वसंत माधव कुळकर्णी
एका विशिष्ट कालावधीत गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याच्या दरातील आणि गुंतवणूकदारांनी त्या गुंतवणुकीवर प्रत्यक्षात मिळविलेल्या परताव्याच्या दरातील फरक म्हणजे ‘बिहेवियर गॅप’ होय. याचा अर्थ गुंतवणूक परतावा आणि गुंतवणूकदार परतावा जवळजवळ नेहमीच वेगळा असतो. हे कशामुळे घडते, याच्या परिणामाचा हा वेध… एप्रिल २०२२ पर्यंत तीन वर्षांच्या कालावधीत एका सर्वोत्तम कामगिरी केलेल्या फंडाने वार्षिक ४० टक्के परतावा दिला. परंतु या फंडातील बहुतांश गुंतवणूकदारांना फक्त २० टक्के परतावा मिळाला. ही तफावत २० टक्के म्हणजे थेट निम्मी आहे. कारण या फंडात सुमारे ७५ टक्के गुंतवणुकीचा ओघ मागील एका वर्षातच आला.
आर्थिक वर्तनामुळे परताव्यात वाढणाऱ्या फरकामागील कारण तुम्ही चुकीची गुंतवणूक निवडली हे नाही, तर ती गुंतवणूक भावना किंवा नजीकच्या परताव्याने प्रेरित होऊन केली आहे. गुंतवणूकदाराचे वर्तन कदाचित त्याच्याकडे असणाऱ्या कौशल्यापेक्षा म्हणूनच खूप जास्त महत्त्वाचे असते.
तोंडाने ‘बाय लो, सेल हाय’ असे म्हणताना बरोबर उलट वर्तन केले जाते. प्रत्येक निर्णय दिलेल्या क्षणी तर्कसंगत वाटला तरी काही वर्षानंतर तो चुकीचा ठरतो. विडंबन असे की, भावनेच्या आधारे घडू नये यासाठी केलेली योजकता म्हणजे ‘एसआयपी’ आणि तीच आर्थिक दुर्वर्तनाच्या बळी जाते.
कोऽहम् हा एक संस्कृत शब्द. त्याचा अर्थ ‘मी कोण आहे?’ असा होतो. गुंतवणूकदाराला सुद्धा ‘स्व’चा शोध घेणे आवश्यक आहे. उपलब्ध असलेला प्रत्येक मालमत्ता वर्ग हा आपल्या जोखीम क्षमतेला साजेसा आहे अथवा नाही हे न पाहताच आजमावणे जरुरीचे नाही. तथापि समाजमाध्यमे, जाहिराती किंवा मार्केटिंग साहित्याचा प्रभाव पाहता, गुंतवणूक हा केवळ अंकगणिताचा खेळ नसून तो मानसिकतेचा खेळ बनला आहे, याचा वारंवार प्रत्यय येतो.
जानेवारी २०२६ या महिन्यात २४,००० कोटी समभागसंलग्न (इक्विटी) फंडात गुंतविण्यात आले. परंतु यापेक्षा जास्त रक्कम त्याच जानेवारीत सोन्यात गुंतविण्यात आली. कारण गेल्या एका वर्षात ‘गोल्ड फंडां’नी ७८ टक्के वार्षिक परतावा दिला. साधारण दोन वर्षांपूर्वी हीच परिस्थिती मिडकॅप आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांच्या बाबतीत होती. अनेकांनी आपल्या लार्जकॅप किंवा फ्लेक्झीकॅपमधील ‘एसआयपी’ बंद करत मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडात ती तेव्हा सुरू केली होती. दोन वर्षांपूर्वीचे चित्र आणि आजचे चित्र पूर्णपणे वेगळे आहे.
मागच्या काळातील अथवा अलीकडील कामगिरीच्या आधारावर खरेदी (किंवा विक्री), एखाद्या मालमत्ता प्रकाराचा पाठलाग करणे किंवा बाजार तात्पुरता खाली असताना गुंतवणुकीतून बाहेर पडणे हे मानसिक खेळच. मात्र असे निर्णय तुमच्या पोर्टफोलिओचा घात करू शकतात. यासाठी स्वत:ला ओळखणे म्हणजे ‘रिस्क प्रोफाइलिंग’ करणे आणि त्यानुसार गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तुम्ही आजपर्यंत कधी एखाद्या मालमत्ता वर्गात परतावा आकर्षक आहे म्हणून गुंतवणूक केली आणि तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक परतावा मिळाला आहे का?
