– अजित जोशी
या लेखमालेच्या सुरुवातीलाच आपण हे म्हटलं होतं की, ‘बिटकॉइन म्हणजे क्रिप्टो चलन नव्हे, तर तो क्रिप्टो चलन प्रकारातील एक किंवा पहिला सदस्य आहे.’ २००९-१० सालच्या बिटकॉइननंतर पुढच्या तीन-चार वर्षांत ‘एलटीसी’ किंवा ‘रिप्ले’ असे बिटकॉइनसारखेच पण वेगवेगळ्या इतर ब्लॉकचेन यंत्रणांवर उपलब्ध असणारे पर्याय जन्माला आले. अर्थात बिटकॉइनप्रमाणे ही चलनं निर्माण करणारे कोणी अज्ञात सातोशी नाकामोटो नव्हते, तर चार्ली ली किंवा जेड मॅकलेब यासारखे ज्ञात तंत्र गुंतवणूकदार होते. पण या तंत्रज्ञानाने प्रगतीचा पुढचा मोठा टप्पा गाठला २०१५ मध्ये ‘इथेरियम’ या स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट मंचामुळे. ब्लॉकचेन म्हणजे अशा असंख्य खोक्यांची साखळी आहे, ज्याच्या प्रत्येक खोक्यात अनेक त्या क्रिप्टो चलनाच्या व्यवहारांचे हिशेब ठेवलेले असतात आणि तो ‘हॅश की’ वापरून बंद केलेला असतो. पुन्हा हे सर्व डिजिटल खोके फक्त एकाच सर्व्हरवर नाही तर अनेक ठिकाणी असल्यामुळे ते उघडून त्यातल्या हिशेबात फेरफार करता येत नाही. प्रत्येक नव्या खोक्यासाठी पूर्वीच्या सर्व हॅश कीच्या नोंदींची यादी द्यावी लागते आणि जिथे हे खोके ठेवलेले आहेत अशा असंख्य संगणकांनी ती बरोबर आहे असं बहुमताने मान्य केलं. कीचा पुढचा खोका निर्माण होतो, हे सगळं आपण आतापर्यंत पाहिलेले आहे. खोका बंद करणारी हॅश की नवीन चलन निर्माण करते पण त्यांच्या निर्मितीचा वेग अर्धा अर्धा होत जातो. पण काही तंत्रज्ञांनी असा विचार केला की, या खोक्यांमध्ये फक्त त्या त्या चलनांच्या व्यवहाराचे हिशेब का बरं ठेवावे? वेगवेगळ्या क्रिप्टो चलनांची थेट देवाणघेवाण, त्यातून होऊ शकणारा कर्जपुरवठा आणि परतफेड, कलाकृतीची सुरक्षितता डिजिटल करणारी ‘एनएफटी’ (यावर आपण स्वतंत्रपणे पुन्हा भेटणार आहोत) किंवा चक्क व्हिडीओ गेमशी संबंधित व्यवहार या सगळ्यांचे हिशेब त्या खोक्यात ठेवता येतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व व्यवहारांमधल्या पैशाच्या देवाण-घेवाणीसाठी आता मध्यवर्ती यंत्रणा उदाहरणार्थ बँक असण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारच्या ब्लॉगचे तंत्रज्ञानामधल्या नोंदी पुरेशा आहेत. यालाच वितरित वित्त म्हणजेच डिसेंट्रलाइज्ड फायनान्स किंवा ‘डेफी’ म्हणतात. अशाप्रकारे आपल्या व्यवहारांच्या नोंदी सुरक्षित राहाव्या याकरिता त्या नोंदी करणारे, त्या नोंदी ठेवणाऱ्यांना फक्त ‘इथेरियम’ या चलनामध्येच मोबदला देतील. साहजिकच अशा मंचावरती जितक्या अधिकाधिक नोंदी होतील तेवढी चलनाची मागणी वाढेल. जेवढं या मंचाचं तंत्रज्ञान परिणामकारक असेल तेवढ्या अधिक नोंदी ठेवल्या जातील.
थोडक्यात चलनाच्या मागणीमागे तंत्रज्ञानाच्या कौशल्याची जोड असेल, ही अशा प्रकारच्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट मंचामागची कल्पना आहे. आणि इथेरियम हे त्यातलं पहिलं चलन…!
प्रत्येक वेळेला व्यवहार करताना जर फी म्हणून इथेरियम द्यावं लागलं, तर त्याचा पुरवठा अनिर्बंध वाढत जाईल. त्यामुळे दर खेपेला काही इथेरियम नष्ट केलं जाईल आणि उरलेलं या सर्व नोंदी ठेवणाऱ्या तंत्रज्ञांना अर्थात व्हॅलिडेटर्स किंवा मायनर्सना मिळेल, अशी रचना करण्यात आली. म्हणजे एक तर तुम्ही तंत्रज्ञ होऊन या नोंदी सुरक्षित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हा आणि त्या सुरक्षित झाल्याचं बहुमताने मान्य झालं, तर त्या मोबदल्यात ब्लॉकचेन-तंत्रज्ञानाकडून नवी इथेरियम मिळवा. किंवा मग पारंपरिक चलन देऊन अस्तित्वात असलेलं इथेरियम विकत घ्या आणि तुमच्या व्यवहारांच्या नोंदी सुरक्षित ठेवण्यासाठी फी म्हणून तंत्रज्ञांना ते द्या. अशा दोन प्रकारे इथेरियमचा वापर होतो. अर्थात पारंपरिक मार्गाने विकत घेतलेलं इथेरियम चलन हे तुम्हाला एक गुंतवणूक म्हणूनही वापरता येतं हे ओघाने आलंच.
