म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या ‘ॲम्फी’ने सोमवार दिनांक ११ मे रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात ३८,४४० कोटींचा ओघ दिसून आला तरी मार्च महिन्याच्या तुलनेत ५ टक्क्यांची घट झाली. ‘एसआयपी’ गुंतवणुकीचे मासिक योगदान मार्च महिन्यातील ३२,०८७ कोटींवरून, एप्रिल महिन्यांत कमी होऊन ३१,११५ कोटींवर आले. एप्रिल महिन्यांत ३.२२ लाख कोटींची गुंतवणूक रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात आली. भू-राजकीय परिस्थितीमुळे गुंतवणूकदार कमी जोखमीच्या गुंतवणुकीकडे वाळलेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर डीएसपी लार्ज अँड मिडकॅप फंडाने शनिवारी (१६ मे २०२६) २६ वर्षे पूर्ण केली. अस्तित्वात आल्यापासून फंडाने वार्षिक १७.५४ टक्के दराने परतावा दिला असला तरी, अलीकडे फंडाची कामगिरी खालावली आहे.

एप्रिल २०२५ पूर्वी हा फंड डीएसपी इक्विटी अपॉर्च्युनिटीज या नावाने ओळखला जात आसे. विद्यमान निधी व्यवस्थापक रोहित सिंघानिया हे जून २०१५ पासून मागील ११ वर्षे या फंडाचे व्यवस्थापन सांभाळत आहेत. सध्या डीएसपी लार्ज अँड मिडकॅप हा फंड त्याच्या मानदंड सापेक्ष (‘निफ्टी लार्ज मिडकॅप मिडकॅप २५०) गचाळ कामगिरी करणाऱ्या फंडात आघाडीवर असलेला फंड आहे. फंडाने एक, तीन, दहा वर्षांत मानदंडापेक्षा थोडा अधिक परतावा मिळविलेला असला तरी पाच आणि सात वर्षाच्या कालावधीत फंड कामगिरी समाधानकारक नाही, कामगिरीतील ही तफावत बाजाराची सध्याची परिस्थिती, फंड व्यवस्थापन धोरणे आणि फंड व्यवस्थापकांनी केलेली कंपन्यांची निवड यांसारख्या अनेक घटकांमुळे असू शकते.

गुंतवणूकदारांनी फंडाच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना या घटकांचा विचार करावा आणि माहितीपूर्ण गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी कामगिरीची आणि गुंतवणुकीवरील परताव्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामाची सखोल माहिती मिळवण्यासाठी योग्य साधनांचा वापर करणे उचित ठरेल.

पंचवीस वर्षे पूर्ण केलेल्या या फंडाचे गुंतवणूकदार या फंडाच्या कामगिरीत सुधारणा होण्याची गेली सहा वर्षे वाट पाहत आहेत. फंडाची कामगिरी गेली पाच वर्षे, विशेषतः कॅलेंडर वर्ष २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीपासून, म्हणजे गेली चार वर्षे निराशाजनक राहिलेली आहे. फंडाची मानदंड सापेक्ष खालावलेली कामगिरी कोष्टक क्रमांक १ मध्ये दिली आहे. गुंतवणुकीचे निर्णय घेताना फंडाची निवड काळजीपूर्वक करणे आणि गुंतवणुकीचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे.

डीएसपी लार्ज अँड मिडकॅप फंड गेल्या काही वर्षांतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे; लार्ज अँड मिडकॅप फंडांसाठी सध्याचा काळ जरी आव्हानात्मक असला तरी अनेक लार्ज अँड मिडकॅप फंडांनी (एक्सीस, एचएसबीसी, बंधन) वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. गुंतवणुकीला हानी पोहचण्यापासून वाचवणे आणि घसघशीत परतावा कमविणे या फंडांना शक्य झाले आहे. एप्रिल अखेरीच्या मालमता क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेला हा फंड वेगवेगळ्या कालावधीतील कामगिरी क्रमवारीत पहिल्या पाच फंडात नसणे हे या फंडातून बाहेर पडावे याचा स्पष्ट संकेत आहे. एक वर्ष पूर्ण केलेले (मार्च २५ ते एप्रिल २६) ३२ फंड असून केवळ १२ फंडांनी मानदंड सापेक्ष अधिक परतावा मिळविला आहे. या क्रमवारीत डीएसपी लार्ज अँड मिडकॅप फंड ३१ व्या क्रमांकावर आहे. म्हणजे सगळ्यात गचाळ कामगिरी करणाऱ्या फंडात या फंडाचा समावेश होतो. एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना या फंडाने मागील वर्षभरात -०.१८ टक्के परतावा दिला असून हा फंड या क्रमवारीत २८ व्या क्रमांकावर आहे. लार्ज अँड मिडकॅप फंड गटात ३ वर्षे पूर्ण केलेले २७ फंड असून ‘एसआयपी‘ पद्धतीने गुंतवणूक परतावा क्रमवारीत वार्षिक ९.३२ टक्के परतावा दिलेला हा फंड १५ व्या स्थानी आहे. एक, तीन, पाच आणि १० वर्षांच्या कालावधीत, या फंडाने ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय’च्या तुलनेत १ ते ६.५ टक्क्यांनी कमी परतावा मिळविलेला आहे.