दशकापूर्वी, कार्ल रिचर्ड्स यांनी ‘द बिहेवियर गॅप: सिंपल वेज टू स्टॉप डुइंग डंब थिंग्ज विथ मनी’ हे पुस्तक प्रकाशित केले. एका निश्चित कालावधीत गुंतवणुकीने नैसर्गिकरीत्या मिळणारा परतावा आणि त्याच गुंतवणुकीत गुंतवणूकदाराला प्रत्यक्षात मिळालेला परतावा यातील फरक वर्णन करण्यासाठी त्यांनी ‘बिहेवियर गॅप’ हा शब्द वापरला. त्याचा परिणाम बहुदा गुंतवणूकदाराच्या विरुद्ध काम करतो. ‘बिहेवियर गॅप’ म्हणजे एका विशिष्ट कालावधीत गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याच्या दरातील आणि गुंतवणूकदारांनी त्या गुंतवणुकीवर प्रत्यक्षात मिळविलेल्या परताव्याच्या दरातील फरक. गुंतवणूक परतावा आणि गुंतवणूकदार परतावा जवळजवळ नेहमीच वेगळा असतो.
प्रचारकी रीलमध्ये किंवा मार्केटिंग साहित्यात तुम्हाला दिसणारे गुंतवणूक परतावे हे असे गृहीत धरून असतात की, तुम्ही कालावधीच्या सुरुवातीला एकरकमी गुंतवणूक करता आणि नंतर तुम्ही ती निष्क्रिय राहून तिला विसरून जाता. मग पुढे तुम्ही खरेदी किंवा विक्री करत नाही आणि तुम्ही तुमचा विचारही बदलत नाही. म्हणजेच दुसऱ्या फंडात ती गुंतवणूक स्विच करत नाही. तुम्ही फक्त एकदा खरेदी करता आणि गुंतवणुकीत बदल न करता स्थितप्रज्ञ राहता. वास्तविक जीवनांत हे असे घडू शकते, परंतु प्रमाण खूप थोडके आहे. परताव्यावर अवलंबून तुम्ही खरेदी आणि विक्री करत राहता किंवा पुढील आकर्षक मालमत्ता परताव्याच्या शोधात एका गुंतवणुकीतून दुसऱ्या गुंतवणुकीत स्विच करत असता. अशातून तुम्हाला मिळणारा परतावा प्रत्यक्षात वेगळा (कमी) असतो.
ही परतावा तफावत किंवा ‘बिहेवियर गॅप’ विविध कारणांमुळे असू शकते. बाजाराच्या वेळेशी शर्यत, अलीकडील कामगिरीच्या आधारावर खरेदी (किंवा विक्री), एखाद्या मालमत्तेचा पाठलाग करणे किंवा बाजार तात्पुरता खाली असताना गुंतवणूक मोडण्याचा निर्णय घेणे. हे सर्व निर्णय तुमच्या पोर्टफोलिओसाठी विनाशकारी ठरू शकतात. फंडाचा परतावा आणि गुंतवणूकदाराला मिळालेला परतावा यांच्यात का फरक असतो, याबाबत अनेक संशोधने झाली आहेत. या संशोधनातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.
सर्वेक्षण -१ : एप्रिल २०२२ पर्यंत फार्मा फंडाच्या तीन वर्षांच्या परताव्यावर नजर टाकली. तो २३ टक्के होता, परंतु गुंतवणूकदारांचा सरासरी परतावा ६ टक्के कमी होता. २०२० पासून फार्मा फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. कारण करोना महासाथ आली तेव्हा फार्मा आणि आरोग्यनिगा क्षेत्राने चांगली कामगिरी केली. गुंतवणूकदारांनी या अलीकडील कामगिरीचा मागोवा घेत फार्मा फंडात गुंतवणूक केली. परंतु दुर्दैवाने, जेव्हा त्यांना अपेक्षित परतावा मिळत नाही तेव्हा, ते नव्या मालमत्तेच्या शोधात नव्या मालमत्तेत गुंतवणूक करत राहिले.
