ती म्हणाली – ए, अरे चल लवकरच नवीन आर्थिक वर्ष सुरू होतंय तर आपण जरा शहाण्यासारखं वागू या! आजपासूनच आपण स्वतःचे पैसे मोजून मापून वापरू या. उगीच खर्च नको.

तो उत्तरला – जमणार आहे का हे तुला? ‘सेल’ म्हटलं की, तुझे डोळे चमकतात आणि आपसूक तुझं ‘क्रेडिट कार्ड’ खरेदी करायला बाहेर पडतं. यावर ती कशी गप्प राहणार ना, फुस्कारत म्हणाली – आणि तू जसा साधूसंतच. तुझ्या खाण्याला काही शिस्त आहे का? घरी जेवण बनत असताना बाहेर खादाडी करतोस, मित्रांबरोबर खाण्यासाठी कुठेपण आणि कधीपण जातोस त्याचं काय? मी एकटीच थोडेच खर्च करते इथे? वार आपल्यावर उलटलेला बघून थोडा घाबरत तो म्हणाला – बरं बरं, तूच नेहमीच बरोबर असतेस आणि तसंसुद्धा सगळेच निर्णय तू घेतेस तर चल तू म्हणालीस तसंच आपण या वर्षी करू या.

आपण आपल्या खर्चाचं ‘बजेट’ बनवू या. पण त्याआधी आपले पैसे नक्की कशासाठी खर्च होतात ते कळले पाहिजे. यावर तिने थोडा विचार केला आणि म्हणाली – हे बरोबर म्हणालास तू. आजवर आपण पैसे आले, गेले आणि संपले हेच बघत आलो, पण कुठे गेले हे फार ढोबळपणे पाहिले. कर्जाचा हप्ता, विम्याचे हप्ता (प्रीमियम), ‘एसआयपी’ हे माहीत आहे. पण बाकी ठाऊक नाही. एक काम करू या आपण ना आजपासून रोज कोणी, किती आणि कुठे खर्च केला हे लिहून ठेवू या. चालेल? तो साशंक होता की, असं केल्याने त्याचे छुपे खर्चसुद्धा तिला कळतील, पण तिला नाही म्हणायची काय बिशाद. वर वर खूश होऊन तो म्हणाला – अरे वाह, मस्तच! आपापल्या ‘लॅपटॉप’मध्ये आपण ही रोजची नोंद ठेवू या आणि असे म्हणत तो आणि ती कामाला लागले.

त्याची नोंदवही

  • पहिला दिवस: १५०० रुपये – १५० रुपये चहा, वडापाव, १३५० पार्टी आणि आठवड्याची भाजी.
  • दुसरा दिवस: ३०० – झोमॅटोवर “Biryani for 1”, पण dessert फ्री होतं. (अचानक जुना मित्र भेटला.)
  • तिसरा दिवस: काहीच लिहिलं नाही – कारण सगळेच खर्च कसे लिहायचे.
  • चौथा दिवस: अगं माझी फाइल करप्ट झाली ! (खर्च नको वाटल्यामुळे डायरीच गायब!)
  • पाचव्या दिवशी मी ठरवलं – मी महिन्याअखेर तुला सगळा हिशोब देतो! (मनातल्या मनात – शेवटी सुखी तो, जो खर्च विसरतो.)

तिची नोंदवही

  • पहिला दिवस: ५,०५० रुपये – ५० रुपये रिक्षा (ऑफिसमधून चालत आले, ‘कॅलरीज’ पण ‘बर्न’ झाल्या), २,५०० रुपये घरकामाचा बाईचा पगार, २,५०० रुपये स्वयंपाकाच्या बाईचा पगार.
  • दुसरा दिवस: १०,१०० रुपये -१०,००० महिन्याभराचं वाण सामान, १०० रुपये – रिक्षा (आज इच्छा होती चालायची पण मैत्रीण म्हणाली घरी जाऊन चालण्यासाठी योग्य ‘बूट’ घालून चालायला जाऊ या. घरी आले तर परत बाहेर जायला काही झालं नाही.)
  • तिसरा दिवस: ६०० रुपये – १०० रुपये रिक्षा, ५०० रुपये नवीन ‘टॉप’ (ऑफिसमध्ये एक जण घेऊन आली होती, ‘मटेरियल’ एक नंबर छान, मॉलमध्ये १५०० ते २००० हजाराच्या खाली मिळणार नाही, किती पैसे वाचले.)
  • चौथा दिवस: ५० रुपये – रिक्षा (शाब्बास, परत आला खर्च रुळावर.)
  • पाचवा दिवस: २००० रुपये – १०० रुपये रिक्षा, १५०० शॉपिंग, ४०० रुपये मॉलमधील खादाडी (अचानक ठरलं की, ऑफिसनंतर मज्जा करायची. मी ठरवलं होतं की, काहीही खर्च न करता सरळ परत यायचं, पण ते कसं दिसेल बाकीच्यांना. म्हणतील ना की एवढं कमावते पण अजिबात खर्च करत नाही. बरं नाही दिसत ते.)