रोहित सिंघानिया यांची फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून १ जून २०१५ रोजी नेमणूक झाली. त्यांच्या कारकीर्दीची विभागणी साधारण तीन टप्प्यात करता येईल. १ जून २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत फंडाची कामगिरी ठीक होती. १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ सप्टेंबर २०२१ या कलावधीत फंडाच्या ‘एनएव्ही’त मोठी घसरण आणि सुधारणा दिसून आली. १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान फंडाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. रोहित सिंघानिया यांच्या कारकीर्दीत (१ जून २०१५ ते ३० एप्रिल २०२६) फंडाने वार्षिक १३.८१ टक्के दराने परतावा दिला आहे. याच कालावधीत मासिक ‘एसआयपी‘ परताव्याचा विचार करता १३,२०,००० चे ३०,९५,२६९ झाले असून वार्षिक परताव्याचा दर १४.८३ टक्के आहे.

लार्ज अँड मिडकॅप फंडांना लार्जकॅप आणि मिडकॅप कंपन्यांत प्रत्येकी किमान ३५ टक्के गुंतवणूक करणे सक्तीचे आहे. सध्या फंडाच्या गुंतवणुकीत लार्जकॅप कंपन्यांचे प्रमाण ५२.४२ टक्के, मिडकॅप ३६.३ टक्के, स्मॉलकॅप ५.८ टक्के व अन्य गुंतवणुका ५.४७ टक्के आहेत. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक खासगी बँका (२३.४४ टक्के) वाहन आणि वाहन पूरक उत्पादने (९.६६ टक्के ) एनबीएफसी (७.४८ टक्के) आरोग्य निगा (७.४३ टक्के), माहिती तंत्रज्ञान (६.७० टक्के) रोकड (५.४७ टक्के) ??? तेल आणि वायू (५.४३ टक्के) रसायने (३.७९ टक्के) सरकारी बँका (३.१० टक्के) आहे. कंपन्यांचा विचार केल्यास आयसीआयसीआय बँक (७.१८ टक्के) एचडीएफसी बँक (६.८२ टक्के) एक्सिस बँक (४.९९ टक्के) एसबीआय (३.०९ टक्के) अशा आहेत.

यापैकी आयसीआयसीआय बँक वगळता सर्व आघाडीच्या गुंतवणूक असलेल्या कंपन्या ५२ आठवड्याच्या तळाच्या जवळ आहेत. तसेच मोठी रक्कम रोख स्वरूपात ठेवणे हेसुद्धा फंडाच्या खराब कामगिरीला कारण ठरले आहे. नजीकच्या काळात फंडाची कामगिरी साधारण किंवा खराब राहील. इथून फंड खूप चांगली कामगिरी करेल असे संकेत नाहीत. या कारणास्तव गुंतवणूकदारांनी फंडातून बाहेर पडावे अशी शिफारस आहे. ‘भेगाळली भुई’ म्हणजे तीव्र दुष्काळ किंवा उन्हामुळे कोरडी पडून भेगा पडलेली (दुभंगलेली) जमीन. तीव्र पाणीटंचाई, कोरडेठाक हवामान आणि पावसाच्या अभावी मातीची झालेली दुर्दशा दर्शवण्यासाठी हा शब्दप्रयोग मराठी भाषेत वापरला जातो. आज या फंडाचे अवस्था अशीच झाली आहे. नागरी वाचकांपेक्षा ग्रामीण वाचकांना या फंडाच्या कामगिरीची कल्पना नक्कीच येईल.