आर्थिक नियोजन म्हणजे काय? तर मिळकत, खर्च आणि गुंतवणुकीचा ताळमेळ होय. पैसे हातात आले की, त्यातून खर्च करायचा, ठरावीक रक्कम गुंतवायची आणि भविष्याची तरतूद करायची असे सरळ समीकरण आहे हे. हो ना? त्याच्यासाठी खूप डोकेफोड करायला हवी असं वाटत नाही. बरोबर ना? सहा आकडी मासिक मिळकत असणाऱ्यांना तर यात काहीच कठीण वाटत नाही. कारण आजच्या घडीला त्यांच्या हातात कदाचित त्यांच्या गरजेपेक्षा खूप जास्त रक्कम शिल्लक राहत असेल. नोकरीमध्ये खूप यश मिळालं असेल किंवा इतर कोणाची जबाबदारी नसेल. तेव्हा मौजमजा करायला काहीच हरकत नाही. हेच जेव्हा आपण कमी मिळकत असणाऱ्या कुटुंबाकडे बघतो, तर तिथे आयुष्यभर कदाचित काटकसर करून आला दिवस पुढे ढकलावा लागतो. तसं पाहायला गेलं तर इथे पैसे पुरत नाही तर उरणार कसे? मात्र सहा आकडी पगार असणारे पैसे गुंतवू शकले असते. मात्र त्यांना दूरदृष्टी आणि परिस्थितीची संपूर्ण जाणीव नसल्याने वेळेवर आणि मुळात हवी तेवढी गुंतवणूक न झाल्याने पुढील काळामध्ये निवृत्ती निधी कमी पडू शकतो. ही जाणीव आपल्यातील बऱ्याच जणांना होतंच नाही. इथवर आलो तर मग इथून पुढेही निभावेल असा भाबडा विश्वास कदाचित यांना वाटत असावा.

माझ्या कामामुळे मला अनेकांचे आर्थिक आराखडे पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी गुंतवणुकीतील सातत्य दिसत नाही, तर अनेक ठिकाणी खर्चांवर अंकुश नसतो. परंतु काही विशिष्ट लोकांचे आर्थिक नियोजन वेगळं होतं. जेव्हा सखोल अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या बाबतीतील काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात आल्या. एक म्हणजे आयुष्यात आर्थिक यश मिळवण्यासाठी फक्त उच्च शिक्षण गरजेचं नसतं. असे अनेक जण माझ्या संपर्कात आहेत, जे हुशार आहेत पण उच्च शिक्षित नाहीत. मात्र त्यांनी पैशांचे व्यवहार करताना खूप काळजी घेतली. मुळात नुकसान कसं कमी होईल? कुठे? कधी? आणि किती जोखीम घ्यायची? हे काटेकोरपणे पाळलं आणि आपल्या गुंतवणुकीचा व्यवस्थित हिशोब ठेवला. शिवाय काहींच्या बाबतीत तर ही बाबसुद्धा दखल घेण्यासारखी होती की, त्यांनी जास्त कर्ज घेतली नाहीत. पहिल्या घरासाठी कदाचित गृह कर्ज घेतलं, परंतु इतर कशासाठी नाही. चैनीसाठी तर अजिबात नाही. शिवाय राहणीमानाचे खर्चसुद्धा बेतात ठेवले. त्यामुळे कमाईच्या वर्षांमध्ये त्यांचा बराचसा पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवला गेला आणि पुढे निवृत्तीच्या वेळेला त्यांच्याकडे चांगला निधी तयार झाला. पुढे जरी आरोग्यासंबंधी खर्च वाढले तरीसुद्धा आरोग्य विमा आणि हातातील जास्तीचा पैसा त्यांना वापरता आला. ही गोष्टसुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे की, असे गुंतवणूकदार भरपूर वाचन करतात, आधी थोडे पैसे घालून गुंतवणुकीचा अनुभव घेतात आणि मग हळूहळू अधिक पैसे निवडलेल्या पर्यायामध्ये घालतात. असं केल्याने नुकसान जरी झालं, तरी ते कमी पैशांचं होतं. चुकीतून शिकता येतं आणि गुंतवणुकीच्या लांब प्रवासातील पुढील पाऊल पक्कं होतं.

