केंद्र सरकारचे धोरण २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात क्रय शक्तीला चालना देण्याकडून पुन्हा पायाभूत सुविधांकडे वळलेले स्पष्ट दिसत आहे. पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात १२.२ लाख कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात भांडवली खर्चात मोठी वाढ करण्यात आली आहे. प्रमुख पायाभूत सुविधांमध्ये ७ नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर, पायाभूत सुविधांच्या विकासकांसाठी जोखीम हमी निधी आणि शहर पुनर्विकासासाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रेल्वे विस्तार: सात नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित आहेत:
मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बेंगळूरु, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बेंगळूरु, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी.
शहरी आणि ग्रामीण विकास:
जल जीवन मिशनचा २०२८ पर्यंत विस्तार करण्याबरोबरच शहर पुनर्विकासासाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.
दळणवळण (लॉजिस्टिक्स) आणि जलमार्ग:
वर्ष २०४७ पर्यंत २० नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित करून देशांतर्गत जलमार्ग आणि किनारी जहाजांचा वाटा ६ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आले आहे.
वित्तपुरवठा यंत्रणा
कर्जदारांना ‘क्रेडिट गॅरंटी’ अर्थात पतहमी देण्यासाठी एक नवीन पायाभूत सुविधा जोखीम हमी निधीसाठी तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक मालकीच्या कंपन्यांच्या मालमत्तेच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी समर्पित रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रिट्स) स्थापन केले जातील.
शाश्वतता आणि तंत्रज्ञान:
बंदर विद्युतीकरण, अक्षय्य ऊर्जा आणि वैज्ञानिक संशोधनासाठी नवीन दुर्बिणींच्या स्थापनेसह पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
राज्य सरकारांना भांडवली प्रकल्पांसाठी राज्यांना ५० वर्षांच्या व्याज मुक्त कर्जात १.५ लाख कोटी रुपयांची योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांवर आधारित इन्फ्रास्ट्रक्चर फंडात गुंतवणूक करणे हा एक चांगला विकल्प आहे. वर्ष २०२४ मधील भरघोस परताव्यापश्चात कंपन्यांच्या मूल्यांकनात घसरण झाल्याने मूल्यांकन नवीन गुंतवणुकीसाठी आकर्षक पातळीवर आले आहे. व्याजदरसुद्धा सर्वकालीन नीचांकी पातळीच्या जवळ आहेत. उत्पादन क्षेत्रात सुधारणा करण्यावर भर दिल्याने खासगी गुंतवणुकीला वेग मिळण्याची आशा आहे. याचा फायदा अभियांत्रिकी क्षेत्राला होईल. इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे सेक्टोरल फंड नसून ते एक थीमॅटिक फंड प्रकार आहे. सुरुवातीची तीन वर्षे अधिक जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांनी या फंडाचा विचार करावा. जे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास सिद्ध आहेत, त्या गुंतवणूकदारांनी फ्रँकलिन बिल्ड इंडिया फंडात आपल्या गुंतवणुकीचा लहान हिस्सा गुंतविण्याची ही शिफारस आहे. फंडाची १७ वर्षांची देदीप्यमान कारकीर्द आहे. फंडाने ४ सप्टेंबर २००९ ते ६ फेब्रुवारी २०१६ दरम्यान १७.८४ टक्के वार्षिक दराने परतावा दिला आहे. याच कालावधीत फंडाच्या तीन वर्षांच्या चलत सरासरीचा (३ ईयर रोलिंग रिटर्न) तपशील पुढीलप्रमाणे आहे.
