प्रवीण देशपांडे
Capital Gains Tax Rules 2026 Marathi : करदात्याने २०२५-२६ या आर्थिक वर्षात कोणत्याही संपत्तीची विक्री केली असेल तर करदात्याला त्यावर होणारा नफा किंवा तोटा याचा तपशील विवरणपत्रात दाखवावा लागतो. भांडवली नफ्यासाठी संपत्ती म्हणजे काय? त्यावर नफा कसा गणायचा? त्यावर कर किती भरायचा? तोटा कसा वजा करायचा किंवा कसा कॅरी-फॉरवर्ड करायचा? असे अनेक प्रश्न करदात्याच्या मनात येतात. याची उत्तरे थोडक्यात या लेखात आहेत.
संपत्ती म्हणजे काय?
प्राप्तिकर कायद्यात भांडवली नफ्यासाठी “संपत्ती” ची व्याख्या दिलेली आहे. संपत्तीच्या व्याख्येत सर्व प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो उदा. सोने, घर, समभाग, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, वगैरे, परंतु यामध्ये व्यापारातील साठा, ग्रामीण भागातील शेत जमीन, ठराविक सोने रोखे (गोल्ड बाँड), वैयक्तिक वस्तू, कपडे, भांडी, गाडी, फर्निचर, इत्यादी यांचा समावेश होत नाही. म्हणजे या वस्तूंच्या विक्रीवर होणारा नफा हा करपात्र भांडवली नफा म्हणून गणला जात नाही. याला अपवाद म्हणजे काही वैयक्तिक वस्तू सोने-चांदीपासून तयार केलेले दागिने, शिल्पे, चित्रे, पुरातत्व वस्तूंचा संग्रह, वगैरे याच्या विक्रीवर होणारा नफा हा करपात्र भांडवली नफा म्हणून गणला जातो.
भांडवली संपत्तीवरील नफा कसा गणायचा?
- संपत्तीच्या विक्रीतून मिळालेल्या संपूर्ण रकमेमधून, त्याची खरेदी किंमत, सुधारणा खर्च आणि विक्रीवर होणाऱ्या पूर्णपणे आणि निव्वळ खर्च वजा केल्यास येणारी रक्कम म्हणजे भांडवली नफा. काही ठराविक व्यवहारात भांडवली नफा गणण्यासाठी काही खास पद्धती आहेत.
- इंडेक्सेशननुसार खरेदी किंमत : वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) यांनी स्थावर मालमत्ता यावर्षी विकली आणि जी २३ जुलै, २०२४ पूर्वी खरेदी केली असेल, तर ते भांडवली नफा गणताना इंडेक्सेशनचा फायदा घेऊन खरेदी किंमत विचारात घेऊ शकतात. ही तरतूद अनिवासी भारतीय करदात्यांना लागू नाही.
- करदात्याला संपत्ती भेट किंवा वारसाहक्काने किंवा रद्द ना करण्याजोगा विश्वस्त निधी, इत्यादी प्रकाराने मिळाली असेल तर, मूळ मालकाने ज्या मूल्याला अशी संपत्ती खरेदी केली होती, ते मूल्य करदात्यासाठी लागू होईल. उदा. एका करदात्याला त्याच्या वडिलांनी खरेदी केलेले घर २०२२ साली वारसाहक्काने मिळाले. ते त्याने २०२५-२६ या आर्थिक वर्षात विकले. यावरील भांडवली नफा गणताना विक्री मूल्यातून वडिलांनी घर खरेदी केलेले मूल्य वजा करावे लागेल.. करदात्याने संपत्ती १ एप्रिल, २००१ पूर्वी खरेदी केलेली असल्यास भांडवली नफा गणताना प्रत्यक्ष खरेदी मूल्य किंवा १ एप्रिल, २००१ रोजीचे वाजवी बाजार मूल्य यापैकी जे करदात्याला सोयीस्कर आहे ते खरेदी मूल्य असेल. परंतु स्थावर मालमत्तेसाठी हे मूल्य, मुद्रांक शुल्कानुसार बाजारभाव मूल्यापेक्षा (जिथे उपलब्ध असेल तिथे) जास्त नसले पाहिजे. हाच नियम करदात्याला संपत्ती वारसाहक्काने, वगैरे मिळाली असेल तर त्याचे खरेदी मूल्य गणतांना लागू होतो.
- स्थावर मालमत्तेचे विक्री मूल्य गणताना प्रत्यक्ष करार मूल्य किंवा मुद्रांक शुल्कानुसार मालमत्तेचे मूल्य, या पैकी जे जास्त आहे ते, विचारात घ्यावे. मुद्रांक शुल्कानुसार मूल्य हे प्रत्यक्ष करार मूल्याच्या ११० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर प्रत्यक्ष करार मूल्य हे, भांडवली नफ्यासाठी, विक्री मूल्य असेल.