एखाद्या मालमत्तेची खरेदी करताना, त्या गुंतवणुकीला काही कारण असणे आवश्यक आहे. त्या मालमत्तेची खरेदी का करत आहात? ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये साजेसे आहे का? जर तो फंड थीमॅटिक किंवा सेक्टोरल फंड असेल, तर तुम्ही ते आता का खरेदी करत आहात, स्वस्त मूल्यांकनामुळे की नजीकच्या काळातील परताव्याने तुम्हाला प्रभावित केले आहे म्हणून? तुम्हाला असे का वाटते की ते विशिष्ट सेक्टर किंवा ती थीम अजून चांगली कामगिरी करेल? सर्वात महत्त्वाचे, तुम्ही कधी बाहेर पडाल? जर आधीच्या प्रश्नांना उत्तरे नसतील, तर अशा सेक्टर / थीममधून बाहेर पडण्याची वेळ निश्चित करणे खूप कठीण असते.
सर्वेक्षण-२ : म्युच्युअल फंडाच्या १० वर्षांच्या कामगिरीचा अभ्यास केला असता एक थक्क करणारी बाब समोर आली. फंडाने मानदंड निर्देशांकाच्या तुलनेत जी जादा कमाई केली, त्यात संपूर्ण १० वर्षांऐवजी केवळ सहा महिन्यांच्या कामगिरीचा मुख्य वाटा होता. याचा अर्थ असा की, गुंतवणूकदार म्हणून जर तुम्ही नेमक्या त्या सहा महिन्यांत बाहेर पडला असला, तर तुम्हाला निर्देशांकापेक्षा कमी परतावा मिळाला असणार.
तुमच्या गुंतवणुकीची वेळ साधणे थांबवा. बाजारात वेळ साधण्यापेक्षा किती वेळ बाजारात गुंतवणूक केली यावर परतावा ठरतो. बाजारात जेव्हा मंदी येईल आणि घसरण होईल, तेव्हा मी गुंतवणुकीतून बाहेर पडेन असे म्हणणे सोपे आहे. प्रत्यक्षात ते इतके सहजतेने होत नाही. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची वेळ निश्चित करू शकत नाही कारण त्या महिन्यांत कधी घसरण होईल आणि कधी तेजी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. जेव्हा तुम्ही ‘ट्रेंड’चा मागोवा घेत फंडातून आत-बाहेर करता, तेव्हा तुम्ही तो महत्त्वाचा कालावधी चुकवता.
गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणुकीऐवजी विविध बाजार चक्रांमध्ये नियमित रक्कम ‘एसआयपी’द्वारा गुंतवून लक्षणीयरीत्या चांगला परतावा मिळविता येईल. जेव्हा तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत हस्तक्षेप करता तेव्हा ती भावनेतून (भीती वा लोभ) होत असते.
सर्वेक्षण -३ : एप्रिल २०२२ पर्यंत तीन वर्षांच्या कालावधीत एका सर्वोत्तम कामगिरी केलेल्या फंडाने वार्षिक ४० टक्के परतावा दिला. परंतु या फंडातील बहुतांश गुंतवणूकदारांना फक्त २० टक्के परतावा मिळाला. ही तफावत २० टक्के म्हणजे थेट निम्मी आहे. कारण या फंडात सुमारे ७५ टक्के गुंतवणुकीचा ओघ मागील एका वर्षातच आला. नव्याने कामगिरी करणाऱ्यांचा फंडाचा मागोवा घेणे देखील व्यर्थ आहे. कोणताही फंड वर्षानुवर्षे चांगली कामगिरी करत नाही. फंडाच्या शैली आणि गुंतवणूक धोरणानुसार फंड हा सर्वोत्तम किंवा साधारण कामगिरीच्या चक्रातून फिरत असतो.
फंडाची कामगिरी खालावलेली असताना बाहेर पडणे व्यर्थ आहे. तुमची उद्दिष्टे आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी दूरचा (तीन वर्षांनंतर) असेल तर तीन वर्षात फंडाची कामगिरी लक्षणीयरीत्या सुधारू शकते. तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांकडे पाहता, तेव्हा तुम्ही तुमची गुंतवणूक काढून घेण्याची शक्यता जास्त असते. कारण तुम्हाला माहिती असते की बाजार आवर्तनातून जातो आणि तो पुन्हा उसळी घेत असतो.
आर्थिक वर्तनामुळे परताव्यात वाढणारा फरकामागील कारण तुम्ही चुकीची गुंतवणूक निवडली हे नाही, तर ती गुंतवणूक भावना किंवा नजीकच्या परताव्याने प्रेरित होऊन केली आहे.
