प्रीथी आरएस: मी आयआयएम कोझिकोडची २०१०-२०१२ तुकडीची विअद्यार्थीनी होते. माझी युटीआय म्युच्युअल फंडाने ‘कॅम्पस एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट ट्रेनी’ या पदासाठी निवड केली. त्यानंतर आधी मुलभूत समभाग संशोधक म्हणून सुरवात करून मी रिसर्च अनॅलिस्ट आणि शेवटी फंड मॅनेजर परतंत पोहचले. या काळात मी आमच्या विश्लेषकांच्या संघात बऱ्याच काळापासून बँकिंग वित्तीय सेवाआणि इंशुरंस या उद्योगातील कंपन्यांचा मागोवा घेत होते. मध्ये माझ्याकडे वित्तीय सेवांसोबत ऑटोमोबाईल सेक्टरसुद्धा सोपविला गेला.
सप्टेंबर २०२५ पासून मला डीएसपी बँकिंग अँड फायनान्शियल सर्विसेस फंडाची नियुक्त निधी व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले. तसं पाहायला गेलं तर माझा आजपर्यंतचा प्रवास एक साधा सरळ राहिला आहे. मला गुंतवणूक आणि समभाग संशोधनाचा जवळपास १५ वर्षांचा अनुभव आहे. ज्यामध्ये मी बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस तसेच उर्वरित बाजार आणि समष्टी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. अर्थव्यवस्थेत काय आणि कसे बदल झाले याचा अभ्यास करण्याची संधी या निमित्ताने जवळून अनुभवता आली.
सध्याच्या परिस्थितीत फंड मॅनेजरच्या दृष्टिकोनातून तुम्ही बाजाराकडे कसे पाहता?
प्रीथी आरएस: सध्या देशाची व्यापक आर्थिक स्थिती आणि जगातील भू-राजकीय परिस्थिती पाहता, अर्थव्यवस्थेचे चित्र नक्कीच तितकेसे आशादायक नाही. सध्याची भु-राजकीय तणावाची परिस्थिती कधी सुधारेल या प्रश्नाचे उत्तर कोणीही खात्रीशीर देऊ शकत नाही, प्रत्येकाचा फक्त एक अंदाज असू शकतो. परंतु माझा असा विश्वास आहे की अर्थव्यवस्था लवचिक आहे. हा फक्त वेळेचा प्रश्न आहे, म्हणजे ‘कधी’ होईल’ हा आहे होईल की नाही हा नाही. ऊर्जा संकट आणि इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे वाढणाऱ्या महागाईमुळे होणारे अर्थव्यवस्थेच्या वाढीला बसणारी खीळ आणि शेवटी रुपयाची होणारी घसरण या सर्व गोष्टी सामान्य झाल्या पाहिजेत. आपण रुपयाचे अवमूल्यन होतांना पाहिले आहे. आणि रुपयाचा अवमुल्यानाला जे काही घटक कारणीभूत आहेत त्यापैकी परकीय अर्थसंस्थांकडून भारतातून पैसे काढून घेणे हे महत्वाचे कारण आहे. या बाबतीत मला एक गोष्ट प्रामुख्याने गुंतवणूकदारांच्या नजरेस आणून द्यावीशी वाटते. ती म्हणजे परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय वित्तीय साधनां व्यतिरिक्त होणारी परकीय गुंतवणूक) तर ग्रॉस एफडीआय फ्लो अजूनही पॉझिटिव्ह आहे.
गेल्या २-३ वर्षांत बरीच नफा वसुली आणि भांडवल देशाबाहेर नेले असुनही ही सकारात्मक आकडेवारी निश्चितच दिलासा देणारी आहे. कारण ही गुंतवणूक आवर्ती स्वरूपाची असते. त्यामुळे भविष्यात रुपयालाही स्थैर्थ लाभण्यास मदत होऊ शकते. मला वाटते की यामुळे मॅक्रो इकॉनॉमीचा एक मोठा भाग सुधारेल आणि म्हणूनच, जर ऊर्जेच्या उच्च दरांच्या संदर्भात गोष्टी सामान्य झाल्या, तर महागाईच्या समस्येवरही मात करता येईल हे होण्यास किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. हा बदल होण्यास ३ महिने लागतील की ६ महिने लागतील हे अनिश्चित असले तरी अर्थ व्यवस्था वळण बिंदूच्या अगदी जवळ आली आह्व असे वाटते.
आपण बँकिंग आणि ऑटो क्षेत्राचा मागोवा घेत आहात आमच्या वाचकांना या क्षेत्रांबद्दल काय सांगाल?
प्रीथी आरएस: बँकिंग क्षेत्राचा विचार करता, हे युद्ध सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती पाहता आपण एका चांगल्या टप्प्यावर होतो. बँकिंग उद्योगाची वाढ १५% दरम्यान होती आणि त्यावरून या क्षेत्राची चांगली स्थिती दिसून येत होती. काही बँकांचा वृद्धी दर १५% ते २०% च्या दरम्यान होता आणि मार्जिनच्या ( ठेवी आणि कर्जे व्याजदरातील फरक) बाबतीतही सुधारणा होत होती. नफ्यावर काहीसा दबाव होता खरा, पण आता ती स्थिती निवळून सुधारणेकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते. आणि मालमत्तेच्या गुणवत्तेचा विचार करता, या क्षेत्रात आम्हाला कोणतेही मोठे तणाव किंवा समस्यांचे गंभीर मुद्दे दिसून आलेले नाहीत.पण युद्ध सुरू झाल्यानंतर, काही प्रश्न नक्कीच उपस्थित होतात—उदा. विकासदर मंदावेल का किंवा पुरेसे ठेवी संकलन होण्यासाठी वाढीव व्याज दर द्यावे लागतील का अशा प्रकारचे मुद्दे नव्याने उपस्थित होत आहेत. तरीही, बँकांच्या मूल्यांकनांमध्ये आता सुधारणा (घसरण) झाली आहे आणि मूल्यांकनाच्या दृष्टीने पाहता, काही कंपन्यांचे समभाग सध्याच्या मुल्यांकन पातळीवरही अतिशय आकर्षक किमतीला उपलब्ध आहेत. त्यामुळे, मला वाटते की या संपूर्ण क्षेत्रासाठीच गुंतवणुकीची एक चांगली संधी निर्माण झाली आहे.