पाचव्या दिवशी – मला ना आता खर्चाचं खूप ‘टेन्शन’ यायला लागलंय. रात्री नीट झोप लागत नाहीये आणि प्रत्येक वेळी खर्च करताना माझंच मन मला खातं. जरा ‘ब्रेक’ घेते आणि बरं वाटलं की परत सुरू करेन. त्याचं थोडं ऐकावं लागेल, पण जाऊ दे आता एवढ्या वर्षांनी त्याच्या टोमण्यांची मला सवय झाली आहे.

अशी ‘बजेट’ची सुरुवात होते आणि असाच शेवट अनेकांच्या बाबतीत असतो. सरकारचं ‘बजेट’ १ फेब्रुवारीला येतंच येतं, पण आपलं ‘बजेट’ मात्र अनेक वर्ष बनतच नाही. ‘बजेट’ म्हणजे काय रे भाऊ? महिन्याच्या सुरुवातीला या वेळी काहीच खरेदी करायचं नाही असं ठरवायचं आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा या महिन्यात खर्च जरा जास्तच झाला असं स्वतःला समजावायचं.

‘बजेट’ म्हणजे शिस्त, काटकसर नाही.

लोकांना वाटतं बजेट म्हणजे कपडे न घेणे, बाहेर न खाणे आणि ‘नेटफ्लिक्स’ बंद करणे. खरं ‘बजेट’ म्हणजे, प्राधान्य निश्चित करणं. आपल्याला हवं काय? गरजेचं काय? आणि हौसेचं काय? याचा हिशोब मांडणं. खर्च करा, पण शहाणपणानेच. थोडक्यात काय तर ‘बजेट’ म्हणजे संकल्प आणि मोह यांच्यातले महाभारत.

संत तुकाराम महाराज म्हणतात: ‘जपे धन, साचे मन – तरीच लाभे जीवन!’ याचा अर्थ आहे पैसे साचवणं आणि मनावर नियंत्रण, हीच खरी संपत्ती. इथे दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी जाणवून दिल्या आहेत. एक पैसे साचवणं आणि दुसरं मनावर नियंत्रण.

आपण दुसरा मुद्दा पहिला घेऊ या कारण इथेच जास्त गुंतागुंत असते. मनावर नियंत्रण ठेवायचं ते कसं? या काळात, ‘क्रेडिट कार्ड’ने आकर्षण वाढवलं आहे. ‘ईएमआय’वर आयफोन घेताना वाटतं की, आपण काय मोठी बाजी मारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड-किल्ले जिंकले तेव्हा जे धाडस त्यांनी केलं, आज आपण आपल्या मोठ्या खरेदीची अशीच काही तुलना करून आपली पाठ थोपटतो. संत तुकारामांच्या वेळी जर ‘क्रेडिट कार्ड’ आणि ‘ऑनलाइन शॉपिंग’ असती तर कदाचित त्यांनी अजून एक कानमंत्र आपल्याला दिला असता.

पहिला मुद्दासुद्धा तितकाच महत्त्वाचा – पैसे साचवायचे तर आहेत पण कसं बरं हे जमवावं? पगार येतो, खर्च होतो आणि महिना संपतो. इथे दोन्ही ठिकाणी लक्ष द्यावं लागतं- एक मिळकत आणि दुसरी खर्च. मिळकत पुरेशी आणि नियमित आहे का? मिळकतीचे अजून कोणते पर्याय असू शकतात? खर्च गरजेचे किती आणि उगीच केलेले किती? आधी ठरवलेले किती आणि अचानक उद्भवलेले किती? मिळालं, खर्च झालं यापेक्षा लक्षपूर्वक कमावलं, त्यातून लक्षपूर्वक खर्च केलं आणि नेटाने गुंतवलं हे समीकरण बसवायचं आहे.

