आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात एखादे तरी रोप लावलेले असेलच. पहिली काही वर्षे आपण त्या रोपाची व्यवस्थित काळजी घेतो. लहान रोप मग हळूहळू तग धरते. बरेच उन्हाळे-पावसाळे झेलल्यानांतर त्या इवल्याश्या रोपट्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होते. काही वर्षांनी आपण मागे वळून पाहतो, तेव्हा त्या झाडाचा मोठा होण्याचा प्रवास आपल्याला आठवतो. आज हे लिहिण्याचे कारण म्हणजे, आपण कोटक स्मॉलकॅप फंड या स्मॉलकॅप फंडाचा आढावा घेणार आहोत. स्मॉलकॅप फंडांनी बाजारातील वादळवाऱ्याशी स्पर्धा करत गुंतवणूकदारांसाठी प्रचंड संपत्तीनिर्मिती गेल्या काही वर्षात केली आहे. स्मॉलकॅप फंडाचा प्रवास हा त्या इवल्याश्या रोपट्याच्या अनुभवांचा प्रवास आहे, यात संघर्ष तर आहेच पण सरतेशेवटीचे भरभरून समाधान आहे.
जर तुम्ही १०,००० रुपयांची एक ‘एसआयपी’ कोटक स्मालकॅप फंडात १० वर्षांपूर्वी सुरू केली असती, तर त्याचे जुलै २०२४ रोजीचे गुंतवणूक मूल्य ४१.४३ लाख रुपये असते. (मूळ गुंतवणूक १२ लाख रुपये). याचा १० वर्षांचा ‘एक्सआयआरआर’ गुंतवणूक परतावा तब्बल २३.४२ टक्के एवढा आहे. स्मॉलकॅप कंपन्या लार्ज आणि मिडकॅप कंपन्यांपेक्षा जास्त जोखमीच्या असतात. मात्र त्यांचा परतावा हा त्यांच्यापेक्षा सर्वसाधारणपणे तुलनात्मकदृष्टया अधिक असतो. हरीश बिहानी हे कोटक स्मॉलकॅप फंडाचे व्यवस्थापक असून ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांनी या फंडाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी फंड व्यवस्थापन आणि संशोधन विभागात काम केले असून आयसीआयसीआय म्युच्युअल फंड आणि एसबीआय म्युच्युअल फंडातील सुमारे सोळा वर्षांचा दांडगा अनुभव आहे.
हेही वाचा >>> ‘मालमत्तेच्या वृद्धीपेक्षा सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे’
कोटक म्युच्युअल फंडाच्या माहितीपत्रकानुसार ‘प्रॉफिट टू-जीडीपी’ (सकल देशांतर्गत उत्पादन) गुणोत्तर वाढताना दिसत आहे. ‘नेट डेट-टू-इक्विटी’ हे गुणोत्तर काही वर्षांमधले सर्वात कमी आहे. बँकांमधील ‘एनपीए’ (नॉन-परफॉर्मिंग ॲसेट) खूपच कमी आहेत आणि त्यांचा ताळेबंद निरोगी आहे, ज्याने अर्थव्यवस्थेला मदत होईल. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमध्ये भांडवली खर्च वाढवला जात आहे. गृहनिर्माण अर्थात रिअल इस्टेटची मागणी वाढली आहे. अनुकूल वातावरण असूनही, बाजारातील अतिउत्साही वर्तनापासून सावध राहणे महत्त्वाचे आहे. प्रवर्तक आणि खासगी इक्विटी कंपन्या मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत आणि प्रत्येक पडझडीमध्ये गुंतवणूकदार बाजारात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. आजच्या बाजारात पाऊल टाकताना गुंतवणूकदारांनी जास्त खबरदारी घेतली पाहिजे.
