आपण आतापर्यंत वायदे बाजाराबद्दलच्या सर्व महत्त्वाच्या संकल्पनांची माहिती घेतली. आता आपण प्रत्यक्षात व्यवहार कसे पार पडतात, व्यवहार करताना प्रत्यक्ष वापरात येणाऱ्या संकल्पना समजून घेणार आहोत. त्यातील सर्व प्रथम ऑप्शनमध्ये व्यवहार करताना नेमके कोटेशन अर्थात भावफलक काय असते ते जाणून घेऊया.
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ‘कोटेशन’ समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यात एखाद्या विशिष्ट कंपनीच्या समभागांविषयी (स्टॉक) किंवा निर्देशांकाच्या (इंडेक्स) ‘ऑप्शन प्रीमियम’ची किंमत आणि त्यासोबतची इतर माहिती दिली असते. जेव्हा एखाद्या ‘ट्रेडिंग’ मंचावर एखादा ऑप्शन बघतो, तेव्हा खालील महत्त्वाचे घटक दिसतात:
१. ऑप्शन कॉन्ट्रॅक्टचे घटक
कोणतेही ‘कोटेशन’ हे चार मुख्य गोष्टींनी बनलेले असते:
अंडरलाईंग (Underlying): ज्या कंपनीच्या समभागात किंवा निर्देशांकाचा तो ऑप्शन आहे (उदा. Reliance, NIFTY, BANKNIFTY.).
एक्सपायरी डेट (Expiry Date): करार ज्यावेळी संपुष्टात येणार आहे, तो महिना आणि वर्षाचा उल्लेख त्यात केला असतो.
स्ट्राईक प्राईस (Strike Price): ज्या ठराविक किमतीवर तो खरेदी किंवा विक्री करण्याचा हक्क मिळवला आहे ती किंमत
ऑप्शन प्रकार (Option Type): भारतीय शेअर बाजारात ‘युरोपियन ऑप्शन’पद्धत वापरली जाते. म्हणजेच Call (CE) आणि Put (PE). यात E म्हणजे युरोपियन पद्धत दर्शवतो.
आता प्रत्यक्ष उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊया
NIFTY २३५०० May २०२६ CE/PE = १५०/Unit
याचा अर्थ काय?
NIFTY: हा कोणता निर्देशांक आहे ते दर्शवतो.
May २०२६: कोणत्या महिन्यात करार संपुष्टात येणार आहे, ते यावरून कळते.
२३५००: स्ट्राईक प्राईस (Strike Price) म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ही ती ठराविक किंमत असते, ज्या किमतीवर ऑप्शन खरेदी करणारा (बायर) भविष्यात शेअर किंवा निर्देशांक खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा अधिकार प्राप्त करतो. ही ठराविक किंमत करार करतानाच निश्चित असते. बाजारभाव कितीही वर किंवा खाली गेला, तरी ‘ऑप्शन होल्डर’ला त्याच ‘स्ट्राईक प्राईस’वर व्यवहार करण्याचा हक्क असतो. नफा किंवा तोटा हा ‘मार्केट प्राईस’ आणि ‘स्ट्राईक प्राईस’मधील फरकावर अवलंबून असतो. ऑप्शन ट्रेडिंग करताना विविध ‘स्ट्राईक प्राईस’ उपलब्ध असतात (उदा. २३५००, २३६००, २३७००).
CE/PE (Call Option/Put Option): CE अर्थात ‘कॉल ऑप्शन’ म्हणजे खरेदी करण्याचा अधिकार तर PE म्हणजेच ‘पुट ऑप्शन’ म्हणजे विक्री करण्याचा अधिकार.
१५०: हा ‘प्रीमियम’ दर्शवला आहे. ऑप्शन व्यवहार हे नेहमी ‘लॉट’मध्ये (Lot) खरेदी करावे लागतात. निफ्टीचा लॉट ६५ चा असेल, तर तुम्हाला १५० रुपये गुणिले ६५ = ९,७५० रुपये प्रीमियम द्यावा लागेल.

‘ऑप्शन कोटेशन’मध्ये पुढील गोष्टींचा समावेश असतो:
१. बिड प्राईस (Bid Price)
खरेदीदार ज्या किमतीला ऑप्शन विकत घेण्यास तयार आहे, त्याला ‘बिड’ म्हणतात. जर ऑप्शन विकायचा असेल, तर ही किंमत मिळेल.
Bid (खरेदी किंमत): खरेदीदार जास्तीत जास्त जी किंमत द्यायला तयार असतो ती म्हणजे ‘बिड प्राईस’
२. आस्क प्राईस (Ask Price)
विक्रेता ज्या किमतीला ऑप्शन विकण्यास तयार आहे, त्याला ‘आस्क’ म्हणतात. जर नवीन ऑप्शन खरेदी करायचा असेल, तर ही किंमत मोजावी लागेल.
Ask (विक्री किंमत): विक्रेता कमीत कमी ज्या किमतीला विकायला तयार असतो ती म्हणजे ‘आस्क प्राईस’. ‘बिड’ आणि ‘आस्क’मधील फरकाला ‘स्प्रेड’ (Spread) म्हणतात. हा फरक जितका कमी, तितकी त्या ऑप्शनमध्ये ‘लिक्विडिटी’ अधिक असण्याची शक्यता असते.
