Emergency Fund : सुधीर पुण्यातील नामांकीत आयटी कंपनीत कामाला आहे. गेल्याच वर्षी पगाराला शोभेल असा ३ बीएचके प्लॅट त्याने घेतला. पार्किंगमध्ये नवीकोरी एसयूव्हीआहे. सुखी संसाच्या वेलीवर एक गोंडस फूल उमललं असून तेही मोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातं. लोकांना हेवा वाटेल असं आयुष्य जगत असताना अचानक एक दिवस त्याला कामावरुन काढल्याचा ईमेल आला. ते शब्द वाचून सुधीरच्या पायाखालची जमीन सरकली. काय बोलावं काही सुचत नव्हतं. गृहकर्जाचा ईएमआय, कारचा हप्ता, मुलीची फी, रोजचा खर्च एक-एक गोष्ट त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागली. सुधीर एका भयंकर आर्थिक संकटात सापडला. आजच्या काळात अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. त्यामुळेच ‘इमर्जन्सी फंड’ काळाची गरज बनली आहे. आरोग्य विमा इतकेच त्याला महत्त्व आले आहे.

इमर्जन्सी फंड म्हणजे ‘लाईफ जॅकेट’

आर्थिक नियोजन म्हटलं की कोणीही शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याविषयी बोलतात. मात्र, या सर्वांचा पाया ज्या गोष्टीवर उभा असतो, त्या ‘इमर्जन्सी फंड’कडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. अनेकांना वाटते की माझ्याकडे मोठी गुंतवणूक आहे, तर काहींना त्याचे नेमके महत्त्वच उमजत नाही. पण लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे समुद्रात जाण्यापूर्वी ‘लाईफ जॅकेट’ अनिवार्य असते, तसेच आर्थिक प्रवासात इमर्जन्सी फंड अनिवार्य आहे. याचं कारण एका महिन्यात मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि ऑरकल सारख्या दिग्गज आयटी कंपन्यांनी तब्बल ४६,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले.

इमर्जन्सी फंड म्हणजे नक्की काय?

सोप्या भाषेत सांगायचे तर, अचानक आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी बाजूला ठेवलेला निधी म्हणजे इमर्जन्सी फंड. हे पैसे अशा आर्थिक संकटासाठी असतात ज्यांची आपण कधीही अपेक्षा केलेली नसते. उदाहरणादाखल, अचानक नोकरी जाणे, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे गंभीर आजारपण, कार अपघात किंवा व्यावसायिक मंदी. हा खर्च तुमच्या नियोजित खर्चासाठी (उदा. मुलांचे शिक्षण किंवा लग्न) नसून, केवळ अनपेक्षित पडझड सावरण्यासाठी आहे.

किती निधी असावा?

इमर्जन्सी फंडसाठी कोणताही एकच आकडा सर्वांना लागू होत नाही. तुमचे उत्पन्न, खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर हे अवलंबून असते. तरीही, आर्थिक तज्ज्ञांच्या मते, तुमच्या किमान ३ ते ६ महिन्यांच्या अत्यावश्यक खर्चा इतकी रक्कम तुमच्याकडे असायला हवी. जर तुमची सरकारी नोकरी असेल किंवा उत्पन्न अत्यंत स्थिर असेल, तर ३ महिन्यांचा खर्च पुरेसा ठरू शकतो. जर तुम्ही फ्रीलान्सर, व्यावसायिक किंवा खासगी नोकरीत असाल, तर ६ ते ९ महिन्यांचा बॅकअप असणे सुरक्षित ठरते. यात केवळ अन्न-धान्याचा खर्च न धरता घरभाडे, वीज बिल, औषधे, मुलांची फी आणि विम्याचे हप्ते यांसारख्या अनिवार्य खर्चांचा समावेश करावा. एक लक्षात ठेवा हा फंड जास्त असला तरी चालेल पण कमी कधीही ठेऊ नका.

उभारणी कशी करावी?

इमर्जन्सी फंड जमा करताना बहुतेक लोक एक चूक करतात. ते मोठी रक्कम जमा होण्याची वाट पाहतात. दरमहा ५०० किंवा १००० रुपयांपासून सुरुवात करा. हळूहळू ही रक्कम वाढवत नेणे सोपे जाते. ज्याप्रमाणे तुमचे मोबाईल बिल किंवा एसआयपी आपोआप कापली जाते, तसेच इमर्जन्सी फंडसाठी ठराविक रक्कम वेगळ्या खात्यात जाण्याची सोय करा. यामुळे शिस्त लागते. कोणत्याही परिस्थितीत हा निधी तुमच्यासाठी एक अनिवार्य बिल आहे, असे समजूनच त्याचे नियोजन करा.

हा पैसा कुठे ठेवावा?

  • इमर्जन्सी फंडच्या बाबतीत ‘परतावा’ पाहण्यापेक्षा ‘उपलब्धता’ पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा संकट येते, तेव्हा तुम्हाला तो पैसा तातडीने मिळायला हवा.
  • बचत खाते : यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे कोणत्याही बँकेचे बचत खाते. इथं तुम्हाला अर्ध्या रात्री म्हटलं तरी पैसे काढता येतात.
  • मुदत ठेव : जी कोणत्याही दंडाशिवाय किंवा कमी दंडासह मोडून पैसे मिळवता येतील.
  • लिक्विड फंड्स : म्युच्युअल फंडातील हे फंड कमी जोखमीचे आणि लवकर पैसे मिळवून देणारे असतात.

गुंतवणूक की सुरक्षा?

सर्वात मोठी चूक म्हणजे इमर्जन्सी फंडकडे ‘गुंतवणूक’ म्हणून पाहणे. हा पैसा शेअर्स किंवा रिअल इस्टेटमध्ये ठेवू नका. समजा बाजारात मंदी आली आणि नेमकी त्याच वेळी तुमची नोकरी गेली, तर तुम्हाला तुमचे शेअर्स तोट्यात विकावे लागतील. इमर्जन्सी फंड हा तुम्हाला श्रीमंत करण्यासाठी नसून, कठीण काळात तुम्हाला कर्जबाजारी होण्यापासून वाचवण्यासाठी असतो. तसेच, हा निधी ‘खऱ्या’ आणीबाणीसाठीच वापरावा. नवीन फोन, सण-उत्सवांची खरेदी किंवा फिरण्यासाठी या निधीला हात लावणे म्हणजे लाईफ जॅकेटशिवाय पाण्यात उडी घेणे आहे.

इमर्जन्सी फंड तुम्हाला कदाचित मोठे उत्पन्न मिळवून देणार नाही, पण जेव्हा आयुष्य रुळावरून घसरते, तेव्हा हाच निधी सर्व काही सावरून धरतो. हा तुम्हाला कर्ज आणि मानसिक तणावापासून वाचवतो. आजच आपल्या खर्चाचा आढावा घ्या आणि तुमच्या पहिल्या ‘आर्थिक लाईफ जॅकेट’च्या उभारणीला सुरुवात करा.