-वसंत कुलकर्णी

जागतिक प्रतिकूल भू राजकीय घटनांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली. कंपन्यांना देशांतर्गत ग्राहकांच्या वाढत्या क्रयशक्तीचा आणि दरडोई उत्पन्नाचा फायदा होत आहे, दुसऱ्या बाजूला लार्जकॅप मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये मूल्यांकनात मोठी तफावत दिसत आहे. गेल्या आठ तिमाहीत आघाडीच्या लार्जकॅप निर्देशांक (बीएसई १००, निफ्टी १००) ठराविक पातळीत व्यवहार करत आहेत. एक बाजूला लार्जकॅप निराशेच्या गर्तेत तर मिड आणि स्मॉलकॅपचे मूल्यांकन मात्र नव्याने गुंतवणूक करण्याच्या पातळीच्या वर आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप महाग असूनही आकर्षक संधी निधी व्यवस्थापकांना खुणावत आहेत. हे त्यांनी केलेल्या ‘चेरी पिकिंग’मधून दिसत आहे.

बाजारातील अनेक क्षेत्रांमध्ये मोठी घसरण झाली असल्याने, गुंतवणूकदारांसाठी काही ठिकाणी योग्य मूल्यावर उपलब्ध असलेले समभाग (व्हॅल्यू बाईंग) खरेदीची संधी दिसत आहे. या पार्श्वभूमीवर लार्जकॅप समभागांवर अधिक भर देणारा आणि भक्कम कामगिरीचा प्रदीर्घ इतिहास असलेला ‘फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड’ (पूर्वीचा ‘फ्रँकलिन इंडिया इक्विटी फंड’) येत्या २९ सप्टेंबर रोजी ३१ वर्षे पूर्ण करत आहे ‘फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड’ १९,५०९ कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत असून गेल्या ३१ वर्षात या फंडाने दमदार कामगिरी नोंदवली आहे.

या फंडाने २९ सप्टेंबर १९९४ ते १० सप्टेंबर २०२६ दरम्यान वार्षिक १७.१८ टक्के दराने परतावा दिला आहे. याच काळात केलेल्या एसआयपीने १९.७८ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. अर्थात, दरम्यान या ३१ वर्षांच्या काळात तीन वेळा फंडाची कामगिरी थोडी खालावलेली असली तरी सर्व काळात या फंडाने सातत्यपूर्ण कामगिरी करत आपल्या संदर्भ निर्देशांकाला कामगिरीत मागे टाकले आहे. लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे संतुलन साधणारा हा एक फंड असून पुनर्जीवित होत असलेल्या आणि १५ वर्षाच्या नीचांकी मूल्यांकनाला उपलब्ध असलेल्या लार्जकॅप कंपन्यांमुळे दीर्घकालीन दृष्टिकोनातून फ्लेक्सीकॅप फंडात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ असू शकते.

उत्कृष्ट कामगिरी

या फंडाने पॉइंट-टू-पॉइंट आधारावर मागील ५-वर्ष (११.४७ टक्के), १०-वर्ष (१२.२३ टक्के) १५-वर्षे (१४.३४ टक्के) २०-वर्षे (१३.९६ टक्के) आणि २५-वर्षांच्या कालावधीत, १९.४४ टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. या कामगिरीमुळे या फंडाला या श्रेणीतील काही सर्वोत्तम फंडांमध्ये स्थान मिळाले आहे. गेल्या वीस वर्षात या फंडाची धुरा आर सुकुमार, आर जानकीरामन (२०११ पासून विद्यमान निधी व्यवस्थापक) आनंद राधाकृष्णन, संदीप मदन,आणि के राजसा यांनी संभाळली आहे.

या योजनेने मध्यम ते दीर्घ कालावधीत (५ ते ७ वर्षे) निफ्टी ५०० टीआरआय पेक्षा २-४ टक्के फरकांनी अधिक चांगली कामगिरी केली आहे. मागील दहा वर्षात वर्षांतील (१ सप्टेंबर २०१६ ते ३१ ऑगस्ट २०२६) तीन-वर्षांच्या रोलिंग परताव्याचा विचार केल्यास, फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सीकॅपने २०.४ टक्के सरासरी परतावा दिला आहे. तसेच, उपरोक्त १० -वर्षांच्या कालावधीत, ३ वर्षे चलत परतावा (रोलिंग रिटर्न) आधारावर, या फंडाने ९२.७८ टक्के वेळा निफ्टी ५०० टीआरआय सापेक्ष सरस कामगिरी केली आहे.

या कालावधीत, या फंडाने जवळपास ७९ टक्केवेळा १५ टक्क्यांपेक्षा जास्त आणि जवळपास ९० टक्केवेळा १२ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षांतील फंडाचा एसआयपी परतावा (एक्सआयआरआर) १४.४९ टक्के असून फ्लेक्झीकॅप गटात या कालावधीत हा परतावा चौथ्या क्रमांकावर आहे. याच कालावधीत निफ्टी ५०० टीआरआयमधील एसआयपीने ११.१८ टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत फंडाची रेग्युलर ग्रोथ एनएव्ही ५०६ वरून १५८८ वर गेल्याचे दिसून आले.

