scorecardresearch

पैसारूपी तिसरे अपत्य

कमावत्या वयात पैशाची पोटच्या मुलाप्रमाणे काळजी आणि संगोपन केल्यास, निवृत्तीपश्चात आर्थिक स्वावलंबन देणारा तो काठीचा आधार निश्चितच ठरेल…

पैसारूपी तिसरे अपत्य
पैसारूपी तिसरे अपत्य ( photo courtesy – financial express )

आजकाल सुशिक्षित समाजात मर्यादित उत्पन्न विचारात घेता कुटुंब सुद्धा मर्यादित ठेवण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल दिसून येतो परिणामी कुटुंबात एक किंवा दोनच मुले असल्याचे दिसून येते आणि या मुलांची जास्तीत जास्त काळजी घेऊन त्यांना शक्य तेवढ्या सुविधा देण्याकडे पालकांचा प्रयत्न असतो. तथापि पोटच्या मुलामुलींप्रमाणे आपल्याला आणखी एक अपत्य असल्याची आणि त्याचीही काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव असणारे पालक अभावानेच दिसून येतात.

हे तिसरे अपत्य म्हणजे आपल्याकडे असणारा पैसा. या अपत्याचीसुद्धा मुलांप्रमाणेच जास्तीत जास्त काळजी घेऊन त्याचे योग्य संगोपन करून त्यात वाढ घडवून आणणे गरजेचे असते. विशेष म्हणजे मुले मोठी झाल्यावर आपल्या नोकरी-व्यवसायामुळे आपल्या सोबत राहतीलच असे नाही आणि आपणही पालक म्हणून त्यांच्या प्रगतीच्या आड न येता त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ देणेच योग्य असते. मात्र आपले पैसा हे जे तिसरे अपत्य आहे त्याची आपण वेळोवेळी आवश्यक ती काळजी घेऊन संगोपन केले तर त्यात वृद्धी तर होईलच शिवाय हे अपत्य आपल्या सेवानिवृत्तीनंतर आपली निश्चितच काळजी घेईल.

या अपत्याची नेमकी काळजी कशी घ्यायची हे आता आपण पाहू.

१. निवृत्त-जीवनासाठी किती तरतूद हवी :

समजा, आज तुमचे वय ३० वर्षे आहे. वयाच्या ६० व्या वर्षी नोकरी/व्यवसायातून तुम्ही निवृत्त होणार आहात असे गृहीत धरल्यास, सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर आजपासूनच आपल्या तिसऱ्या अपत्याचे आपल्या मुलांसोबतच संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपल्याकडे किती निवृत्ती कोष (रिटायरमेंट कॉर्पस) असणे आवश्यक आहे याचा अभ्यास करून त्यानुसार आवश्यक ती गुंतवणूक नियमित करण्यास शक्य तितक्या लवकर सुरुवात करावी. उदाहरणार्थ, सध्या कुटुंबाच्या दरमहा खर्चासाठी ५०,००० रुपये लागत असतील तर साधारण एवढ्याच त्या वेळच्या रकमेची (जरी मुलांसाठीचे काही खर्च कमी झाले तरी वैद्यकीय खर्च या वयात वाढतात) गरज असणार आहे. सेवानिवृत्तीनंतर (म्हणजेच ३० वर्षांनी) आजच्या ५०,००० रुपयांची गरज भागविण्यासाठी त्या वेळचे सुमारे अडीच लाख रुपये दरमहा मिळणे आवश्यक ठरेल. तर त्यापुढे आणखी २० वर्षे हयात (वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत) असाल असे गृहीत धरल्यास या रकमेतही महागाई दरानुसार वाढ होणार आहे. या ठिकाणी भविष्यातील महागाई ५.५ ते ६ टक्के दराने वाढणार आहे असे गृहीत धरले आहे. त्या दृष्टीने ६० व्या वर्षी आपल्याकडे सुमारे ५ कोटी रुपये एवढा निवृत्ती कोष तयार असणे आवश्यक आहे.

२. गुंतवणुकीला लवकर सुरुवात व सातत्य आवश्यक :

असे असले तरी जर भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ सरासरी २०,००० रुपये दरमहा पुढील ३० वर्षे जमा होणार असेल, तर सेवानिवृत्तीच्या वेळी सुमारे ३ कोटी रुपये त्यायोगे मिळतील. म्हणजे आपल्याला उर्वरित दोन कोटी रुपयांचीच तरतूद करावयाची आहे. ही तरतूद दरमहा पुढील ३० वर्षे केवळ ७,००० रुपये ते ९,००० रुपये नियमित गुंतवणूक करून सहजगत्या करता येईल. अशी गुंतवणूक पीपीएफ, एनपीएस, तसेच इक्विटी म्युच्युअल फंडात दरमहा आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार करावी.

३. विम्याचे कवच गरजेचेच :

या नियोजनात काही कारणाने व्यत्यय आला तर तरतूद करणे आवश्यक असते. यासाठी शक्य तितक्या लवकर मुदतीचा जीवन विमा अर्थात टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी. आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ पट भरेल इतके कवच असलेली टर्म पॉलिसी घ्यावी. सोबतच सुरुवातीस तीन लाखांचे कवच असणारी आरोग्य विमा (मेडिक्लेम) पॉलिसी घ्यावी. पुढे दर पाच वर्षांनी एक लाखानी तिचे कवच वाढवत न्यावे किंवा टॉप-अप पॉलिसी घ्यावी.

४. इच्छापत्र :

शिवाय आपले आर्थिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने ही रक्कम पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असणे आवश्यक आहे. मात्र आपल्या पश्चात आपल्या मर्जीनुसार वाटप व्हावे यासाठी वेळीच ‘विल’ (इच्छापत्र) तयार करून घ्यावे.

अशा रीतीने आपल्या तिसऱ्या अपत्याचे संगोपन केल्यास सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहून आपल्याला सेवानिवृत्तीचा आनंद स्वेच्छेने उपभोगता येईल.

सुधाकर कुलकर्णी

(लेखक पुणेस्थित सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर)

मराठीतील सर्व मनी-मंत्र ( Personal-finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 11:21 IST

संबंधित बातम्या