कौस्तुभ जोशी
Corporate Demerger and Merger Stocks : भारतीय शेअर बाजारातील गेल्या १० वर्षांतील घडामोडींचा सूक्ष्म अभ्यास केला, तर एक स्पष्ट धोरण समोर येते, ते म्हणजे विलीनीकरण (मर्जर) आणि विभाजन (डीमर्जर). दोन बलाढ्य कंपन्या एकत्र येऊन महाकाय साम्राज्य उभे करणे असो किंवा एकाच मोठ्या कंपनीतील एखादा व्यवसाय वेगळा करून त्याला शेअर बाजारात स्वतंत्रपणे सूचिबद्ध करणे असो; यामागे ‘व्हॅल्यू अनलॉक’ अर्थात भागधारकांच्या भांडवलाचे मूल्य वाढवण्याचा मुख्य उद्देश असतो.
गुंतवणूकदारांसाठी अशा प्रकारच्या व्यवहारांचा गृहपाठ म्हणून विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना फक्त कंपन्यांचा नफा-तोटा किंवा दरवर्षी दिला जाणारा लाभांश याचा फक्त विचार न करता व्यवस्थापनाचे पुढील पाच ते दहा वर्षात कंपनी पुढे नेण्याचे कसे धोरण आहे किंवा नेमकी काय रणनीती आखली जाणार आहे, याचा अंदाज घेणे आवश्यक आहे.
एखाद्या कंपनीतून उपकंपनी वेगळी करणे आणि ती शेअर बाजारात सूचिबद्ध करणे, हे एका रात्रीत होणारे काम नसते. त्याचप्रमाणे दोन महाकाय कंपन्या एकत्र येऊन महाकाय कंपनी सुरू करणे हेही तितकेच कठीण आणि वेळ काढू काम आहे. म्हणूनच कंपन्यांना याचा विचार तीन ते पाच वर्षे आधीपासून करावा लागतो.
कंपन्या दरवर्षी पाठवत असलेल्या वार्षिक अहवालातील मॅनेजमेंट डिस्कशन अँड ॲनालिसिस गुंतवणूकदारांनी आवर्जून वाचली पाहिजेत. सोप्या शब्दांत सांगायचे तर, कंपनीचे संचालक आणि वरिष्ठ व्यवस्थापन कंपनीच्या कामगिरीचे, आर्थिक स्थितीचे आणि भविष्यातील योजनांचे स्वतःच्या शब्दांत जे विश्लेषण करतात. आजच्या लेखात अशाच काही कंपन्यांच्या रणनीतीची माहिती करून घेऊया.
टाटा मोटर्स
टाटा मोटर्स या वाहन उद्योगातील कंपनीने वर्ष २००८ मध्ये २.३ अब्ज डॉलर रोख मोजून जग्वार लँड रोव्हर ही नाममुद्रा खरेदी केली. त्याच कंपनीने गेल्या वर्षी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल आणि टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल हे दोन व्यवसाय वेगळे करून कंपनीचे पुनर्रचना केली. पॅसेंजर व्हेईकल या कंपनीकडे प्रवासी वाहने, विद्युत शक्तीवर चालणाऱ्या (इलेक्ट्रिक) मोटारी आणि जग्वार लँड रोव्हर यांचा समावेश आहे तर कमर्शियल व्हेईकल या कंपनीकडे ट्रक बस आणि वाणिज्य वापराची वाहने असे उद्योग दिले. मूळ टाटा मोटर्सचे समभाग असणाऱ्यांना या दोन्ही कंपन्यांचे समभाग प्राप्त झाले आहेत.
आयटीसी आणि आयटीसी हॉटेल
भारतातील ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती अर्थात एफएमसीजी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या आयटीसीने मागच्या वर्षी आयटीसी हॉटेल ही कंपनी वेगळी काढून समभाग शेअर बाजारात सूचिबद्ध केले. ‘आयटीसी’च्या दहा समभागांमागे आयटीसी हॉटेलचा एक शेअर गुंतवणूकदारांना मिळाला. एफएमसीजी क्षेत्रात भारताची पहिल्या क्रमांकाची कंपनी बनवण्याचा ध्यास घेतलेल्या आयटीसीचा समभाग गेल्या वर्षभरात मात्र गुंतवणूकदारांना फारसे काहीही देऊ शकलेला नाही. ५२ आठवड्यातील नीचांकी स्तरावर सध्या आयटीसीचा शेअर मिळतो आहे.
