निखिल राजाध्यक्ष
Cibil Score Rules: दरवर्षीची ही बाब आहे. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होतो आणि घराघरांत चर्चा सुरू होते. यंदा घरात दुरुस्ती करायची का? नवी कार घ्यायची का? परदेशात फिरायला जायचे का? घरातला व्यवसाय वाढवायचा का? बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. अर्थसंकल्पातून दिशा मिळते, त्यातून लोकांचा आत्मविश्वास वाढतो आणि बाजारात सकारात्मक वातावरण तयार होते.
उदाहरणार्थ, पुण्यातील एखादे कुटुंब भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात जाण्याचा विचार करत असेल; नाशिकमध्ये एखादे आई-वडील आपल्या मुलीच्या पुढील शिक्षणासाठी पैशांची सोय कशी करावी याचा विचार करीत असतील; नागपूरमध्ये एक लहान उद्योजक व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घ्यावे का हे ठरवीत असेल किंवा मुंबईतील एखादी तरुणी आपली अनेक वर्षांची बचत लक्षात घेऊन पहिली कार घ्यायची का याचा विचार करीत असेल; या सगळ्यांच्या विचारांतून त्यांचा स्वतःच्या भविष्याबद्दलचा विश्वास आणि प्रगतीची आशा व्यक्त होते.
लोकांच्या हातात जास्त पैसे राहू लागले आणि सरकारी धोरणांनी खर्चाला प्रोत्साहन दिले की अर्थव्यवस्थेला वेग येतो. जीएसटीमधील बदलांमुळे आता व्यवहार तुलनेने सुलभ झाले आहेत. लघुउद्योगांना मदत मिळत आहे. ते भरारीची स्वप्ने पाहू लागले आहेत. डिजिटल सुविधांमुळे बँकिंग आणि कर्जसेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे औपचारिक कर्जव्यवस्थेत अधिक लोक सहभागी होत आहेत. त्यांच्या महत्त्वाकांक्षांना अंकुर फुटू लागले आहेत. पण हे सगळे साध्य करायचे, तर त्यासाठी हवी एक महत्त्वाची गोष्ट, आर्थिक शिस्त! आणि या शिस्तीची सुरुवात होते आपला सिबिल स्कोअर जाणून घेण्यापासून व तो व्यवस्थित जपण्यापासून.
सिबिल स्कोअरमुळे पतमर्यादा कशी वाढते?
सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० दरम्यानचा तीन अंकी आकडा असतो. तो तुमच्या कर्जफेडीच्या इतिहासावर आधारित असतो. स्कोअर जास्त असेल तर तुमची कर्जफेड व्यवस्थित आहे, असे मानले जाते. तुमचे उत्पन्न, तुमची बचत किंवा तुमच्याकडील मालमत्ता हा स्कोअर पाहत नाही. तो फक्त तुम्ही कर्ज कसे हाताळता हे दाखवतो.
वेळेवर हप्ते भरणे, जास्त कर्ज न घेणे, वेगवेगळ्या प्रकारची कर्जे संतुलित ठेवणे, कर्जासाठी विनाकारण चौकशा न करणे या गोष्टी चांगल्या स्कोअरसाठी महत्त्वाच्या असतात. सतत जबाबदारीने कर्ज फेडल्यास चांगला स्कोअर तयार होतो. त्यामुळे बँकांचा आपल्यावरचा विश्वास वाढतो.
शिस्तबद्धतेसाठी जागरूकता महत्त्वाची
सध्याच्या कर्जव्यवस्थेत लोकांचा सहभाग वाढत असला तरी सिबिलच्या एकूण कार्यपद्धतीविषयी अनेकांचे अजूनही काही गैरसमज आहेत. ते दूर होण्याची गरज आहे. सिबिल स्कोअर स्वतः तपासल्याने तो कमी होत नाही, आपले उत्पन्न किंवा बचत यांचा स्कोअरवर परिणाम होत नसतो, क्रेडिट कार्डाचे बिल भरताना त्यातील फक्त किमान रक्कम भरत राहून पूर्ण बिल भरायचे टाळल्याने बिल फुगतच जाते आणि आर्थिक ताण असल्याचा संकेत मिळू शकतो, ही जागरुकता यायला हवी. विविध प्रकारची कर्जे जबाबदारीने हाताळली, तर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो, हेही लक्षात यायला हवे.
प्रत्येकाला वर्षातून एकदा मोफत सिबिल स्कोअर आणि रिपोर्ट मिळतो. तो तपासल्याने चुका लवकर कळतात. त्यातून जागरुकताही वाढते. एखादा वाद होत असल्यास तो नोंदवण्याची सुविधादेखील मोफत असते. त्यासाठी मात्र ठराविक कालमर्यादा असते. आर्थिक शिस्त म्हणजे बंधन नाही. ती तुम्हाला निर्धास्तपणे पुढे जाण्याची ताकद देते. कर्ज देण्या-घेण्याच्या प्रक्रियेत ती विश्वास निर्माण करते.
विश्वास हेच खरे चलन
कर्जव्यवस्था ही विश्वासावर चालत असते. तुम्ही कर्ज वेळेवर फेडले तर कर्जदार त्याची व्यवस्थित नोंद घेतात. त्यातून तुमचे प्रोफाइल बळकट होते. पुढील वेळी कर्ज घेणे सोपे होते. चांगले आणि सुदृढ क्रेडिट प्रोफाइल असेल तर कर्जमंजुरी लवकर मिळते. व्याजदर चांगले मिळू शकतात. कागदपत्रांची अडचण कमी होते. विश्वास निर्माण झाला असल्यामुळे एकूण खर्च कमी पडतो, अधिक पर्याय मिळतात आणि अनिश्चित काळातही आर्थिक स्थैर्य राखणे सोपे जाते.
