करदात्याला आर्थिक वर्षात (म्हणजे १ एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत) मिळालेल्या उत्पन्नावर कर भरावा लागतो. काही करदात्यांकडून हा कर उद्गम कराच्या (टीडीएस) रूपाने, गोळा केल्या जाणाऱ्या कराच्या (टीसीएस) रूपाने वसूल केला जातो. असे वसूल केलेले कर जर करदात्याच्या करदायित्वापेक्षा जास्त असतील तर करदात्याला विवरणपत्र दाखल करून कराच्या परताव्याचा (रिफंड) दावा करावा लागतो. जर करदात्याचे करदायित्व वसूल केलेल्या करापेक्षा जास्त असेल तर बाकी कर करदात्याला स्वतः भरावा लागतो.असा कर जर करदात्याला भरावा लागला तर तो कधी आणि किती भरावा यासाठी प्राप्तिकर कायद्यात काही तरतुदी आहेत. हा कर भरण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.एक म्हणजे अग्रिम कर (अॅडव्हान्स टॅक्स) आणि स्वःनिर्धारण कर (सेल्फ असेसमेंट टॅक्स). हे दोन्ही कर कधी भरावे यासाठी काही नियम आहेत. हे वेळेवर न भरल्यास करदात्याला व्याज भरावे लागते. हा कर कोणी आणि कधी भरावा याच्या तरतुदी खालीलप्रमाणे :

१. अग्रिम कर : हा कर करदात्याला आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भरावा लागतो. उदा. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अग्रिम कर २०२५-२६ या आर्थिक वर्षातच भरावा लागतो. या वर्षासाठी ३१ मार्च, २०२६ नंतर केलेल्या कराचा भरणा अग्रिम कर म्हणून समजला जात नाही.

अग्रिम कर कोणी भरावयाचा आहे : ज्या करदात्यांचे अंदाजित करदायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात. ज्या करदात्याच्या उत्पन्नातून उद्गम कर (टीडीएस) कापला जातो किंवा कर गोळा केला जातो (टीसीएस) अशा करदात्यांना अग्रिम कराच्या तरतुदीसाठी अंदाजित करदायित्व गणताना उत्पन्नावरील उद्गम कर वजा केल्यानंतर देयकर १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर अग्रिम कर भरावा लागतो. हा कर, करदाता ४ हफ्यात भरू शकतो.

अग्रिम कर कसा गणावा आणि किती भरावा :

करदात्याने आर्थिक वर्षात अंदाजित उत्पन्नाचा आढावा घेऊन, त्या उत्पन्नातून प्राप्तिकर कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या वजावटी (गृहकर्ज, कलम ८०सी, वगैरे) विचारात घेऊन बाकी उत्पन्नावर एकूण किती कर भरावा लागेल याची गणना करावी किंवा करदाता नवीन करप्रणालीनुसार (वजावट आणि सवलती न घेता सवलतीच्या दरात कर) कर भरणार असेल तर त्यानुसार देय कर गणावा. या रकमेतून उद्गम कर आणि टीसीएस वजा करावा आणि बाकी कर हा अग्रिम कराच्या रूपाने भरावा. अग्रिम कराचा पहिला हप्ता या एकूण अंदाजित कराच्या (उद्गम कर आणि टीसीएस वजा जाता) १५ टक्के इतका १५ जूनपूर्वी, दुसरा हप्ता अंदाजित कराच्या एकूण ४५ टक्के इतका १५ सप्टेंबरपूर्वी, तिसरा हप्ता अंदाजित कराच्या एकूण ७५ टक्के इतका १५ डिसेंबरपूर्वी, चौथा हप्ता अंदाजित कराच्या एकूण १०० टक्के इतका १५ मार्चपूर्वी भरावा लागतो. हा कर करदात्याला आर्थिक वर्षातील अंदाजित उत्पन्न आणि अंदाजित उद्गम कर आणि गोळा केलेला कर विचारात घेऊन गणावा लागतो. असे अंदाज आर्थिक वर्षात बदलू शकतात, असे बदललेले अंदाजित उत्पन्न विचारात घेऊन करदात्याने पुढील हप्ता भरावा. उदा. करदात्याने २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा, अग्रिम कराचा पहिला हप्ता भरताना आपले अंदाजित उत्पन्न आणि उद्गम कर विचारात घेऊन एकूण करदायित्व (उद्गम कर वजा जाता) ५०,००० रुपये गणले त्यानुसार पहिला हफ्ता १५ जून पूर्वी १५ टक्के म्हणजे ७,५०० रुपये भरले आणि १५ सप्टेंबर २०२५ पूर्वी १५,००० रुपये असे एकूण ४५ टक्के म्हणजे २२,५०० रुपये भरले. नोव्हेंबर २०२५ मध्ये करदात्याला काही समभाग विकावे लागले. हे उत्पन त्याने जून आणि सप्टेंबरमध्ये अग्रिम कर भरताना विचारात घेतले नव्हते.

