सध्याची व्याजदर पातळी नीचांकी पातळीवर असून भविष्यात व्याजदर कपात जवळजवळ अशक्य वाटत आहे. युद्धजन्य स्थितीमुळे नजीकच्या काळात महागाई वाढेल तसेच यावर्षी अपुरा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या परिस्थितीचे दोन परिणाम संभवतात. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे कृषी उत्पन्न घटेल. त्यामुळे ग्रामीण भारतातील क्रयशक्ती मंदावेल आणि महागाई वाढेल. याचा परिणाम केंद्र सरकारच्या रोख्यांच्या परताव्यावर दिसून आला आहे.
मागील वर्षी २९ एप्रिल २०२५ रोजी केंद्र सरकारच्या १० वर्षे रोख्यांच्या परताव्याचा दर (वायटीएम) ६.३ टक्के होता, जो एप्रिल २०२६ मध्ये ७.१० पर्यंत वाढत जाऊन हा लेख लिहित असताना ६.९३ टक्के आहे. गेल्या वर्षभरात १० वर्षे रोख्यांच्या परतावा दरात जवळजवळ पाऊण टक्के वाढ झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांना बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा अधिक रोकडसुलभता आणि साधारण ६.५० ते ७.०० टक्क्यांपर्यंत परतावा मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी बँका आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी जारी केलेले रोख्यांमध्ये गुंतवणूक करणारे बँकिंग अँड पीएसयू डेट फंड हा एक विकल्प असून या फंड गटातील फ्रँकलिन इंडिया बँकिंग अँड पीएसयू डेट फंडाचा गुंतवणूकदार विचार करू शकतात.
बँकिंग अँड पीएसयू डेट फंड गटात मालमत्ता क्रमवारीत चौदाव्या क्रमांकावर असलेला हा फंड एक तीन पाच वर्षे मुदतीतील कामगिरीत पहिल्या तीन क्रमांकात आहे. कर्जाची वाढती मागणी आणि मंदावलेले बँकांचे ठेवी संकलन यामुळे बँका सध्या आक्रमकपणे (अधिक व्याज दराने) ठेवी संकलित करत आहेत; तसेच आपल्या भांडवलात भर घालण्यासाठी त्या ७.५ ते ८.५ टक्के दराने ‘अतिरिक्त टायर-१’ रोख्यांची विक्री करत आहेत. या संधीचा लाभ बँकिंग अँड पीएसयू डेट फंड घेत आहेत. मध्यम परतावा आणि रोख्यांची उच्च गुणवत्ता यांचा सुरेख मेळ बँकिंग अँड पीएसयू डेट फंडात साधलेला असतो.
बँकिंग अँड पीएसयू डेट या फंड गटात फ्रँकलिन इंडिया बँकिंग अँड पीएसयू डेट फंडाची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. या फंडाने २५ एप्रिल रोजी बारा वर्षे पूर्ण करून तेराव्या वर्षात पदार्पण केले आहे. या बारा वर्षात एक वर्ष, पाच वर्षे आणि १० वर्षे कालावधीत ३ वर्षाचा चलत परतावा (रोलिंग रिटर्न्स) या फंड गटातील मोठी मालमत्ता असणाऱ्या फंडाच्या तोडीस तोड आहेत. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ‘रोलिंग रिटर्न्स’ हे अधिक महत्त्वाचे मानले जातात. ‘रोलिंग रिटर्न्स’च्या निकषावर पाहता, या फंडाच्या ‘रेग्युलर प्लॅन’ने २०१४ पासूनच्या विविध व्याजदर आवर्तनामध्ये सरासरी ६.९७ टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे; यामध्ये एका वर्षाच्या कालावधीसाठी मिळालेला कमाल परतावा १२.५ टक्के, तर किमान परतावा २.० टक्के इतका राहिला आहे.
निफ्टी बँकिंग अँड पीएसयू डेट इंडेक्स ए२ हा फंडाचा मानदंड आहे. चांदनी गुप्ता आणि अनुज ताग्रा हे फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. अलीकडील काळात फ्रँकलिन इंडिया बँकिंग अँड पीएसयू डेट फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणुकीचे विभाजन ‘ट्रिपल ए’ किंवा ‘ए१’ पत मानांकन असलेल्या सार्वजनिक मालकीच्या कंपन्या, बँका आणि केंद्र सरकारी रोख्यांमध्ये विभागून करत आहे. मार्च २६च्या अखेरीस फंडाची गुंतवणूक खालील दहा आघाडीच्या गुंतवणुका होत्या.