आपलं स्वतःचं ‘बजेट प्लॅन’ बनवताना अशी तरतूद करावी:

  • गरजेचं: किराणा, औषधे, शाळा-कॉलेजची ‘फी’, गरजेचा प्रवास खर्च, घरभाडं/मासिक ‘मेन्टेनन्स’
  • हौसेचं: ‘बुक माय शो’, कॉफी, बाहेर जेवण, ‘पार्टी’, भटकंती, सण-वार आणि इतर सौंदर्य प्रसाधनांवरील खर्च
  • भविष्यासाठी: एसआयपी, आरडी, आपत्कालीन निधी
  • गुप्त खातं: बाबांना/आईला/बायकोला/नवऱ्याला सांगायचं नाही, खर्च! शेवटी काही मज्जा आपली एकट्याची पण असते ना!

‘बजेट’ फसतं का? हो, कारण:

  • भावना: आज ‘बोनस’ मिळालाय. आपण आपल्यावर खर्च केला पाहिजे ही भावना.
  • ‘सेल’ची फसवणूक: ५० टक्के सवलत पाहून घेतलेला ‘शर्ट’ अजूनही तसाच आहे. कारण तेव्हा पोट कमी होईल या वर्षी या भावनेने ‘सेल’ मध्ये घेतला, पण पोट तर कमी नाही झालं पण पैसे तर खर्च झालेच.
  • राहणीमानाची शर्यत: आपण जिथे राहतो, काम करतो त्यानुसार आपले खर्च असले पाहिजे अशी भावना. खरंच गरज कोणती आहे आणि त्यासाठी आपण किती किंमत मोजतो आणि त्याचे आपल्या पुढील भविष्यावर काय परिणाम होतील ही जाणीव प्रत्येकाला स्वतःच झाली पाहिजे. पुढे त्यानुसार कृतीसुद्धा घडली पाहिजे.

‘बजेट’ म्हणजे ‘स्वतःशी प्रामाणिक राहणं’. दुसरा आपले खर्च पाहणार आणि त्याचं विश्लेषण करून आपण कुठे चुकतोय हे दाखवणार हे दडपण प्रत्येकाच्या मनावर असतं. परंतु याचीच दुसरी बाजू अशी आहे की, कोणी तरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि तेसुद्धा आपल्या फायद्यासाठी तर आपण आपसूकच जरा आवर घालतो. हा प्रामाणिकपणा डोक्यात घट्ट व्हायला दृढ निश्चय आणि त्यानुसार कृती व्हायला हवी. उद्या करू किंवा हळू हळू करू हे चालत नाही. आताच, लगेच आणि सतत ही त्रिसूत्री बाळगली तरच मनावर नियंत्रण येऊन हवं ते साध्य करता येईल.

शेवटच्या छोट्या ‘टिप्स’ :

  • खर्चासाठी एक ठरावीक खातं ठेवा ज्यात ‘बजेट’नुसार महिन्याच्या सुरुवातीला पैसे भरा. त्या खात्यातील पैसे कधी संपतात आणि परत किती भरावे लागतात याचं विश्लेषण करा.
  • काही ठरावीक खर्च ‘डेबिट कार्ड’ , काही ठरावीक खर्च ‘क्रेडिट कार्ड’ , काही ठरावीक खर्च ‘जीपे’ अर्थात गूगलपे आणि काही रोख रकमेने करा. जेणेकरून खर्चाचं वर्गीकरण सोपे होईल आणि त्यांच्यावर नियंत्रणसुद्धा ठेवता येईल.
  • ‘खुर्चीतून न उठता’ होणारे खर्च शोधा (सगळे ऑनलाइन असतात). हेच खर्च अनेकदा अवास्तव ठरतात.
  • आणि महत्त्वाचं – मौजमजेसाठी ‘बजेट’ ठरवा. भटकंती, खादाडी याचे नीट नियोजन करा.

पैसा जातो, येतो… पण वय नाही. ते नेहमी जातंच!, योग्य वयात लागलेली शिस्त, केलेली गुंतवणूक ही पुढे खूप फायद्याची ठरते. तरुणपणी ‘बजेट’ केलं, तर म्हातारपणात कोणावर विसंबून राहायची गरज भासत नाही. चला तर मग पुन्हा एकदा आपण हे निश्चय करू या की, ‘खुद से है ये वादा… अबसे ख़र्च सोच और समझके होगा!’.

तृप्ती राणे
सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
trupti_vrane@yahoo.com