Ankur Warikoo Investment Tips : अलीकडच्या काळात श्रीमंतीचा दिखावा करण्याचा विचित्र ट्रेंड समाजात पाहायला मिळत आहे. बाजारात नवीन आलेला महागडा स्मार्टफोन, लक्झरी कार किंवा ब्रँडेड कपडे खरेदी करून श्रीमंत दिसण्याच्या मोहात अनेकजण कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत. पर्सनल लोन आणि क्रेडीट कार्डची वाढलेली प्रचंड संख्या याचाच परिणाम आहे. अशा काळात, प्रसिद्ध उद्योजक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकुर वारिकू आणि त्यांच्या पत्नी रुची वारिकू यांनी तरुणांना श्रीमंत होण्यासाठी ५ सोपे आर्थिक नियम सांगितले आहेत.
१. संपत्ती निर्माण करा, दिखावा नाही
- वारिकू दाम्पत्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पैशाचा वापर दिखाव्यासाठी न करता संपत्ती निर्माण करण्यासाठी करा. अंकुर वारिकू म्हणाले, आमच्याकडे स्वतःची कोणतीही लक्झरी कार नाही. आम्ही प्रवासाठी भाड्याची गाडी वापरतो.
- केवळ चारचौघांत सांगण्यासाठी आम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली नाही. स्वतःचे केवळ एकच घर आहे.
- महागड्या वस्तू किंवा ब्रँडेड गोष्टींवर पैसे खर्च करण्याऐवजी गुंतवणुकीवर भर देतो.
२. आरोग्याबाबत तडजोड नाही
अनेक जण हॉटेलिंग किंवा कपड्यांवर हजारो रुपये खर्च करतात, पण रोजच्या आहारातील भाज्या किंवा धान्यांच्या गुणवत्तेकडे फारसे लक्ष देत नाहीत. वारिकू कुटुंबाचा नियम याच्या अगदी उलट आहे. ते इतर बाबींमध्ये पैशांची बचत करत असले, तरी खाण्यापिण्याच्या बाबतीत सर्वोत्तम गुणवत्तेला प्राधान्य देतात. ते म्हणतात, ‘चांगले आणि सकस अन्न स्वस्त मिळत नाही, हे आम्हाला ठाऊक आहे’. परंतु, आपल्या शरीरात जे जाते, तीच आपली खरी संपत्ती आहे. त्यामुळे आरोग्यासाठी लागणाऱ्या उच्च दर्जाच्या अन्नावर खर्च करताना आम्ही कधीही हात आखडता घेत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
३. वस्तूंऐवजी ‘अनुभवांवर’ खर्च
मोबाईल असो की गाडी… नवीन मॉडेल आलं की अनेकांना ते घ्यायचंच असते. यासाठी ते कर्ज काढायलाही तयार असते. वारिकू कुटुंब वस्तूंऐवजी अनुभवांना जास्त महत्त्व देते. त्यांच्या म्हणण्यानुसार, एखादी वस्तू आपल्याला काही काळापुरतीच आनंद देऊ शकते. याउलट, कौटुंबिक ट्रिप किंवा प्रवासासारखे अनुभव आयुष्यभर आठवणींच्या रूपाने सोबत राहतात. अंकुर वारिकू यांनी सांगितले की, गेल्या एका वर्षात त्यांनी कुटुंबासोबत तब्बल ११६ दिवस प्रवासात घालवले आहेत. अशा अनुभवांमुळे नातेसंबंध घट्ट होतात आणि व्यक्ती म्हणून विकास होतो, असा त्यांचा विश्वास आहे.
४. आधी गुंतवणूक, नंतर खर्च!
आपल्याकडे आधी खर्च आणि उरलेल्या पैशात बचत हीच पद्धत आहे. वारिकू दाम्पत्य म्हणतात, की महिन्याच्या सुरुवातीला उत्पन्न येताच, त्यातील मोठा हिस्सा थेट गुंतवणुकीत जातो आणि जे काही शिल्लक राहते, त्यातच महिन्याचा खर्च भागवला जातो. व्हिडिओ रेकॉर्ड करताना महिन्याचा शेवट असल्याने रुची वारिकू यांनी हसत हसत सांगितले की, त्यांच्या बँक खात्यात फक्त ९,००० रुपये शिल्लक आहेत, तर अंकुर यांच्या खात्यात केवळ ६०० रुपये उरले होते.
५. शिकण्यासाठी ‘नो बजेट’
पाचवा आणि अंतिम नियम सर्वात महत्त्वाचा आहे. नवीन पुस्तके खरेदी करणे, नवीन कौशल्ये शिकणे किंवा कोर्सेस करणे यासाठी या कुटुंबात कोणतीही आर्थिक मर्यादा नाही. ज्ञानावर केलेला खर्च हा कधीही वाया जात नाही, असे ते मानतात. सध्या रुची या मातीची भांडी बनवणे, वॉटरकलर पेंटिंग आणि टेनिस शिकत आहेत, तर अंकुर देखील सतत नवीन गोष्टी आत्मसात करत असतात. त्यांची मुलेही वेगवेगळ्या कला आणि क्रीडा वर्गांमध्ये सहभागी होतात.
