गेल्या आठवड्यातील लेखात फार्मा क्षेत्राचे व्यवसाय प्रारूप आणि संधींचा आपण अंदाज घेतला. आजच्या लेखातून फार्मा क्षेत्राच्या जोडीने हळूहळू उदयास येत असलेल्या आरोग्यविषयक सुविधा निर्माण करणाऱ्या आणि प्रदान करणाऱ्या क्षेत्राविषयी माहिती समजून घेऊ या. भारतातील फार्म क्षेत्र भविष्यात तीन बाबींमुळे बहरणार आहे. जसजशी लोकसंख्या वाढेल, तसे लोकसंख्येतील मोठा वाटा वयाची पन्नाशी ओलांडलेल्या नागरिकांचा असणार आहे. देशात एकूण लोकसंख्येपैकी १५ टक्के ज्येष्ठ नागरिक असणार आहेत. भारताचे सरासरी आयुर्मान वाढत असून त्याचा परिणाम फार्मा आणि आरोग्य क्षेत्रावर पडणार आहे. भारताचे आयुर्मान १९६० च्या दशकात पन्नाशीच्या आसपास होते ते आता सत्तरीच्या पलीकडे पोहोचले आहे. भारतीयांचे आयुर्मान वाढले असले तरीही जीवनशैलीजन्य बदल धोकादायक आहेत हे निश्चित. खाद्यपदार्थांच्या उपलब्धतेमध्ये आणि ऐपतीमध्ये झालेल्या बदलांचे थेट परिणाम मधुमेह, तणाव, हृदयविकार, सांधेविकार अशा आरोग्यविषयक समस्यांमध्ये दिसून येत आहे. आजारांचे निदान करणे शक्य असले तरी उपचाराचा खर्च परवडणारा नाही याचाच अर्थ फार्मा क्षेत्राप्रमाणेच शुश्रूषा केंद्र आणि रुग्णालय हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर उदयास येणार आहे. आरोग्यविषयक उद्योगात चाचण्या आणि निदान करणे, रुग्णालय आणि त्याच्या अनुषंगाने येणारी औषधे आणि वैद्यकीय वस्तूंची विक्री असे तीन व्यवसाय केले जातात. विकसित- विकसनशील देशांचा विचार केल्यास वैद्यकीय साधनांवर, उपचारांवर सर्वाधिक कमी खर्च भारतात होतो. दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि चीन या विकसनशील देशांच्या तुलनेत भारत सरकारचा खर्च अगदीच कमी आहे. या उलट खासगी क्षेत्रातून उपचार घेणे, शस्त्रक्रिया करणे यांचे प्रमाण गेल्या वीस वर्षांत वाढले आहे. हेही वाचा.Money Mantra : एसआयपी टॉप अप म्हणजे काय ? रक्ताभिसरण यंत्रणा, श्वासोच्छवास संबंधित विकार, मधुमेह आणि मूत्रपिंड (किडनी) नादुरुस्त होणे या बरोबरीने कर्करोगाचे रुग्ण भारतात वाढताना दिसत आहेत. फार्मा कंपन्यांचा व्यवसाय गेल्या दहा वर्षांत दर साल ११ टक्के दराने वाढतो आहे व आगामी पाच ते सात वर्षांत ही वाढ कायम राहील. औषधांची एकूण विक्री, औषधांची किंमत आणि नवीन औषधनिर्मिती या तिन्ही पातळ्यांवर व्यवसाय वाढले आहेत. रुग्णालयांची संख्या दरवर्षी दहा टक्क्याने वाढताना दिसते. दहा हजार जणांमागे किती खाटा आहेत यावरून देशात रुग्णालयांची स्थिती कशी आहे याचा अंदाज येतो. भारतात हा आकडा १५ आहे. रशियात ७१, चीनमध्ये ४३, व्हिएतनाममध्ये २७ आणि ब्राझीलमध्ये २१ ! यावरून या क्षेत्रात किती गुंतवणूक येणे अपेक्षित आहे याचा अंदाज येईल. वैद्यकीय पर्यटनातील संधी एका खासगी पतमानांकन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील वैद्यकीय पर्यटनातील संधी वेगाने वाढत असून वार्षिक ७० लाख रुग्ण पुढील काही वर्षांत भारतात उपचारासाठी येतील, अशी अपेक्षा आहे. दंतशल्यचिकित्सा, अवयव प्रत्यारोपण, हृदयविकार, वंध्यत्व निवारण या उपचार प्रकारात सर्वाधिक उलाढाल होत आहे. दक्षिण आशियाई देश, आफ्रिकेतील देश आणि भारतात असलेले अंतर लक्षात घेता या देशातील रुग्ण भारतात येऊन उपचार घेतील, अशी स्थिती निर्माण होत आहे. हेही वाचा.