FIRE Movement Early Retirement : सामान्यतः निवृत्तीचे वय म्हणजे साठीच्या आसपासचा टप्पा असे मानले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत विशेषतः तरुणांमध्ये ‘FIRE’ अर्थात Financial Independence, Retire Early या संकल्पनेची चर्चा वाढली आहे. ठरावीक वयापर्यंत नोकरी करून निवृत्त होण्याऐवजी तुलनेने लवकर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे आणि त्यानंतर काम करायचे की नाही, याचा निर्णय स्वतः घ्यायचा, अशी या संकल्पनेची मध्यवर्ती कल्पना आहे.

मात्र, FIRE म्हणजे नोकरीतून पळ काढणे किंवा काही वर्षांत मोठा पैसा कमावून कायमची सुट्टी घेणे नव्हे. त्यासाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन, खर्चावर नियंत्रण, विमा, गुंतवणूक, योग्य कॉर्पस आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन या सर्वांचा विचार करावा लागतो. या संकल्पनेची व्याप्ती, त्यातील धोके आणि भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या संदर्भातील आव्हाने याविषयी अर्थविषयक लेखक व नियोजक कौस्तुभ जोशी यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्रश्न : ‘FIRE’ ही संकल्पना नेमकी काय आहे?

कौस्तुभ जोशी : FIRE या शब्दाचा आगीशी काही संबंध नाही. त्याचा अर्थ Financial Independence and Retire Early असा होतो. म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणे आणि तुलनेने लवकर निवृत्त होणे. साधारणपणे आपण वैयक्तिक अर्थनियोजनात गुंतवणूक कशी करायची, कुठे करायची, किती बचत करायची याबद्दल बोलतो. त्याचबरोबर निवृत्तीचे नियोजन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. FIRE संकल्पना मात्र यापेक्षा थोडी वेगळी आहे. यात माणूस नेहमीच्या निवृत्तीच्या वयापर्यंत काम करण्याऐवजी तुलनेने लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. मागील चार-पाच वर्षांत, विशेषतः कोविडनंतर सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यामुळे पाश्चात्त्य देशांतील अनेक वैयक्तिक वित्तविषयक संकल्पना भारतात लोकप्रिय झाल्या. FIRE त्यापैकीच एक आहे.
मात्र, त्याकडे केवळ ‘लवकर रिटायर व्हायचे’ एवढ्याच दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे. FIRE चा खरा गाभा आर्थिक स्वातंत्र्यात आहे. म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय करणे ही तुमची मजबुरी राहू नये; ती तुमची निवड असावी.

प्रश्न : आज तरुणांमध्ये लवकर निवृत्तीची इच्छा का वाढताना दिसते?

कौस्तुभ जोशी : पूर्वी साधारणपणे एक व्यक्ती शिक्षण पूर्ण करून एखाद्या संस्थेत नोकरीला लागायची आणि तिथेच अनेक वर्षे काम करून निवृत्त व्हायची. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. नोकरीचे स्वरूप बदलले आहे. सतत नवीन कौशल्ये शिकावी लागतात. कंपन्या बदलतात, व्यवसाय बदलतात, तंत्रज्ञान बदलते आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तर कामाच्या स्वरूपात आणखी मोठे बदल होत आहेत. त्यामुळे ‘३०-३५ वर्षे काम करूनच निवृत्त व्हायचे’ ही पारंपरिक कल्पना अनेकांना आकर्षक वाटत नाही. त्याऐवजी लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवून पुढील आयुष्य आपल्या पद्धतीने जगावे, अशी इच्छा निर्माण होत आहे.
मात्र, ही इच्छा योग्य आहे की नाही यापेक्षा ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक तयारी किती आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

प्रश्न : मग निवृत्तीचे योग्य वय किती असावे?

