ज्यांनी हा चित्रपट बघितला असेल, ते हा लेख नक्की वाचतील, कारण या चित्रपटात वित्त विषयांचे संदर्भ जिथे मिळतात ते अतिशय छोटे आहेत आणि त्यांना हे संदर्भ नक्की कुठे होते, हेसुद्धा कदाचित आठवणार नाहीत. तसा चित्रपट म्हणजे सयुंक्त परिवार की विभक्त परिवार एवढा विषय आहे. पण त्यात बराच मसाला घालून चित्रपट बनवला आहे. रणबीर कपूर हा आई-वडिलांनी उभारलेला उद्योग चालवत असतो. पुढे चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर त्याचा उल्लेख ‘लाला’ असा करते. यात सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये ‘डिम्पल कपाडिया’ आकांडतांडव करताना दाखवली आहे. याचे कारण म्हणजे ३ वर्षे कर वाचवल्यानंतर त्यांची तपासणी म्हणजे ‘स्क्रुटिनी’ काढण्यात आली आहे आणि त्यामुळे या वर्षी खरे तर न झालेला ‘लॉस’ (तोटा) दाखवायचा आहे, असे रणबीर कपूर तिला सांगतो. त्याचे वाक्य ‘लॉस हुआ नहीं बस दिखाया है’ हे कुठल्याही सनदी लेखापालाला आपल्या व्यावसायिक नैतिकतेशी तडजोड करा, असे सांगण्याचा भागच आहे.

या उपर डिम्पलचे म्हणणे असते की, कर जास्ती भरला तरी चालेल, पण धंदा कधी तोट्यात दाखवयाचा नसतो. खरे तर एवढाच संदर्भ वित्त विषयाचा यात आहे. पण तरीही हा लेखाचा विषय आहे, कारण प्राप्तिकर भरताना तोटा दाखवणे कसे चांगले आहे, हे सांगण्याचा प्रयत्न यात केला आहे. तेसुद्धा आपला उद्योग नफ्यात असून फक्त प्राप्तिकर भरताना काहीना काही मार्गाने तोटा दाखवावा का, असादेखील प्रश्न उपस्थित होतो.

छोट्या उद्योगांमध्ये विशेषतः जे पारिवारिक उद्योग असतात, तिथे स्वतःचे खर्च आणि उद्योगाचे खर्च वेगवेगळे ठेवणे अपेक्षित असते. ज्यामुळे उद्योगाचा खराखुरा ताळेबंद दिसतो. चित्रपटात एका शेवटच्या प्रसंगामध्ये स्वतःच्या जेवणाची ‘बिले’ जपून ठेवावी म्हणजे धंद्यात तोटा दाखवता येईल, अशा अर्थाचे संवादसुद्धा आहेत. मला विचाराल तर कुठलाही वित्त व्यावसायिक मुद्दामून तोटा दाखवावा या विचाराचा नसतो. त्यातसुद्धा वैयक्तिक खर्च उद्योगात दाखवून तोटा दाखवणे म्हणजे वित्तीय व्यवसायात नैतिकतेला धरून नसते. उद्योगात खरंच तोटा झाला असेल तर ठीक, अन्यथा तोटा दाखवणे म्हणजे वित्तीय संकटांना आमंत्रण देण्यासारखेच असते. पहिला फटका म्हणजे जेव्हा केव्हा कर्ज घेण्याची वेळ येते तेव्हा बँका आपला हात आखडता घेतात. हा दाखवलेला तोटा तात्पुरता प्राप्तिकर वाचवतो, पण चित्रपटात दाखवल्याप्रमाणे तुमची समाजातील पतसुद्धा घसरल्याचे दर्शवतो. ज्यामुळे रणबीर कपूरचे कदाचित लग्न होणार नाही असे त्याच्या घरच्यांना वाटते. पुढे डिम्पल प्राप्तिकराचे कागद परत पाठवते आणि सांगते, जोपर्यंत नफा दाखवला जात नाही, तोपर्यंत सही करणार नाही, असे आपल्या सनदी लेखापालाला जाऊन सांगा. असे खरे तर माझ्यासारख्या वित्त व्यावसायिकाला अजिबात पटणारे नाही, पण चित्रपट असल्यामुळे मनोरंजनात सगळे चालून जाते.

चित्रपटात अजून एक व्यवसायाशी संबंध असणारी संकल्पना वापरली आहे, ती म्हणजे लाला उद्योग किंवा कंपनी. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना कदाचित ‘लाला’ म्हणजे माहीत असेल असे नाही, पण उत्तरेकडील राज्यांमध्ये ही सामान्य संकल्पना आहे. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना ‘लाला’ असे म्हणतात त्यातसुद्धा फक्त एक व्यवसाय नसून बरेच व्यवसाय ही ‘लाला’ कुटुंबे करतात. भारतातील उद्योग हे बहुतांश कौटुंबिक आहेत, कारण एक मनुष्य किंवा त्याचे कुटुंब व्यवसायाचे मालक असतात. त्यातसुद्धा जे छोटे किंवा मध्यम उद्योग असतात त्यांना ‘लाला’ असे म्हणतात. हे उद्योग एककेंद्री म्हणजे एकच माणूस चालवतो आणि त्याच्या मंजुरीशिवाय किंवा सहीशिवाय धंद्यातले पानदेखील हलत नाही. तसे जगातील बहुतेक उद्योग एकेकाळी लालाच होते, पण नवीन पिढीने त्यात लक्ष घालून उद्योग वाढवले आणि बहुराष्ट्रीयसुद्धा बनवले, पण तरीही कित्येक कंपन्या आजसुद्धा लालाच आहेत. असो, नफा असताना उद्योगात तोटा दाखवणाऱ्या चित्रपटाच्या नावात ‘झूठी’ आणि ‘मक्कार’ हे शब्द असणे हा योगायोगच समजावा.