- सूचिबद्ध शेअर किंवा इक्विटी फंडातील युनिट (ज्यांना कलम ११२ अ लागू होतो) आणि जे १ फेब्रुवारी, २०१८ पूर्वी खरेदी केले असल्यास, भांडवली नफा गणतांना समभागाची खरेदी किंमत खालील प्रमाणे दोन्हीपैकी (१ आणि २ पैकी) जी जास्त आहे ती विचारात घेतली जाईल :
१. प्रत्यक्ष खरेदी किंमत
२. खालील पैकी (अ आणि आ पैकी) जी कमी आहे ती
- समभागाचा ३१ जानेवारी, २०१८ रोजीचा योग्य बाजार भाव
- विक्री किंमत
संपत्तीचा धारणकाल :
भांडवली नफ्याची करपात्रता त्याच्या धारणकाळावर अवलंबून असते. या धारणकाळानुसार भांडवली नफा हा अल्प मुदतीचा आहे किंवा दीर्घमुदतीचा आहे हे ठरते. साधारणतः २४ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी संपत्ती धारण केली असेल तर ती संपत्ती दीर्घमुदतीची होते आणि त्यावर होणारा भांडवली नफा देखील दीर्घ मुदतीचा असतो. २४ महिन्यांपेक्षा कमी काळासाठी संपत्ती धारण केली असेल तर ती संपत्ती अल्पमुदतीची होते. याला काही अपवाद आहेत.
१. शेअरबाजारात नोंदणीकृत समभाग, रोख्यांसाठी आणि इक्विटी फंडातील युनिटसाठी हा कालावधी २४ महिन्यांऐवजी १२ महिन्यांचा आहे.
२. रोखे फंडातील युनिट १ एप्रिल २०२३ पूर्वी खरेदी केले असतील तर त्यावर होणारा नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. रोखे अर्थात डेट फंडातील युनिट १ एप्रिल, २०२३ नंतर खरेदी केलेले असल्यास आणि या युनिटचा धारणकाळ कितीही (२४ महिन्यांपेक्षा जास्त) असला तरी किंवा सूचिबद्ध नसलेले बॉंड किंवा डिबेंचर याच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा अल्पमुदतीचाच असेल.
भांडवली नफ्यावर कर किती भरावयाचा?
या धारणकाळानुसार भांडवली नफा अल्पमुदतीचा आहे का दीर्घमुदतीचा हे शोधून काढल्यानंतर त्यावर कर किती भरावयाचा हे ठरते.
अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्या प्रमाणे कर भरावा लागतो, याला अपवाद म्हणजे सूचिबद्ध शेअर किंवा इक्विटी फंडातील युनिट्स (ज्यावर एसटीटी भरला गेला असेल) त्यावर २० टक्के (अधिक ४ टक्के शैक्षणिक आणि आरोग्य कर) इतका कर भरावा लागेल.
दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याला १२.५ टक्के (अधिक ४ टक्के शैक्षणिक आणि आरोग्य कर) इतका कर भरावा लागतो. याला अपवाद म्हणजे, ज्या करदात्यांना इंडेक्सेशनच्या तरतुदी लागू होत असतील आणि त्या घेऊन भांडवली नफा गणला असेल तर त्यावर २० टक्के (अधिक ४ टक्के शैक्षणिक आणि आरोग्य कर) इतका कर (करदात्याला फायदेशीर असेल तर) भरावा लागेल.
कलम ८७ए नुसार वजावट
वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षात निवासी भारतीय करदात्याचे करपात्र उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला कलम ८७ए नुसार वजावट मिळून कर भरावा लागत नाही. दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यासाठी आणि सवलतीच्या दरात भरल्या जाणाऱ्या अल्पमुदतीच्या करासाठी ही सवलत मिळत नाही, ही सवलत फक्त नियमित उत्पन्नासाठी आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांच्या उत्पन्नात दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्याचा समावेश असेल तर त्या भांडवली नफ्यावर त्यांना कर भरावा लागेल.
भांडवली तोटा :
- दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो, अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येत नाही. अल्पमुदतीचा भांडवली तोटा मात्र दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून किंवा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. भांडवली तोटा हा इतर स्त्रोताच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही.
- इतर उत्पन्नामधून तोटा वजा होत नसेल तर तो पुढील ८ वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. पुढील वर्षी दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो आणि अल्पमुदतीचा भांडवली तोटा पुढील वर्षी दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून किंवा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. ज्या वर्षी तोटा झाला आहे तो तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करावयाचा आहे त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे.
भांडवली नफ्याच्या तरतुदी जाणून करदात्याने असे व्यवहार केले असतील तर ते विवरणपत्रात योग्य सदरात दाखविणे आणि त्यावर कर भरणे गरजेचे आहे. करदाता मोठ्या रकमेचे व्यवहार वार्षिक माहिती अहवालामधून (एआयएस) तपासू शकतो आणि त्याने विवरणपत्रात सर्व व्यवहार दाखविले आहेत याची खात्री करू शकतो.
प्रवीण देशपांडे
pravindeshpande1966@gmail.com
