डॉ. अजित जोशी
Bitcoin Crash and Hacking :
ही लेखमाला सुरू केल्यापासून अनेकांनी माझ्यासमोर बिटकॉइनच्या संदर्भात दोन प्रमुख अडचणी मांडल्या. एक म्हणजे, लोकांच्या मते ही नक्की कशा प्रकारची मालमत्ता (अॅसेट क्लास) आहे हे अजूनही ध्यानात येत नाही; आणि दुसरी गोष्ट म्हणजे, त्यातील गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाची वाटणारी भीती. ३० ऑक्टोबरच्या सकाळी घडलेल्या एका घटनेच्या निमित्ताने आपण या दोन्ही पैलूंकडे एकत्रितपणे पाहू शकतो.

या घटनेकडे वळण्यापूर्वी थोडी पूर्वपीठिका समजून घेणे आवश्यक आहे. गेल्या पंधरवड्यात व्यापक आर्थिक परिस्थिती बिटकॉइनसाठी फारशी अनुकूल नव्हती. अमेरिकेत महागाईचा दबाव कायम होता, व्याजदर चढे होते, कच्च्या तेलाचे दर वाढत होते आणि फेडरल रिझर्व्हकडून लगेचच व्याजदरात मोठी कपात होईल अशी चिन्हेही दिसत नव्हती. नेमक्या याच काळात अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि विशेषतः कृत्रिम प्रज्ञेशी (एआय) संबंधित समभागांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. ‘एआय’साठी होणारा प्रचंड भांडवली खर्च, डेटा सेंटर्ससाठी वाढणारे कर्ज आणि त्यातून भविष्यात पुरेसा नफा पदरात पडेल का, याविषयी गुंतवणूकदार साशंक झाले. परिणामी, काही आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग एकाच दिवसात मोठ्या प्रमाणावर कोसळले आणि ‘नॅस्डॅक-१००’ निर्देशांकातही मोठी घसरण नोंदवली गेली. साधारणपणे अशा प्रतिकूल वातावरणात बिटकॉइनच्या किमतीवरही दबाव यायला हवा होता. असे असतानाही, बिटकॉइन ७८,००० डॉलर्सच्या पातळीजवळ ठामपणे टिकून होता. इतकेच नव्हे, तर याच काळात क्रिप्टो-संबंधित ईटीएफमध्ये (एक्सचेंज ट्रेडेड फंड) मोठ्या प्रमाणावर निधी ओघळत असल्याचेही दिसून आले. एका अर्थाने ही घडामोड क्रिप्टोचलनाविषयी बाजारात निर्माण होत असलेल्या विश्वासार्हतेचा निदर्शक होती.

या पार्श्वभूमीवर, २९-३० ऑक्टोबरच्या सुमारास जगातील सर्वांत मोठे क्रिप्टोचलन केंद्र असलेल्या ‘बायनान्स’मधून तब्बल ६३० कोटी डॉलर्स मूल्याचे चलन अनधिकृतरीत्या गायब झाले; साध्या शब्दांत सांगायचे तर चोरीला गेले. या अनपेक्षित धक्क्याने बाजाराने अखेर ७८,००० ची आधारभूत पातळी तोडली. स्वाभाविकच, क्रिप्टोच्या सुरक्षिततेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या शंकेखोरांना यामुळे पुन्हा बळ मिळाले.