जर तुम्ही विचार केला तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य दीर्घकाळात वाढताना दिसले असेल. म्हणूनच नव्याने प्रभावी कामगिरी करणाऱ्यांचा मागोवा घेणे थांबवा. अर्थात सतत फंड बदलणे थांबवा. गुंतवणूकदाराचे वर्तन कदाचित त्याच्याकडील कौशल्यापेक्षाही खूप जास्त महत्त्वाचे असते,
एका जागतिक सल्लागार कंपनी आणि भारतीय डिस्काऊंट ब्रोकरेजच्या अलीकडच्या एका संशोधन अहवालात भारतातील वैयक्तिक गुंतवणूक क्रांतीचे चित्र रेखाटण्यात आले आहे. म्युच्युअल फंड मालमत्ता सहा पटीने वाढली आहे, सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – ‘एसआयपी’मधील ओघ वाढला आहे, ‘एसआयपी’ अखंडित राहण्याचा कालावधी वाढला आहे आणि देशी गुंतवणूकदार दुप्पट झाल्याचे सत्य हा अहवाल मांडतो. लाखो भारतीय शिस्तबद्ध गुंतवणुकीद्वारे संपत्ती निर्माण करत आहेत. या कथेत फक्त एकच समस्या आहे: ती म्हणजे गुंतवणुकीवर मिळालेला परतावा आणि गुंतवणूकदारांच्या परताव्यात खूप फरक दिसतो.
एक म्युच्युअल फंडांचा अभ्यासक या नात्याने बऱ्याच काळापासून शंका आहे की, गुंतवणूकदाराला प्रत्यक्षात मिळणारा परतावा हा फंड कामगिरी सारण्यांमध्ये नोंदवलेल्या परताव्यापेक्षा खूपच कमी आहे. शेवटी ही तफावत मोजण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे २००० हून अधिक गुंतवणूकदारांचा तपशील उपलब्ध आहे. आम्ही सर्वाधिक परतावा मिळविलेले १०० आणि सर्वात कमी परतावा मिळविलेले १०० असे २०० पोर्टफोलिओ निवडले. समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांमधील १० वर्षांच्या ‘एसआयपी रिटर्न’चा अभ्यास केला आणि त्यांची तुलना गुंतवणूकदारांनी प्रत्यक्षात मिळवलेल्या परताव्याशी केली, हा डेटा गुंतवणूकदारांच्या वर्तनाबाबत बरेच काही सांगून गेला. आम्ही तपासलेल्या प्रत्येक समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांनी दिलेला परतावा हा गुंतवणूकदाराला मिळालेल्या फंडांच्या ‘एसआयपी रिटर्न’पेक्षा कमी होता.
दोहोंतील फरक खूप मोठा होता. व्हॅल्यू फंडांमध्ये ही तफावत दरवर्षी सरासरी ३.७८ टक्के होती. मल्टीकॅप फंडांमध्ये ती २.८७ टक्के होती. लार्ज-कॅप फंडांमध्ये, ज्याला सर्वात स्थिर फंड गट मानले जाते, जिथे गुंतवणूकदारांचे वर्तन सर्वात तर्कसंगत असले पाहिजे, तेथे ही तफावत सर्वात कमी म्हणजे ०.७४ टक्के होती. हे वार्षिक फरक एका दशकात बाजार मूल्यांच्या बाबतीत मोठे होत गेले. व्हॅल्यू फंडांमध्ये वार्षिक ३.७८ टक्के तफावत म्हणजे गुंतवणूकदारांना ‘एसआयपी‘तून मिळणाऱ्या रिटर्नमधील तफावतीपेक्षा २ टक्के कमी कमाई देणारे होते. मल्टीकॅप फंडांमध्ये, ही तूट मूल्याच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सर्वोत्तम वर्तन असलेल्या श्रेणीतील, स्मॉल-कॅप फंडांमध्ये, १.७६ टक्क्यांच्या तफावतीसह, १० वर्षांमध्ये जवळजवळ १२ टक्के रकमेचा फरक आढळतो. या सततच्या तफावतीचे कारण काय आहे?