मी म्हटल्याप्रमाणे, ‘मॅक्रो’ (समष्टी आर्थिक) पातळीवर—किंवा अनावश्यक गोंगाट होत आहे त्याकडे वरकरणी पाहता—परिस्थिती जशी दिसते, तितकी ती प्रत्यक्षात वाईट नाही. त्यामुळे, मला वाटते की काही विशिष्ट कंपन्यांत उपलब्धतेची (योग्य मुल्यांकनाची) थोडीफार समस्या आहे, पण ती काही सर्वव्यापी नाही. आणि शिवाय. ती गोष्ट काही प्रमाणात उपलब्ध असली तरी ते समभाग महाग वाटतात. त्यामुळे, कोविडच्या काळात जशी परिस्थिती होती—जेव्हा व्यवसायांचे नुकसान झाले किंवा उपजीविकेची साधने हिरावली गेली—(अनुत्पादित कर्जे वाढण्याची भीती होती) तशी परिस्थिती सध्या आपल्याला दिसत नाही. ऑटो क्षेत्राच्या बाबतीत बोलायचे तर, मला वाटते की प्रत्येक विभाग स्वतःच्या एका वेगळ्या आवर्तनातून जात आहे.
उदाहरणार्थ, ट्रॅक्टरच्या बाबतीत गेल्या दोन वर्षांत खूप चांगली कामगिरी झाली आहे; मात्र ‘एल निनो’च्या धोक्यांमुळे आता तिथे काहीशी भीती किंवा विक्री संथपणे वाढण्याची शक्यता दिसून येऊ शकते. दुसरीकडे, प्रवासी वाहनांच्या बाबतीत चांगली कामगिरी सुरू राहील असे वाटते. गेल्या वर्षी जीएसटी कपातीचाही त्यांना लाभ मिळाला आहे; त्यामुळे याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. तसेच, दुचाकी वाहनांनाही जीएसटी कपातीचा मोठा फायदा झाला आहे. अर्थात, इथे आपल्याला निवडक दृष्टिकोन ठेवावा लागेल, ऑटो क्षेत्रातील ‘डिस्क्रीशनरी स्पेंड’ (विवेकी खरेदी) अत्यावश्यक नसलेल्या, पण आवडीनुसार केल्या जाणाऱ्या खर्चा बाबतचा दृष्टिकोन सकारात्मक आहे.
तुम्ही बाजाराकडून काय शिकलात आणि बाजाराने तुम्हाला काय शिकवले?
प्रीथी आरएस: मला वाटतं, बाजारात आपल्या मतावर ठाम राहणं महत्त्वाचं असतं, कारण बाजाराचा नैसर्गिक कल असा आहे की तो मध्यम कालावधीत तुमच्या त्या ठाम मताची परीक्षा घेतो. परंतु दीर्घकाळात तुमच्या मतावर ठाम राहिल्यास तुमचे कौतुकही (परतावा) करतो त्याचबरोबर, कधी आपला निर्णय बदलायचा हे ओळखणंही तितकंच महत्त्वाचं असतं. मला वाटतं या दोन्ही गोष्टींमधील रेषा खूप पुसट असते. तुम्ही तुमच्या मूळ विश्लेषणावर ठाम राहता की बदलत्या परिस्थितीनुसार तुमचा निर्णय बदलता? यातला फरक ओळखणं कठीण असतं, कारण एकतर तुम्ही खूप लवकर हार मानता किंवा मग तोटा होत असूनही त्या स्थितीत अडकून राहता. मला वाटतं, बाजाराचा हा असा अनुभव आहे जो आपण प्रत्येक वेळी शिकवत राहतो. यातून मिळणारा मुख्य धडा किंवा निष्कर्ष हाच आहे की, आपले निर्णय चुकीच्या ठरण्यापेक्षा बरोबर ठरण्याचे प्रमाण जास्त असायला हवे. चुका पूर्णपणे टाळणे कठीण असले, तरी किमान ६० ते ७० टक्के ‘हिट रेट’ (यशस्वी निर्णयांचे प्रमाण) राखणे हेच आपले उद्दिष्ट असायला हवे.
तुम्ही युनिट-होल्डर्सना—म्हणजेच गुंतवणूकदारांना—तुमचा काय संदेश आहे?
प्रीथी आरएस: मला वाटते की, भारतात गुंतवणूक करण्यासाठी, विशेषतः ‘एसआयपी’ची रक्कम वाढवण्यासाठी किंवा एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे; कारण बाजारात सध्या मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे, या संधीचा लाभ घेतला पाहिजे आणि थोडा अधिक काळ संयम बाळगला पाहिजे. आज गुंतवणूक केली म्हणजे उद्यापासून नफा होईल असे नाही. गुंतवणूक कालावधी किमान ५ वर्षाचा असणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत बाजारातून तोटा होतोय म्हणून आपली गुंतवणूक काढून घेण्याची चूक करू नका. ‘एसआयपी’चा हा एक मूलभूत नियम आहे जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा तुम्हाला अधिक युनिट्स मिळतात आणि त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे.
संकलन : वसंत कुलकर्णी
संकल्पना : गौरव मुठे, लोकसत्ता