अर्थात, क्रिप्टोचलनाच्या इतिहासातील हा काही पहिलाच गैरव्यवहार नाही. २०१४ मध्ये ‘माउंट गॉक्स’ (Mt. Gox) हे जगातील सर्वांत मोठ्या बिटकॉइन केंद्रांपैकी एक होते. अचानक ग्राहकांना आपले बिटकॉइन काढून घेणे अशक्य झाले आणि प्रचंड प्रमाणात बिटकॉइन गायब असल्याचे उघडकीस आले. बिटकॉइन खरेदी करणे आणि ते सुरक्षित बाळगणे या दोन पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत, हे या घटनेने पहिल्यांदाच ठळकपणे अधोरेखित केले. त्यानंतर २०१६ मध्ये ‘बिटफिनेक्स’वरून (Bitfinex) सुमारे १,२०,००० बिटकॉइन चोरीला गेले; ग्राहकांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याच्या संरचनेतच गंभीर त्रुटी राहिली होती. मात्र, ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर प्रत्येक व्यवहाराचा कायमस्वरूपी माग (ट्रेस) राहत असल्याने, अनेक वर्षांनंतर चोरीला गेलेल्या बिटकॉइनचा मोठा हिस्सा परत मिळवणे शक्य झाले. म्हणजेच क्रिप्टोविश्वात एक विचित्र विरोधाभास आहे – येथे पैसा जितक्या वेगाने चोरीला जाऊ शकतो, तितक्याच काटेकोरपणे त्याचा मागही काढता येतो. पुढे २०२२ मध्ये ‘रोनिन नेटवर्क’वर सायबर हल्ला झाला. हे दोन वेगवेगळ्या ब्लॉकचेन व्यवस्थांमध्ये मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी वापरले जाणारे ‘ब्रिज’ होते; तेथून अर्धा अब्ज डॉलरपेक्षा अधिक मालमत्ता लंपास झाली. त्याच वर्षी ‘एफटीएक्स’ (FTX) हे महाकाय केंद्र कोसळले. मात्र, ते हॅकिंगचे प्रकरण नव्हते; ग्राहकांनी केंद्राकडे सुरक्षिततेच्या विश्वासाने ठेवलेला मोठा पैसा तिथल्या व्यवस्थापनाने संबंधित ट्रेडिंग व्यवसायात वळवला होता. म्हणजेच तो व्यवस्थापकीय अपप्रवृत्ती आणि ग्राहकांच्या पैशाच्या गैरवापराचा प्रश्न होता.

थोडक्यात, या प्रत्येक घटनेमागे मूळ ब्लॉकचेन अथवा क्रिप्टोकरन्सीचे तंत्रज्ञान अपयशी ठरले असे नव्हते; तर कधी केंद्र (एक्स्चेंज), कधी ‘कस्टडी’, कधी ‘ब्रिज’, तर कधी व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार हे कमकुवत दुवे ठरले. अर्थात, या सगळ्याचा अंतिम परिणाम गुंतवणूकदारांचे नुकसान आणि किमतींमधील पडझड यातच झाला, हे वास्तव नाकारता येत नाही.

क्रिप्टोचलनाच्या सुरक्षिततेवर संशय घेणाऱ्यांसाठी ही प्रत्येक घटना त्यांच्या भूमिकेला पुष्टी देणारी ठरली. मात्र, अशा गैरव्यवहारांची आणि त्यातून भाव कोसळण्याची जोखीम पारंपरिक समभाग बाजारात नसते का? भारतामध्ये हर्षद मेहता घोटाळ्यानंतर नेमके हेच चित्र पाहायला मिळाले होते. १९९२ मध्ये ‘सेन्सेक्स’ एकाच महिन्यात सुमारे २३ टक्के घसरला, तर सर्वोच्च पातळीवरून तो तब्बल ४३ टक्के खाली आला. तो केवळ एखाद्या समभागापुरता मर्यादित प्रश्न नव्हता; संपूर्ण बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वासच डळमळीत झाला होता. २००१ मधील केतन पारेख घोटाळा आणि ‘डॉट-कॉम’ बुडबुडा फुटल्याचा दुहेरी फटका बसून सेन्सेक्स पुन्हा मोठ्या प्रमाणावर कोसळला. अमेरिकेत ‘एन्रॉन’ आणि ‘वर्ल्डकॉम’च्या दिवाळखोरीच्या काळातही जगभराने हाच अनुभव घेतला.

