Bank Nominations: शहरांमध्ये तर प्रत्येक नागरिकाचे साधारणतः बँक खाते असतेच असते. आताशा ग्रामीण भागांमध्येही बँका सर्वत्र पोहोचल्या आहेत. त्यामुळे प्रतिवर्षी बँक खात्यांची संख्या वाढतेच आहे. पण त्याच बरोबर आणखी एक आकडेवारीही भरमसाठ वाढते आहे आणि ती नागरिकांसाठी अधिक चिंताजनक आहे. बँक खाती तर उघडली जातात पण अनेकदा त्यासाठीचे नामांकन अर्थात नॉमिनेशन भरले जात नाही. त्यामुळे तुमच्या मृत्यूनंतर त्यातील रक्कम, तिचे अधिकार कुणाकडे जाणार याविषयी कायदेशीर स्पष्टता नसते आणि त्यामुळेच तुमचे वारसदार त्या रकमेपासून वंचित राहतात. गेल्या वर्षी ही रक्कम तब्बल ६७ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. म्हणूनत तुमचे वारसदार या हक्कांपासून वंचित राहून नयेत, म्हणून सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, त्याविषयी जाणून घेऊ!
बँक ग्राहकाची आपल्या बँकेत विविध प्रकारची ठेव खाती असतात, जसे की बचत खाते, मुदत ठेव खाते, लॉकर खाते. सबंधित ग्राहक हयात असेपर्यंत बहुदा ही खाती सुरळीत चालू असतात. तथापि, बँक खातेदारचा मृत्यू झाल्यावर मयत खातेदारच्या नावे शिल्लक असलेली रक्कम नेमकी कोणाच्या नावावर वर्ग करावयाची ही बऱ्याचदा क्लिष्ट गोष्ट होऊन जाते. त्यात अनेक कायदेशीर अडचणी येतात. त्यावर मात कशी करणार? त्यासाठीच ग्राहकाने अर्थात कुटुंबांच्या संदर्भात विचार करता कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. कारण मृत्यू कधीही कुणालाही सांगून येत नाही. आपल्यानंतर कुटुंबीयांची अडचण होऊ न देणे हे आपल्या कुटुंबासाठी सर्वाधिक महत्त्वाचे असते. तुमचे प्राण गेले या धक्क्यातून सावरताना पुन्हा त्यात या कायदेशीर अडचणींना सामोरे जाणे कुटुंबासाठी अवघड असते.
एखाद्याच्या मृत्यूनंतर प्रसंगी खात्यावर रक्कम शिल्लक असतानादेखील पत्नी/ मुले (वारसांना) आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. तर कित्येकदा क्लेम प्रक्रिया क्लिष्ट वाटत असल्याने अशा शिल्लक रकमेवर वारसाकडून दावा न केला गेल्याने अशी रक्कम बॅंकेकडे अनक्लेम्ड स्वरुपात पडून राहते. कारण काहीही असले तरी तुमची रक्कम अशा प्रकारे पडून राहणे हे कुटुंबासाठी वाईटच. तुमच्या मेहनतीची रक्कम तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबीयांना मिळणे हे खूप महत्त्वाचे आहे.
२०२५ या वर्षाच्या मधपर्यंत बँकांकडील अशी अनक्लेम्ड ठेवीची रक्कम सुमारे रु.६७,००० कोटी इतकी आहे. यावर उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेने सक्रीय पाउल उचलले असून आता १ नोव्हेंबर २०२५ पासून नॉमिनेशन प्रक्रिया आता आणखी सुलभ केली आहे.
ही नवीन नॉमिनेशन प्रक्रिया कशी आहे ते आपण खालील प्रश्नोत्तरातून समजून घेऊ.
प्रश्न १: बँकेतील विविध ठेव खात्यांसाठी नॉमिनेशन मध्ये नेमके काय बदल झाले आहेत ?
उत्तर: आता एकाहून अधिक पण जास्तीतजास्त चार नॉमिनी बँकेतील विविध ठेव खात्यांसाठी १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाली आहेत. या आधी फक्त एकच नॉमिनी देता येत असे. ( जर दुसरा नॉमिनी असेल तर पहिला नॉमिनी हयात नसेल तरच दुसरा क्लेम करू शकत असे)
प्रश्न २: नवीन बदलानुसार नॉमिनेशन कसे करता येईल ?
उत्तर: नवीन बदलानुसार नॉमिनेशन दोन प्रकारे करता येईल
पर्याय पहिला: एकाच वेळी (सायमलटेनियस) चार जणांचे नामनिर्देशन (नॉमिनेशन) करणे व त्यात प्रत्येकाचा हिस्सा किती असेल याचा स्पष्ट उल्लेख करणे.
पर्याय दुसरा: सलग (सक्सेसिव्ह) चार जणांचे नामनिर्देशन (नॉमिनेशन) करणे. या पद्धतीमध्ये जरी चार जणांचे नामनिर्देशन करता येत असले तरी खातेदारच्या मृत्यूनंतर ज्या क्रमाने (ऑर्डर) नामनिर्देशन केले असेल त्या क्रमानुसार हयात असणाऱ्या पहिल्या व्यक्तीस संपूर्ण रक्कम वर्ग केली जाईल.
प्रश्न ३: नवीन बदलानुसार लॉकरसाठीचे नॉमिनेशन कसे असणार आहे?
उत्तर: लॉकरसाठी मात्र फक्त पर्याय दोन प्रमाणे नॉमिनेशन करता येईल. पर्याय पहिला लॉकरसाठी वापरता येणार नाही.
प्रश्न ४: आता नॉमिनीच ठेवी अथवा लॉकर मधील चीजवस्तूंचा हक्कदार असेल का?
उत्तर: नाही , नॉमिनी सर्व वारसांच्या वतीने ठेवी अथवा चीजवस्तूंचा ताबा घेऊ शकेल. प्रत्यक्ष मालकी मृत्यूपत्र (वील) असल्यास त्यानुसार आणि नसल्यास वारसा ह्क्कानुसारच असेल.
प्रश्न ५: एकाच बँकेत एकाहून अधिक ठेव खाती असतील तर एकच नॉमिनेशन देता येईल का?
उत्तर: होय , जर तुमच्या एकाच बँकेत विविध ठेव खाती असतील तर सबंधित बँकेस विनंती करून एका खात्यास दिलेले नॉमिनेशन उर्वरित खात्यासाठी लागू करण्याबाबत सांगू शकता. यामुळे प्रत्येक ठेव खात्यास वेगळे नॉमिनेशन देण्याची गरज पडणार नाही.
