-निखिल राजाध्यक्ष

महिन्याच्या सुरुवातीला पगार जमा झालेला असतो, घरभाडे भरलेले असते, गुंतवणुकीसाठीची रक्कम बाजूला काढलेली असते आणि त्यामुळे एखाद्या तरुण नोकरदाराला आपले आर्थिक नियोजन नियंत्रणात असल्यासारखे वाटू शकते. मात्र, काही दिवसांतच देयकांच्या आठवणी हळूहळू डोके वर काढू लागतात. तीन दिवसांत मोबाइलचा ईएमआय भरायचा असतो, पुढील आठवड्यात छोट्या वैयक्तिक कर्जाचा हप्ता देय असतो, एखाद्या सदस्यत्वाचे शुल्क कार्डावर आकारलेले असते आणि क्रेडिट कार्डाच्या बिलात गेल्या महिन्यातील प्रवासाचे बुकिंग, बाहेर जेवणावरील काही खर्च आणि खरेदीच्या वेळी किरकोळ वाटलेली ऑनलाइन खरेदी जमा झालेली असते.

यातील प्रत्येक खर्चामागे रास्त कारण असू शकते. मोबाइलची कामासाठी गरज असू शकते, एखादी अल्पकालीन आर्थिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतलेले असू शकते, प्रवास नियोजित असू शकतो आणि सोय, रिवॉर्ड्स किंवा रोख प्रवाह सांभाळण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरलेले असू शकते. मात्र, या सर्व आर्थिक निर्णयांची देयके एकाच वेळी समोर येतात, तेव्हा दबाव जाणवू लागतो. आपले कर्ज आता विविध उत्पादने, डिजिटल मंच, देय तारखा आणि खर्चाच्या पर्यायांमध्ये विभागले गेले आहे, याची ग्राहकाला जाणीव होते. अशा वेळी केवळ एक देयक म्हणजेच बिल स्वतंत्रपणे सांभाळणे पुरेसे राहत नाही. संपूर्ण परतफेडीच्या वेळापत्रकाचा ताळमेळ समजून घेणे हे खरे आव्हान ठरते.

अनेक तरुण भारतीयांसाठी कर्जव्यवहाराचे हे बदलते वास्तव आहे. औपचारिक पतप्रवासातील सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून एकेकाळी पहिल्या क्रेडिट कार्डाकडे पाहिले जात असे. आता मात्र कर्ज घेण्याचा काही अनुभव आल्यानंतर अनेकांच्या हातात पहिले क्रेडिट कार्ड येत आहे. कार्ड मिळण्यापूर्वीच एखाद्या ग्राहकाने मोबाइलसाठी कर्ज घेतलेले असू शकते, अल्पकालीन रोख गरजेसाठी छोटे वैयक्तिक कर्ज घेतलेले असू शकते, लॅपटॉपची खरेदी हप्त्यांमध्ये रूपांतरित केलेली असू शकते किंवा शिक्षण अथवा घरगुती खर्चासाठी कर्जाचा वापर केलेला असू शकतो. तोपर्यंत ईएमआय, देय तारखा आणि आजचा खर्च भविष्यातील उत्पन्नाशी जुळवून घेण्याची शिस्त यांची त्याला ओळख झालेली असते.

विस्तारत जाणारे क्रेडिट वॉलेटभारतातील क्रेडिट कार्ड बाजारावरील आमच्या ताज्या अभ्यासानुसार, क्रेडिट कार्डांवरील थकीत शिल्लक मार्च २०१६ मधील ०.४ लाख कोटींवरून मार्च २०२६ मध्ये ३.१ लाख कोटींवर पोहोचली आहे. ही ८.३ पट वाढ असून, औपचारिक पतव्यवस्थेत क्रेडिट कार्ड किती खोलवर रुजले आहे, हे त्यातून दिसते.