कौस्तुभ जोशी : याचे एकच उत्तर देता येणार नाही. सरकारी किंवा पारंपरिक व्यवस्थेत साठी हे निवृत्तीचे वय मानले गेले. त्यामागे माणसाची शारीरिक आणि मानसिक क्षमता, काम करण्याची क्षमता आणि आयुर्मान यांचा विचार होता. पण आजच्या कॉर्पोरेट जगात एक वेगळाच प्रश्न आहे, ‘मी ६० वर्षांपर्यंत काम करायला तयार आहे; पण मला ६० वर्षांपर्यंत काम मिळेल का?’
त्यामुळे निवृत्तीचे वय ठरवताना फक्त ‘मला किती वर्षे काम करायचे आहे’ एवढाच विचार पुरेसा नाही. ‘मी किती वर्षे काम करू शकतो?’, ‘माझ्या क्षेत्रात माझी कौशल्ये किती काळ उपयोगी राहतील?’ आणि ‘मला काम करण्याची क्षमता किती काळ टिकवता येईल?’ हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत.
तुम्ही डॉक्टर असाल, कन्सल्टंट असाल किंवा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर निवृत्तीचे वय तुम्ही स्वतः ठरवू शकता. मात्र, काही तांत्रिक किंवा शारीरिक क्षमतेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या क्षेत्रांत परिस्थिती वेगळी असू शकते.

प्रश्न : FIRE आणि पारंपरिक निवृत्ती नियोजन यात नेमका फरक काय?

कौस्तुभ जोशी : पारंपरिक निवृत्ती नियोजनात आपण ठरावीक वयानंतर उत्पन्नाचा स्रोत कमी होईल किंवा थांबेल, हे गृहीत धरतो आणि त्यासाठी कॉर्पस तयार करतो. FIREमध्ये ही प्रक्रिया लवकर सुरू होते. तुम्हाला ४५ किंवा ५० व्या वर्षी कामाची गरज राहू नये, असे वाटत असेल तर २५-३० वर्षांच्या वयापासून त्यासाठी अधिक आक्रमक बचत आणि गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे FIRE हा ‘लवकर निवृत्ती’चा विचार असला, तरी त्यामागे ‘लवकर आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक तयारी’ असते.

प्रश्न : निवृत्ती नियोजन म्हणजे SIP सुरू करणे एवढेच आहे का?

कौस्तुभ जोशी : अजिबात नाही. SIP हा कॉर्पस तयार करण्याचा एक मार्ग आहे. उदाहरणार्थ, एखादा ३० वर्षांचा तरुण दर महिन्याला SIP सुरू करतो. त्याचे उत्पन्न वाढल्यावर तो Step-up SIP करतो. हे चांगले आहे. पण त्याचवेळी जोखीम व्यवस्थापनाची तयारी आहे का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

जीवन विमा आणि आरोग्य विमा याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. अनेक कॉर्पोरेट कंपन्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा किंवा मेडिक्लेम देतात. त्यामुळे कर्मचारी स्वतःचा स्वतंत्र विमा घेत नाहीत. पण प्रश्न असा आहे की कंपनीची ही सुविधा तुम्ही नोकरी सोडल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर किती काळ वापरू शकणार आहात?

नोकरी बदलतानाही दोन-तीन महिन्यांचा गॅप आला तर त्या काळात विमा संरक्षण काय असेल, याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे SIP, विमा आणि आपत्कालीन निधी ही FIRE किंवा निवृत्ती नियोजनाची मूलभूत पायाभरणी आहे.

प्रश्न : निवृत्तीच्या कॉर्पसचा वापर मध्येच करण्याची सवय किती धोकादायक आहे?

कौस्तुभ जोशी : हा मोठा अडथळा आहे. आपण SIP सुरू करतो, कॉर्पस वाढताना पाहतो आणि एक दिवस लक्षात येते की ‘आपल्याकडे चांगले पैसे जमा झाले आहेत.’मग एखादा मित्र परदेशवारीला जाण्याचा प्रस्ताव देतो. आपण म्हणतो, ‘पैसे आपलेच आहेत, आयुष्याची मजा कधी घेणार?’ त्यात काही गैर नाही. पण जर त्या प्रवासासाठी निवृत्तीच्या कॉर्पसमधून काही लाख रुपये काढले, तर भविष्यात पुन्हा तशीच सवय लागू शकते. समस्या पैसा काढण्यात नाही; त्या पैशाचा उद्देश विसरण्यात आहे. निवृत्तीसाठी बाजूला ठेवलेला पैसा हा त्याच्या उद्देशासाठीच वापरला जावा. अर्थात, गंभीर आजार किंवा मोठे संकट आले तर त्या पैशाला हात लावणे चुकीचे नाही. शेवटी तो पैसा आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठीच आहे.