पारंपरिक बाजारातील गैरप्रकारांची कारणे क्रिप्टोतील घोटाळ्यांपेक्षा वेगळी असतात. कंपन्यांच्या बाबतीत व्यवस्थापन नफा फुगवून दाखवू शकते, प्रवर्तक निधी इतरत्र वळवू शकतात, खोटी विक्री नोंदवली जाऊ शकते, ‘इनसायडर ट्रेडिंग’चा गैरवापर होऊ शकतो, संगनमताने समभागांचे भाव कृत्रिमरीत्या वाढवले जाऊ शकतात किंवा दलाल व निधी व्यवस्थापक ग्राहकांच्या पैशांची अफरातफर करू शकतात. याउलट, क्रिप्टोचलनांच्या बाबतीत या पारंपरिक व्यवस्थापकीय जोखीमा नसतात. तिथे प्रवर्तक, मालक किंवा संचालक मंडळ नसते. त्यांचे तिमाही अथवा वार्षिक ताळेबंद नसतात; त्यामुळे हितसंबंधितांमधील व्यवहार आणि त्यातून उद्भवणाऱ्या भ्रष्टाचाराला वाव नसतो. कोणतेही व्यवस्थापन स्वतःच्या मर्जीने नफा वाढवून दाखवू शकत नाही किंवा अचानक नवीन चलन छापून जुन्या गुंतवणूकदारांचा हिस्सा पातळ करू शकत नाही. दोन्ही बाजारांमधील धोक्यांचे स्वरूप भिन्न आहे; संपूर्ण सुरक्षित कोणीच नाही, मात्र जोखीमेची वर्गवारी वेगळी आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, या वेळच्या घोटाळ्यातून मिळणारे संकेत केवळ भीतीचेच नाहीत. वर उल्लेख केलेल्या प्रत्येक ऐतिहासिक पडझडीत संबंधित चलनांचे भाव २० ते २५ टक्क्यांहून अधिक घसरले होते. मात्र, त्यानंतर बाजार सावरण्याचा वेग पाहण्यासारखा आहे. ‘माउंट गॉक्स’च्या धक्क्यानंतर बिटकॉइनला जुनी पातळी गाठण्यासाठी सुमारे २२ महिने लागले होते. ‘बिटफिनेक्स’ आणि ‘एफटीएक्स’ संकटानंतर मात्र अवघ्या दोन-तीन महिन्यांत बिटकॉइनने पूर्वस्थिती मिळवली. या वेळीही ‘बायनान्स’मधील महाचोरीनंतरच्या पहिल्या दोन दिवसांत भावातील घसरण केवळ ४ ते ५ टक्क्यांपुरतीच मर्यादित राहिली.

इथेच दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी संधी दडलेली असू शकते. प्रत्येक मोठ्या गैरव्यवहारानंतर किमती सावरल्याचा आजवरचा इतिहास आहे. त्यातही सध्याच्या अनेक जागतिक प्रतिकूल घटकांवर मात करून बिटकॉइनने दाखवलेली चिवट लवचिकता लक्षणीय आहे. ज्यांची बाजारातील जोखीम पेलण्याची तयारी आहे आणि ज्यांना या नव्या मालमत्ता प्रकाराचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ७६,००० ते ७८,००० डॉलर्सचा हा पट्टा तांत्रिकदृष्ट्या आकर्षक वाटणारा असाच आहे.

क्रिप्टोचलन हा नक्की कोणत्या प्रकारचा मालमत्ता वर्ग आहे? त्यामागील तर्कशास्त्र आणि तंत्रज्ञान काय आहे? याविषयीची सविस्तर चर्चा आपण पुढेही चालू ठेवणार आहोत. तथापि, या आगळ्यावेगळ्या पर्यायातील जोखीम आणि संधी यांचे संतुलित मूल्यमापन करायचे असल्यास, सध्याच्या पडझडीच्या आणि साशंकतेच्या वातावरणासारखी दुसरी कोणतीही उत्तम वेळ असू शकत नाही.