नव्याने क्रेडिट कार्ड घेणाऱ्या ग्राहकांचे वयही कमी होत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. मार्च २०२६ पर्यंत नव्याने क्रेडिट कार्ड घेणाऱ्या म्हणजेच एनटीसीसी ग्राहकांपैकी निम्मे ग्राहक ३० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे होते. त्याचप्रमाणे, प्रत्येक चार एनटीसीसी ग्राहकांपैकी एका ग्राहकाकडे आधीपासूनच तीन किंवा अधिक सक्रिय क्रेडिट खाती होती.

ही आकडेवारी महत्त्वाची आहे, कारण ग्राहक क्रेडिट कार्ड बाजारात कशा प्रकारे प्रवेश करीत आहेत, यातील वर्तनात्मक बदल तिच्यातून स्पष्ट होतो. अनेकांसाठी क्रेडिट कार्ड हे आता पहिले कर्जसाधन राहिलेले नाही. मोबाइलचा ईएमआय, टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तूंसाठीचे कर्ज, छोटे वैयक्तिक कर्ज किंवा कमी मुदतीचे अन्य कर्ज उत्पादन आधीपासूनच असलेल्या विस्तृत क्रेडिट वॉलेटचा ते एक भाग बनत आहे.नियोजित गरजांसाठी कर्जाचा वापर केला आणि परतफेडीची शिस्त पाळली, तर कर्जसाधनांचा हा विस्तृत संच उपयुक्त ठरू शकतो. औपचारिक कर्जव्यवहारामुळे ग्राहकाला परतफेडीचा विश्वासार्ह इतिहास निर्माण करता येतो, रोख प्रवाहाचे व्यवस्थापन करता येते आणि अधिक आत्मविश्वासाने वित्तीय व्यवस्थेत सहभागी होता येते. मात्र, त्यासाठी अधिक काळजीही घ्यावी लागते. प्रत्येक नवीन कर्ज उत्पादनासोबत आणखी एक देय तारीख, आणखी एक आर्थिक जबाबदारी आणि ग्राहकाच्या एकूण पतस्थितीवर परिणाम करणारा आणखी एक निर्णय जोडला जातो.क्रेडिट मर्यादा म्हणजे परवड नव्हे

क्रेडिट कार्डावरील चर्चा अनेकदा रिवॉर्ड्स, सवलती म्हणजेच ऑफर, वार्षिक शुल्क आणि उपलब्ध क्रेडिट मर्यादेपासून सुरू होते. मात्र, आधीच इतर आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या ग्राहकासाठी संपूर्ण आर्थिक चित्रात या कार्डाचे स्थान काय आहे, हा अधिक महत्त्वाचा प्रश्न ठरतो.नियोजित खरेदी किंवा अनपेक्षित गरजेच्या वेळी अधिक क्रेडिट मर्यादा लवचिकता देऊ शकते. मात्र, त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न उपलब्ध झाल्याचा भास निर्माण होता कामा नये. क्रेडिट कार्ड ग्राहकाला ठरावीक कालावधीसाठी कर्ज उपलब्ध करून देते, परंतु त्याच्या परतफेडीची जबाबदारी अखेर ग्राहकाचीच असते.

अॅप्स, डिजिटल वॉलेट्स आणि ऑनलाइन मंचांवर वारंवार व्यवहार करण्याची सवय असलेल्या ग्राहकांसाठी हा फरक विशेष महत्त्वाचा आहे. डिजिटल व्यवहारातील सहजतेमुळे खर्चाची खरी जाणीव पुढे ढकलली जाऊ शकते. एका टॅपमध्ये, स्वाइपमध्ये किंवा सेव्ह केलेल्या कार्डाद्वारे काही सेकंदांत व्यवहार पूर्ण होतो. मात्र, त्याची परतफेड नंतर करावी लागते आणि अनेकदा ती इतर बिलांसोबत समोर येते. त्यामुळे खर्च सहज होत असेल आणि परतफेडीचे आगाऊ नियोजन नसेल, तर सोयीचे साधन असलेले कार्ड आर्थिक दबावाचे कारण ठरू शकते.परतफेडीचा दबाव सहसा एखाद्या एकाच मोठ्या खरेदीमुळे अचानक निर्माण होत नाही. स्वतंत्रपणे परवडणारे वाटणारे अनेक छोटे निर्णय एकत्र आल्यामुळे तो वाढत जातो. कार्डावर केलेला आठवडाअखेरचा प्रवास, ईएमआयमध्ये रूपांतरित केलेली सणासुदीची खरेदी, हप्त्यांवर घेतलेला मोबाइल, आपोआप नूतनीकरण झालेले सदस्यत्व आणि अॅप्सवरून झालेले काही किरकोळ खर्च मिळून अपेक्षेपेक्षा मोठी मासिक देय रक्कम तयार होऊ शकते.

