– अजय वाळिंबे
Deepak Nitrite Share Price Analysis : भारतीय केमिकल क्षेत्रातील वेगाने वाढणारी कंपनी ‘दीपक नायट्राइट लिमिटेड’च्या (Deepak Nitrite Ltd) शेअरमध्ये सध्या गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. जून २०२६ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने नक्त नफ्यात तब्बल ५७ टक्क्यांची भरघोस वाढ साध्य केली आहे. ५,००० कोटींच्या आगामी प्रकल्पांसह आणि नव्या उत्पादन क्षमतेसह या मिडकॅप शेअरचे भवितव्य कसे आहे, याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे.
दीपक नायट्राइट लिमिटेड (बीएसई कोड ५०६४०१)
वेबसाइट: http://www.godeepak.com
प्रवर्तक: दीपक मेहता
बाजारभाव: रु. १७५०/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: केमिकल्स
भरणा झालेले भाग भांडवल: रु. २७.२८ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ४९.३४
परदेशी गुंतवणूकदार ०६.२४
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २३.७६
इतर/ जनता २०.६६
पुस्तकी मूल्य: रु.४२८
दर्शनी मूल्य: रु. २/-
लाभांश: ३७५%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ५७.४३
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३०.१
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २८.६
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.२८
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १८.८
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (ROCE): ११.४
बीटा : ०.९
बाजार भांडवल: रु. २३८६३ कोटी (मिड कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १९०४/१२८०
गुंतवणूक कालावधी : २४ महिने
वर्ष १९७० मध्ये स्थापन झालेली ‘दीपक नायट्राइट लिमिटेड’ ही कंपनी मूलभूत मध्यवर्ती रसायने (बेसिक इंटरमीडिएट्स), फाइन आणि स्पेशालिटी केमिकल्स, परफॉर्मन्स उत्पादने आणि फिनोलिक्सचे उत्पादन करते. कंपनी भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या केमिकल इंटरमीडिएट्स कंपन्यांपैकी एक असून कंपनीकडे ३६ हून अधिक उत्पादने आणि ५६ हून अधिक ॲप्लिकेशन्सची श्रेणी आहे, जी पुढील दोन विभागांमध्ये विभागली गेली आहे.
व्यावसायिक विभाग (आर्थिक वर्ष २६):
अ) फिनोलिक्स (६८ टक्के):
कंपनी क्युमीन, फिनोल, ॲसिटोन, आयसोप्रोपाइल अल्कोहोल, अल्फा मिथाइल स्टायरीन (एएमएस) इत्यादींचे उत्पादन करते. ही उत्पादने लॅमिनेट्स आणि प्लायवूड, ऑटोमोटिव्ह, बांधकाम, औषधनिर्माण (फार्मास्युटिकल्स) आणि ॲडेसिव्ह्ज (चिकटवणारे पदार्थ) यांसारख्या उद्योगांना पुरवली जातात. ५० टक्के बाजारहिश्श्यासह दीपक नायट्राइट भारतातील फिनोल आणि ॲसिटोनची सर्वात मोठी उत्पादक आहे.
ब) ॲडव्हान्स्ड इंटरमीडिएट्स (३२ टक्के):
कंपनी नायट्राइट्स, नायट्रो टोल्युइडिन्स, झायलिडिन्स, ऑक्साइम्स, क्युमिडिन्स, ऑप्टिकल ब्राइटनिंग एजंट्स इत्यादींचे उत्पादन करते. ही उत्पादने रंगद्रव्ये, डायज, रबर, कागद, कृषी-रसायने, औषधनिर्माण, जलशुद्धीकरण इत्यादी उद्योगांना पुरवली जातात. ही कंपनी भारतातील सोडियम नायट्राइटची सर्वात मोठी उत्पादक आहे आणि झायलिडिन्स व ऑक्साइम्सच्या जागतिक उत्पादकांमध्ये पहिल्या तीन कंपन्यांमध्ये गणली जाते.
महसूल विभागणी:
देशंतर्गत: ८६ टक्के, निर्यात: १४ टक्के
कंपनीची उत्पादने ६ खंडांमधील ५० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात.