| फ्रँकलिन बिल्ड | इंडिया फंड | निफ्टी, इन्फ्रास्ट्रक्चर, टीआरआय |
| सरासरी | १९.६४ | ९.४४ |
| कमाल | ४२.७९ | ३६.०५ |
| किमान | -१०.१३ | -१७.२४ |
| ० पेक्षा कमी | ७.४२ | १८.२३ |
| ० ते ८% | १४.८७ | ३०.८९ |
| ८ ते १२ | १०.७२ | १२.१४ |
| १२ ते १५ | ७.५४ | ५.६९ |
| १५ ते २० | १०.५७ | ९.९३ |
| २०% पेक्षा अधिक | ४८.८८ | २३.११ |
गेल्या पाच वर्षांत (१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२५) या फंडाने मानदंड सापेक्ष ९८ टक्के वेळा जास्त परतावा दिला आहे. या कालावधीत फंडाने आयसीआयसीआय प्रुडे. इन्फ्रास्ट्रक्चर, निप्पॉन इंडिया पॉवर ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर, डीएसपी ‘टायगर’, एसबीआय इन्फ्रास्ट्रक्चर या सारखे मालमत्ता क्रमवारीत पुढे असणाऱ्या फंडांच्या तुलनेत सातत्य राखले आहे. म्हणून ३१ डिसेंबर २०२५ रोजी ३०३५ कोटींची मालमत्ता असणाऱ्या या फंडाला मॉर्निंग स्टारने ‘फाइव्ह स्टार’ अर्थात पंचतारांकित मानांकन दिले आहे.
फंडाच्या गुंतवणुकीचा तपशील
| उद्योग क्षेत्र | टक्केवारी |
| तेल आणि इंधन | १६.७५ |
| भांडवली वस्तू | १५.८७ |
| वित्तीय सेवा | १५.०२ |
| ऊर्जा | ११.४८ |
| बांधकाम | ११.२३ |
| सेवा | ९.५५ |
| दूरसंचार | ६.८ |
| स्थावर मालमत्ता | २.६३ |
| धातू आणि खनिकर्म | २.३४ |
| ग्राहकोपयोगी वस्तू | २.०० |
फंडाच्या गुंतवणुकीत ३९ कंपन्यांचा समावेश आहे. आघाडीच्या पाच कंपन्यांत लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंटरग्लोब एव्हिएशन, ओएनजीसी, भारती एअरटेल यांचा समावेश आहे. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात असून पहिल्या पाच कंपन्यांत एकही बँक नाही, हे या फंडाच्या पोर्टफोलिओचे वैशिष्ट्य आहे. अन्य इन्फ्रास्ट्रक्चर फंडांप्रमाणे फ्रँकलिन बिल्ड इंडिया फंडाने बंदरे, रस्ते, रेल्वे आणि वीज प्रकल्पांच्या विकासकांपुरती गुंतवणूक मर्यादित राखलेली नाही. दूरसंचार, ऑटो साहाय्यक, अभियांत्रिकी भांडवली वस्तू आणि बँकिंगसारख्या उद्योग क्षेत्रांमध्ये फंडाने गुंतवणूक केली आहे.
फ्रँकलिन बिल्ड इंडिया फंडाच्या गुंतवणुकीत २०२० दरम्यान बँकिंग क्षेत्रात २७ टक्के असलेली गुंतवणूक कमी करून आता १२ टक्क्यांवर आणली आहे. या कालावधीत किर्लोस्कर ऑइल इंजिन, किर्लोस्कर न्यूमॅटिक, अशोक लेलँड एसकेएफ इंडिया या सारख्या भांडवली वस्तूंशी निगडित कंपन्यांत गुंतवणूक वाढविली आहे. अभियांत्रिकी, वाहन उद्योग आणि सिमेंट उत्पादकांचे पोर्टफोलिओतील प्रमाण मानदंड सापेक्ष अधिक आहे. पाच वर्षे पूर्ण केलेले १८ इन्फ्रास्ट्रक्चर फंड उपलब्ध असले तरीही, गुंतवणूकदारांच्या पदरात भरघोस परतावा घालणारा फ्रँकलिन बिल्ड इंडिया फंड ज्यांच्या गुंतवणुकीत आहे त्यांना समाधान देणारा आणि ज्यांच्या पोर्टफोलिओत नाही त्यांना हळहळ लावणाऱ्या म्हणून ‘लाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळे’ या उक्तीची आठवण करून देणारा फंड आहे. इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे अतिशय अस्थिर असतात. या अस्थिरतेवर मात करून परतावा कमाविण्यासाठी या फंडाचा समावेश गुंतवणूकदारांनी त्यांच्या वितरकाच्या मदतीने करायचा आहे.