अग्रिम कराचा तिसरा हप्ता भरताना करदात्याला हे उत्पन्नसुद्धा विचारात घ्यावे लागेल आणि अंदाजित कर गणावा लागेल. समभाग विक्रीवरील कर विचारात घेऊन आता त्याचे अंदाजित करदायित्व ८०,००० रुपये झाले, त्याला तिसरा हफ्ता, १५ डिसेंबर २०२५ पूर्वी, भरताना अंदाजित करदायित्वाच्या एकूण ७५ टक्के म्हणजेच ६०,००० (८०,००० रुपयांच्या ७५ टक्के) कर भरावा लागेल. या ६०,००० रुपयांपैकी त्याने २२,५०० रुपयांचे पहिले दोन हफ्ते भरले होते, त्यामुळे त्याला १५ डिसेंबर २०२५ पूर्वी ३७,५०० भरावे लागतील. अग्रिम कराचा चौथा हफ्ता भरताना त्याचे उत्पन्न आणि करदायित्व बदलले नाही, तर त्याला पूर्ण ८०,००० रुपये म्हणजेच बाकी २०,००० रुपये अग्रिम कर भरावा लागेल.

अग्रिम कर कसा भरावा : अग्रिम कर ऑनलाइन किंवा बँकेत चलन देऊन भरता येतो, यासाठी २८० क्रमांकाचे चलन (कोड १००) वापरून अग्रिम कर भरता येतो.

अग्रिम कर कोणाला लागू नाही : (१) ज्या करदात्यांचे करदायित्व उद्गम कर आणि गोळा केलेला कर वजा जाता १०,००० रुपयांपेक्षा कमी आहे,

(२) निवासी ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही, अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत.
अनुमानित कराचा लाभ घेणाऱ्यांसाठी : करदाता अनुमानित कराच्या योजनेचा लाभ घेणार असेल, म्हणजेच कलम ४४ एडी किंवा ४४ एडीएनुसार अनुमानित कर भरण्यासाठी पात्र असेल आणि या कलमांतर्गत कर भरत असेल तर अशा करदात्यांना १०० टक्के देय कर १५ मार्चपूर्वी भरावा लागेल.

अग्रिम कर न भरल्यास, कमी किंवा उशिरा भरल्यास : अग्रिम कर न भरल्यास, कमी भरल्यास किंवा मुदतीनंतर भरल्यास व्याज भरावे लागते.
अग्रिम कर जास्त भरल्यास : अग्रिम कर जास्त भरल्यास विवरणपत्र भरून कर परताव्याचा (रिफंड) दावा करता येतो.

१. प्राप्तिकर खात्याकडून आदेश : जर प्राप्तिकर खात्याकडून, मागील वर्षाच्या उत्पन्नाचे नियमित मूल्यांकन (असेसमेंट) केले गेले असेल आणि करदात्याने अग्रिम कर भरला नाही (किंवा भरलेला अग्रिम कर आवश्यक रकमेपेक्षा कमी असेल) तर करनिर्धारण अधिकारी कलम २१०(३) अंतर्गत आदेश देऊ शकतो. ज्यामध्ये त्याला त्याच्या चालू वर्षाच्या उत्पन्नावर (कर भरावा लागणाऱ्या हप्त्यांची रक्कम निर्दिष्ट करून) अग्रिम कर भरण्याचा आदेश देऊ शकतो. असा आदेश २८ फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो. जर करदात्याचे अंदाजित करदायित्व करनिर्धारण अधिकाऱ्याच्या अंदाजापेक्षा कमी असेल, तर करदात्याला सध्याच्या उत्पन्नाचा/अग्रिम कराचा स्वतःचा अंदाज सादर करता येतो आणि त्यानुसार कर भरता येतो. अशा परिस्थितीत, त्याला फॉर्म क्रमांक २८अमध्ये करनिर्धारण अधिकाऱ्याला सूचना पाठवावी लागते.

२. स्वःनिर्धारण कर : हा कर म्हणजे बाकी कर, आर्थिक वर्ष संपल्यानंतर आणि विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी भरावा लागतो. जेव्हा करदात्याचे करदायित्व एकूण भरलेल्या करापेक्षा (उद्गम कर, गोळा केलेला कर आणि अग्रिम कराच्या रूपाने भरलेला) जास्त असते तेव्हा त्याला बाकी कर स्वःनिर्धारण कर या नावाने भरावा लागतो. हा कर भरण्यासाठी ठरावीक मुदत नाही, परंतु हा, विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी भरावा लागतो. हा कर ऑनलाइन किंवा बँकेत चलन देऊन भरता येतो, यासाठी २८० क्रमांकाचे चलन (कोड ३००) वापरून स्वःनिर्धारण कर भरता येतो. संपूर्ण स्व-निर्धारण कर न भरता विवरणपत्र दाखल केल्यास ते सदोष मानले जाते.

करदात्यांना २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे अंदाजित उपन्न आणि करदायित्व वर दर्शविल्याप्रमाणे गणून अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत असतील तर अंदाजित कराच्या ७५ टक्के रक्कम १५ डिसेंबर, २०२५ पूर्वी भरून कायद्याचे अनुपालन करता येईल आणि व्याजापासून सुटका करून घेता येईल

प्रवीण देशपांडे

pravindeshpande1966@gmail.com