आजकाल आपण सगळेच एटीएम कार्ड आपल्या वॉलेटमध्ये ठेवतो, पण कधी चोरटे खिसे कापून वॉलेट किंवा पर्स चोरतात. अशा स्थितीत कुणालाही अडचणी येणं स्वाभाविक आहे. पण आज देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना या समस्येतून सुटकेचा एक मार्ग सुचवला आहे. एसबीआयने ट्विट करून आपल्या ग्राहकांना तुमचे एटीएम हरवले किंवा चोरीला गेल्यास एटीएम किंवा डेबिट कार्ड कसे ब्लॉक करायचे ते सांगितले आहे. याशिवाय एसबीआयने ग्राहकांना फसवणूक टाळण्याबरोबरच बँकिंग सुविधा कशा मिळवता येतील हेसुद्धा सांगितले आहे. एसबीआय शाखेला भेट देण्याची गरज नाही एसबीआयने ट्विट करून आपल्या ग्राहकांना एटीएम कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास कार्ड कसे ब्लॉक करायचे ते सांगितले. ट्विटमध्ये बँकेने सांगितले की, तुम्ही तुमच्या फोनद्वारेच कार्ड अगदी सहज ब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. कार्ड ब्लॉक करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया SBI ने ट्विट करून कार्ड ब्लॉक करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगितली आहे.SBI ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून SBI च्या कस्टमर केअर नंबर १८०० १२३४ किंवा १८०० २१०० वर कॉल करावा लागेल.यानंतर तुम्हाला शून्य (०) दाबण्यास सांगितले जाईल, जे UPI आणि इंटरनेट बँकिंग बंद करेल.मग तुम्हाला कार्ड ब्लॉक करण्यासाठी १ नंबर दाबावा लागेल.पुढील टप्प्यात जर कार्ड क्रमांक किंवा खाते क्रमांक विचारला गेला, तर तुम्हाला या दोन्हीपैकी शेवटचे ४ क्रमांक टाकावे लागतील.खातरजमा करण्यासाठी तुम्हाला पुन्हा १ नंबर दाबावा लागेल.एकदा तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कार्ड ब्लॉकसाठी एक खात्रीशीर मेसेज मिळेल. हा मेसेज फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येईल.