– भूषण पडकील
सुटीचे दिवस म्हणजे बहुतांशवेळा आनंद, प्रवास, कुटुंबासोबतचा वेळ आणि थोडीशी उधळपट्टी. या काळात तुम्ही विमान तिकिटे बुक करणे, नवीन ‘गॅजेट्स’ घेणे, आपल्या प्रियजनांसाठी खरेदी करणे किंवा एखाद्या छोट्या सहलीची योजना आखणे असे अनेक खर्च करता. साहजिकच, या कालावधीत नेहमीपेक्षा खर्च वाढतो. अलीकडच्या काळात या खर्चाचा मोठा भाग ‘क्रेडिट कार्ड’, ‘नो कॉस्ट ईएमआय’, ‘बाय नाऊ पे लेटर’ असे पर्याय किंवा अल्पकालीन वैयक्तिक कर्जे या माध्यमातून खर्च भागवला जातो. या पर्यायांमुळे खर्च करणे अधिक सुलभ आणि लवचीक होते. त्याचवेळी त्यांचा तुमच्या पत गुणवत्तेवर अर्थात ‘क्रेडिट प्रोफाइल’वर ठसा उमटतो. याच वेळी तुमचा ‘सिबिल स्कोअर’ महत्त्वाची भूमिका बजावतो.
मुळात, तुमचा ‘सिबिल स्कोअर’ हा तुमच्या ‘क्रेडिट’ माहितीचा तीन अंकी संख्यात्मक सारांश असतो. तुम्ही कर्ज कसे घेता, किती वेळा कर्ज घेता, ‘क्रेडिट कार्ड’चा वापर करता, किती प्रमाणात वापर करता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही त्याची परतफेड किती नियमितपणे करता, हे तो दर्शवतो. सुटीच्या काळातल्या जास्त खर्चाच्या कालावधीत, तुम्ही ‘क्रेडिट कार्ड’ अर्थात खर्च कसे हाताळता यानुसार हा ‘स्कोअर’ सकारात्मक किंवा नकारात्मक पद्धतीने प्रभावित होऊ शकतो.
सुटीतील खर्चाचा ‘क्रेडिट कार्ड’च्या आरोग्यावर परिणाम
सुटीतील खर्च सहसा एका व्यवहारापुरता मर्यादित नसतो. अनेक वेळा ‘कार्ड स्वाइप’, मोठ्या तिकीट खरेदीसाठी ‘ईएमआय’ आणि कधी कधी रोख प्रवाह सांभाळण्यासाठी घेतलेले अल्पकालीन कर्ज यामुळे तुमचा ‘क्रेडिट कार्ड’ वापर लक्षणीयरीत्या वाढू शकतो. ‘क्रेडिट युटिलायझेशन’ म्हणजे तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या एकूण ‘क्रेडिट’पैकी म्हणजे तुम्हाला दिलेल्या अल्पकालीन कर्जाच्या किती टक्के कर्ज वापरत आहात. जेव्हा हा वापर अचानक वाढतो, म्हणजेच ‘क्रेडिट कार्ड’च्या मर्यादेचा मोठा भाग वापरला जातो, जरी ‘क्रेडिट कार्ड’च्या माध्यमातून वापरलेले पैसे तुम्ही वेळेत भरणा करत असले तरी वित्तपुरवठादारांना तुम्ही ते ‘क्रेडिट कार्ड’ जास्त वापरत असल्याने अधिक जोखमीचे संकेत देतात.
सुटीतील काळात धावपळीत देय तारखा चुकण्याची शक्यतादेखील वाढते. प्रवास, गडबडीची दिनचर्या आणि वाढलेली देयके यामध्ये ‘क्रेडिट कार्ड’ किंवा ‘ईएमआय’ हप्ता चुकू शकतो. अगदी एकच उशिरा किंवा चुकलेले देयकसुद्धा ‘सिबिल स्कोअर’वर लक्षणीय परिणाम करू शकते. याचे कारण परतफेडीचा इतिहास हा त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
कर्जाची सोय आणि शिस्त यांचा समतोल‘क्रेडिट कार्ड’ म्हणजेच अल्पकालीन कर्ज विचारपूर्वक योग्य नियोजनासह वापरल्यास सुटीतील खर्चासाठी ‘क्रेडिट कार्ड’चा वापर हा शहाणपणाचा आर्थिक निर्णय ठरू शकतो. यामुळे वाढीव खर्च करता येतो, रोख प्रवाह अधिक चांगल्याप्रकारे व्यवस्थापित करता येतो. अनेक बक्षिसे म्हणजेच ‘रिवॉर्ड’ किंवा सवलतींचा लाभ मिळतो. मात्र, हा काळ नैसर्गिकरीत्या जास्त आणि कधी कधी अनियोजित खर्चाला प्रोत्साहन देणारा असल्याने शिस्त पाळणे अत्यावश्यक ठरते.
