गेल्या काही दिवसातली ‘क्रिप्टो’ बाजारातील पडझड पाहिली, तर गुंतवणूकदारांना आणि खास करून नवीन गुंतवणूकदारांना, ‘ये कहाँ आ गए हम’ हा प्रश्न नक्कीच पडू शकतो. गेल्या पंधरा दिवसांत बिटकॉइन साधारण ७३ हजार डॉलरवरून ६२ हजार डॉलरच्या आसपास आले. म्हणजे जवळपास १५ टक्क्यांची घसरण. इथेरियम, सोलाना आणि चेनलिंक तर अजून जास्त कोसळले. ट्रॉन मात्र तुलनेने टिकून राहिला.
शेअर बाजाराची सवय असलेल्या गुंतवणूकदाराला ही घसरण धक्कादायक वाटू शकते. पण ‘क्रिप्टो’मध्ये एवढा झटका नवा नाही. आज विचारायचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच की, ही घसरण क्रिप्टोच्या मूळ कल्पनेला हादरा देणारी आहे का, की बाजारातील पैशांच्या प्रवाहामुळे होणारे हेलकावे आहेत?आजवरच्या आकडेवारीवरून दुसरी शक्यता अधिक ठोस वाटते. म्हणजे ही घसरण गंभीर आहे; पण तीमधून बिटकॉइनच्या मूलभूत संकल्पनेला धोका अजून तरी वाटत नाही. घसरणीचे सर्वांत तातडीचे कारण म्हणजे अमेरिकेतील स्पॉट ‘बिटकॉइन ईटीएफ’मधून पैसा बाहेर पडणं. हे ईटीएफ गेल्या काही काळात बिटकॉइनमध्ये संस्थात्मक गुंतवणुकीचा महत्त्वाचा मार्ग बनले होते. ईटीएफच्या प्रभावाविषयी आपण पूर्वीही बोललेलो आहोत.
या फंडांत पैसा येतो तेव्हा बाजाराला मागणीचा आधार मिळतो. पण सलग अनेक दिवस पैसा बाहेर पडू लागला की चित्र उलटतं. अलीकडच्या १२ ते १३ ट्रेडिंग दिवसांत, सलगपणे ईटीएफमधून पैसा बाहेर पडत गेला. सुमारे ४ अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिक रक्कम बाहेर गेल्याचे अहवाल आहेत. बिटकॉइनचा एकूण बाजारमूल्याचा आकार ट्रिलियन डॉलरच्या वर आहे. त्या तुलनेत ही रक्कम अर्ध्या टक्क्याहून कमी आहे. तरीही किंमत १५ टक्क्यांच्या आसपास का घसरली? कारण बाजारात किंमत संपूर्ण मालमत्तेच्या आकाराने ठरत नाही. ती ठरते त्या क्षणी सक्रिय असलेल्या खरेदीदार आणि विक्रेत्यांमधून. जर ताजे खरेदीदार मागे हटले आणि विक्रेते सक्रिय राहिले, तर किंमत वेगाने पडते. त्यामुळे ही घसरण ‘सारेच बिटकॉइन सोडून पळत आहेत’ अशी नसून, तिला ‘लिक्विडिटी शॉक’ अथवा तरलता आटली असे अधिकतर म्हणता येईल.
दुसरा धक्का मानसिक होता. मोठे कॉर्पोरेट बिटकॉइनधारक कायम खरेदी करतील, विकणार नाहीत, असा बाजारात एक समज तयार झाला होता. अमेरिकी कंपनी ‘स्ट्रॅटेजी’ने (पूर्वाश्रमीची ‘मायक्रोस्ट्रॅटेजी’) बिटकॉइनचा काही भाग विकल्याच्या बातम्यांनी हा समज कमकुवत केला. संख्यात्मक परिणाम फार मोठा नसेल; पण प्रतीकात्मक परिणाम मोठा होता. क्रिप्टोमध्ये नॅरेटिव्ह महत्त्वाचं असतं. ‘कधीही न विकणारा’ विकू शकतो, हे समजल्यावर बाजार इतरांबद्दलही प्रश्न विचारू लागतो.
