-अर्थवृ संदीप वाळुंज
“गुंतवणूक तत्त्वज्ञानाबाबतची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे असे तत्त्वज्ञान अंगीकारणे, जे तुम्हाला सातत्याने अनुसरता येईल.” – डेव्हिड बूथ
“The most important thing about an investment philosophy is that you have one you can stick with.” – David Booth
जगातील आघाडीच्या गुंतवणूक व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या डिमेन्शनल फंड अॅडव्हायझर्सचे सहसंस्थापक डेव्हिड बूथ यांनी आपल्या अनेक दशकांच्या अनुभवाचे सार एका साध्या वाटणाऱ्या विधानात सांगितले आहे. प्रथमदर्शनी त्यांचे विधान स्वयंसिद्ध वाटते. पण थांबून थोडा विचार केला की, त्याची खोली लक्षात येते. गुंतवणूकदार वजनदार गुंतवणूक धोरण शोधण्याला पुष्कळ महत्त्व देतात. वेगवेगळ्या धोरणांच्या ऐतिहासिक परताव्यांची तुलना करतात, यशस्वी गुंतवणूकदारांच्या पद्धतींचा अभ्यास करतात. पण बूथ यांच्या मते, योग्य गुंतवणूक तत्त्वज्ञान सापडणे ही केवळ सुरुवात आहे. परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्या तत्त्वज्ञानानुसार वागता येणे ही खरी मेख आहे. वीस वर्षे सातत्याने अनुसरलेले एक ‘साधारण’ धोरण, दोन वर्षांच्या निराशाजनक कामगिरीनंतर सोडून दिलेल्या एखाद्या सैद्धान्तिकदृष्ट्या श्रेष्ठ धोरणापेक्षा अधिक लाभदायक ठरू शकते.
गुंतवणुकीत तत्त्वज्ञानाची काय गरज?
गुंतवणूक करताना आज घेतलेल्या निर्णयाचे परिणाम स्पष्ट व्हायला अनेक वर्षे लागू शकतात. व्यवसायांचे स्वरूप बदलते, नवे तंत्रज्ञान प्रस्थापित उद्योगांपुढे अनपेक्षित आव्हाने उभी करते, आर्थिक परिस्थिती आणि त्याबरोबर बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना झपाट्याने बदलतात. सखोल अभ्यास करून केलेली गुंतवणूकही अकल्पित कारणांमुळे निराश करू शकते. काही वेळा गुंतवणुकीमागील मूळ गृहीतक योग्य असते; पण त्या गुंतवणुकीचे खरे मूल्य बाजारभावात प्रतिबिंबित व्हायला अनेक वर्षे लागतात. इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे गुंतवणुकीत आपला निर्णय योग्य होता की अयोग्य, याचे उत्तर लगेच मिळत नाही.
ही अनिश्चितता आणि निर्णयांचे परिणाम दिसण्यास लागणारा विलंब यांमुळे आपली वैचारिक बैठक खमकी लागते. आपण कोणत्या प्रकारची गुंतवणूक करायची आणि कोणती नाही, कोणती जोखीम स्वीकारण्याजोगी आहे आणि भविष्याबाबत निश्चित माहिती नसताना निर्णय कसे घ्यायचे, याविषयीच्या मूलभूत धारणा म्हणजे गुंतवणूक तत्त्वज्ञान. अशी चौकट नसेल, तर त्या त्या वेळी जे यशस्वी होताना दिसते, त्याकडे गुंतवणूकदार सहज आकर्षित होतात. उलट, स्पष्ट तत्त्वज्ञान असेल तर अलीकडच्या बाजारातील चढउतारांवरच अवलंबून न राहता विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी त्यांना एक ठोस आधार मिळतो.
पण प्रत्येक तत्त्वज्ञानाची एक किंमत असते
गुंतवणुकीच्या तीन प्रचलित पद्धती पाहूया. मूल्याधारित गुंतवणूक (व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग) करणारे गुंतवणूकदार अशा कंपन्यांचे शेअर शोधतात जे त्यांच्या वास्तविक मूल्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध असतात. वाढकेंद्रित गुंतवणूक (ग्रोथ इन्व्हेस्टिंग) करणारे गुंतवणूकदार अशा कंपन्यांच्या शोधात असतात ज्यांच्या नफ्यात भविष्यात मोठी वाढ होऊ घातली आहे – त्या सध्या महाग असल्या तरी. तर कलाधारित (मोमेंटम इन्व्हेस्टिंग) गुंतवणूक करणारे अलीकडे तुलनेने चांगली कामगिरी करणाऱ्या शेअर्समधील भाववाढीचा कल पुढेही काही काळ टिकेल, या अपेक्षेने गुंतवणूक करतात.
