-समीर शेट्टी

भारतातील ‘जेन झी’ ही अशी पहिली पिढी आहे, जिचे पैशांशी नाते मोठ्या प्रमाणावर डिजिटल अनुभवातून घडले आहे. बँक खाते काही मिनिटांत उघडता येते, पैसे क्षणार्धात पाठवता येतात, काही टॅप्समध्ये गुंतवणुकीला सुरुवात करता येते आणि गरज पडताच कर्जही उपलब्ध होते. एकेकाळी कागदपत्रे, बँकेच्या शाखांना भेटी आणि प्रदीर्घ प्रतीक्षा यांची गरज भासणाऱ्या वित्तीय सेवा आता दैनंदिन डिजिटल जीवनाचा सहज भाग झाल्या आहेत.

भारताच्या आर्थिक प्रवासातील ही अत्यंत महत्त्वाची परिवर्तनकथा आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, किरकोळ डिजिटल व्यवहारांची संख्या आर्थिक वर्ष २०१२-१३ मधील १६२ कोटींवरून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २२,१६७ कोटींहून अधिक झाली आहे. २०२४ मध्ये जगातील रिअल-टाइम पेमेंट व्यवहारांपैकी जवळपास ४९ टक्के व्यवहार भारतात झाले. देशातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या यशाचे हे मोठे उदाहरण आहे.

पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत जेन झी अशा काळात मोठी झाली आहे, जेव्हा बँकिंगच्या भौतिक अडथळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. आर्थिक व्यवहार अधिक सहज, वेगवान आणि मागणीनुसार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आजचे आव्हान केवळ आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याचे राहिलेले नाही; त्या उपलब्धतेचा योग्य वापर करण्यासाठी आवश्यक असलेली निर्णयक्षमता विकसित करण्याचे आहे.

पेमेंट, कर्ज आणि गुंतवणूक काही टॅप्सच्या अंतरावर असताना आर्थिक यश हे किती सहज व्यवहार करता येतात यापेक्षा किती माहितीपूर्ण आणि योग्य निर्णय घेतले जातात यावर अधिक अवलंबून राहणार आहे.

पैसा ‘अदृश्य’ होत असताना निर्णयक्षमता महत्त्वाची

पूर्वीच्या पिढ्यांचा पैशांशी संबंध वेगळा होता. रोख रक्कम हातातून जाताना खर्चाची जाणीव अधिक तीव्र होत असे. एखादी वस्तू खरेदी करताना पैसा प्रत्यक्ष खर्च होत असल्याची जाणीव होत असे आणि इच्छा व प्रत्यक्ष खर्च यांच्यामध्ये विचार करण्यासाठी काही वेळही मिळत असे.

आजचे आर्थिक व्यवहार मात्र यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. पेमेंट क्षणार्धात होते, विविध सबस्क्रिप्शनची रक्कम पार्श्वभूमीवर आपोआप वजा होत राहते, काही सेकंदांत गुंतवणूक करता येते आणि कर्जही पूर्वीपेक्षा सहज उपलब्ध झाले आहे. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी विचार करण्यासाठी असलेले अनेक ‘अडथळे’ डिजिटल व्यवस्थेने दूर केले आहेत.

जेन झीसाठी आर्थिक निर्णयांची सुरुवात आणि शेवट अनेकदा स्मार्टफोनवरच होतो. पेमेंट, गुंतवणूक, बचत आणि कर्ज या सर्व सेवा मागणीनुसार उपलब्ध आहेत. भारतातील ब्रॉडबँड जोडण्यांची संख्या एक अब्जांहून अधिक झाली आहे. त्यामुळे आर्थिक सेवांपर्यंत पोहोच आता व्यापक झाली आहे. प्रश्न हा आहे की या सहज उपलब्धतेचा ग्राहक सातत्याने आणि जबाबदारीने कसा वापर करतो?