हे अधिक खोलात जाऊन शोधले असता गुंतवणूकदारांचे स्वत:चे वर्तन आहे, हे स्पष्टपणे अधोरेखित होते. जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा लोक ‘एसआयपी’ सुरू करतात आणि जेव्हा बाजार घसरतो तेव्हाच यांना अडचण निर्माण होते. तेव्हा ते ‘एसआयपी’ थांबवतात किंवा कमी करतात. ज्या फंडाने सर्वात कमी परतावा दिला अशाच फंडाची ते अशा निर्णयासाठी निवड करतात अणि सर्वाधिक परतावा देणाऱ्या फंडात ‘एसआयपी’ सुरू ठेवतात. सगळ्यात चांगल्या वर्षानंतर ते एकरकमी पैसा गुंतवितात आणि वाईट कामगिरी झालेल्या वर्षानंतर रक्कम काढून घेतात. आणि तोंडाने ‘बाय लो, सेल हाय’ असे म्हणताना बरोबर उलट वर्तन करतात. यापैकी प्रत्येक निर्णय दिलेल्या क्षणी तर्कसंगत वाटला तरी काही वर्षानंतर हा निर्णय चुकीचा ठरतो.
विडंबन असे की, भावनेच्या आधारे घडू नये यासाठी केलेली योजकता म्हणजे ‘एसआयपी’ आणि तीच आर्थिक दुर्वर्तनाच्या बळी जाते. ‘एसआयपी’चा संपूर्ण उद्देश वेळ साधण्याच्या अट्टहासावर काबू मिळविणे, मानवी भावनेला गुंतवणूक निर्णयातून हद्दपार करणे, बाजार विक्रमी उच्चांकावर असो किंवा बहु-वर्षांच्या नीचांकी पातळीवर असो, भरघोस परतावा असो किंवा तोटा होऊ द्यात दरमहा समान रक्कम गुंतवा… हाच ‘एसआयपी’चा मार्ग आहे. तथापि जी अटळ असायला हवी त्याच गोष्टीशी छेडछाड होते. गुंतवणूकदार स्वतःला हस्तक्षेप करण्यापासून रोखू शकत नाहीत. ते ‘एसआयपी’कडे वचनबद्धता म्हणून पाहात नाहीत, तर बाजारातील परिस्थिती, बातम्यांचा रोख आणि त्यांच्या स्वतःच्या भावनिक स्थितीच्या आधारावर सुधारणा करण्याची संधी म्हणून पाहतात.
‘एसआयपी’शी वचनबद्धता महत्त्वाची
जेव्हा वर उल्लेखलेला अहवाल ‘एसआयपी’ खात्यांमधील वाढ किंवा म्युच्युअल फंड ‘एयूएम’मध्ये वाढ साजरी करतो, तेव्हा तो परिणामांचे नव्हे तर परिचालनाचे मोजमाप करतो. जेव्हा गुंतवणूकदार अधिक बचत करत असतात, परंतु सतत त्यांच्या स्वतःच्या परताव्यांची तोडफोड करत असतात, तेव्हा ती गुंतवणूकदाराची समस्या असते. गुंतवणूकदार परतावा मिळवतात की नाही याची पर्वा न करता फंड घराणी त्यांच्या मालमत्तेवर शुल्क कमावतात. याकडे गुंतवणूकदाराने लक्ष देणे आवश्यक आहे.
यावरील उपाय जरी कठीण असला तरी गुंतागुंतीचा नाही. गुंतवणूकदारांनी त्यांच्या ‘एसआयपी’ला ‘नॉन-नेगोशिएबल’ बनविणे आवश्यक आहे. त्यांना त्यांचे पोर्टफोलिओ वारंवार पाहणे थांबवावे लागेल. कारण असे प्रत्येक वर्तन हस्तक्षेपाची संधी निर्माण करते. गुंतवणुकीत, काहीही न करणे हे नेहमीच काहीतरी करण्यापेक्षा चांगले असते.
उपलब्ध डेटावरून असे दिसून येते की, ज्या गुंतवणूकदारांनी दशकापूर्वी एसआयपी सुरू केले आणि ते विसरून गेले, ते आज गुंतवणुकीचे सक्रिय व्यवस्थापन करणाऱ्यांनी मिळविलेल्या परताव्यापेक्षा अधिक कमावत आहेत. म्हणून वर्षातून एकदा तरी स्वत:चा शोध घ्यायला हवा.
(लेखक, म्युच्युअल फंडाचे अभ्यासक आणि सल्लागार)
