जीई वर्नोवा टी अँड डी लिमिटेड (बीएसई कोड: ५२२२७५)
संकेतस्थळ: http://www.gevernova.com/regions/asia/in/gevernova-td-india
प्रवर्तक: ग्रिड ईक्विपमेंट प्रायव्हेट लि.
बाजारभाव: रु. ४,१९४/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: पॉवर ट्रान्समिशन आणि वितरण
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ५१.२१ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५१.००
परदेशी गुंतवणूकदार २२.८९
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १८.४६
इतर/ जनता ७.६५
पुस्तकी मूल्य: रु. १०५
दर्शनी मूल्य: रु. २/- गतवर्षीचा लाभांश: ५००%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ५२.८
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ८०.३
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३३.७
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०१
इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ११८
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (ROCE): ७७.४
बीटा : ०.९
बाजार भांडवल: रु. १,०८,४१७ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ५६५०/२५२५
गुंतवणूक कालावधी : ३६ महिने
जीई टी अँड डी ही भारतातील जीई वर्नोवा समूहाच्या ग्रिड सोल्युशन व्यवसायाची कंपनी आहे. कंपनी १०० वर्षांहून अधिक काळापासून वीज पारेषण आणि वितरण क्षेत्रात कार्यरत आहे. वीज निर्मिती केंद्रांपासून ग्रिडपर्यंत वीज जोडणे आणि ती वाहून नेणे यासाठी कंपनी विविध प्रकारच्या उपाययोजना पुरवते. जीई वर्नोवा ही एक जागतिक ऊर्जा कंपनी असून त्यात पॉवर, विंड आणि इलेक्ट्रिफिकेशन या विभागांचा समावेश आहे. जीई वर्नोवाचे मुख्यालय केंब्रिज, मॅसॅच्युसेट्स (अमेरिका) येथे असून १०० हून अधिक देशांमध्ये त्यांचे ८५,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
उत्पादने आणि सेवा
कंपनी वीज पारेषण (ट्रान्समिशन) आणि वितरण व्यवसायात कार्यरत आहे. वीज निर्मिती स्रोतांपासून ग्रिडपर्यंत वीज जोडणे आणि ती वाहून नेणे यासाठी कंपनी विविध उपाययोजना पुरवते. तसेच, कंपनी पॉवर ट्रान्सफॉर्मर्स, सर्किट ब्रेकर्स, गॅस-इन्सुलेटेड स्विचगिअर, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर्स, सबस्टेशन ऑटोमेशन, डिजिटल सॉफ्टवेअर सोल्युशन्स, टर्नकी सबस्टेशन सोल्युशन्स, सीटीएस, एचव्हीडीसी आणि देखभाल यांसारखी उत्पादने व सेवा देते.
भौगोलिक विभागणी
आर्थिक वर्ष २०२६
देशांतर्गत: ६७% ; निर्यात: ३३%
कंपनी ६० हून अधिक देशांमध्ये निर्यात करते तसेच आशिया, मध्य पूर्व व युरोपमधील अतिरिक्त बाजारपेठांमध्ये आपला विस्तार करण्याची योजना आखत आहे.
ग्राहक वर्ग: एनटीपीसी, अदानी ट्रान्समिशन, हिंडाल्को, टाटा पॉवर, बीएचईएल, इंडिग्रिड, ॲमेझॉन, पॉवरग्रिड, एनएचपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील इत्यादी.
कार्यादेश (प्रलंबित ऑर्डर्सचा साठा)
आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत, कंपनीकडे एकूण २१४५५ कोटी रुपयांचे कार्यादेश होते (आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हा आकडा १२,६५७ कोटी रुपये होता). आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १४,७७६ कोटी रुपयांचे नवीन कार्यादेश मिळाले. जून २०२६ पर्यंत कंपनीचे कार्यादेश अर्थात ऑर्डर बुक २०,९३० कोटींव आले आहे.
प्रलंबित कार्यादेश: आर्थिक वर्ष २०२६
खासगी क्षेत्र: ७६%
केंद्रीय युटिलिटीज आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम : २२%
राज्य युटिलिटीज: २%
उत्पादन क्षमता
कंपनीचे वडोदरा, होसूर, पडप्पई, पल्लवरम आणि नोएडा येथे एकूण ५ उत्पादन प्रकल्प आहेत.
भांडवली खर्च
कंपनी वडोदरा येथे ट्रान्सफॉर्मर आणि रिअॅक्टरची क्षमता सुमारे ५० टक्क्याने वाढवण्याची, होसूर येथे एआयएस क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढवण्याची, बुशिंग्ज आणि एसीआरसाठी नवीन उत्पादनलाइन सुरू करत असून आणि पडप्पई येथे सुमारे २५ टक्के क्षमता वाढवण्याची योजना आखत आहे. या विस्तारांसाठी एकूण सुमारे ८१० कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे, जो डिसेंबर २०२८ पर्यंत टप्प्याटप्प्याने केला जाईल. याव्यतिरिक्त, कंपनी पल्लवरम येथे एचव्हीडीसी व्हॉल्व्ह आणि व्हीएससी स्टॅटकॉम व्हॉल्व्हसाठी नवीन उत्पादन लाइन, तसेच नोएडा येथे सिस्टम डिझाइन, नवीन अभियांत्रिकी आणि चाचणी प्रयोगशाळा उभारण्याची योजना आखत आहे. यासाठी १४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल आणि हे काम २०२७ च्या सुरुवातीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
तसेच, कंपनी वल्लम येथे नवीन प्रकल्प उभारत असून यासाठी सुमारे ६० कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे, हे काम डिसेंबर २०२६ पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाईल. एकंदरीत, सर्व ठिकाणांवरील क्षमता विस्तारासाठी एकूण नवीन गुंतवणूक सुमारे १,००० कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष २०२७ साठी, व्यवस्थापनाने २० टक्क्यांच्या मधल्या श्रेणीती मार्जिनचा अंदाज वर्तवला असून, ७,००० कोटी रुपयांच्या मूळ कार्यादेश मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
जून २०२६ साठी कंपनीने अपेक्षित कामगिरी करून दाखवली होती. या पहिल्या तिमाहीत कंपनीने उलाढालीत ३८ टक्क्यांनी वाढ दाखवून ती १,८३६ कोटी रुपयांवर गेली आहे तर नक्त नफ्यात २५ टक्क्याने वाढ होऊन तो ३६३ कोटींवर गेला आहे. कंपनीचे सप्टेंबर २०२६ साठी संपलेल्या तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर होतील.
अनुभवी बहुराष्ट्रीय प्रवर्तक, मोठे कार्यादेश आणि कुठलेही कर्ज नसलेली जीई वर्नोवा तुमच्या पोर्टफोलियोला या मंदीच्या काळात आधार देऊ शकेल. सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
(अजय वाळिंबे: stocksandwealth@gmail.com)
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.
हा गुंतवणूक सल्ला नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