पहिले घर घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबासाठी तर हा विश्वास फारच महत्त्वाचा. वेळेवर कर्जमंजुरी होईल की त्यास उशीर होईल, हे या विश्वासार्हतेतून ठरते. व्यवसाय वाढवू इच्छिणाऱ्या एखाद्या लघुउद्योगाला व्याजदर आणि परतफेडीसाठीचा कालावधी किती मिळेल, हे या विश्वासावरच ठरते. शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला कर्जाच्या अटी परवडणाऱ्या असतील की नाही, हे त्याच्याबद्दलचा विश्वासच ठरवतो.
ही विश्वासार्हता एका दिवसात तयार होत नाही. प्रत्येक महिन्यात वेळेवर हप्ता भरल्याने ती हळूहळू वाढते. कर्जाचा योग्य आणि मर्यादित वापर केल्यास ती अधिक बळकट होते. जास्त कर्ज घेणे टाळल्यास ती टिकून राहते. कर्ज घेण्याची क्षमता आणि परतफेड करण्याची ताकद यांचा समतोल राखला की विश्वास अधिक घट्ट होतो. आणि अशा प्रकारे जबाबदारीने वाढलेले कर्ज अर्थव्यवस्थेलाही पुढे नेते.
कर्ज म्हणजे संधी : भारताच्या स्वप्नांना नवे पंख
गेल्या वीस वर्षांत ७० कोटींपेक्षा जास्त लोक कर्जव्यवस्थेत सहभागी झाले आहेत. ३.६ कोटींहून अधिक व्यवसायांनी कर्जांचा फायदा घेतलेला आहे. तसेच ८.५ कोटींपेक्षा जास्त कर्जदारांनी सूक्ष्म स्वरुपाची कर्जे घेतलेली आहेत. मागील दहा वर्षांतच ४१ कोटींपेक्षा जास्त लोकांनी पहिल्यांदा कर्ज घेण्यास सुरुवात केली. ११.८ कोटींपेक्षा जास्त महिलांनी कर्जांच्या संधीचा लाभ घेतला आणि १८.७ कोटी तरुणांनी आपली पत निर्माण केली. डिसेंबर २०२५ पर्यंत १८.४ कोटी लोकांनी स्वतःहून आपला सिबिल स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट पाहिला आहे. यावरून लोकांमध्ये जागरूकता वाढत असल्याचे दिसते.
ही फक्त आकडेवारी नाही. यात आर्थिक समावेशन, पुढे जाण्याची संधी आणि व्यवस्थेवरील वाढता विश्वास या बाबी दिसून येतात. कर्ज हे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उपयोगी साधन आहे; पण त्याचा खरा फायदा आर्थिक शिस्त पाळल्यावरच मिळतो, याची जाणीव सर्वांना असायला हवी. कर्ज या विषयाची अधिक चांगली समज येणे अजूनही आवश्यक आहे. भारतातील अनेक कुटुंबे थोडी-थोडी बचत करीत असतात, भविष्यासाठीचे नियोजन करीत राहतात. अडचणीच्या वेळेसाठी पैसे बाजूला ठेवतात. मोठे खर्च करताना नीट विचार करतात. ही सवय अनेक वर्षांपासून मध्यमवर्गीय कुटुंबांत आहे. विशेषतः महाराष्ट्रात आर्थिक शिस्त ही स्वाभिमानाची गोष्ट मानली जाते.
अशा पद्धतीने वर्षानुवर्षे बचत करणाऱ्या, कर्जाचे हप्तेही वेळेवर भरणाऱ्यांना घरासाठी, गाडीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज मिळवणे सोपे होते. त्यांना व्याजदर चांगले मिळू शकतात. कर्ज लवकर मंजूर होते. आणि निवडीचे पर्यायही जास्त मिळतात. कर्जप्रक्रियेविषयी पुरेशी माहिती नसेल किंवा जागरूकता कमी असेल, तर मात्र अनेक चांगल्या संधींचा फायदा आपल्याला घेता येत नाही. आपली पत नीट सांभाळली, तर मोठे निर्णय घेताना प्रत्येक वेळी आपल्याला पुरेसा आत्मविश्वास असतो आणि पर्यायदेखील बरेच मिळू शकतात.
म्हणजेच, सिबिल स्कोअर हा फक्त कर्ज घेताना दिसणारा आकडा नाही. तो आपल्या मागच्या दीर्घकाळच्या आर्थिक सवयी दाखवतो. एखादे कुटुंब पुढचे मोठे पाऊल टाकते तेव्हा बॅंका किंवा अर्थसंस्था त्यास किती सहजतेने आणि विश्वासाने प्रतिसाद देतात, हे त्या कुटुंबाच्या पतप्रतिष्ठेवर ठरते.
पुढची दिशा
भारत नव्या विकासाच्या टप्प्यात आहे. उत्पन्न वाढत आहे, कर्जाच्या संधी वाढत आहेत, धोरणात्मक पाठबळही आहे. हीच योग्य वेळ आहे. आपण बचत करतो आणि भविष्याची योजना आखतो, त्याच प्रकारे आपली पतप्रतिष्ठाही जपायला हवी. विश्वासार्हता टिकवून धरायला हवी. कारण आपल्या रोजच्या छोट्या आर्थिक सवयीच भविष्यातील मोठ्या संधींची दारे उघडीत असतात किंवा बंद करीत असतात.
(लेखक ट्रान्सयुनियन सिबिलचे मुख्य महसूल अधिकारी आहेत.)