- संशोधन आणि विकास : कंपनीचे नंदेसरी येथे संशोधन आणि विकास (आरअँडडी) केंद्र आहे. कंपनी स्पेशालिटी केमिकल क्षेत्रातील क्षमता वाढवण्यासाठी नवीन उत्पादने विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते. कंपनीने ७७ स्वामित्व हक्क अर्ज (पेटंट) दाखल केले असून, त्यापैकी २२ पेटंट्स मंजूर झाले आहेत. गेल्याच वर्षी, कंपनीने वडोदरा येथे १०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ५ एकर क्षेत्रातील एका नवीन अत्याधुनिक संशोधन आणि विकास केंद्राचे उद्घाटन केले.
- ग्राहक वर्ग: कंपनी १,५०० हून अधिक ग्राहकांना सेवा पुरवते; यामध्ये बायर क्रॉप, युनिलिव्हर, इंडियन ऑइल, रॅलिस, बीएएसएफ, लोरियल, लुब्रिजोल, रिलायन्स इंडस्ट्रीज तसेच निरमा इत्यादींचा समावेश आहे.
- उत्पादन प्रकल्प: दीपक नायट्राइट भारतातील ५ ठिकाणी ७ उत्पादन केंद्रे चालवते.
- कंपनीने गुजरातच्या दहेज येथे ८५ कोटी रुपये भांडवली खर्चासह आपला नायट्रेशन आणि दुसरा हायड्रोजनेशन प्रकल्प कार्यान्वित केला आहे. तसेच, गुजरातच्या नंदेसरी येथे ५१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून नायट्रिक ॲसिड प्रकल्प कार्यान्वित केला. याव्यतिरिक्त, गेल्याच वर्षी दहेज येथे ११५ कोटी रुपये भांडवली खर्चासह एक हायड्रोजनेशन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.
कंपनी आपली उपकंपनी ‘दीपक केम टेक लिमिटेड’द्वारे दहेज येथे १६५ केटीए क्षमतेचा पॉलीकार्बोनेट रेझिन प्रकल्प उभारण्यासाठी ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे; हा प्रकल्प जून २०२८ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. तसेच, कंपनी ३०० केटीए फिनॉल, १८५ केटीए ॲसीटोन आणि १०० केटीए, आयसोप्रोपाइल अल्कोहोलची क्षमता वाढवण्यासाठी ३,५०० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेत आहे, जो त्यांच्या आगामी दीपक नायट्राइट प्रकल्पाशी जोडला जाईल.
कंपनीने अॅग्रो केमिकल क्षेत्रातील एका महत्त्वाच्या मध्यवर्ती उत्पादनाच्या निर्मितीसाठी २२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे ‘स्पेशालिटी फ्लोरोकेमिकल्स’ क्षेत्रात कंपनीचा प्रवेश होत आहे. आज हा लेख लिहतानाच कंपनीचा दहेज येथील ७३५ कोटी रुपये भांडवली खर्चाचा बहुउद्देशीय अॅग्रो केमिकल मध्यवर्ती उत्पादने आणि एमआयबीके/एमआयबीसी प्रकल्प ६ ऑगस्ट रोजी कार्यान्वयित झाला आहे.
एप्रिल २०२६ मध्ये, कंपनीने दहेज येथे एका समर्पित ‘ऑन-साइट हयको’ प्रकल्पाची उभारणी, मालकी आणि संचालन करण्यासाठी ‘प्रॅक्सएअर इंडिया’सोबत दीर्घकालीन करार केला; हा प्रकल्प २०२८ मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
कंपनीचे यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. कंपनीने जून २०२६ साठी संपलेल्या तिमाहीसाठी गत वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ३५ टक्के वाढ साध्य करून ती २,५९२ कोटींवर गेली आहे तर नक्त नफ्यात तब्बल ५७ टक्के वाढ होऊन तो ३४२ कोटींवर गेला आहे. उत्तम अनुभवी प्रवर्तक , कामगिरीतील सातत्य आणि संशोधन विकास तसेच विस्तारीकरणावर दिलेला भर यामुळे दीपक नायट्राइटचे भवितव्य उज्वल वाटते.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com
वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.
लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