प्रश्न : निवृत्तीनंतर किती पैसे लागतील, याचे गणित कसे करावे?

कौस्तुभ जोशी : हे गणित करणे थोडे धैर्याचे काम आहे. कारण आजची परिस्थिती आणि १५-२० वर्षांनंतरची परिस्थिती वेगळी असेल. आपण आपल्या खर्चाचे तीन भाग करू शकतो—Comfort, Necessities आणि Luxury. निवृत्तीनंतरच्या गरजांचा विचार करताना आजचा खर्च किती आहे, हे पाहणे आवश्यक आहे. त्यावर महागाईचा परिणाम गृहीत धरावा लागतो. उदाहरणार्थ, दीर्घकालीन नियोजनासाठी ७-८ टक्क्यांचा महागाईदर गृहीत धरून भविष्यातील खर्चाचा अंदाज काढता येतो. यानंतर उलटे गणित करायचे,भविष्यात मला किती कॉर्पस लागेल आणि तो तयार करण्यासाठी आजपासून दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल? बऱ्याचदा लोक कॉर्पसची मोठी रक्कम ऐकून घाबरतात. पण सुरुवात न करण्यापेक्षा उपलब्ध क्षमतेनुसार सुरुवात करणे महत्त्वाचे आहे.

प्रश्न : ‘२५ पट नियम’ म्हणजे काय?

कौस्तुभ जोशी : वैयक्तिक वित्तक्षेत्रात एक साधा नियम सांगितला जातो—तुमच्या सध्याच्या वार्षिक खर्चाच्या किंवा आवश्यक उत्पन्नाच्या सुमारे २५ पट कॉर्पस असावा. पण हा काही अंतिम किंवा सार्वत्रिक फॉर्म्युला नाही. वय, उत्पन्न, खर्च, गुंतवणुकीचा कालावधी आणि निवृत्तीनंतरच्या गरजा यानुसार तो बदलतो.
समजा एखादे जोडपे ४० वर्षांचे आहे आणि अजून १५ वर्षे काम करण्यास तयार आहे. तर त्यांच्यासाठी २५ पट कॉर्पस तयार करण्याचे गणित वेगळे असेल. पण एखादी व्यक्ती ४७-४८ वर्षांची आहे आणि म्हणते की आता दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त काम करायचे नाही, तर त्याच उद्दिष्टासाठी आवश्यक मासिक गुंतवणूक अधिक मोठी असू शकते. म्हणून २५ पट हा मार्गदर्शक नियम आहे; तो अंधपणे लागू करण्याचा फॉर्म्युला नाही.

प्रश्न : ४० ते ५० या वयोगटात निवृत्ती नियोजन करताना सर्वात मोठी अडचण कोणती?

कौस्तुभ जोशी : ४० वर्षांपर्यंत अनेकांनी घर, मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टी उभ्या केलेल्या असतात. त्यानंतर पैसे थोडे हाताशी दिसू लागतात. याच काळात स्वतःच्या गरजांना थोडी मुरड घालून अधिक बचत करणे मानसिकदृष्ट्या अवघड जाते. ‘आता पैसे कमावतोय, आता थोडे खर्च करूया’ हा विचार होतो. म्हणूनच निवृत्ती नियोजन हा केवळ आर्थिक निर्णय नसून कौटुंबिक निर्णय असायला हवा. नवरा-बायको दोघे कमावत असतील तर दोघांचे स्वतंत्र आर्थिक नियोजन असणे ठीक आहे; मात्र कुटुंबाची एकत्रित उद्दिष्टे काय आहेत, निवृत्तीनंतरचे जीवन कसे असेल, कोणत्या जबाबदाऱ्या असतील, यावर चर्चा होणे आवश्यक आहे.

प्रश्न : FIREच्या नावाखाली शहर सोडून गावात स्थायिक होण्याची कल्पना कितपत योग्य आहे?