या तिन्ही पद्धतींमागे परतावा मिळवण्याचा आपापला तर्कसंगत विचार आहे आणि तिन्ही पद्धतींचा यशस्वीपणे अवलंब करणारे गुंतवणूकदारही आहेत. पण प्रत्येक पद्धतीच्या काही मर्यादा आहेत. व्हॅल्यू इन्व्हेस्टरला तुलनेने महाग म्हणून नाकारलेल्या ग्रोथ कंपन्यांचे शेअर पुढची अनेक वर्षे अधिक परतावा देताना पाहावे लागू शकते. ग्रोथ इन्व्हेस्टरला उत्तम व्यवसाय असलेल्या कंपनीच्या शेअरसाठी आपण मोजलेली किंमत अवाजवी होती, हे उशिरा लक्षात येऊ शकते. तर मोमेंटम इन्व्हेस्टरला बाजारातील प्रस्थापित कल अचानक उलटल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
बरेच गुंतवणूकदार एखाद्या तत्त्वज्ञानाकडे त्यातून मिळू शकणाऱ्या आकर्षक परताव्यामुळे वळतात. त्या पद्धतीने यश मिळवलेल्या गुंतवणूकदारांचा अभ्यास करतात, ऐतिहासिक परतावे पाहतात आणि त्याच्या श्रेष्ठत्वाविषयी आडाखे बांधतात. मात्र, त्या तत्त्वज्ञानाच्या मर्यादा समजून घेणारे तुलनेने अगदी कमी असतात. प्रत्यक्षात मात्र कोणतेही तत्त्वज्ञान स्वीकारताना त्याबरोबर काही तडजोडीही अनायसे स्वीकाराल्या जातात. विविध प्रकारच्या गुंतवणुकीत पैसे विभागून ठेवणाऱ्याला आपल्या पोर्टफोलिओतील काही गुंतवणुकी जास्त आणि काही कमी परतावा देणार आहेत, हे साहजिकच स्वीकारावे लागते. त्यामुळे तत्त्वज्ञान निवडणे म्हणजे केवळ परतावा कुठून मिळवायचा हे ठरवणे नव्हे; तर कोणत्या संधी सोडून देणार आणि कोणत्या प्रकारची निराशा सहन करणार, हेही ठरवणे होय.
तत्त्वज्ञान गुंतवणूकदाराच्या स्वभावाला अनुरूप हवे
एखादे गुंतवणूक तत्त्वज्ञान तर्कशुद्ध असले, तरी ते अनुसरण्यासाठी आवश्यक मानसिकता नसलेल्या व्यक्तीला ते उपयोगी पडेलच असे नाही. उदाहरणार्थ, मोजक्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केल्यास असाधारण परतावा मिळवण्याची अधिक संधी असते, अशी एखाद्या गुंतवणूकदाराची अभ्यासाअंती खात्री झाली असेल. पण समजा त्यातील एका कंपनीचा शेअर तीस टक्क्यांनी घसरला आणि तो इतका अस्वस्थ झाला की आपला अभ्यास बाजूला ठेवून त्याने घाईघाईने तो शेअर विकला, तर ही पद्धत त्याच्या उपयोगाची ठरणार नाही. म्हणूनच निवडलेले तत्त्वज्ञान गुंतवणूकदाराची आर्थिक परिस्थिती, गुंतवणुकीचा कालावधी, ज्ञान आणि स्वभाव यांच्याशी सुसंगत असले पाहिजे. अर्थात, याचा अर्थ गुंतवणुकीतील प्रत्येक अस्वस्थता टाळायची असा नाही. मुद्दा एवढाच की निवडलेल्या पद्धतीतील चढउतार सहन करण्याची आपली क्षमता डोळसपणे ओळखली पाहिजे.