उदाहरणार्थ, ‘ईएमआय’मुळे मासिक खर्च कमी वाटू शकतो, पण एकाच वेळी अनेक ‘ईएमआय’ सुरू असतील तर एकूण रक्कम झपाट्याने वाढू शकते. यामुळे सुटीनंतरच्या महिन्यांत तुमचे महिन्याचे अंदाजपत्रक ताणले जाऊ शकते. त्याचप्रमाणे, ‘क्रेडिट कार्ड’वर केवळ किमान देय रक्कम भरणे तात्काळ दिलासा देऊ शकते, मात्र त्यामुळे व्याजाचा खर्च वाढतो आणि परतफेडीचा कालावधी लांबतो.
क्रेडिट कार्डच्या आरोग्याच्या दृष्टीने, प्रसंगापेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचे असते. वित्तपुरवठादार सणासुदीचा हेतू पाहत नाहीत, ते वापरण्याची पद्धत अर्थात ‘पॅटर्न’ पाहतात. नियमित आणि वेळेवर देयक, सुयोग्य प्रमाणात ‘क्रेडिट युटिलायझेशन’ आणि नियंत्रित कर्ज यामुळे कर्ज फेडीच्या क्षमतेवर विश्वास निर्माण होतो.
सणासुदीपलीकडील परिणामसणासुदीच्या दिवसातील सोहळे संपले तरी तेव्हा केलेल्या खर्चाचे परिणाम थांबत नाहीत. या काळातील ‘क्रेडिट’ वर्तन तुमच्या दीर्घकालीन खर्चाच्या इतिहासाचा भाग बनते. गृहकर्जासाठी अर्ज करणे, चांगले व्याजदर मिळवणे किंवा अधिक कर्जाची मर्यादा मिळवणे अशा भविष्यातील महत्त्वाच्या आर्थिक टप्प्यांसाठी सक्षम ‘सिबिल स्कोअर’ उपयुक्त ठरतो. याउलट, खर्च जास्त असतानाच्या काळात सतत जास्त खर्च आणि परतफेडीचा ताण असल्यास ‘क्रेडिट स्कोअर’ हळूहळू कमकुवत होऊ शकतो. कालांतराने, यामुळे सर्वाधिक गरजेच्या वेळी परवडणाऱ्या किमतीत कर्ज मिळणे अवघड होऊ शकते.
सुट्यांमध्ये ‘सिबिल स्कोअर’ सुरक्षित ठेवण्यासाठीचे सोपे मार्ग
सणासुदीच्या काळात ‘क्रेडिट कार्ड’ आरोग्य जपणे म्हणजे उत्सवावर मर्यादा घालणे नव्हे, तर आधीच नियोजन करणे होय. खर्चाचा आराखडा ठरवणे, ‘क्रेडिट कार्ड’ वापरावर लक्ष ठेवणे आणि खरेदी टप्प्याटप्प्याने करणे. यामुळे ‘क्रेडिट युटिलायझेशन’मध्ये अचानक वाढ होण्यापासून बचाव करता येतो. ‘क्रेडिट कार्ड’ची थकबाकी पूर्ण भरणे आणि ‘ईएमआय’ वेळेवर भरल्यास ‘सिबिल स्कोअर’ सुरक्षित राहण्यास मोठी मदत होते.
वेळोवेळी ‘क्रेडिट’ अहवाल तपासणेदेखील उपयुक्त ठरते. अहवाल तपासल्याने चुका ओळखता येतात, परतफेडीचा मागोवा घेता येतो आणि अलीकडील व्यवहारांचा ‘क्रेडिट स्कोअर’वर कसा परिणाम झाला आहे, हे समजते. जागरूकता ही अनेकदा चांगल्या आर्थिक निर्णयांची पहिली पायरी असते.
सध्याच्या खर्च आणि भविष्यातील उद्दिष्टांमधील समतोल राखणेसुटीचा काळ आनंदाचा असावा, नंतर आर्थिक तणाव निर्माण करणारा नव्हे. जेव्हा ‘क्रेडिट’कडे अल्पकालीन सोयीऐवजी दीर्घकालीन आर्थिक जबाबदारी म्हणून पाहता, तेव्हा खर्चाचे निर्णय अधिक मोजूनमापून आणि विचारपूर्वक होतात. तुमचा ‘सिबिल स्कोअर’ हा केवळ एक आकडा नसून तो एवढ्या काळात निर्माण केलेल्या आर्थिक सवयींचे प्रतिबिंब आहे. जास्त खर्चाच्या काळात कर्ज किती जबाबदारीने हाताळता याचाही यामध्ये समावेश असतो.सणासुदीच्या काळात शिस्तबद्ध, सजग आणि जागरूक आर्थिक वर्तन ठेवल्यास, आजच्या गरजा पूर्ण करताना तडजोड न करता उद्याची आर्थिक लवचीकता कायम राखू शकता. म्हणजेच भविष्यात आर्थिक ताण येत नाही. विचारपूर्वक कर्ज घेणे, वेळेवर परतफेड आणि सुज्ञपणे कर्जाचा वापर यामुळे सणोत्सवाचा मनमुराद आनंद घेऊ शकता आणि भविष्यासाठीही सज्ज राहू शकता.
लेखक ‘ट्रान्सयुनियन सिबिल’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.
