डॉ. अजित जोशी
शनिवार, ७ एप्रिल २०२६ ला न्यूयॉर्कच्या वेळेनुसार रात्री आठ वाजता जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण बरोबरच्या युद्धात शस्त्रसंधी घोषित केली तेव्हा अर्थात न्यूयॉर्क शेअर बाजार बंद झालेला होताच. पण त्याचबरोबर लंडनमध्ये तेव्हा मध्यरात्रीनंतर एक वाजले असावेत. मुंबईत सकाळचे साडेपाच आणि सिंगापूरमध्ये आठ! थोडक्यात कुठल्याच महत्त्वाच्या बाजारात व्यवहार सुरू झालेले नव्हते. या घोषणेसरशी तात्काळ म्हणजे अवघ्या एका तासात तीन टक्क्यांनी आणि तीन तासात पाच टक्क्यांनी वर गेली ती बिटकॉइनची किंमत. कारण क्रिप्टोचा बाजार कधीच बंद होत नाही तर तो अहोरात्र, २४ तास सुरूच असतो. या कारणाने ज्या गुंतवणूकदारांना खूप कमी कालावधीत खरेदी विक्री करत फायदा मिळवण्याची आवड आहे, अशांसाठी क्रिप्टोकरन्सी आकर्षक असणे स्वाभाविक आहे. पण संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग लक्षात घेता दीर्घकालीन गुंतवणुकीकडे पाहणाऱ्यांनाही ‘क्रिप्टो’ हे चलन आकर्षक पर्याय असू शकतो. आणि अशा महत्त्वाच्या प्रसंगी गुंतवणुकीची संधी साधायला क्रिप्टो बाजार २४ तास खुली संधी देतो.
इराण युद्धातल्या शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी शेअर बाजारात नव्या उत्साहाने गुंतवणूक करायला सुरुवात केली. पण तशाच संधी क्रिप्टो बाजारातही उपलब्ध आहेत हे लक्षात घ्यायला हवं. यापूर्वी वर्णन केलेली वाढती संस्थात्मक गुंतवणूक आणि आखातातील युद्ध थांबण्याची शक्यता हे लक्षात घेता या चलनात कुठे गुंतवणूक सुरू करता येईल, ते आज पाहू.
आपल्याला माहिती आहे की नव्या गुंतवणूकदारांनी नेहमीच भरपूर बाजार मूल्य असलेल्या आणि खूप काळ अस्तित्वात असलेल्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करावी. व्यवहार आणि उलाढालीच्या दृष्टीने मोठ्या चलनांकडे पाहिलं तर ‘बिटकॉइन’ मागोमाग ‘इथेरियम’ आणि ‘सोलाना’ यांचा क्रमांक येईल. एका अर्थाने या क्रिप्टो बाजारातल्या ब्लू चिप्स आहेत. शेअर्समध्ये जसं गुणोत्तरांचा विश्लेषण हे आपल्याला योग्य कंपनी निवडायला मदत करते त्याचप्रमाणे क्रिप्टोच्या संदर्भात तुलना करायची असेल तर मिळणारी फी किंवा नेटवर्क वापराबद्दलचं उत्पन्न हा एक महत्त्वाचा निकष आहे आणि एकूण किती लोक या नेटवर्कचा वापर करतात, हे महत्त्वाचे ठरते. त्यांच्या आधारे ‘एनव्हीटी’ म्हणजे फीचं बाजारमूल्याशी असलेले गुणोत्तर किंवा सरासरी रोजचे वापरकर्ते यांचा हिशेब मांडला जातो. यात ‘सोलाना’मध्ये १५ ते २० लाख वापरकर्ते असतील, तर ‘बिटकॉइन’कडे साधारण दहा लाख आणि इथे ‘इथेरियम’कडे तर अवघे पाचच लाख आहेत.
गुणोत्तरांच्या संदर्भात निव्वळ आकडा महत्त्वाचा नसतो. उदाहरणार्थ, ‘सोलाना’चे आजचे बाजार मूल्य सुमारे ४० ते ६० अब्ज डॉलर आहे, तर ‘बिटकॉइन’चे चौदाशे ते सोळाशे अब्ज डॉलर. त्यामुळे कमी व्यवहार असले तरी ‘बिटकॉइन’चा एनव्हीटी ८० ते १२० पर्यंत जातो तर ‘सोलाना’चा १० ते २०च्या आसपास! याचा दुसरा अर्थ असाही होतो की जर ‘सोलाना’ स्वतःला एक महत्त्वपूर्ण चलन म्हणून हळूहळू प्रस्थापित करू शकले तर त्याच्या बाजार मूल्यालाही वर जाण्यास वाव राहतो. एका अर्थाने क्रिप्टोमधील एनव्हीटी शेअर बाजारातल्या पीई गुणोत्तराचे काम करते. याच न्यायाने तीनशे ते साडेतीनशे अब्ज डॉलर्सच्या आसपास बाजारमूल्य असणाऱ्या ‘इथेरियम’चा एनव्हीटी ६०च्या घरात जातो.
‘बिटकॉइन’ जरी सर्वात ताकदवान चलन असलं तरी बाकीच्या दोन चलनांचे वाढते महत्त्व समजून घ्यायचं तर वापरकर्त्यांचा आकडा पाहायलाच हवा. वापरकर्त्यांच्या संख्येत प्रतिवर्षी होणारी वाढ लक्षात घेतली तर ‘बिटकॉइन’च्या पाच ते दहा टक्क्यांच्या तुलनेत ‘इथेरियम’चे वापरकर्ते दहा ते वीस टक्क्यांनी वाढत आहेत आणि ‘सोलना’चे ३० ते ६० टक्के दराने.