पोर्टफोलिओ रचना

फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सीकॅपने गुंतवणुकीसाठी कंपन्यांच्या निवडीमध्ये लार्जकॅप कंपन्यांना प्राधान्य दिले आहे. साधारणपणे फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ५६-५७ कंपन्यांचा समावेश असतो. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये लार्जकॅपचे प्रमाण एकूण पोर्टफोलिओच्या ७३.३० टक्के आहे. मागील दहा वर्षात अल्प कालावधीत लार्जकॅपचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा कमी झाले होते. मिडकॅपचे प्रमाण १६.०१ टक्के तर स्मॉलकॅपचे प्रमाण ५.३९ टक्के आहे. साधारण ७५ टक्के लार्जकॅप आणि २५ टक्के मिड आणि स्मॉलकॅप अशी पोर्टफोलिओची रचना राहिली आहे.

ऑक्टोबर २०२३ मधील भू-राजकीय तणावामुळे आणि त्यावेळी वेगाने वाढणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रोख्यांच्या परताव्याच्या दरातील वाढीमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेसारखे दुर्मिळ प्रसंग वगळता, फंडाने पोर्टफोलिओच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी रोख रक्कम ठेवल्याचे दिसून येते. लार्जकॅप क्षेत्रात, विशेषतः अलीकडील घसरणीनंतर, मूल्यांकन अभूतपूर्व नीचांकी पातळीवर असल्याने, पोर्टफोलिओची लार्जकॅप केंद्रित रचना फंडाला पुढील २ ते ३ वर्षात ३२ वर्षातील सर्वोत्तम चलत परतावा देण्याची अपेक्षा गुंतवणूकदार बाळगू शकतात.

फंडाची सर्वाधिक गुंतवणूक खासगी बँका (२१.७९ टक्के) वाहन निर्मिती आणि पूरक उत्पादने (९.५२ टक्के), रोकड (५.०५ टक्के), सेवा (४.९९ टक्के), किरकोळ विक्री दालने (४.८४ टक्के), अभियांत्रिकी आणि भांडवली वस्तू (४.४५ टक्के) या उद्योग क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक आहे. या व्यतिरिक्त फंडाची गुंतवणूक बांधकाम, पायाभूत सुविधा, दूरसंचार, सिमेंट आणि सिमेंट उत्पादने यांसारख्या क्षेत्रांमधील गुंतवणूक ही इतर प्रमुख उद्योगक्षेत्रे आहेत आणि बाजार व उद्योगाच्या परिस्थितीनुसार त्यात बदल केला जातो.

हा फंड प्रामुख्याने ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ला प्राधान्य देतो. पोर्टफोलिओमध्ये मिड आणि स्मॉलकॅपमधील काही ‘ग्रोथ पिक्स’चाही समावेश आहे. मिड आणि स्मॉलकॅपमध्ये निवडक उद्योग क्षेत्रांमध्ये ही संधी उपलब्ध असल्याचा फायदा निधी व्यवस्थापक उचलत आहेत. नव्याने गुंतवणुकीत समावेश केलेली शैली अभियांत्रिकी, प्लास्टिक्स आणि बँकेतर वित्तीय संस्था (एसबीएफसी), वित्त ही वानगीदाखल उदाहरणे म्हणून पाहता येतील. जिथे लार्जकॅपमधील संमभागांची उपलब्धता मर्यादित आहे. जसे की, वाहन पूरक उत्पादने, औद्योगिक उत्पादने, भांडवली वस्तू इत्यादी. हा फंड काही प्रमुख कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करतो. एकूण पोर्टफोलिओमध्ये आघाडीच्या ५ कंपन्यांमधील गुंतवणुकीचे प्रमाण २५ टक्के तर आघाडीच्या १० कंपन्यांमधील गुंतवणुकीचे प्रमाण ४१ टक्के आहे.

हा लेख लिहीपर्यंत ऑगस्ट महिन्याची म्युच्युअल फंडाची मासिक आकडेवारी उपलब्ध नव्हती. परंतु हा लेख प्रसिद्ध होईल तोपर्यंत म्युच्युअल फंडांची ऑगस्ट आकडेवारी उपलब्ध झालेली असेल. जुलैमध्ये मासिक गुंतवणूक कमी होऊन सुद्धा इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये या फ्लेक्झीकॅप गटाचा मोठा वाटा होता. जुलै महिन्यांत फ्लेक्सी-कॅप फंडांमध्ये ४,७०९ कोटी रुपये गुंतविण्यात आले. जूनमध्ये हा आकडा ५,२३१ कोटी रुपये होता.

या फंड गटात म्युच्युअल फंड खाती (फोलिओ) आणि मालमत्ता या दोन्हीमध्ये दमदार वाढ दिसून आली आहे. फ्लेक्सी-कॅप फंडांनी वार्षिक २५.७ टक्के सर्वाधिक फोलिओ वाढ नोंदवली आहे. या दमदार गुंतवणुकीमुळे गेल्या महिन्यात एकूण निव्वळ इक्विटी गुंतवणुकीत १९ टक्के आणि गेल्या १२ महिन्यांत २७ टक्के बाजारहिस्सा मिळाला आहे. ही वाढती गुंतवणूक केवळ परताव्याच्या अपेक्षेने केलेली नसून गुंतवणूकदार आता ठराविक बाजार भांडवलाऐवजी निधी व्यवस्थापकांच्या नेतृत्वाखालील गुंतवणुकीकडे असल्याचा हा पुरावा असल्याचे मानले जाते.

(हा गुंतवणूक सल्ला नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)