कोटक स्मॉलकॅप फंड व्यवस्थापकाने अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे, जे पुढील पाच ते दहा वर्षांमध्ये चांगली कामगिरी करू शकतील. जिथे नफ्यात स्थिर वाढ अपेक्षित आहे आणि मूल्यांकन आकर्षक आहे. हॉस्पिटल, डायग्नोस्टिक आणि ऑटो, ऑटो ॲन्सिलरी क्षेत्र, दूरसंचार याकडे फंड व्यवस्थापकाचे लक्ष आहे. भांडवल बाजार व्यवसायातील कंपन्यांचा तसेच उत्पादन क्षेत्रातील प्रमुख कंपन्या फंड व्यवस्थापकाच्या विचाराधीन आहेत. शिवाय, रिअल इस्टेटमध्येही वाढ होत आहे आणि याचा लाभार्थी बांधकाम साहित्य क्षेत्र असण्याची शक्यता आहे. भारताचा सध्याचा जीडीपी ३.५ ट्रिलियन डॉलरवरून पुढील १२-१५ वर्षात १० ट्रिलियन डॉलरवर जाईल, असे फंड व्यवस्थापकाला वाटते. अनेक स्मॉल-कॅप कंपन्या भविष्यकाळात आकाराने मोठ्या होतील. भारताच्या वाढीच्या प्रवासाला लाभदायक ठरणारी क्षेत्र, कंपन्या शोधण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
कोटक स्मॉलकॅप फंडाच्या गुंतवणूक पद्धतीनुसार स्मॉल-कॅप कंपन्यांना तीन भागात विभागलेले आहे. ‘क्वालिटी कंपाउंडर्स, नॉर्मलसी कॅन्डिडेट्स आणि वेल्थ डिस्ट्रॉयर्स’. यातील ‘क्वालिटी कंपाउंडर्स’ या अशा कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या महत्त्वाच्या समस्यांचे उत्तर शोधतात, त्या उत्कृष्ट व्यवस्थापकांकडून आणि प्रवर्तकांकडून चालवल्या जातात. तीन ते चार वर्षांमध्ये या कंपन्यांच्या नफ्यात चांगली वाढ अपेक्षित आहे. ‘नॉर्मलसी कॅन्डिडेट्स’ हे तात्पुरत्या समस्यांना तोंड देत असलेल्या कंपन्या आहेत. परंतु त्यांच्याकडे मजबूत ताळेबंद आहेत. त्या वाईट काळात टिकून राहू शकतात आणि मजबूत होऊ शकतात. तिसरी यादी ‘वेल्थ डिस्ट्रॉयर्स’ आहे. या कंपन्यांना टाळले जाते कारण त्यांचे व्यवसाय प्रारूप चुकीचे आहे. बिघडलेले नफा-तोटा खाते, अयोग्य ताळेबंद आणि सदोष व्यवस्थापन या कंपनांच्या कमकुवत बाजू आहेत. अशा कंपन्यांना वगळले जाते. तेजीच्या बाजारपेठेत तात्पुरती चांगली कामगिरी केली तरीही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक होत नाही. ‘वेल्थ डिस्ट्रॉयर्स’ टाळताना ‘क्वालिटी कंपाउंडर्स’ आणि ‘नॉर्मलसी कॅन्डिडेट्स’ यांचे समतोल मिश्रण राखणे हे या फंडाचे धोरण आहे.
हेही वाचा >>> बँकांच्या डिजिटल व्यवहारातील फसवणूक आणि नुकसानभरपाई
स्मॉलकॅप विश्व खूप मोठे आहे. यात काही कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतात आणि त्यांना नेहमीच मागणी असते. वाढलेल्या मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर चांगल्या स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत राहणे यासाठी निरंतर खूप खोलवर अभ्यास करणे गरजेचे आहे. हेही आपल्यास माहिती पाहिजे की सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारभांडवल किती आहे. ‘ॲम्फी’ माहितीनुसार, २५१ व्या कंपनीचे सरासरी बाजार मूल्य आता सुमारे २७,००० कोटी रुपये आहे, जे पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत सुमारे चार पट आहे. याशिवाय, गेल्या पाच वर्षांत अनेक नवीन कंपन्यांनी त्यांचे ‘आयपीओ’ आणल्याने स्मॉलकॅप विश्वाचा विस्तार होण्यास मदत झाली आहे. परंतु, वाढलेल्या मूल्यांकनामुळे सर्वच फंड व्यवस्थापकांचे काम अधिक आव्हानात्मक झाले आहे.
परताव्याच्या दृष्टीकोनातून पाहिले तर कोटक स्मॉल कॅप फंडासाठी २०२३ हे वर्ष चांगले नव्हते, परंतु अलिकडच्या काही महिन्यांत लक्षणीय सुधारणा झालेली आहे. अर्थव्यवस्थेच्या चांगल्या काळात निर्देशांकापेक्षा जास्त परतावा देणे आणि कमकुवत काळात निर्देशांकापेक्षा कमी पडझड होणे याकडे कोटक म्युच्युअल फंड व्यवस्थापनाचा कटाक्ष असतो. दीर्घकालीन संपत्तीनिर्मिती करणे हाच सुरवातीपासून आजपर्यंत फंडाचा प्रमुख दृष्टिकोन राहिला आहे. फंडाच्या पहिल्या पाच गुंतवणूक क्षेत्रात ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू, वाहन निर्मिती आणि सुटे भाग, आरोग्यनिगा आणि बांधकाम यांचा समावेश आहे. जुलै २०२४ रोजी मागील ५ वर्षांचा वार्षिक परतावा ३३.६९ टक्के, ३ वर्षांचा वार्षिक परतावा २२.८४ टक्के आणि योजनेच्या सुरुवातीपासूनचा (फेब्रुवारी २००५) वार्षिक परतावा १८.६३ टक्के राहिला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपला विश्वास असेल आणि दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीच्या विचाराचे तुम्ही खंदे समर्थक असाल, तर आज स्मॉलकॅप फंडाचे छोटेसे रोपटे तुम्ही नक्की लावा. माती अधीर आहे.
समाप्त