देवदत्त धनोकर आर्थिक नियोजनात उद्दिष्टे योग्य प्रकारे लिहिणे अत्यंत महत्त्वाचे असते. आर्थिक नियोजनांतील या महत्त्वाच्या टप्प्यावर आर्थिक नियोजनाचे यश अवलंबून असते. आजच्या लेखामध्ये आर्थिक उद्दिष्टे कशाप्रकारे निश्चित करून नमूद करावीत आणि त्याचे महत्त्व याची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण एखाद्या सामान्य कुटुंबाची आर्थिक उद्दिष्टे काय असतात ते बघूया मुलांचे शिक्षण आणि लग्नासाठी तरतूदप्रशस्त घरचारचाकी वाहनसहल / पर्यटननिवृत्तीपश्चात नियमित उत्पन्न यासह विविध आर्थिक उद्दिष्टे असू शकतात. जर ही सर्व उद्दिष्टे योग्यप्रकारे साध्य करायची असतील तर ती योग्य पद्धतीने लिहिणे आवश्यक असते. त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून बचत आणि गुंतवणूक निग्रहाद्वारे आवश्यक असते. स्मार्ट आर्थिक उद्दिष्टे कशी लिहावीत? स्मार्ट smart म्हणजे एस - स्पेसिफिक (निश्चित) उदाहरणार्थ - मला पुण्यात बाणेर येथे चार खोल्यांचे प्रशस्त घर घ्यायचे आहे. एम - मेजरेबल (मोजता येण्याजोगा) उदाहरणार्थ - घर घेण्यासाठी किती रक्कम आवश्यक आहे, याचा समावेश स्मार्ट उद्दिष्टांमध्ये असणे आवश्यक आहे. मला पुण्यातील बाणेरमध्ये ६० लाख रुपयांचे चार खोल्यांचे घर घ्यायचे आहे. ए - अचिव्हेबल (साध्य करता येण्याजोगे) उदाहरणार्थ - आपल्याकडे उपलब्ध असणारा निधी आणि आपले उत्पन्न यांच्या मदतीने आपण ठरविलेले उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे का? याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जसे, पुण्यातील बाणेर परिसरात चार खोल्यांच्या घराच्या किमती ६० लाखांपासून ते १.२ कोटी रुपयांपर्यंत आहेत. जर एखाद्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न १ लाख रुपये असेल तर ती व्यक्ती गृहकर्जाच्या मदतीने ७० लाख रुपयांपर्यंतचे घर घेऊ शकेल आणि दोन लाख रुपये मासिक उत्पन्न असलेली व्यक्ती १.२ कोटी रुपये किमतीचे घर घेऊ शकेल. आर - रिअलिस्टिक (वास्तववादी) आपण विविध मार्गांच्या मदतीने बचत आणि गुंतवणूक करत असतो. त्या माध्यमातून भविष्यातील उद्दिष्टपूर्तीचे आपले नियोजन असते. आपल्या बचत किंवा गुंतवणुकीवर आपण गृहीत धरलेला परतावा हा वास्तव परताव्याच्या जवळ जाणारा असावा अशी दक्षता आपण घेणे आवश्यक असते. भविष्यातील वाढीव उत्पन्नाच्या (पगारातून / व्यवसायातून) आधारे देखील आपण योजना तयार करतो, अशा वेळेस देखील आपण योग्य उत्पन्नवाढ विचारात घेऊन त्यायोगे नियोजन केले पाहिजे. उदाहरणार्थ - ६० हजार रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्या सुहासला मागील पाच वर्षात कंपनीने सरासरी १० टक्के पगारवाढ दिली असेल आणि सुहासला तीन वर्षानंतर गृहकर्जाच्या मदतीने घर घ्यायचे असेल तर पुढील तीन वर्षांत देखील १० टक्के दराने पगारवाढ मिळेल अशा गृहीतकाच्या मदतीने घरखरेदीचे नियोजन करता येईल. टी - टाईम बाउंड (कालबद्ध) उदाहरणार्थ - प्रत्येक आर्थिक उद्दिष्ट आपल्याला किती कालावधीत पूर्ण करावयाचे आहे, हे देखील निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे. जसे, एप्रिल २०२५ मध्ये बाणेर येथे निश्चित केलेले घर घ्यायचे आहे. स्मार्ट उद्दिष्ट निश्चित करताना आपण वरील सर्व