तिसरा मुद्दा म्हणजे पैशांची दिशा बदलणं. सर्वच जोखमीच्या मालमत्तांमधून पैसा बाहेर गेला असे नाही. एआय, आयपीओ आणि काही इक्विटी थीम्सकडे अजूनही लक्ष आहे. म्हणजेच पैसा जोखीम टाळतोय असं सरळ म्हणता येत नाही; तो क्रिप्टोमधून काही प्रमाणात दुसऱ्या जोखमीच्या पर्यायांकडे जातोय. यामुळे बिटकॉइन नेहमीच ‘डिजिटल सोनं’ म्हणून वागेल, ही अपेक्षा धोकादायक ठरते. कधीकधी ते ‘लिक्विडिटी-सेन्सेटिव्ह’ मालमत्तेसारखंही वागतं.
‘मॅक्रो’ घटकही बाजूला ठेवता येत नाहीत. जास्त रोख्यांवर चढा परतावा (बाँड यील्ड्स), मजबूत डॉलर, तेल आणि भू-राजकीय अस्थिरता, व्याजदर कपातीची अनिश्चितता – हे सगळं क्रिप्टोसारख्या मालमत्तेला ताण देऊ शकतं. किमती १५ टक्क्यांनी कमी झाल्या तर नियमित खरेदीदाराला फटका बसतो. पण हाच गुंतवणूकदार जर डेरिव्हेटीव्हजमध्ये असेल तर त्यांचं भांडवलच संपून जाऊ शकतं. त्यामुळे मग किंमत खाली आली की जबरदस्तीची विक्री होते. त्या विक्रीमुळे किंमत आणखी खाली जाते. मग आणखी लिक्विडेशन होतं. हा चक्रव्यूह वेगाने तयार होतो.मग ही मूलभूत पडझड आहे का? अजून तरी स्पष्टपणे तसे म्हणता येत नाही.
मूलभूत पडझड असती तर दीर्घकालीन धारक मोठ्या प्रमाणात विकू लागले असते, नेटवर्कवरील विश्वास ढासळला असता, सुरक्षा किंवा वापरातील गंभीर घट दिसली असती, आणि अगदी जुने गुंतवणूकदारही सरासरी तोट्यात आले असते. सध्या तसे चित्र नाही.बिटकॉइनमध्ये दीर्घकालीन आणि अल्पकालीन धारक अशी विभागणी महत्त्वाची आहे. साधारण १५५ दिवसांपेक्षा जास्त काळ न हललेले कॉइन्स दीर्घकालीन मानले जातात. अलीकडील अंदाजानुसार बिटकॉइन पुरवठ्यापैकी जवळपास ८० टक्के हिस्सा दीर्घकालीन धारकांकडे आहे, तर सुमारे २० टक्क्यांकडील हिस्सा अल्पकालीन किंवा सक्रिय पुरवठा आहे. दीर्घकालीन धारकांचा सरासरी खर्च साधारण ४८ ते ४९ हजार डॉलरच्या आसपास मानला जातो. बिटकॉइन सध्या ६२ हजार डॉलरच्या आसपास असल्याने हे धारक सरासरी नफ्यात आहेत.
पण अल्पकालीन धारकांची स्थिती वेगळी आहे. त्यांचा सरासरी खर्च ७६ ते ७७ हजार डॉलरच्या आसपास आहे. म्हणजे अलीकडील खरेदीदार तोट्यात आहेत. यात ईटीएफ गुंतवणूकदार, मोमेन्टम ट्रेडर्स आणि लीव्हरेज्ड ट्रेडर्स येतात. त्यामुळे दबाव आहे; पण तो मुख्यतः नव्या किंवा कमी संयमी पैशावर आहे. हेच कारण आहे की ही घसरण अजून ‘स्लो कॉलॅप्स’ वाटत नाही.
तरी ‘ईटीएफमुळे पडतंय, काळजी नको’ असं म्हणणं भाबडेपणा ठरेल. पैशांचा प्रवाह बिघडलेला असला, तरी तो दीर्घकाळ बिघडत राहिला तर बाजारातील मंदीवाली अस्वलं जागी होऊ शकतात. म्हणून लक्षात घ्यावयाचे स्तर स्पष्ट असावेत. बिटकॉइन ६० ते ६१ हजार डॉलरवर टिकतं का, हे महत्त्वाचं. ६० हजारच्या खाली साप्ताहिक बंद भाव आला तर सावधगिरी वाढवावी. ५० हजार डॉलरच्या खाली दीर्घकालीन धारकांचाही आत्मविश्वास तपासला जाईल. ४८ ते ४९ हजार डॉलरखाली गेल्यास चर्चाच बदलेल.