याच तीन चलनांकडे तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, ‘बिटकॉइन’ सध्या ६५,००० – ६८,००० डॉलर या पातळीवर आधार घेत आहे आणि ७२,००० – ७४,००० डॉलर या पातळीवर प्रतिकार आहे. ‘इथेरियम’साठी १,९०० ते २,००० डॉलर हा सपोर्ट आहे, तर २,२०० डॉलरच्या आसपास प्रतिकार आहे. ‘सोलाना’साठी ८० ते ८५ डॉलरचा आधार आणि ९५ ते १०० डॉलर ही त्याची प्रतिकार पातळी आहे. यावरून स्पष्ट होतं की, बाजार सध्या एका मर्यादेत फिरत आहे, इराण युद्ध आणि तंत्रज्ञानातल्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर या चलनात जी मंदी आली ती तोडून वरच्या बाजूला झेपावयाच्या तयारीत ही चलने दिसतात, पण त्याचबरोबर लोकांचा आत्मविश्वास डळमळला तर ती कोलमडूही शकतात.
पण तांत्रिक आधार आणि प्रतिकाराचे हे आकडे अजून एक गोष्ट दाखवतात. ती म्हणजे या तीनही चलनांचे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने परस्पर संदर्भात असलेले स्थान. गेल्या तीन वर्षांत या तिन्ही क्रिप्टोमध्ये वेगळे ट्रेंड दिसले. संकटाच्या काळात गुंतवणूकदार सर्वात आधी ‘बिटकॉइन’ विकतात. कारण ते सर्वात तरल (लिक्विड) साधन आहे, पण नंतर तेच ‘बिटकॉइन’ स्थिरही होतं. ‘इथेरियम’ जास्त पडतं पण फेरउभारीत जास्त वाढतं. ‘सोलाना’ सर्वात जास्त पडतं आणि सर्वात जास्त वाढतं – म्हणजेच जास्त जोखीम, जास्त परतावा. जोखीम आणि परताव्याची ही गणितं लक्षात आली की, किती प्रमाणात कुठल्या चलनामध्ये गुंतवणूक करावी हे जाणत्या गुंतवणूकदाराला स्वतःच्या जोखमीच्या क्षमतेनुसार ठरवता येईल.
क्रिप्टोचलनातल्या घडामोडी फक्त युद्धाच्या संदर्भात नाहीत. गेल्या काही आठवड्यात अमेरिकी सरकारने घेतलेले महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय पाहायला हवेत. एक हा की क्रिप्टो स्वरूप हे नक्की वस्तू किंवा कमोडिटी म्हणून असेल का ‘सिक्युरिटी’ म्हणजे हुंडी या स्वरूपात असेल याबद्दल त्याने स्पष्टता दिली. दुसरं असं की, या तंत्रज्ञानाच्या आधारे होणाऱ्या व्यवहारांना कायद्याच्या चौकटीत बसवलं आणि त्या संदर्भातले काही कडक नियमही शिथील केले. या सगळ्याचा फायदा इतर क्रिप्टो चलनांना खास करून होणार आहे.
आपण पाहिलं होतं की, निव्वळ चलन म्हणून काम न करता ‘इथेरियम’चा प्लॅटफॉर्म अनेक वेगवेगळ्या व्यवहारांची खात्रीशीर आणि विश्वासार्ह पद्धतीने नोंद ठेवण्याचं डिजिटल माध्यम म्हणून सुद्धा काम करते. ‘सोलाना’ हे चलन म्हणजे यातलीच पुढची व प्रगत आवृत्ती आहे. या व्यवहारांचं काम ‘सोलाना’ अतिशय जलद गतीने आणि फार मोठ्या प्रमाणात, पण तुलनेत छोट्या व्यवहारांसाठी करत असते. या दोन्ही चलनांच्या बाजारातल्या किमती त्यांनी केलेल्या व्यवहारांवर अवलंबून असतात. सहाजिकच अमेरिकी सरकारने एकूणच तंत्रज्ञानाचा वापर व्यवहारांच्या नोंदीसाठी करण्याला प्रोत्साहन देण्याचं जे धोरण आणलेलं आहे, त्याचा मोठा फायदा या दोन चलनांना होईल.
अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा कल पाहता कोणताही निर्णय आणि धोरणे यांमध्ये सातत्य असण्याची शक्यता कमी. कदाचित हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत सुद्धा युद्धाच्या संदर्भातील स्थिती बदललेली असेल. म्हणूनच गुंतवणुकीचा निर्णय घेताना फक्त युद्धाचा विचार पुरेसा नाही. क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीला सुरुवात करणाऱ्यांनी या सगळ्याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आणि जास्त जोखीम त्यामुळे जास्त नुकसानीची शक्यता, पण त्याचबरोबर जास्त फायद्याचीही अपेक्षा, हा कोणत्याही गुंतवणुकीतील मूलभूत नियम इथेही लागू होतोच.
| तपशील | बिटकॉइन | इथेरियम | सोलाना |
| अब्ज डॉलरमध्ये बाजार मूल्य | १,३०० – १,४०० | ३०० – ३५० | ४० – ६० |
| एनव्हीटी गुणोत्तर | ८० – १२० | ३० – ६० | १० – २५ |
| लाखांमध्ये सक्रिय वापरकर्ते | ०.९ – १.१ | ०.४ – ०.६ | १.५ – २.० |
| प्रतिवर्ष वापरकर्ते वाढीचा दर | ५ – १०% | १० – २०% | ३० – ६०% |