त्यामुळे आणखी एखादे कर्ज उत्पादन घेण्यापूर्वी किंवा कार्डावर मोठी खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण क्रेडिट वॉलेटचा आढावा घेणे ही जबाबदार पद्धत ठरते. उपलब्ध क्रेडिट मर्यादा ग्राहकाला किती खर्च करता येऊ शकतो, हे सांगते. मात्र, प्रत्यक्षात किती खर्च करावा, हे उत्पन्नाची स्थिरता, आधीच्या आर्थिक जबाबदाऱ्या, उपलब्ध बचत आणि परतफेडीची क्षमता यांनी ठरवले पाहिजे.

सिबिल स्कोअरसाठी याचा अर्थ काय?ही शिस्त महत्त्वाची ठरते, कारण पतव्यवस्थेत कार्ड वापरण्याच्या पद्धतीची दीर्घकालीन नोंद राहते. परतफेडीचा इतिहास, उपलब्ध क्रेडिटचा वापर, पतइतिहासाचा कालावधी आणि नवीन कर्जासाठी झालेल्या चौकश्या यांसारख्या घटकांचा सिबिल स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकाने कार्डाचा कसा वापर केला आणि त्याची परतफेड कशी केली, याचा प्रभाव संबंधित खरेदीपेक्षा अधिक काळ टिकू शकतो.कार्डाचा वापर विमानतिकिटासाठी झाला, मोबाइलसाठी, सणासुदीतील खरेदीसाठी किंवा रेस्टॉरंटच्या बिलासाठी झाला, हे कर्जदात्यासाठी महत्त्वाचे असेलच असे नाही. पतवर्तनाच्या दृष्टीने देय रक्कम वेळेवर भरली का, उपलब्ध मर्यादेपैकी किती रक्कम वापरली जात होती, नवीन कर्जासाठी किती वारंवार प्रयत्न केले जात होते आणि विविध कर्ज उत्पादनांवरील जबाबदाऱ्या ग्राहकाने सातत्याने सांभाळल्या का, हे अधिक महत्त्वाचे ठरते.वेळेवर परतफेड करणे हा यातील केंद्रबिंदू आहे. क्रेडिट कार्डाची बिले आणि ईएमआय वेळेवर भरणे आर्थिक शिस्तीतील सातत्य दर्शवते. दुसरीकडे, विलंबाने केलेली परतफेड, चुकलेले हप्ते किंवा न भरलेली थकबाकी वारंवार पुढील बिलिंग चक्रात नेल्यामुळे ग्राहकाच्या पतस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

उपलब्ध क्रेडिटच्या वापराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. परतफेड नियमित होत असली, तरी उपलब्ध क्रेडिट मर्यादेचा मोठा भाग सातत्याने वापरला जात असल्यास ते कर्जावरील अधिक अवलंबित्वाचे संकेत देऊ शकते.