इतर चलनांचं चित्र वेगळं आहे. इथेरियमचा प्रश्न बिटकॉइनसारखा नाही. त्यात नेटवर्क वापर, स्टॅकिंग, डेफी आणि ईटीएच /बीटीसी रेशो महत्त्वाचा असतो. अलीकडे इथेरियम बिटकॉइनपेक्षा कमकुवत दिसत आहे. सोलाना अधिक हाय-बीटा आहे. तेजीमध्ये ते वेगाने धावू शकतं; पण घसरणीत जास्त पडू शकतं. चेनलिंकचा संबंध ओरॅकल आणि इन्फ्रास्ट्रक्चर थिसीसशी आहे, पण उपयोगिता असली म्हणून टोकन नेहमी टिकेलच असं नाही. ट्रॉन तुलनेने मजबूत राहिला आहे, कारण त्याचा संबंध स्टेबलकॉइन सेटलमेंट आणि नेटवर्क ॲक्टिव्हीटीशी आहे. पण त्यात नियमनाचा धोका कमी आहे असे समजू नये.
हीच योग्य वेळ आहे या बाजारात काही महत्त्वाच्या गोष्टी अनुभवण्याची.
पहिले म्हणजे ठरलेली सगळी रक्कम एकदम गुंतवू नये. हा तर नेहमीचाच नियम आहे. पण या बाजारात तो अधिक मोलाचा ठरतो. आता कदाचित गुंतवणुकीला संधी वाटू शकते. पण त्यात टप्प्याटप्प्याने गेलेले चांगले. दुसरी गोष्ट, सुरुवात बिटकॉइनपासून करावी; अल्टकॉइन्सपासून नाही. बिटकॉइनची अस्थिरताच सहन होत नसेल, तर सोलाना, चेनलिंक, ट्रॉन किंवा मीम कॉइन्ससाठी आपण तयार नाही. तिसरी, लीव्हरेज पूर्ण टाळावा. मार्जिन, फ्युचर्स, उसनवारीचा पैसा किंवा ‘डबल युवर बिटकॉइन’ वगैरे प्रकार नव्या गुंतवणूकदारांसाठी नाहीत. चौथी, भारतीय कररचना लक्षात घ्यावी. क्रिप्टोवर कर आणि टीडीएस यामुळे वारंवार ट्रेडिंग आकर्षक राहत नाही. त्यामुळे हा निर्णय दीर्घकालीन गुंतवणुकीचा वाटा क्रिप्टोला देण्याचा असावा, रोजच्या खरेदी-विकीचा नाही.
ज्यांनी आधीच क्रिप्टो घेतले आहे, त्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचा पोर्टफोलिओ तपासायला हवा. एकूण संपत्तीत क्रिप्टो किती आहे? बिटकॉइन कोअर आहे की अल्टकॉइन्सने पोर्टफोलिओ व्यापला आहे? ॲव्हरेजिंग खरोखर शिस्तीत आहे की फक्त मनाला दिलासा देण्यासाठी आहे? या सगळ्यातून विक्रीचे योग्य निर्णय घेता येतील. याउलट खरेदी करायची असेल तर किंमत पडली म्हणून सरासरी कमी करणे हे गुंतवणूक शिस्तीत बसत नाही. मूळ भरोसा टिकून असेल, वाटा मर्यादेत असेल आणि ताजी अतिरिक्त रक्कम उपलब्ध असेल, तरच ॲव्हरेजिंग अर्थपूर्ण ठरते.
सध्या बाजार स्पष्ट खरेदीची घंटा वाजवत नाही आणि विनाशाचं शिंगही फुंकत नाही. ही परीक्षेची वेळ आहे. सर्वांना सारखा सल्ला कधीच नसतो. पण आता गुंतवणुकीचे निर्णय मोठ्या प्रमाणावर तुमच्या पोर्टफोलिओवर आधारित असणार आहेत.शेवटी क्रिप्टोच्या रस्त्यावर आपल्याला ‘ये कहाँ आ गये हम’ वरून ‘के मंझिल आयेगी नज़र, साथ चलने से’ म्हणावंसं वाटतं का नाही, हा आज नेमका प्रश्न आहे.
