Best child investment plans options : अनेक जागरुक पालक आता जन्मापासूनच मुलांच्या नावावर गुंतवणूक सुरू करत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारा शैक्षणिक खर्च पाहाता हे आवश्यकही आहे. सध्या बाजारात एफडीपासून म्युच्युअल फंडांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहे. अशावेळी नेमकी कुठे आणि किती काळ गुंतवणूक करावी? सर्वाधिक परतावा कसा मिळेल? याबाबत पालकांचा गोंधळ उडतो. आज आपण ५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
१. बँक फिक्स्ड डिपॉझिट
बँकेमध्ये ५ वर्षांसाठी पैसे गुंतवण्यापूर्वी विविध बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे गरजेचे आहे. सामान्यतः बँकांकडून ६.५०% ते ७.९०% पर्यंत व्याज दिले जाते. आपण सरासरी ७.०% वार्षिक व्याजदर गृहीत धरला तर ५ वर्षांनंतर ५ लाख रुपयांचे ७.०८ लाख रुपये परतावा मिळेल.
२. पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट
पोस्ट ऑफिसमध्ये देखील बँक एफडीप्रमाणेच टर्म डिपॉझिटचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये कालावधीनुसार वेगवेगळे व्याजदर मिळतात. जर आपण ५ वर्षांच्या मुदतीसाठी ५ लाख रुपये गुंतवले. तर साधारणपणे ७.५% व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ५ वर्षांसाठी पोस्ट ऑफिसच्या टर्म डिपॉझिटमध्ये ५ लाख रुपये गुंतवल्यास ५ वर्षांनंतर तुम्हाला ७,२४,९७४ मिळतील.
३. म्युच्युअल फंड
जर तुमची जोखीम पत्करण्याची तयारी असेल तर म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला बँक एफडी किंवा पोस्ट ऑफिसपेक्षा अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते. समजा तुम्ही ५ वर्षांसाठी म्युच्युअल फंडात ५ लाख रुपये गुंतवले. यावर आपण सरासरी १२ टक्के वार्षिक परतावा गृहीत धरूयात, तर तुम्हाला ५ वर्षानंतर ८.०० लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते.
तुमच्या पाल्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?
अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार, तुम्हाला शेअर बाजारातील चढउताराची भीती वाटत असेल आणि जोखीम पत्करण्याची तयारी नसेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा बँक एफडी हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. जर तुमची थोडी जोखीम घेण्याची तयारी असेल तर मग चांगल्या परताव्यासाठी म्युच्युअल फंड उत्तम पर्याय ठरेल.
(टीप: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारपेठेतील जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.)
