डॉ. अजित जोशी
कॉम्प्युटर किंवा इंटरनेट नव्हे तर डिजिटल म्हटली गेलेली प्रत्येक गोष्ट प्रोग्राम किंवा आज्ञावलीवर चालते, हे कदाचित आपल्याला माहीत असेल. ही आज्ञावली म्हणजे सूचनांचा एक संच असतो की ज्यानुसार तुम्ही त्या यंत्राला काही सांगितलं तर ते आपलं उत्तर देतं. सूचना, त्यावर प्रक्रिया आणि उत्तर या साखळीला अल्गोरिदम म्हणतात. उदाहरणार्थ, एका अल्गोरिदममधून बेरीज हा प्रोग्राम बनतो. आता कोणत्याही यंत्राला दोन आकडे दिले की, तो त्यांची बेरीज करून तिसरा आकडा देतो. मग ते २ अधिक २ असो की एखाद्या ३२ आकडी संख्येत २५ आकडी संख्या जोडायची असो. आणि हे प्रोग्रॅम कितीही गुंतागुंतीचे असू शकतात. मग चित्रफीत, ध्वनिफीत, व्हिडीओ गेम्स, माहिती, अगदी आज परवलीचा झालेले एआय तंत्रज्ञानही या मूळ रचनेवर चालते. अशा प्रोग्रामचा अफाट साठा संगणक/मोबाइल वगैरे यंत्रं आणि त्यांचे मेंदू किंवा सर्व्हर स्वतःच्या डोक्यात ठेवू शकतात. समजा, सोपानरावांनी सुभानरावांना जमीन विकली तर मूळचा सातबारा आणि नवा सातबारा या दोन्ही गोष्टी संगणकाला आपल्या स्मृतीत ठेवता येतात. अगदी एखादी २०० चौरस फुटाची खोली भरून जाईल एवढी कागदपत्रं चिमटीत मावेल एवढ्या जागेतही साठवली जाऊ शकतात.
पण ही सगळी यंत्रं (अजून तरी) मठ्ठ आहेत. समजा त्या यंत्राच्या मेंदूत, अर्थात सीपीयूमध्ये असलेल्या प्रोग्राममध्ये फेरफार करून सांगितलं की, बेरीज करताना त्यात ५ वाढव, तर तो २ अधिक २ चं उत्तर खुशाल ९ देईल. किंवा सुभानरावांऐवजी गणपतरावांचे नाव दे, असे म्हटले तर तो सातबारा बदलून टाकेल. अशा वाटेल त्या सूचना हे यंत्र चूपचाप पाळते. गोष्टी डिजिटल झाल्या की अधिक असुरक्षित होतात असे म्हणतात ते म्हणूनच.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने यावर एक उपाय काढला. समजा अशा आज्ञावलीचा एक संच एकाच नाही तर जगभरातल्या असंख्य सर्व्हरवर असेल आणि ते सगळे एकमेकांशी एका साखळीने जोडले गेलेले असतील तर? याला पीअर टू पीअर (पी२पी) नेटवर्क म्हणतात. आता एका संचात फेरफार करून चालणार नाही. कारण उरलेले सर्व संच ताबडतोब या बदलाबद्दल इशारे देतील. किंबहुना एका आज्ञावलीमध्ये कोणताच बदल कधीच करता येणार नाही. समजा, खरोखरच सुभानरावांऐवजी चुकून गणपतरावांचे नाव पडले असेल किंवा भविष्यात सुभानरावांनी ती जमीन विकली तर नवा प्रोग्राम लिहून त्यात बदल करावा लागेल. व्यवहाराचा प्रोग्राम पार पडला की त्यातून एक पावती म्हणजेच हॅश-की, कोणत्या क्षणी तो पार पडला त्याच्या टाइमस्टॅम्प सकट, निर्माण होईल जी फक्त सुभानरावांकडे असेल. ज्याच्याकडे ती आहे त्यालाच या प्रोग्रामशी संबंधित कागदपत्रांवर मालकी सांगता येईल. या तंत्रज्ञानाने डिजिटल युगात एक क्रांती घडवली. आज क्रिप्टो चलनाविषयी कितीही आक्षेप असला तरी अगदी भारतीय सरकारनेसुद्धा ब्लॉकचेनचे महत्त्व मान्य केलेले आहे आणि त्यामुळे सरकार, खासगी संस्था, उद्योगधंदे हे सारेच ब्लॉकचेन वापरण्यावर आपलं लक्ष केंद्रित करीत आहेत.
हे तंत्रज्ञान आधीपासून होते. पण आपल्या गेल्या वेळच्या लेखातल्या अज्ञात निर्मिकाने अर्थात सातोशीने यात नवी गुंतागुंत आणली. एखादा प्रोग्राम किंवा खरे तर क्रिप्टोग्राफिक कोडे सोडवले की त्यातून मिळणारी पावती म्हणजेच हॅश-की तिला त्याने नाव दिले बिटकॉइन… पण त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन त्याने एक असा अल्गोरिदम विकसित केला ज्यात एक क्रिप्टोग्राफिक कोडे सोडवले की आपोआप त्यातून पुढचे निर्माण होईल. हा अल्गोरिदम झाला नव्या युगातली डिजिटल सोन्याची खाण! बिटकॉइन मिळवण्यासाठी त्यातील प्रत्येक कोडे सोडवणे म्हणजे मायनिंग. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बिटकॉइनचा हा पुरवठा अगणित नाही. आणि प्रत्येक कोड्यातून मिळणाऱ्या बिटकॉइनची संख्या अर्धी होत जाते. एकूण मिळून २१ मिलियन किंवा दोन कोटी दहा लाख बिटकॉइन निर्माण झाली की हा अल्गोरिदम थांबणार. अर्थात एवढ्या मोलाचे असणारे बिटकॉइन ज्यात निर्माण होईल ते खूप कठीण नसले तरी विलक्षण गुंतागुंतीचे असणार हे स्वाभाविकच आहे. किंबहुना आपल्याला तो आपल्या नेहमीच्या कॉम्प्युटरवर सोडवतासुद्धा येत नाही. त्याकरिता विशेष क्षमता असलेली गणनयंत्र आवश्यक असतात. जी पाच लाख रुपयांच्या आसपास मिळतात आणि एक मशीन २ दिवसांत इतकी वीज खाते, जितकी एक सामान्य कुटुंब पूर्ण महिनाभर वापरते.