हेही वाचा…Money Mantra: इन्शुरन्स पॉलिसी- फ्री लूक परियड म्हणजे काय? तो कसा वापरावा?

मुळात आर्थिक आराखडा आयुष्यात लवकर बांधता आला, तर त्याचे फायदे अनेक आहेत. तो लवकर का बांधावा यामागे ठोस कारणेदेखील आहेत बरं का.

१. आधी एकत्र कुटुंब पद्धत असल्याने खर्च वाटले जात होते. वाणसामान, सणवार, भेटवस्तू, मुलांचे संगोपन हे सामायिक असल्याने जर मिळकत चांगली असेल तर बचतसुद्धा होत होती. आता तसं नाहीये. प्रत्येकाचं सगळं वेगवेगळं असल्याने सगळे खर्चसुद्धा त्याच पटीने वाढले. शिवाय अनेक वेळी तर मोठ्या शहरांमध्ये घर घेताना नाकी नऊ येऊ लागले आहेत.
२. आधी अनेक लोक नोकरी संपल्यानंतर निवृत्ती वेतनावर जगत होती. शहरातील नोकरी संपली की, गावी जाऊन आहे त्या निवृत्ती निधीमध्ये त्यांचं भागत होतं. परंतु आता अनेक लोकांना मुळात निवृत्ती वेतन नाहीये. जरी असली तरी जिथे पगारच कमी होता तिथे हे तुटपुंजे निवृत्ती वेतन तरी कसे पुरणार?
३. आरोग्याचे खर्च एकेकाळी कमी होते. मुळात आयुर्मान कमी, वैद्यकीय सुविधांचा तुटवडा आणि प्रवासाची गैरसोय असल्याने औषध व रुग्णालयासंबंधी खर्च तसे कमी होते. परंतु आज एकीकडे आयुर्मान वाढलं, वैद्यकीय सुविधा मिळू लागल्या आणि त्यात अजून प्रवासाची सोय झाल्याने मोठ्या रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घेता येऊ लागले. औषधे मिळू लागली आणि तसतसे आजारदेखील बळावले. जे आजार साठीनंतर लागत होते ते चाळिशीतच होऊ लागले आहेत. या सर्वांचा परिणाम निवृत्तीआधीच्या बचतीवर आणि निवृत्तीनंतरच्या खर्चांवर खूप मोठ्या प्रमाणात होताना लक्षात येतो आहे.
४. राहणीमानाचे खर्च तर वाढते राहिले आहेत. आधी गावी घर आणि शहरात नोकरी होती, पिढ्यानपिढ्या त्याच घरात लोकं राहात होती. फक्त डागडुजीचे खर्च असायचे. आता जिथे-जिथे नोकरी तिथे-तिथे घर, वीकएंड होम, फार्म हाऊस इत्यादी प्रकारसुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. बरं या प्रत्येकाचे खर्च, त्यांच्यातून होणारी मिळकत आणि त्यांच्यासाठी घेतलेली कर्ज यांच्यावर लक्ष असेल तर ठीक, नाहीतर किती मिळतंय आणि किती जातंय याबाबत काहीच माहीत नसतं अनेकांना.

हेही वाचा…Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?

५. घटस्फोटित, एकेरी पालकत्व स्वीकारणारे, आयुष्यभर अविवाहित राहणारे, मुलं नको असणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला, कुटुंबात आपल्याला दिसतात. अर्थात त्यांच्या निर्णयाबद्धल मला काहीच म्हणायचं नाहीये. मात्र या कारणांमुळेसुद्धा कौटुंबिक सुरक्षितता कमी पडते, आर्थिक मेहेनत जास्त घेऊन बऱ्यापैकी जास्त निवृत्ती निधी जमवावा लागतो.

६. शिक्षणाचा खर्चसुद्धा प्रत्येक वर्षी वाढतोय. एके काळी मॅट्रिक परीक्षा पास झाली तरी नोकरी मिळत होती. परंतु आज उच्च शिक्षण घेऊनसुद्धा अनेकांना वेळेवर आणि मनाजोगी नोकरी मिळत नाहीये. परदेशी शिकायला गेलेल्या मुलांना तर ही चणचण जास्त जाणवू लागली आहे. शैक्षणिक कर्ज मिळाल्यामुळे आणि निरनिराळे पर्याय उपलब्ध झाल्याने आज मुलं सहजगत्या वेगवेगळे पर्याय शिकत आहेत. एवढा खर्च आणि मेहनत करून पुढे नक्की कोणत्या प्रकारची नोकरी मिळेल किंवा उद्योग करायचा झाला तर किती भागभांडवल लागेल याबाबतीत विचार पक्का नसतो. त्यामुळे पालकांच्या आर्थिक आराखड्यावर अनेक वर्षं ताण येताना जाणवत आहे.