नवीन कर्जासाठी उद्देशपूर्ण पद्धतीने अर्ज केला पाहिजे. ग्राहक क्रेडिट कार्ड किंवा कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा कर्जदाता त्याच्या मूल्यमापनाचा भाग म्हणून सिबिल अहवाल तपासू शकतो. अल्प कालावधीत केलेले अनेक अर्ज हा स्कोअरवर परिणाम करू शकणाऱ्या घटकांपैकी एक मानला जाऊ शकतो.याचा अर्थ खरी गरज असतानाही ग्राहकांनी कर्ज घेणे टाळावे, असा नाही. मात्र, अर्ज नियोजनपूर्वक आणि निवडक पद्धतीने केले पाहिजेत. ते ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेशी सुसंगत असणे आवश्यक आहे.किमान देय रक्कम म्हणजे परतफेडीची योजना नव्हे

क्रेडिट कार्डाच्या बिलामध्ये ग्राहकाला परतफेडीचे काही पर्याय उपलब्ध असतात. एखाद्या वास्तविक अल्पकालीन अडचणीच्या वेळी ही लवचिकता उपयुक्त ठरू शकते. मात्र, नियमितपणे केवळ किमान देय रक्कम भरल्यामुळे सुरक्षिततेचा खोटा भास निर्माण होऊ शकतो. कार्ड खाते सुरू राहते, परंतु न भरलेल्या शिल्लक रकमेवर व्याज आकारले जात राहते आणि कालांतराने ती रक्कम सांभाळणे कठीण होऊ शकते.किमान रक्कम भरल्यामुळे आपली जबाबदारी पूर्ण झाल्याचे ग्राहकाला वाटू शकते. प्रत्यक्षात मात्र उर्वरित थकबाकीवर खर्च वाढत राहतो आणि त्यामुळे पुढील महिन्यांतील आर्थिक मोकळीक कमी होऊ शकते.

पूर्ण देय रक्कम हीच खरी परतफेडीची जबाबदारी मानणे अधिक हितावह ठरते. संपूर्ण बिल सहजपणे भरता येत नसेल, तर तो खर्चाचा आढावा घेण्याचा प्रारंभिक इशारा मानला पाहिजे. अशा वेळी ऐच्छिक खर्च कमी करणे, मोठी खरेदी पुढे ढकलणे किंवा थकबाकी पूर्णपणे फेडली जाईपर्यंत कार्डाचा पुढील वापर कमी करणे आवश्यक ठरू शकते.आधीपासूनच इतर ईएमआय सांभाळणाऱ्या ग्राहकांसाठी हे विशेष महत्त्वाचे आहे. कार्डावरील थकबाकी सातत्याने पुढील बिलिंग चक्रात ढकलली गेल्यास ती नकळत मासिक अर्थसंकल्प कमकुवत करू शकते.

नियोजित गरजा शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी कर्ज मदत करते, तेव्हा त्याचे खरे मूल्य निर्माण होते. क्रेडिट कार्डामुळे पतइतिहास तयार होऊ शकतो, व्यवहाराची सोय मिळू शकते, ऑनलाइन खरेदी करता येते आणि अल्पकालीन आर्थिक लवचिकता उपलब्ध होते. त्याचवेळी परतफेडीचा असा इतिहास तयार होतो, जो भविष्यात घर, वाहन, उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी मोठे कर्ज घेताना महत्त्वाचा ठरू शकतो.क्रेडिट कार्डाचा अधिक सक्षमपणे वापर करणारे ग्राहक सामान्यतः आपल्या परतफेडीचे चक्र समजून घेतात, ठराविक उद्देशाने कर्जाचा वापर करतात, वेळेवर परतफेड करतात, क्रेडिटचा वापर नियंत्रणात ठेवतात आणि आपल्या एकूण पतस्थितीचा वेळोवेळी आढावा घेतात. या सवयी साध्या वाटू शकतात, परंतु त्यातून सातत्य निर्माण होते आणि हेच सातत्य निरोगी पतस्थितीचा पाया असते.

पहिले क्रेडिट कार्ड मिळणे हा कदाचित आता तरुण ग्राहकासाठी खरा मैलाचा दगड राहिलेला नाही. आत्मविश्वास वाढवेल, सिबिल स्कोअरचे संरक्षण करेल आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्याला आधार देईल अशा पद्धतीने कर्जाचा वापर करण्याची शिस्त आत्मसात करणे, हाच खरा महत्त्वाचा टप्पा आहे.

लेखक ट्रान्सयुनियन सिबिलचे मुख्य महसूल अधिकारी आहेत.