प्रश्न असा आहे की, आता यामुळे चलनाचे प्रश्न कसे सुटतात? मौल्यवान वस्तू हे जर चलन असेल, उदाहरणार्थ सोने, तर त्याच्या विभाजनाचा प्रश्न निर्माण होतो. पण आज तुम्ही हजार रुपयाचेसुद्धा बिटकॉइन घेऊ शकता, कारण एका बिटकॉइनची किंमत ९५ हजार अमेरिकी डॉलर असली तरी या संख्येच्या अनेक दशांशापर्यंत आपल्याला सहज जाता येते. शिवाय सोन्याप्रमाणे त्याचा दुसरा कुठलाही उपयोग नाही, त्यामुळे त्याचे मूल्य हे फक्त वापरकर्त्यांकडे असलेल्या संपत्ती, वस्तू आणि सेवा यांच्या प्रमाणातच बदलू शकतं. सोन्यावर आधारित चलन छापले तर छापणारी यंत्रणा अर्थात सरकारकडे खरेच तेवढे सोने आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. इथे मात्र किती बिटकॉइन अर्थव्यवस्थेत उपलब्ध आहेत हे खुलेआम पाहता येते. आणि जर कोणत्याही भौतिक वस्तूव्यतिरिक्त चलन छापले जात असेल – जे आज अर्थव्यवस्थेत सर्वत्र घडते – तर ते छापणारी यंत्रणा कशाच्या आधारावर ते छापते आहे आणि कोणाला ते उपलब्ध करून देते आहे हे कधीच कळू शकत नाही. ज्याचा ऊहापोह आपण गेल्या लेखात केला. बिटकॉइन मात्र अमर्याद नाही. आज किती उपलब्ध आहे (जवळपास दोन कोटी) आणि किती अजून उपलब्ध होणार आहे (आता दहा लाखांच्या आसपास उरली आहेत) हे आपल्याला स्पष्टपणे माहीत आहे. आता हे सर्व गुणधर्म जर असतील तर देवाणघेवाण करण्यासाठी बिटकॉइन सर्वमान्य का होणार नाही? म्हणजेच चलनासाठी मान्यता हा गुणधर्म त्याला आपोआप प्राप्त होतो. किंबहुना दहा हजार बिटकॉइनला दोन पिझ्झा ते ९५ हजार डॉलरला एक बिटकॉइन हा प्रवासच हे दाखवून देतो की त्याला व्यापक मान्यता आहे.
या आठवड्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला क्रिप्टोमधला नकारात्मकतेचा कल सुरूच राहिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जरी क्रिप्टोचे मोठे समर्थक असले तरी टॅरीफबद्दलच्या त्यांच्या धोरणामुळे जी अनिश्चितता निर्माण होते त्याचा फटका या गुंतवणुकीला बसला आहे. बिटकॉइनमधल्या पाच- सहा टक्के, यापासून ते इतर काही चलनांमध्ये दहा-बारा टक्क्यांपर्यंत घट झाली. सोन्या-चांदीसारखे भौतिक मौल्यवान धातू चढ्या किमतीला असताना क्रिप्टोने मात्र पुन्हा फटका खाल्ला. मात्र क्रिप्टोमध्ये अशा स्वरूपाचे हेलकावे हे काही तसे नवे नाहीत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट वेगळीच आहे. कोणत्याही गुंतवणुकीत संस्थात्मक म्हणजे इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदार यायला लागले, तर ती सकारात्मक गोष्ट धरली जाते. या आठवड्यात अमेरिकी अब्जाधीश माईक नोव्होग्रात्झ याने दहा कोटी डॉलरचा एक क्रिप्टोमधला निधी बाजारात आणण्याची घोषणा केली. दुसरीकडे गेल्या काही काळातल्या घसरलेल्या किमती लक्षात घेता अजून एक अब्जाधीश मायकेल सेलर याने सुमारे २१३ कोटी डॉलर मूल्याची बिटकॉइन विकत घेतली. किंबहुना या आठवड्यात एकूण क्रिप्टोमध्ये झालेली संस्थात्मक गुंतवणूक गेल्या वर्षभरातल्या कित्येक आठवड्यांपेक्षा सर्वाधिक आहे.
थोडक्यात, अभ्यास करून आणि मोठ्या ताकदीने बाजारात उतरणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्याच्या घसरत्या किमती गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत, असे दिसते.
बिटकॉइनसारख्या इतर चलनांचा कारभार कसा चालतो? त्यांच्या किमती कशामुळे वरखाली होत असतात? शेअर्सच्या बाबतीत जर गुणोत्तरांच्या आधारावर किमती ठरत असतील तर क्रिप्टोसाठी कशाचा अभ्यास करावा? असे अनेक प्रश्न येत्या काळात आपण पाहणार आहोत. पण ही भरघोस संस्थात्मक गुंतवणूक दाखवून देते की, मालमत्तेचा हा प्रकार येत्या काळात लक्षणीय असणार आहे.
(लेखक एका व्यवस्थापन संस्थेमध्ये वित्त विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत, ई-मेल: ajitatresearch@gmail.com)