हेही वाचा…क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…

वरील सर्व बाबी वेळेवर लक्षात घेऊन केलेलं नियोजन फायद्याचं तेव्हाच ठरतं, जेव्हा सक्रिय पद्धतीने आपली उद्दिष्ट गाठून आपण निश्चिन्त होतो. इथे सक्रिय राहाणं का गरजेचं आहे बरं? आपला कमाईचा काळ आणि निवृत्तीचा काळ बराच मोठा असतो. आज आराखडा बांधताना आपण फार फार तर मागील ५ वर्षांचा काळ लक्षात घेऊन त्यानुसार पुढील अंदाज बांधतो. मग ते महागाई असूदेत किंवा पोर्टफोलिओचे परतावे. नियोजन कितीही काटेकोरपणे केलं तरीदेखील आपले अंदाज बरोबर आहेत का याची शहानिशा वेळोवेळी करावी लागते. एक उदाहरण इथे आपण घेऊया. आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी जर एखाद्याने आज ५० लाख रुपये बाजूला काढले आणि १२ टक्के परतावा दर व १० टक्के महागाईचा अंदाज बांधला तर ५ वर्षांनंतर खर्च ८० लाख आणि जमा रक्कम ८८ लाख असेल. जर परतावा २ टक्क्यांनी कमी झाला आणि महागाई २ टक्क्याने वाढली, तर इथे खर्चासाठी ८ लाख कमी पडतील. मग ते पुरवताना एकतर इतर गुंतवणुकीतून काढले जातील किंवा कर्ज घेतलं जाईल. कर्ज बेतात असेल तरीही ठीक, परंतु भरपूर कर्ज आणि कमी पगाराची नोकरी असं झालं तर?

एखाद्या पोर्टफोलिओच्या जोखीम आणि परताव्याच्या बाबतीत वेळोवेळी मागोवा घ्यावा लागतो. मागील ४ वर्षांमध्ये समभागसंलग्न परतावे बघून जर एखाद्याने पुढील अंदाज बांधले तर कदाचित फसगत होऊ शकेल. शेअर बाजार वरच जातो असं नेहमीच होत नाही. तेव्हा पोर्टफोलिओमध्ये नक्की कशाचं प्रमाण किती आहे? कुठे फायदा काढून ठेवावा? कोणत्या पर्यायातून येणाऱ्या काळात फायदा होऊ शकतो? आणि कधी निष्क्रिय राहावं? या सर्व महत्त्वाच्या गोष्टी समजून त्यानुसार वेळीच निर्णय घेतलेले बरे. ‘लॉस मिनिमायझेशन’ म्हणजेच तोटा कमी करणे आणि ‘रिस्क ऑप्टिमायझेशन’ म्हणजेच झेपेल तेवढीच जोखीम, या दोन आधारस्तंभांवर आपला पोर्टफोलिओ बनवला आणि पुढे नियमितपणे सांभाळला तर वेळीच योग्य ते बदल करून आपली आर्थिक उद्दिष्टे साधता येतील.

हेही वाचा..युद्धसदृश काळातील गुंतवणूक व्यवस्थापन.

येणाऱ्या काळात महागाई जास्त राहील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. भू-राजकीय संघर्षांमुळे तेलाच्या आणि इतर वस्तूंच्या किमती वाढतील, पाऊस नीट पडला नाही तर अन्नधान्य महाग होईल. बँकांचे व्याजदर वाढलेले राहतील किंवा अजून वाढतील आणि या सर्वांचा परिणाम हा उद्योगांच्या नफ्यावर होईल. तेव्हा आपल्या पोर्टफोलिओवर, मिळकतीवर आणि खर्चांवर इथून पुढे जास्त लक्ष ठेवावं. काम मेहनतीचं आहे खरं, पण जर फायदा मिळणार असेल तर नक्कीच करावं!

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख केवळ मार्गदर्शनपर आहे.