बक्षीस समभाग आणि करपात्रता गुंतवणूक संधी या क्षेत्रातील गुंतवणूक संधींचा विचार करायचा झाल्यास आकाराने मोठ्या आणि सुप्रसिद्ध अशा कंपन्या तर आहेतच, पण मिडकॅप आणि स्मॉलकॅप सदरात मोडणाऱ्या अनेक फार्मा कंपन्या गुंतवणुकीसाठी आकर्षक मूल्यांकन मिळवून देतात. बीएसई हेल्थकेअर इंडेक्स विचारात घेतल्यास एकूण कंपन्यांपैकी लार्जकॅप प्रकारात सहा कंपन्या आहेत तर मिड आणि स्मॉलकॅपमध्ये ८०पेक्षा जास्त कंपन्यांचा पर्याय उपलब्ध आहे. व्यवसायाचा विचार केल्यास फार्मा कंपन्या म्हणजेच औषध निर्माण याबरोबर रुग्णालय, रुग्णालयाशी संलग्न सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, औषध निर्मिती आणि औषधोपचार या संदर्भातील संशोधन करणाऱ्या कंपन्या, फार्मा क्षेत्राला आवश्यक असणारी तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, माहितीचे पृथक्करण करणाऱ्या कंपन्या, रुग्णालयातील यंत्रसामग्रीची निर्मिती/ आयात आणि त्या संदर्भातील विक्रीपश्चात सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या असा मोठा पसारा या क्षेत्राचा आहे. भारतातील आरोग्य विमा विकत घेणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण वाढते असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेण्याचा खर्च ही समस्या राहिली नसून आरोग्य विमा उपलब्ध असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते आहे. जसजशा रुग्णालयांतील खाटा वाढतील तसे रुग्णांना अधिकाधिक चांगले उपचार देणे शक्य होईल. भारतातील आरोग्य क्षेत्रात सरकारचा वाटा निर्विवादपणे मोठा आहे व तो कायम राहणार आहे असे असले तरीही खासगी क्षेत्रातील कंपन्या आरोग्य क्षेत्रात आगेकूच करण्यासाठी सज्ज आहेत. हेही वाचा.कंप्यूटरजी ‘लॉक’ किया जाए! फार्मा आणि आरोग्य क्षेत्र व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर इंडस्ट्री ४.० अर्थात डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर फार्मा क्षेत्रात वाढताना दिसतो आहे. प्रयोगशाळा, रुग्णांची माहिती, लोकसंख्येतील रुग्णविषयक माहितीची साठवणूक करणे यासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. क्लाऊड सेवेचा वापर या क्षेत्रात वाढताना दिसतो आहे. औषधांच्या विपणन आणि विक्रीमध्ये या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. हेही वाचा.कर्जवसुली न्याय प्राधिकरण व्यवसाय म्हटला की जोखीम आली, मात्र फार्मा व्यवसायाला सर्वात कमी जोखमीचा सामना करावा लागतो. आपल्या पोर्टफोलिओचा भाग म्हणून फार्मा कंपन्या नक्कीच विचारात घ्याव्यात. या क्षेत्राशी संबंधित म्युच्युअल फंड योजनाही गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत.