अनुराग गुप्ता
आजकाल सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये ‘फायर’ हा छोटासा शब्द खूप ट्रेंड होत आहे. प्रत्येकाला तो विशिष्ट जादुई आकडा जाणून घ्यायचा आहे, तो म्हणजे निधी किंवा बँक बॅलन्स, जो त्यांना ‘आर्थिक स्वातंत्र्य, लवकर निवृत्ती’साठी मदत करेल. त्या महत्त्वाकांक्षी निधीवर लक्ष केंद्रित करणे स्वाभाविक आहे. अर्थात, अंतिम आकडा प्रत्येकाच्या जीवनशैली, आरोग्य आणि इतर गरजांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल. तो मूर्त आणि सहजपणे मोजता येण्याजोगा आहे. पण तो अपूर्णही आहे.

निवृत्ती ही अशी एकच घटना नाही जी निधी जमा झाल्यावर संपते. हा एक टप्पा आहे. तो दोन, कधीकधी तीन दशकांपर्यंत चालू शकतो. त्या वर्षांमध्ये केवळ जमा झालेला निधी किती मोठा आहे हे महत्त्वाचे नाही तर तो निधी न आटता दर महिन्याला किती विश्वसनीयतेने उत्पन्नात रूपांतरित केला जाऊ शकतो हे महत्त्वाचे आहे. निवृत्त व्यक्तींसमोर खरा प्रश्न हा नसतो की, “मी किती बचत केली आहे,” तर “ही बचत किती काळ पुरेल आणि पुरेशी असेल का? हा असतो.”

भारतातील सेवानिवृत्ती नियोजनासाठी आवश्यक असलेला मानसिकतेतील अपेक्षित निधीच्या उद्दिष्टावरील अती आग्रहापासून ते रोख प्रवाहाच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करण्यापर्यंत बदल झाला आहे. चुकीच्या साधनांमध्ये गुंतवलेला मोठा निधी किंवा कोणत्याही नियोजनाशिवाय काढलेला निधी सेवानिवृत्त व्यक्तीला चिंताग्रस्त आणि असुरक्षित ठेवू शकतो. उत्पन्नाचा एक सुनियोजित प्रवाह असा आर्थिक आत्मविश्वास निर्माण करतो. त्यामुळे लोक आपले पैसे संपण्याची चिंता करण्याऐवजी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आनंद घेऊ शकतात.

मागील काही वर्षांत भारतीयांमध्ये सेवानिवृत्ती नियोजनाबद्दलची जागरूकता लक्षणीयरीत्या वाढली आहे. तरीही त्याचे पुरेशा तयारीत रूपांतर झालेले नाही. सेवानिवृत्तीच्या तयारीवरील एका अलीकडील औद्योगिक अहवालानुसार केवळ ३७% प्रतिसादकांनी त्यांच्या स्वतःच्या अपेक्षित सेवानिवृत्ती निधीच्या एक चतुर्थांश निधी जमा केला होता आणि दहापैकी सात जणांचा अजूनही असा विश्वास होता की १ कोटी रुपयांचा निधी पुरेसा असेल. वाढता खर्च आणि वाढलेले आयुर्मान पाहता हा आकडा खूपच कमी पडण्याची शक्यता आहे.

संशोधनात असेही आढळून आले की, फक्त एक तृतीयांश प्रतिसादकांनाच आपली बचत सेवानिवृत्तीनंतर दहा वर्षांपेक्षा जास्त काळ टिकेल असा विश्वास होता. हेतू आणि कृती यांमधील हीच दरी देशातील सेवानिवृत्तीच्या मोठ्या जोखमीचे मूळ आहे.

महागाई निवृत्तीसाठी थांबत नाही

आज पुरेशी वाटणारी रक्कम पंधरा वर्षांनंतर खूप कमी वाटू शकते. महागाईमुळे खरेदी शक्ती हळूहळू कमी होत जाते आणि दोन ते तीन दशकांच्या सेवानिवृत्तीच्या काळात अगदी मध्यम स्वरूपाची महागाईदेखील चक्रवाढ होऊन प्रत्यक्ष उत्पन्नात लक्षणीय घट घडवते. एक निश्चित पेन्शन किंवा ठराविक वार्षिक रक्कम सुरुवातीच्या वर्षांमध्ये खर्च सहजपणे भागवू शकते. परंतु त्यानंतर आरोग्यसेवेचा खर्च वाढण्याची शक्यता असते तेव्हा ती अपुरी पडू शकते. त्यामुळेच सेवानिवृत्तीचे उत्पन्न पहिल्या दिवसापासून स्थिर राहण्याऐवजी कालांतराने वाढण्याची क्षमता असलेले असावे.

काळाची गरज: उत्पन्नासोबत तरलता

साठ वर्षांनंतरचे आयुष्य क्वचितच एखाद्या स्प्रेडशीटमध्ये सुचवल्याप्रमाणे अंदाजे असते. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा जीवनशैलीतील गरजांमधील बदल कोणत्याही सूचनेशिवाय उद्भवू शकतात. पूर्णपणे निश्चित, ठराविक रकमेवर आधारित सेवानिवृत्ती योजना प्रतिसाद देण्यासाठी फारच कमी वाव ठेवते. अधिक लवचिक दृष्टिकोन स्थिर, विश्वासार्ह उत्पन्नासोबत काही प्रमाणात तरलता आणि लवचिकता यांचा समतोल साधतो, जेणेकरून परिस्थितीची खरोखर गरज असेल तेव्हा निधी उपलब्ध राहील.

अनेक सेवानिवृत्तांसाठी आर्थिक नियोजन हे फक्त त्यांच्या स्वतःच्या आरामापुरते मर्यादित नसते तर ते आपल्यामागे काय सोडून जात आहेत याचाही विचार करते. कुटुंबांनी स्वतःच्या उत्पन्नाच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता संपत्तीची रचनाबद्ध पद्धतीने पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्याचा विचार करण्यास सुरुवात केल्यामुळे वारसा नियोजनाचे महत्त्व वाढले आहे. आयुष्यभराचे स्थिर उत्पन्न आणि एक अर्थपूर्ण वारसा या परस्परविरोधी गोष्टी नाहीत परंतु दोन्ही साध्य करण्यासाठी नंतरचा विचार करण्याऐवजी जाणीवपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे.

सेवानिवृत्ती नियोजन कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे

सेवानिवृत्ती नियोजन हे केवळ बचत, उत्पन्न किंवा संरक्षण अशा एकाच गरजेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या स्वतंत्र उत्पादनांपासून दूर जाऊन एकात्मिक दृष्टिकोनाकडे वळत आहे. हा एकात्मिक दृष्टिकोन संपत्ती निर्मिती, शाश्वत उत्पन्न, महागाईपासून संरक्षण, आपत्कालीन परिस्थितीसाठी तरलता आणि वारसा नियोजन या सर्वांना एकाच, सुसंगत चौकटीत एकत्र आणतात.

सेवानिवृत्तीसाठीच्या तयारीचे खरे मोजमाप हे स्टेटमेंटवरील आकड्याच्या आकारावरून कधीच होणार नव्हते. हे मोजमाप त्या संपत्तीचे रूपांतर अशा उत्पन्नात करता येते का जे सेवानिवृत्तीइतकेच टिकेल आणि आयुष्याच्या बदलांनुसार जुळवूनही घेईल यावर असते. संपत्ती जमा करण्यापासून ते शाश्वत उत्पन्नापर्यंतचा हा विचारसरणीतील बदल आज सेवानिवृत्तीसाठी बचत करणाऱ्या प्रत्येक भारतीयाने करणे हिताचे ठरेल.

(लेखक ॲक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेडमध्ये पार्टनरशिप चॅनेल्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी आणि निवृत्ती विभागाचे प्रमुख आहेत)