‘एचडीएफसी’चे महाविलीनीकरण
जवळपास दहा वर्षापासून चर्चा आणि नियोजनाच्या पातळीवर असलेल्या एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोन महाकाय कंपन्यांचे तीन वर्षांपूर्वी विलीनीकरण झाले आणि जवळपास पंधरा लाख कोटी बाजारमूल्य असलेली महाकाय कंपनी उदयाला आली. एचडीएफसी बँकेला एचडीएफसीचा तयार ग्राहक वर्ग मिळाला. मात्र गेल्या तीन वर्षात भागधारकांच्या हाती नेमके काय लागले आहे? हा संशोधनाचाच विषय आहे.
वेदान्त आणि कर्ज व्यवस्थापन
संसाधनांच्या क्षेत्रात असलेल्या अनिल अग्रवाल यांच्या वेदान्त कंपनीने जून महिन्यात आपला व्यवसाय एका मोठ्या प्रक्रियेनंतर ऊर्जा निर्मिती, तेल आणि वायू, लोह पोलाद आणि ॲल्युमिनियम चार प्रकारात विभागला आहे. वेदान्तवर असलेले महाग कर्ज यानिमित्ताने हाताळणे या कंपन्यांना सोपे जाईल असा अंदाज आहे. सेसागोवापासून सुरू झालेला वेदान्तचा प्रवास शेअर बाजाराचा अभ्यास करणाऱ्याला उत्तम घटना अभ्यास (केस स्टडी) आहे. ॲल्युमिनियम आणि तांबे या क्षेत्रात आघाडीची कंपनी असलेल्या वेदान्तने गुंतवणूकदारांना नेमके काय दिले आहे, ते समजायला आणखी दोन वर्षे लागतील.
लार्सन अँड टुब्रो
भारतातील अभियांत्रिकी हे प्रमुख क्षेत्र आणि त्याचबरोबर अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लार्सन अँड टुब्रो या कंपनीने अनिल नाईक प्रमुखपदी असताना व्यवसाय विभाजनाचा निर्णय घेतला. कंपनीतील अभियांत्रिकी, बांधकाम-निर्मिती, वित्त (फायनान्स), तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी), संरक्षण (डिफेन्स) असे व्यवसाय हळूहळू वेगळे काढून ते बाजारामध्ये सूचिबद्ध करण्यात येतील, असा दीर्घकालीन आराखडा मांडला गेला. यापैकी फायनान्स, टेक्नॉलॉजी या कंपन्या वेगळ्या होऊन त्या उत्तम पद्धतीने व्यवसाय करत आहेत.
एकाच छताखाली अनेक व्यवसाय चालवण्यापेक्षा, प्रत्येक व्यवसायाला स्वतंत्र ओळख आणि लक्ष केंद्रित करण्याची संधी देणे आजच्या कॉर्पोरेट जगताची गरज बनली आहे. २०२५ या एकाच वर्षात भारतात तब्बल ४० बिलियन डॉलर (सुमारे ३.३ लाख कोटी रुपये) मूल्याचे विलीनीकरण आणि विभाजनाचे व्यवहार होणे, हे या धोरणाची व्याप्ती स्पष्ट करते.
मात्र, गुंतवणूकदार म्हणून एका गोष्टीचे भान ठेवणे गरजेचे आहे. कंपनीचे विभाजन किंवा विलीनीकरण झाले म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी जादू होऊन शेअरचा भाव वाढेल असे नाही. टाटा मोटर्स किंवा एल अँड टीसारख्या कंपन्यांमध्ये या रणनीतीचे गोड फळ मिळायला काही वर्षे लागली, तर एचडीएफसी किंवा आयटीसीच्या बाबतीत बाजार अजूनही स्पष्ट निकालाची वाट पाहत आहे.
म्हणूनच, अशा बदलांकडे अल्पकालीन नफ्याची संधी म्हणून न पाहता, व्यवस्थापनाच्या दीर्घकालीन ध्येयाचा घटना अभ्यास (केस स्टडी) म्हणून विचार करा. जो गुंतवणूकदार व्यवस्थापनाची ही चाल वेळेत ओळखेल, तोच बाजारात खरी ‘व्हॅल्यू’ अनलॉक करू शकेल!
