‘लोकसत्ता’च्या जाणत्या वाचकांसाठी एक ‘एआय’ प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या साहाय्याने उत्तम कामगिरी असणारे फंड शोधून त्या फंडाचा वाचकांना परिचय करून देणे हा स्तंभाचा उद्देश आहे. या संशोधनातून ‘डीएसपी व्हॅल्यू फंड’ हाती लागला. अपर्णा कर्णिक (देशांतर्गत गुंतवणूक) आणि कैवल्या नाडकर्णी (परदेशातील गुंतवणूक) या दोन महिला फंडाच्या निधी व्यवस्थापिका आहेत. अपर्णा कर्णिक या डीएसपीच्या ‘हेड क्वांटिटेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ॲनॅलिटिक्स’ आहेत. कालच उत्साहात साजरा झालेल्या महिला दिनाच्या निमित्ताने महिला निधी व्यवस्थापिका असलेल्या फंडाची ही शिफारस.

या फंडाची सुरुवात २ डिसेंबर २०२० रोजी झाली. तीन वर्षांत १५ टक्के आणि पाच वर्षांत १२ टक्के परतावा देणारे आणि एकपेक्षा अधिक ‘शार्प रेशो’ असणारे फंड कोणते हा प्रश्न ‘एआय’ला विचारल्यावर ५ वर्षे पूर्ण केलेल्या १७५६ फंडांतून ७२२ फंड सुचविले. निकषांची संख्या वाढविली आणि निकष अधिक कठोर केले असता फंडांची संख्या कमी होत गेली. या प्रक्रियेतून मोजके जे १२ फंड हाती लागले त्यापैकी हा एक फंड आहे. या फंडाचा ‘शार्प रेशो’ अधिक असल्याचे कारण म्हणजे गुंतवणुकीत परकीय कंपन्यांचा समावेश असणे. हा फंड ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ तत्त्वांचे पालन करतो आणि अशा कंपन्यांत गुंतवणूक करतो, जे व्यवसाय त्यांच्या वास्तविक मूल्यापेक्षा सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहेत. कंपन्या निवडताना, निधी व्यवस्थापक खराब दर्जाचे आणि उच्च-मूल्य असलेल्या कंपन्या वगळण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेले दिसत आहेत. गुणवत्तेच्या बाबतीत, फंड कर्जाचे अतिरिक्त प्रमाण असलेले, महाग, अधिक अस्थिर, कमकुवत ताळेबंद आणि कमजोर अनुपालन असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करत नाही.

मूल्यांकनाच्या बाबतीत, नफा किंवा भांडवली परतावा समायोजित केल्यानंतर बाजारातील किमतीचे पुस्तकी किमतीशी उच्च गुणोत्तर असलेल्या कंपन्या वगळल्या जातात. काही क्षेत्रीय मूल्यांकन जास्त असते, जसे की, ‘एफएमसीजी’ अर्थात ग्राहकोपयोगी कंपन्यांचे मूल्यांकन आणि जिन्नस कंपन्यांचे (सिमेंट, पोलाद, खते) मूल्यांकन कमी असते. याचा विचार करून, ही रणनीती अमलात आणली जाते. भांडवली परतावा जितका जास्त असेल तितके मूल्यांकन अधिक असेल. फंड घराण्याच्या मते बीएसई २०० निर्देशांकाचा भाग असलेल्या कंपन्यांचा गेल्या १० वर्षांतील सांख्यिकी विचारात घेऊन कंपन्यांची निवड केली जाते. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने या फंडाला ६५-१०० टक्के मालमत्ता देशांतर्गत कंपन्यांत तर ०-३५ टक्के मालमत्ता परदेशी कंपन्यांत गुंतविण्यास मान्यता दिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, सध्या २४ टक्के मालमत्ता परदेशातील कंपन्यांत, ‘ईटीएफ’मध्ये गुंतविण्यात आली आहे. देशांतर्गत गुंतवणुकीसाठी हा फंड ‘निफ्टी ५००’ परिघातील कंपन्यांची निवड करतो. आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी फंड घराणे मूल्य-गुंतवणूक धोरणात बसणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांत गुंतवणूक करतो. ‘निफ्टी ५०० टीआरआय’ हा निर्देशांक फंडाचा मानदंड आहे.

‘डीएसपी व्हॅल्यू फंडा’चा पोर्टफोलिओ फ्लेक्सिकॅप घाटणीचा आहे. पोर्टफोलिओत ६० ते ६५ कंपन्यांचा समावेश असतो. ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार, फंडाच्या गुंतवणुकीत ४७.८८ टक्के लार्जकॅप, १४.३० टक्के मिडकॅप आणि १९.३८ टक्के स्मॉलकॅप कंपन्यांचा समावेश आहे. फंडाच्या गुंतवणुकीत वाहन आणि वाहनपूरक उत्पादने, वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान, धातू आणि खाणकाम आणि तेल, वायू आणि इंधन ही गुंतवणूक असलेली आघाडीची उद्योग क्षेत्रे आहेत. दीर्घकाळ ‘एसआयपी’ करून संपत्ती निर्मितीची आस असलेल्या गुंतवणूकदारांसाठी या फंडाची शिफारस आहे.

आघाडीच्या पाच             %

परदेशी गुंतवणुका

हार्डिंग लोएव्हनर ४.५६

ग्लोबल इक्विटी फंड

एसके हायनिक्स इंक ३.४९

डब्ल्यूसीएम ग्लोबल २.३१

इक्विटी फंड

मायक्रोसॉफ्ट कॉर्प १.४३

अलिबाबा ग्रुप             १.३९

होल्डिंग लिमिटेड

आघाडीच्या पाच             %

देशांतर्गत गुंतवणुका

रिव्हर्स रेपो गुंतवणूक ७.२२

एचडीएफसी बँक            ३.९४

भारती एअरटेल             ३.११

लार्सन अँड टुब्रो लिमिटेड २.८९

इन्फोसिस             २.८६