गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे, निफ्टी निर्देशांकावर २४,३६४ वरून २३,८५० पर्यंतची नेमकी घसरण झाली. भविष्यात निफ्टी निर्देशांक २३,८५० चा स्तर सातत्याने राखत असल्यास, ही घसरण ही ‘हलक्या फुलक्या स्वरूपाची’ असेल आणि निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २४,५०० असेल, असेही तेव्हा सूतोवाच केलेले. हे वरचे लक्ष्य युद्धज्वराच्या पार्श्वभूमीवर सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या पहिल्या सत्रात २४,५८९ चा उच्चांक मारत साध्य देखील केले गेले.

आताच्या घडीला दोन महत्त्वाच्या घटना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पटलावर घडत आहेत. त्या म्हणजे भारत-पाकिस्तानातील संभावित युद्ध व आर्थिक आघाडीवर अमेरिकेचे घसरलेले ‘सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)’. या दोन घटनांचा निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीवर होणारा परिणाम आणि या घडामोडीत निफ्टी निर्देशांकाचा संभाव्य उच्चांक अथवा नीचांकाचा आज आपण आढावा घेऊया.

या दोन घटनांचे अतिशय दूरगामी, व्यापक असे परिणाम होणार आहेत. आर्थिक आघाडीवर अमेरिकेचा जानेवारी ते मार्च या तिमाही कालावधीतील जीडीपी हे ०.३ टक्क्यांवर घसरल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक साहसवादाला थोडा पायबंद बसून सर्वसमावेशक असे व्यापार धोरण अमलात येण्याची शक्यता आहे. तसेच युद्धस्य कथा रम्य: जरी असले तरी भारतीय सैन्याची जीवित हानी न होता,अत्याधुनिक युद्ध तंत्रज्ञानाचा (उदा. लेसर गायडेड मिसाइल टार्गेट टेक्नॉलॉजी) वापर करत या युद्धात विजय भारताने मिळविण्याची शक्यताही मोठी आहे. म्हणून या दोन्ही घटनांचा ल.सा.वि. काढता, मे महिन्याच्या अखेरपर्यंत निफ्टी निर्देशांकावर २४,००० हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ असणार आहे. या दोन्ही घटनांच्या उलथापालथीत निफ्टी निर्देशांकाने सातत्याने २४,००० चा स्तर राखल्यास त्याचे वरचे लक्ष्य २४,६००, २४,९०० ते २५,५०० असे असेल. युद्धाची व्याप्ती वाढल्यास मात्र २४,००० चा स्तर तोडत, निफ्टी निर्देशांक २३,८००, २३,५००, २३,३०० ते २२,८०० अशी खालची लक्ष्य गाठताना दिसू शकेल.

निकालपूर्व विश्लेषण

१) इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड

२ मेचा बंद भाव : ८००.५० रु.

तिमाही वित्तीय निकाल : सोमवार,५ मे

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ७७५ रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून ७७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ८५० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास : ७७५ रुपयांच्या केंद्रबिंदू स्तर तोडत ७२५ रुपयांपर्यंत घसरण

२) महिंद्रा अँण्ड महिंद्रा लिमिटेड

२ मेचा बंद भाव : २,९२६.२० रु.

तिमाही वित्तीय निकाल: सोमवार, ५ मे

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : २,८७५ रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून २,८७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,०५० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,२५० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास: २,८७५ रुपयांच्या केंद्रबिंदू स्तर तोडत २,७५० रुपयांपर्यंत घसरण

३) बॉम्बे स्टाँक एक्सचेंज (बीएसई) लिमिटेड

२ मेचा बंद भाव : ६,३०६.५० रु.

तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार,६ मे

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ६,१५०रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : समभागाकडून ६,१५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६,५०० रुपये, द्वितीय लक्ष्य ६,८०० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास: ६,१५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५,९०० रुपयांपर्यंत घसरण

४) टाटा केमिकल्स लिमिटेड

२ मेचा बंद भाव : ८३५.१० रु.

तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, ७ मे

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ८२० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : समभागाकडून ८२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९२५ रुपये, द्वितीय लक्ष्य १,००० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास: ८२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७७० रुपयांपर्यंत घसरण

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.