Emergency Fund Calculation : आजची नोकरदार तरुणाई बऱ्यापैकी गुंतवणूक, विमा योजना आणि इमर्जन्सी फंडबाबत गंभीर झाली आहे. मात्र, एकीकडे वृद्ध आईवडिलांच्या आरोग्याची काळजी तर दुसरीकडे मुलांचे शिक्षण यात महिन्याचा पगार कधी उडून जातो, कळत नाही. आज भारतातील लाखो मध्यमवर्गीय कुटुंबे याच आव्हानाचा सामना करत आहेत. अशा कुटुंबांसाठी ‘इमर्जन्सी फंड’ ही केवळ एक साधी बचत नसून, तो संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक सुरक्षा कवच बनला आहे. पण, आपल्याकडे किती आपत्कालीन निधी? असावा याचं अनेकांना अचूक उत्तर माहिती नाही.
इमर्जन्सी फंड म्हणजे काय?
कोणत्याही कारणाने आपले उत्पन्न थांबले किंवा एखादं आर्थिक संकट आलं तर, अशी परिस्थिती हाताळण्यासाठी जमा केलेला निधी म्हणजे इमर्जन्सी फंड होय. यामध्ये तुमचा सर्व महिन्याचा खर्च समाविष्ट असतो. यात घरखर्च, कर्जाचा हप्ता, मुलांचे शिक्षण असे सर्व खर्च भागवले जाऊ शकतात.
३ ते ६ महिन्यांचा इमर्जन्सी फंड आता कामाचा नाही
सामान्यतः आर्थिक तज्ज्ञ असा सल्ला देतात की, व्यक्तीकडे ३ ते ६ महिन्यांच्या खर्चा इतका इमर्जन्सी फंड असावा. मात्र, महागाई आणि सध्याच्या परिस्थितीनुसार, हा नियम आता बदलला आहे. ‘एयूएम वेल्थ’चे संस्थापक आणि सीईओ अमित सूरी यांच्या मते, जेव्हा कुटुंबातील अनेक सदस्य एकाच उत्पन्नावर अवलंबून असतात, तेव्हा कोणत्याही आर्थिक झटक्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे अशा कुटुंबांकडे इमर्जन्सी फंडचा आकार मोठा असणे आवश्यक आहे. अशा विशेष परिस्थितीत कुटुंबाकडे किमान ९ ते १२ महिन्यांच्या एकूण खर्चा इतका इमर्जन्सी फंड असणे अत्यंत गरजेचे आहे.
इमर्जन्सी फंडचे अचूक गणित कसे मांडायचे?
- अनेकजण केवळ स्वतःचे वैयक्तिक खर्च गृहीत धरून फंड तयार करतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. उत्पन्नाचा स्रोत बंद झाला, तरी जे खर्च थांबत नाहीत त्या सर्वांचा यात समावेश केला पाहिजे.
- नियमित घरगुती खर्च : रेशन, दूध, वीज-पाणी बिल, गॅस सिलिंडर आणि वाहतूक खर्च
- आर्थिक दायित्वे : होम लोन, कार लोन किंवा वैयक्तिक कर्जाचे मासिक हप्ते किंवा घराचे भाडे
- शैक्षणिक खर्च : मुलांची स्कूल फी, कॉलेज फी, कोचिंग आणि वाहतूक खर्च
- आरोग्य आणि विमा : पालकांच्या औषधोपचारांचा खर्च आणि सर्व हेल्थ व लाईफ इन्शुरन्स प्रिमियम
वैद्यकीय खर्चासाठी बनवा ‘बफर फंड’
भारतात वैद्यकीय उपचारांचा खर्च सातत्याने वाढत आहे. तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणे अत्यंत आवश्यक असले, तरी तो प्रत्येक खर्च कव्हर करत नाही. रुग्णालयात भरती झाल्यावर रूम रेंट लिमिट, काही विशिष्ट उपचारांचे एक्स्क्लुजन, केअरगिव्हर चार्ज आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतरचा औषधोपचार खर्च अनेकदा खिशातून करावा लागतो. म्हणूनच, सामान्य इमर्जन्सी फंडव्यतिरिक्त वैद्यकीय आपत्कालीन स्थितीसाठी एक वेगळा ‘बफर फंड’ ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
इमर्जन्सी फंडचे पैसे कुठे ठेवावेत?
- इमर्जन्सी फंडचे पैसे व्यवस्थापित करताना ते एकाच ठिकाणी ठेवण्याऐवजी त्याचे वर्गीकरण करणे फायदेशीर ठरते.
- १ ते २ महिन्यांचा खर्च : हे पैसे बँक सेव्हिंग अकाउंट किंवा ‘लिक्विड म्युच्युअल फंड’मध्ये ठेवावा, जेणेकरून रात्री-अपरात्री गरज पडल्यास एटीएम किंवा ऑनलाईन बँकिंगद्वारे हा पैसा त्वरित काढता येईल.
- उर्वरित ६ ते १० महिन्यांचा खर्च : हा पैसा अल्प मुदतीच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवावा. यामुळे पैशांची सुरक्षा टिकून राहते आणि सेव्हिंग बँक खात्यापेक्षा थोडे जास्त परतावे मिळतात.
दरवर्षी आढावा घेणे आवश्यक
इमर्जन्सी फंड ही एकदाच बनवून विसरून जाण्याची गोष्ट नाही. जसजसा काळ बदलतो, तशी मुलांची फी वाढते, पालकांच्या आरोग्यावरील खर्च वाढतात आणि महागाईचा आलेखही उंचावतो. त्यामुळे वर्षातून किमान एकदा आपल्या इमर्जन्सी फंडचा आढावा नक्की घ्या.