या फरकामुळे दुसरीही एक कल्पना जन्माला आली आणि ती म्हणजे खऱ्याखुऱ्या मालमत्तांचं ‘टोकनायझेशन.’ खरं तर यापूर्वीही एखाद्या मालमत्तेच्या आधारे गुंतवणुकीची एकके निर्माण केली जात होती. म्हणजे समजा माझ्याकडे शंभर किलो सोने असेल तर आजचा भाव लक्षात घेता दीडशे कोटी रुपये आहेत. याच्या आधारे मी शंभर रुपयाची दीड कोटी एकके – अर्थात डिबेंचर किंवा बाँड या स्वरूपात विकू शकतो. मात्र या डिबेंचर वा बाँड इत्यादी रोख्यांच्या माध्यमासाठी मर्चंट बँक, बँक, डिपॉझिटरी असे अनेक मध्यस्थ आणि यंत्रणा याची आवश्यकता होती. ‘डेफी’मुळे त्याची गरजच संपली. आता यंत्रांच्या आधारे छोट्या छोट्या रकमेपासून, संपूर्णतः सुरक्षित, फेरफार करता येणार नाहीत अशा स्वरूपाच्या नोंदी सहजपणे करता येणं शक्य झालं आणि तेही काही मिनिटांत. इथेरियमच्या शोधानंतर झालेल्या या आमूलाग्र बदलाचे प्रतिसाद आता कुठे हळूहळू संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या प्राधान्यांमध्ये उमटायला लागलेले आहेत. एका अर्थाने इथेरियमचे मूल्य हे एखाद्या गूगल, मायक्रोसॉफ्टसारख्या आयटी कंपन्यांच्या मूल्याप्रमाणे ठरत जाईल, असं म्हणता येऊ शकतं. कारण हा मंचसुद्धा वेगवेगळ्या आयटी सेवा देत आहे, फक्त मोबदल्यात तो पारंपरिक चलनाऐवजी क्रिप्टो चलन स्वीकारतो हा महत्त्वाचा फरक.
साहजिकच पंधरवड्यापूर्वी ज्या वेळेला क्रिप्टोचलनात मोठी पडझड झाली, तेव्हा इथेरियममध्ये बिटकॉइनपेक्षा काही जास्तच घट आली. कारण आयटी क्षेत्रातल्या या दिग्गज पाश्चिमात्यांनाही अँथ्रोपिकच्या शोधाचा फटका बसलेला होता. मात्र त्यानंतर गेल्या पंधरवड्यात एकूणच क्रिप्टोचलनाचे बाजार हे आपली मांड पक्की करण्यात (कन्सॉलिडेशन) मग्न होते असं म्हणता येईल. या प्रक्रियेत बिटकॉइन आणि तत्सम चलनांमधलं, घबराटीचे वातावरण आता निवळलं आहे, पण उत्साह परत आलेला नाही. याउलट बहुतेक संस्थागत किंवा ईटीएफ गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असलेल्या किंवा गर्दी झालेल्या बिटकॉइनमधून बाहेर पडून ‘एक्सआरपी’ किंवा तत्सम इतर चलनांमध्ये गेलेले आहेत. एकूण क्रिप्टो बाजाराच्या दृष्टीने ही सूचक घटना आहे. कारण पडझड झाली तरी लोक मालमत्तेच्या या प्रकारातून बाहेर पडलेली नाहीत. तर कन्सोलिडेशनच्या फेजमध्ये असतं त्याप्रमाणे आपला निधी या चलनांमधल्याच वेगवेगळ्या गुंतवणुकीमध्ये वाटून पोर्टफोलिओ अधिक स्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पण याच वेळेला आलेली दुसरी एक बातमी लक्षणीय आहे. ब्लॅकरॉक या प्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार कंपनीने ‘डेफी’च्या माध्यमातून मोठा निधी ठेवण्याचं ठरवलेलं आहे. गेल्या लेखात आपण पाहिलं की मोठे संस्थागत गुंतवणूकदार आता या चलनाकडे गुंतवणुकीचं माध्यम म्हणून पाहायला लागलेले आहेत. पण ब्लॅकरॉकसारख्या कंपनीने यामध्ये प्रवेश करणे याचा अर्थ ते या चलनाकडे निव्वळ गुंतवणूक म्हणून नव्हे तर भविष्यातल्या कार्यपद्धतीचा आधार म्हणून पाहतात असा होतो. थोडक्यात आता चलनामध्येच नव्हे तर चलनामागच्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक होत आहे. मात्र असं असलं तरी बाजारातल्या पडझडीतून ही चलनं अजूनही वर आलेली नाहीत. किंबहुना नक्की कधी येतील याबद्दलचा अंदाजही सध्या व्यक्त करणे कठीण आहे. क्रिप्टो चलन आणि खास करून बिटकॉइन, इथेरियम किंवा तुम्ही जिथे गुंतवणूक करत आहात ते चलन, दीर्घकाळ अस्तित्वात राहील आणि व्यवहारांना आधार बनेल असं वाटतं त्या गुंतवणूकदारासाठी ही सुवर्णसंधी आहे, असं म्हणायला हवं. दुसऱ्या बाजूला या चलनाकडे निव्वळ गुंतवणुकीचं माध्यम म्हणून पाहणाऱ्यांनी सावध राहायला हवं. काही ठरावीक किमतीचे टप्पे ओलांडून जर या चलनाने उसळी मारायला सुरुवात केली तरच या दुसऱ्या वर्गातल्या गुंतवणूकदारांनी इथे यायला हरकत नाही.