कौस्तुभ जोशी : ही कल्पना आकर्षक वाटू शकते. शहरातील धकाधकीचे जीवन सोडून गावात शांतपणे राहावे, असे अनेकांना वाटते. पण निर्णय घेण्यापूर्वी वास्तव तपासले पाहिजे. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? गावात तुमच्यासाठी व्यवसायाची किंवा उत्पन्नाची संधी आहे का? तुमचे सामाजिक संबंध आहेत का? तुमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था काय असेल? आरोग्य सुविधा कशा आहेत? तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत त्या सुविधा परवडतील का?
फक्त ‘गावात घर आहे’ म्हणून तिथे निवृत्तीनंतरचे आयुष्य सहज सुरू होईल असे नाही. त्यासाठी संपूर्ण जीवनशैलीचा विचार करावा लागतो.

प्रश्न : निवृत्तीनंतर पैसे असूनही आर्थिक अडचण कशी निर्माण होऊ शकते?

कौस्तुभ जोशी : निवृत्तीनंतर अचानक मोठी रक्कम हातात येते. PF, ग्रॅच्युइटी, लीव्ह एनकॅशमेंट आणि इतर बचतीमुळे एक मोठा कॉर्पस तयार होतो.
अनेक कुटुंबांना आयुष्यात कधी एकदम एवढी मोठी रक्कम खात्यात पाहण्याची सवय नसते. त्यामुळे पैसे खर्च करण्याची मानसिकता वाढू शकते.
नवीन घर, परदेशवारी, महागड्या वस्तू, गॅझेट्स अशा गोष्टींवर खर्च सुरू होतो. पैसा खर्च केल्यावर त्या क्षणी आनंद मिळतो; पण नंतर कॉर्पस कमी झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे निवृत्तीनंतर पैसा कसा खर्च करायचा, किती खर्च करायचा आणि किती रक्कम सुरक्षित ठेवायची, याचे आधीच नियोजन असणे आवश्यक आहे.

प्रश्न : निवृत्तीनंतर इतरांना आर्थिक मदत करण्याचा दबावही असतो. त्याबाबत काय?

कौस्तुभ जोशी : तुमच्याकडे निवृत्तीनंतर मोठी रक्कम आली आहे, हे लोकांना माहीत झाले की काही वेळा तुमच्याकडे पैशाची मागणी होऊ शकते.
मदत करणे चुकीचे नाही. पण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा—‘मी दिलेले पैसे परत आले नाहीत तर माझ्या आपत्कालीन गरजा कोण भागवणार?’
पूर्वी संयुक्त कुटुंबव्यवस्था मजबूत होती. आज न्यूक्लिअर फॅमिली वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची आर्थिक सुरक्षितता जपणे अधिक महत्त्वाचे झाले आहे.

प्रश्न : निवृत्ती नियोजनामध्ये ‘मानसशास्त्र’ किती महत्त्वाचे आहे?

कौस्तुभ जोशी : अत्यंत महत्त्वाचे. तुमचा पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा लहानपणापासूनच्या अनुभवांमधून तयार होतो. एखादी व्यक्ती सुरक्षित आर्थिक वातावरणातून आली असेल तर तिला भविष्यासाठी फारशी भीती वाटत नाही. उलट, ज्यांना लहानपणी पैशाची कमतरता अनुभवावी लागली असेल, ते पुढे पैसे मिळाल्यावर अधिक बचत करू शकतात. त्याचबरोबर आपण कोणाला फॉलो करतो, कोणत्या प्रकारची जीवनशैली पाहतो, याचाही परिणाम होतो. ‘Our nature is our future’ हा मुद्दा येथे लागू होतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांची जीवनशैली जर खूप खर्चिक असेल तर नकळत तुमचीही तशीच जीवनशैली बनू शकते. म्हणून निवृत्ती नियोजनासाठी केवळ आर्थिक गणित पुरेसे नाही; पैशाबद्दलची मानसिकता बदलणेही आवश्यक आहे.

प्रश्न : निवृत्तीनंतर वेळेचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे का?

