भारतीय भांडवली बाजार सध्या सार्वकालिक उच्चांकावर असताना आपण गुंतवणूक करण्यासाठी नेमक्या कोणत्या कंपन्या निवडाव्यात हा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. लार्ज कॅप, मिडकॅप की स्मॉल कॅप कंपन्या निवडाव्यात? यापेक्षा ज्या कंपन्यांच्या पुढील पाच वर्षाच्या नफ्याची खात्री आहे, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणुकीस प्राधान्य देण्यात यावे. पूर्वी हमखास परतावा देणाऱ्या कंपन्या म्हणून आठ-दहा कंपन्यांची नावे घेणे शक्य होते. पण आता बदलत्या बाजार स्थितीत एका नवीन कंपन्यांच्या गटाचा उदय झाला आहे.

विशेषतः गेल्या काही वर्षात पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे व्यवसाय प्रारूप असणाऱ्या कंपन्यांचा भारतीय बाजारांमध्ये उदय झाल्याचे दिसतो. वर्ष १९९१ नंतर भारतात उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यावर माहिती तंत्रज्ञान केंद्रातील कंपन्यांचे क्षेत्रातील नवे युग सुरू झाले. गुंतवणूकदारांना भरभरून संपत्ती निर्मितीचे लाभ या क्षेत्रातील कंपन्यांनी करून दिले. गेल्या काही वर्षात उदयास आलेल्या ‘टेक कंपनी’ याच प्रकारे आकर्षणाचे केंद्र बनत आहेत. या कंपन्या कशा ओळखायच्या? नवीन पिढीच्या टेक कंपन्या इंटरनेटचा वापर करून त्याद्वारे स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करतात आणि आपला व्यवसाय विस्तार करतात.

वस्तूंचे उत्पादन कारखान्यात करण्यापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षेत्रासंबंधित सेवा प्रदान करणे, असा आणखी एक व्यवसायाचा नमुना दिसून येतो. ढोबळमानाने ई-कॉमर्स, फिनटेक, फूड डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक या चार प्रकारांमध्ये या कंपन्या विभागल्या जाऊ शकतील. याव्यतिरिक्त गृहनिर्माण, प्रवासी सुविधा निर्मिती, माध्यमे आणि प्रसारण सेवा, हरित ऊर्जा निर्मिती आणि शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या सेवा विकणे या प्रकारच्या कंपन्या वेगाने पुढे येताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या कमीत कमी २५ ते ३० कंपन्यांचा उदय गेल्या पाच वर्षात झालेला दिसून येतो.

‘स्टार्टअप ते यूनिकॉर्न’ आणि नवतंत्रज्ञान

भारतीय तरुणांनी आपल्या व्यावसायिक कल्पनांचे रूपांतर कंपन्यात करणे, याला आता मान्यता मिळू लागली आहे. फक्त नवउद्यमी अर्थात स्टार्टअप पुरतेच मर्यादित न राहता यूनिकॉर्न होण्याकडे देखील अशा कंपन्यांचा कल दिसतो आहे. स्विगी, ग्रो, लेन्सकार्ट, ओला इलेक्ट्रिक, झेप्टो, रेझरपे, फिजिक्सवाला, झेटवर्क अशा कंपन्या यूनिकॉर्न श्रेणीपर्यंत खूप कमी कालावधीत पोहोचल्या आहेत.

गुंतवणूकदारांची पसंती आणि टेक कंपन्या

गेल्या पाच वर्षात पहिल्या पिढीतील तरुण गुंतवणूकदारांनी शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीच्या उद्देशाने डिमॅट खाते उघडले. अशा गुंतवणूकदारांना या नवीन पिढीच्या टेक कंपन्या आकर्षक वाटत होत्या. कारण त्यांचा व्यवसाय वेगळ्या पद्धतीने होत होता आणि ही पद्धत त्यांना आपलीशी वाटली. झोमॅटो, पॉलिसीबाजार, पेटीएम, नायका, इन्फोएज, मामाअर्थ, नजारा टेक्नॉलॉजी या कंपन्यांचे व्यवसाय बघितल्यास वाहने, मोबाइल फोन, सॉफ्टवेअर, वाहनांचे सुटे भाग, औषधे, यंत्रसामग्री यातले काहीही न बनवतासुद्धा या कंपन्या अल्पावधीतच प्रसिद्ध झाले आहेत.

नवीन युगाच्या टेक कंपन्यांनी जुन्याचा कित्ता न गिरवता कमी कालावधीत शेअर बाजाराचे दार ठोठावले आणि प्रारंभिक समभाग विक्रीतून मोठ्या प्रमाणावर पैसे उभारले. यापैकी ३६ कंपन्या यावर्षअखेरीस नफ्यात होत्या म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी या कंपन्या आकर्षक ठरल्या.

मध्यमवर्गाचा हात

भारतातील लोकसंख्येचे प्रमाण वेगाने बदलत आहे. शहरीकरणाचा वाढता रेटा, ग्रामीण भागातील जनतेला शहरी जीवनशैलीचे वाटत असलेले आकर्षण, हाताच्या बोटावर उपलब्ध झालेले तंत्रज्ञान आणि घराघरांत पोहोचलेले परवडणाऱ्या दरातील इंटरनेट यामुळे या कंपन्यांचे बाजार क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत राहणार आहे. ग्राहकांचे प्रमाण वाढणे आणि मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय ग्राहकांचा वर्ग निर्माण होणे, हे या कंपन्यांसाठी पथ्यावर पडले आहे. हा वर्ग नुसताच वाढत नसून त्याची खर्च करण्याची क्षमता आणि इच्छासुद्धा सतत वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक बाजारांपेक्षा या कंपन्या वेगळ्या बाजार प्रणालीवर अवलंबून आहेत. वस्तू तयार करणे जमल्यानंतर ती विकण्यासाठी प्रत्यक्ष दुकान असण्यापेक्षा एक डिजिटल मंच तयार करणे तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळे खूप सोपे झाले आहे. सर्वदूर पसरलेल्या लॉजिस्टिक्स सुविधांमुळे ग्राहक आणि उत्पादक यांनी समोरासमोर भेटण्यापेक्षा ऍप्लिकेशन आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्यवसाय केला जावा ही पद्धत रूढ झाली आहे.

या कंपन्यांनी शेअर बाजारात अल्पावधीतच बस्तान बसवले असले तरी, त्यांचे व्यवसाय प्रारूप स्थिर नाही. काही व्यवसाय शाश्वत असतात म्हणजेच सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती विपरीत झाली तरीसुद्धा ते व्यवसाय मरत नाहीत. अशा कंपन्या पोर्टफोलिओला स्थिरता देतात. आपण ज्या कंपन्यांविषयी या लेखात चर्चा करत आहोत, अशा टेक कंपन्या किती काळापर्यंत यशस्वी होतील किंवा त्यांच्यात कोणते बदल घडून येतील हे सांगणे अवघड आहे. तंत्रज्ञानाचा दुसरा मुद्दा परिस्थितीनुसार बदलणे हा आहे. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार कदाचित साहसी ठरू शकतो. मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या लाटेमध्ये या कंपन्यांचा वाटा लक्षणीय आहे हे वास्तव विसरून चालणार नाही. नव्वदीनंतर उदयास आलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा वरचष्मा होता. त्यामुळे सतत अनेक वर्ष या कंपन्या नफ्यातच राहिल्या आणि गुंतवणूकदारांना संपत्ती निर्मितीचा लाभ घेता आला असेच या नवउद्यमी कंपन्यांच्या बाबतीत ठरावे हीच सदिच्छा आपण ठेवूया.