यात एक विरोधाभास लक्षात घेण्यासारखा आहे. कित्येक गुंतवणूकदार जे तत्त्वज्ञान अनुसरत असल्याचा दावा करतात आणि प्रत्यक्षात जे आचरणात आणताना दिसतात, त्यात मोठा फरक दिसतो. एखादी व्यक्ती स्वतःला दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणवते; पण बाजारात मोठी घसरण झाली की ताबडतोब शेअर विकून टाकते. दुसरी व्यक्ती योग्य मूल्यांकनाच्या तत्त्वाचा पुरस्कार करतो असे सांगते; पण बाजारात चर्चेत असलेल्या कंपन्यांचे शेअर अवाजवी वाटणाऱ्या भावात वारंवार खरेदी करते. गुंतवणुकीच्या क्षेत्रातही तुम्ही भिंतीवर ज्याचा फोटो लावता तो तुमचा आदर्श नसतो तर तुम्ही ज्याप्रमाणे वागता, तो असतो.
वारंवार धोरण बदलण्याचा भुर्दंड
आपण मानत असलेले तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष वर्तन यांतील ही विसंगती जेव्हा वारंवार गुंतवणूक धोरण बदलले जाते, तेव्हा आणखीनच नुकसानकारक ठरते. समजा, एखाद्या गुंतवणूकदाराने व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगपासून सुरुवात केली. काही वर्षे ग्रोथ कंपन्यांचे शेअर अधिक परतावा देत असल्याचे पाहून त्याने आपली मूळ पद्धत सोडली आणि ग्रोथ कंपन्यांमध्ये गुंतवणूक सुरू केली. त्यानंतर बाजारातील परिस्थिती बदलली आणि महाग असलेल्या ग्रोथ कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. निराश होऊन त्याने तुलनेने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या, नियमित लाभांश देणाऱ्या कंपन्यांकडे मोर्चा वळवला.
पुढे बाजारात पुन्हा तेजी आली, तेव्हा सर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअरच्या तुलनेत त्याचा पोर्टफोलिओ पुन्हा मागे पडला. या तिन्ही पद्धतींपैकी कोणतीही मुळात चुकीची नव्हती. धोरण बदलण्याच्या वेळेने या गुंतवणूकदाराचा घात केला. एखाद्या धोरणाला अनुकूल परिस्थितीचा फायदा मिळून गेल्यानंतर तो त्या धोरणाकडे वळत होता आणि दुसऱ्या धोरणाला प्रतिकूल परिस्थितीचा फटका बसल्यानंतर त्याचा त्याग करत होता. अशा प्रकारे अनेक उत्तम गुंतवणूक पद्धती वापरूनही तो वारंवार त्यांच्या लाभांपासून वंचित राहिला. कारण त्या पद्धतीचा फायदा अनुभवता येईल इतका काळ त्याने कोणतीच पद्धत अनुसरलेली नव्हती.
निष्ठेचे रूपांतर हट्टात होतेय का यावरही लक्ष ठेवा!
याचा अर्थ एकदा गुंतवणूक तत्त्वज्ञान निवडले की काहीही झाले तरी त्याच्याशी एकनिष्ठ राहावे, असा अजिबात नाही. तसे केले तर धरसोड वृत्तीची जागा आंधळ्या हट्टाने घेतली असे होईल. जग बदलत असते आणि गुंतवणुकीच्या पद्धतींनाही त्या बदलांची दखल घ्यावी लागते. नव्या तंत्रज्ञानामुळे कंपन्यांची स्पर्धात्मक बलस्थाने बदलतात, व्यवसायांची स्वरूपे बदलतात, नियामक बदलांमुळे उद्योगांची रचना बदलते आणि वित्तीय बाजार अधिक प्रगत होत जातात.
या नव्या वास्तवाशी जुळवून घेऊ न शकणारे गुंतवणूक तत्त्वज्ञान कालांतराने कालबाह्य होते. पण बाजारातील प्रत्येक बदलाबरोबर बदलत राहणारे तत्त्वज्ञानही गुंतवणूकदाराला कोणतीच निश्चित दिशा देऊ शकत नाही. न बदलणारी मूलभूत तत्त्वे आणि तात्कालिक परिस्थितीचा रेटा, यातला फरक लक्षात यायला हवा. उदाहरणार्थ, दीर्घकाळ टिकणारी स्पर्धात्मक बलस्थाने असलेल्या कंपन्यांचा शोध घेणाऱ्या गुंतवणूकदाराने अशी बलस्थाने नेमकी कशामुळे टिकतात, याविषयीचे आपले आकलन वेळोवेळी तपासले पाहिजे. एकेकाळी देशभर पसरलेले वितरण जाळे किंवा प्रस्थापित ब्रँड ही प्रतिस्पर्ध्यांपासून संरक्षण देणारी मोठी बलस्थाने असू शकत होती. तंत्रज्ञानातील बदलांमुळे त्यांचे महत्त्व कमी होऊ शकते. पण त्यामुळे टिकाऊ स्पर्धात्मक बलस्थाने असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे मूळ तत्त्व चुकीचे ठरत नाही.