मुद्द्यांचा समावेश करणे अपेक्षित असते. तसेच वरील उद्दिष्टपूर्तीसाठी काही अन्य उपाययोजना आवश्यक असतात. त्यांचाही समावेश आपण आर्थिक नियोजनांत केला पाहिजे. काही उदाहरणांच्या मदतीने आपण स्मार्ट उद्दिष्टे कशी असतात त्याबाबत माहिती घेऊया. सामान्य उद्दिष्ट - घर घ्यायचे आहे स्मार्ट उद्दिष्ट - दरमहा ८० हजार रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्या रमेशचे उद्दिष्ट : एप्रिल २०२५ मध्ये बाणेर परिसरात चार खोल्यांचे घर घ्यायचे आहे. ज्याची अंदाजित किंमत ८० लाख रुपये असेल. घर घेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला अन्य उपाययोजना करणे देखील आवश्यक आहेत. ते पुढीलप्रमाणे ० व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने दरवर्षी योग्य उत्पन्न दाखवणे आवश्यक आणि आणि प्राप्तिकर विवरणपत्र वेळेवर भरणे आवश्यक आहे. ० ‘सिबिल स्कोअर’ योग्य राहील यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. ० बचत आणि गुंतवणूक : गृहखरेदीसाठी उपलब्ध वेळेनुसार योग्य गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करणे. ० अन्य आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य उपाययोजना करून आवश्यक रकमेचा आपत्कालीन निधी तयार करणे. ० विमा कवच : गृहखरेदीसाठी आपण गृहकर्ज घेत असल्यास अतिरिक्त आयुर्विमा संरक्षण जरूर घ्यावे. उदाहरणार्थ, ६० लाखांचे गृहकर्ज घेल्यास ६० लाखांचे अतिरिक्त विमा सरंक्षण घ्यावे. महत्त्वाचे : प्रत्येक आर्थिक उद्दिष्ट अन्य आर्थिक उद्दिष्टांवर अवलंवून असते. यासाठी सर्वसमावेशक अशी आर्थिक योजना केल्यास विविध आर्थिक उद्दिष्ट सहजसाध्य आहेत. या संदर्भातील एक अनुभव आपण जाणून घेऊया. एका ३६ वर्षीय व्यक्तीने, केवळ निवृत्ती नियोजन करायचे असून अन्य कोणतीही योजना/गुंतवणूक करावयाची नाही असे सांगत, त्या संबंधाने नियोजनाबाबत विचारणा केली. त्या व्यक्तीची आर्थिक आणि कौटुंबिक माहिती घेतल्यानंतर त्यांना मी आरोग्य विमा, आयुर्विमा यासह म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा असे सुचविले. त्यांचा प्रश्नार्थक चेहरा बघून मी त्यांना सांगितले की, तुमच्या सेवानिवृत्तीसाठी तुम्हाला ५८ व्या वर्षी ३.४ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. याकरिता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने तुमचे काही झाल्यास तुमच्यानंतर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह तुमच्या आयुर्विम्याच्या माध्यमातून होईल. अनेक गुंतवणूकदारांना याबाबत स्पष्टता नसल्याने आर्थिक तज्ज्ञांकडून माहिती घेऊनच आर्थिक उद्दिष्टे ठरविणे योग्य ठरते. सामान्य उद्दिष्टेस्मार्ट उद्दिष्टेश्रीमंत व्हायचे आहे२०३० पर्यंत कोट्यधीश व्हायचे आहेमुलीचे उच्च शिक्षण२०३२ पर्यंत आनंदीचे उच्च शिक्षण सुरू होईल. त्यासाठी ४० लाख रुपयांची तरतूदमुलीचे थाटामाटात लग्न२०३८ पर्यंत आनंदीच्या लग्नासाठी २५ लाख रुपयांची तरतूदनिवृत्तिवेतनासाठी गुंतवणूक२०४४ साली वयाच्या ५८ व्या वर्षी दरमहा ५०,००० रुपयांच्या उत्पन्नासाठी तरतूद पुढील लेखात आपण आर्थिक उद्दिष्टे साध्य कशी करायची याबाबत माहिती घेऊया. लेखक पुणेस्थित गुंतवणूक सल्लागार dgdinvestment@gmail.com