| रोखे | % |
| झिरो पर्सेंट आरईसी ०३ नोव्हें २०२४ | ७.०५ |
| ७.५६% इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनांस कंपनी २० मार्च-२०२८ | ६.३३ |
| ६.९० % हुडको २३ एप्रिल-२०३२ | ५.४१ |
| ७.५० % नाबार्ड ३१ ऑगस्ट २०२६ | ५.४१ |
| ७.३० % उत्तराखंड राज्य विकास कर्जे ०१ ऑक्टो-२०३२ | ५.४१ |
| ७.६५% एक्सिस बँक ३० जानेवारी २०२७ | ५.२७ |
| ७.२४% पीएफसी १७ फेब्रुवारी फेब्रु २०३१ | ५.२२ |
| ६.९० % केंद्र सरकार | ४.१० |
| बँक ऑफ बरोडा ६ जानेवारी २०२७ | ४.९३ |
| ८.३५% एचडीएफसी बँक १३ मे २०२६ | ४.४५ |
व्याज दर वर जाण्याची जोखीम
रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांमध्ये गुंतवणूक करताना, दोन प्रमुख धोके तपासले पाहिजेत. ‘क्रेडिट रिस्क’ (पत धोका) आणि ‘ड्युरेशन रिस्क’ (व्याज दर धोका).
जो फंड सर्वोच्च मानांकन असलेल्या ‘ट्रिपल ए’ आणि ‘ए१प्लस’ तसेच सार्वभौम कर्जपत्रांमध्ये लक्षणीय गुंतवणूक करतो, तो पत गुणवत्तेच्या बाबतीत उच्च स्थान मिळवतो. जर पोर्टफोलिओमध्ये तुलनेने कमी मुदतीचे रोखे असतील, तर व्याज दराचा धोकाही मर्यादित राहतो. व्याज दर ऐतिहासिकदृष्ट्या नीचांकी पातळीवर आहेत आणि महागाई वाढण्याच्या धोक्यामुळे व्याजदर हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे.
एक विश्लेषक, या नात्याने आर्थिक वर्ष २०२७ मध्ये व्याजदर किमान अर्ध्या टक्क्याने वाढण्याचा धोका संभवतो. डिसेंबर २६ आणि फेब्रुवारी २७ आणि किंवा एप्रिल २७ च्या पत धोरण आढावा बैठकीत प्रत्येकी पाव टक्क्याची वाढ अपेक्षित आहे. ही संभाव्य व्याजदर वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाले तर तुलनेने कमी मुदतीच्या डेट फंडांच्या ‘एनएव्ही’ घसरतील.
या फंडाचा व्यवस्थापन खर्च ‘रेग्युलर प्लॅन’साठी ०.४७ टक्के, तर ‘डायरेक्ट प्लॅन’साठी ०.१९ टक्के इतके आहे. या फंड गटात कमी व्यवस्थापन खर्च असलेला हा फंड आहे. मार्च २६च्या अखेरीस ४७९ कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन केले आहे. व्याजदरात संभाव्य वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, या फंडाने अवलंबलेली ‘रोल-डाउन स्ट्रॅटेजी’ ज्यामध्ये रोख्यांच्या मुदतपूर्तीपर्यंत राखून ठेवले जातात, कालांतराने संबंधित व्याजदराचा धोका कमी करण्यास मदत करेल. फ्रँकलिन टेम्पलटनचे रोखे गुंतवणूक करणारे फंड गुंतवणूकदारांना फ्रँकलिन टेम्पलटनच्या पूर्व इतिहासामुळे पसंत पडत नाहीत.
सामान्य गुंतवणूकदार अनेकदा डेट फंड टाळतात. जास्त परतावा देणारे इक्विटी फंडाला त्यांची पसंती असते. तसेच डेट फंड गुंतागुंतीचे वाटतात. व्याजदर वाढल्यावर रोख्यांच्या किमती का घसरतात हा व्यस्त सहसंबंध कळत नाही. त्यात मुदत ठेवींच्या तुलनेत डेट फंडात असलेल्या जोखमींची भीती वाटते. मुदत ठेवींप्रमाणे डेट फंड जोखीममुक्त नसतात; ते व्याजदरातील चढउतार आणि पत संबंधी जोखमेशी संबंधित असतात.
अनेक गुंतवणूकदारांचा असा विश्वास असतो की, डेट फंड बँकेतील ठेवींप्रमाणे १०० टक्के सुरक्षित आहेत, ज्यामुळे बाजारात अस्थिरता आल्यावर भीतीचे वातावरण निर्माण होते. डेट फंडाचे सर्वच प्रकार पतसंबंधी जोखमेशी संबंधित नसतात. पोर्टफोलिओत वैविध्य साध्य करण्यासाठी आणि स्थैर्यासाठी मध्यम ते दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी डेट फंड हे सर्वात उपयुक्त साधन आहे. व्याजदर आणि पतविषयक जोखीम अल्प असल्याने पत आणि व्याजदर यांच्या जोखमेचा समतोल साधणाऱ्या या फंडाला गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओत स्थान द्यावे यासाठी ही शिफारस आहे.