तत्त्वज्ञानाचा गाभा कायम ठेवून त्याच्या अंमलबजावणीच्या सूत्रात बदल करणे शक्य असते. मात्र, एखाद्या गुंतवणूक पद्धतीतून निराशाजनक परिणाम मिळू लागले की अधिक कठीण प्रश्न उभा राहतो. ही केवळ त्या पद्धतीसाठी प्रतिकूल परिस्थिती आहे, की तिच्यामागील मूळ गृहीतकांनाच धक्का देणारे काही बदल घडले आहेत? व्हॅल्यू इन्व्हेस्टरने तुलनेने महाग कंपन्यांचे शेअर्स काही काळ स्वस्त कंपन्यांपेक्षा अधिक परतावा देतील, अशी शक्यता गृहीत धरली पाहिजे. त्यामुळे योग्य मूल्यांकनाचे महत्त्व कमी होत नाही. पण एखाद्या उद्योगातील कंपन्यांच्या व्यवसायात मूलभूत घसरण होत असताना ती ओळखण्यात त्याचा अभ्यास वारंवार अपयशी ठरत असेल आणि तो अशा कंपन्यांचे शेअर स्वस्त समजून खरेदी करत असेल, तर दोष बाजाराच्या तात्पुरत्या चढउताराचा नसून त्याच्या मूल्यांकन पद्धतीचा असू शकतो.
यातून धडा काय घ्यायचा?
सर्वप्रथम एखादे गुंतवणूक तत्त्वज्ञान अंगीकारण्यापूर्वी ते यशस्वी होण्यासाठी कोणती गृहीतके खरी ठरणे आवश्यक आहे, हे समजून घ्या. त्यानंतर ती गृहीतके आता लागू पडतात की नाही, हे कोणत्या पुराव्यांवरून आपण ठरवायचे, हेही ठरवून ठेवा. कोणत्या परिस्थितीत हे तत्त्वज्ञान उपयोगाचे नाही, या प्रश्नाचे उत्तर देता येत नसेल, तर त्यातत्त्वज्ञानावरील विश्वास आणि त्याचा दुराग्रह यांत फरक करणे कठीण होऊ शकते.
कोणताही पुरावा आपले मत बदलू शकणार नाही, अशी भूमिका असेल, तर ते तत्त्वज्ञान निर्णय घेण्यासाठीची चौकट न राहता केवळ एक अंधविश्वास ठरते.
म्हणूनच गुंतवणूकदाराला दोन प्रकारची शिस्त अंगीकारणे आवश्यक असते. प्रतिकूल परिणाम मिळत असले, तरी ते आपल्या धोरणामागील मूळ तत्त्वांशी विसंगत नसतील तेव्हा संयम राखण्याची; आणि नवे पुरावे त्या तत्त्वांमागील गृहीतकांनाच आव्हान देत असतील, तेव्हा प्रामाणिकपणे आपली भूमिका बदलण्याची. शेवटी, गुंतवणुकीत निष्ठा हवी ती तत्त्वांशी; तात्कालिक निष्कर्षांशी नव्हे. परिस्थिती प्रतिकूल असताना तत्त्वांवर टिकून राहणे हे धैर्य आहे. पण ती तत्त्वे ज्या गृहीतकांवर उभी आहेत, तीच चुकीची ठरल्यावरही त्यांना चिकटून राहणे हा दुराग्रह आहे. हा फरक ओळखता येणे, हीच गुंतवणूकदाराच्या प्रगल्भतेची खरी कसोटी होय.
(लेखक ‘इक्विरस’ समूहाचे मुख्य व्यवसायवृद्धी अधिकारी असून लेखात व्यक्त केलेली मते त्यांची वैयक्तिक आहेत. sandeep.walunj@zohomail.in)