कौस्तुभ जोशी : नक्कीच. हा अनेकदा दुर्लक्षित राहणारा मुद्दा आहे.
नोकरीच्या काळात आपले संपूर्ण आयुष्य ऑफिसभोवती फिरत असते. निवृत्तीनंतर अचानक भरपूर वेळ उपलब्ध होतो. पैसा असतो, पण वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवृत्तीपूर्वीच छंद, कला, सामाजिक काम, प्रवास किंवा इतर रचनात्मक उपक्रम यांचा विचार केला पाहिजे.
कारण रिकामा वेळ आणि हाताशी पैसा हे चुकीच्या निर्णयांना कारणीभूत ठरू शकतात. काही निवृत्त व्यक्ती वेळ घालवण्यासाठी शेअर ट्रेडिंगकडे वळतात आणि निवृत्तीचा कॉर्पस धोक्यात घालतात. शेअर ट्रेडिंग करणे चुकीचे आहे असे नाही; पण त्यासाठी ज्ञान, अनुभव आणि जोखीम समजून घेणे आवश्यक आहे.

प्रश्न : ‘सेफ रिटायरमेंट’साठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

कौस्तुभ जोशी : निवृत्तीनंतर गुंतवणूक विकणे, नवीन गुंतवणूक करणे किंवा मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे योग्य ठरते.
आपण डॉक्टरांकडे जाताना स्वतःच औषधोपचार करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेतो. त्याचप्रमाणे गुंतवणुकीतही आपण कितीही वाचलेले असलो तरी दुसऱ्या जाणकार व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरतो. पण त्याचवेळी प्रत्येक गोष्टीसाठी दहा जणांचा सल्ला घेणेही योग्य नाही. दोन-तीन जाणकार सल्लागारांचे मत घेतल्यानंतर निर्णय घेणे आणि त्यावर ठाम राहणे महत्त्वाचे आहे. सतत सल्ले बदलत राहिल्यास गोंधळ वाढतो.

प्रश्न : मग FIREकडे तरुणांनी नेमके कसे पाहावे?

कौस्तुभ जोशी : FIREला ‘Financial Independence, Retire Early’ एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता त्याचा अर्थ Financial Independence, Safe Retirement असा व्यापकपणे पाहायला हवा. तुम्ही किती रुपयांपासून बचत सुरू करता, हा पहिला प्रश्न नाही. तुम्ही दर महिन्याला बचत सुरू करता का, हा पहिला प्रश्न आहे. समजा तुम्हाला महिन्याला १५ हजार रुपये गुंतवणे शक्य नाही. पण ५ हजार रुपये शक्य आहेत. तर ५ हजार रुपयांपासून सुरुवात करा. दीर्घकालीन गुंतवणुकीत वेळ हा मोठा घटक आहे. नंतर उत्पन्न वाढले की गुंतवणूक वाढवा. तुमची परिस्थिती, मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या गरजा आणि निवृत्तीचे उद्दिष्ट यांचा वेळोवेळी आढावा घ्या.

प्रश्न : शेवटी, निवृत्ती नियोजन करताना कोणती एक गोष्ट अजिबात विसरू नये?

कौस्तुभ जोशी : निवृत्ती म्हणजे आयुष्य संपण्याचा टप्पा नाही; तो आयुष्याच्या एका नव्या टप्प्याची सुरुवात आहे.
म्हणून निवृत्तीनंतर फक्त पैसा किती असेल याचा विचार करू नका. तुमचे आयुष्य कसे असेल, तुमच्या आवडी काय असतील, छंद कोणते असतील, कुटुंबासोबत कसा वेळ घालवाल, आरोग्य कसे राखाल आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित कसे राहाल, याचा विचार करा. रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे केवळ कॉर्पस तयार करणे नाही. ते आपल्या उर्वरित आयुष्याची रचना करण्याचे नियोजन आहे. FIREची सुरुवात मोठ्या रकमेपासून होत नाही. ती एका छोट्या निर्णयापासून होते—‘माझ्या उत्पन्नातून दर महिन्याला काही रक्कम मी भविष्यासाठी बाजूला काढणारच.’ ही सवय जितक्या लवकर लागेल, तितका आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग सोपा होईल.