फसवणूक ओळखणे आर्थिक कौशल्याचीच बाब

डिजिटल सहभाग वाढत असताना आर्थिक फसवणुकीचे प्रकारही अधिक क्लिष्ट होत आहेत. आजच्या अनेक फसवणुका तंत्रज्ञानातील त्रुटींचा फायदा घेण्यापेक्षा मानवी वर्तनातील कमकुवतपणाचा फायदा घेतात. घाई निर्माण करणे, विश्वासार्ह संस्थांची हुबेहूब नक्कल करणे किंवा विचार करण्यापूर्वी तातडीने निर्णय घेण्यास भाग पाडणे, अशा पद्धतींचा त्यात वापर केला जातो. यातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. वित्तीय सेवा अधिकाधिक डिजिटल होत असताना सुरक्षितता ही केवळ बँकांच्या तांत्रिक सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी राहिलेली नाही. दररोज घेतले जाणारे ग्राहकांचे निर्णयही तितकेच महत्त्वाचे आहेत.

याची जाणीव ठेवून बँका ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर अधिक नियंत्रण ठेवता यावे यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत. व्यवहारांची मर्यादा निश्चित करणे, कार्डचा वापर नियंत्रित करणे, तात्काळ सूचना मिळवणे आणि खात्यातील व्यवहारांवर लक्ष ठेवणे यांसारख्या सुविधांमुळे ग्राहकांना डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षितपणे वापरता येते.

यामागचा उद्देश केवळ बँकिंग अधिक सोयीचे करणे हा नाही. डिजिटल आर्थिक व्यवस्थेत ग्राहकाला अधिक आत्मविश्वासाने आणि अधिक नियंत्रणासह वावरता यावे, हाही त्यामागचा महत्त्वाचा हेतू आहे.

जेन झीसाठी ‘कधी थांबायचे’ हे शिकणे कदाचित ‘व्यवहार कसा करायचा’ हे शिकण्याइतकेच महत्त्वाचे ठरणार आहे. एखादी विनंती खरी आहे का, एखादी लिंक सुरक्षित आहे का किंवा अनपेक्षित संदेश खरोखरच संबंधित संस्थेकडून आला आहे का, हे तपासण्यासाठी काही क्षण थांबणेही मोठा धोका टाळू शकते.

डिजिटल जगात आत्मविश्वास म्हणजे केवळ तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता नव्हे; ते तंत्रज्ञान विवेकबुद्धीने वापरण्याची क्षमता होय. सर्वात सक्षम ग्राहक तो नाही जो सर्वाधिक वेगाने व्यवहार करतो. डिजिटल बँकिंगच्या सोयीचा लाभ घेताना योग्य निर्णय घेणारा ग्राहकच खऱ्या अर्थाने सक्षम ठरतो.

बँकिंगचा पुढचा टप्पा कोणता?

डिजिटल बँकिंगचा पहिला टप्पा आर्थिक सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा होता. दुसऱ्या टप्प्यात व्यवहार अधिक वेगवान, सोपे आणि सुलभ करण्यावर भर देण्यात आला. आता पुढचा टप्पा ग्राहकांना अधिक चांगले आर्थिक निर्णय घेण्यास मदत करण्याचा असेल. डेटा, विश्लेषण आणि डिजिटल साधने अधिक प्रगत होत असताना वित्तीय संस्थांना ग्राहकांच्या खर्चाच्या सवयी समजून घेणे, संभाव्य जोखीम ओळखणे आणि अधिक माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास मदत करणे शक्य होईल. यापुढे यशाचे मोजमाप केवळ लोक किती व्यवहार करतात यावर होणार नाही. ते किती प्रभावीपणे बचत करतात, कर्ज घेतात, गुंतवणूक करतात आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य निर्माण करतात, यावरही होईल.

या बदलाचे महत्त्व मोठे आहे. भारतात ५० कोटींपेक्षा अधिक जेन झी ग्राहक आहेत. जगातील सर्वांत मोठा जेन झी वर्ग भारतात आहे. ही पिढी आता आपल्या कमाईच्या आणि नेतृत्वाच्या महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. त्यामुळे तिचे आर्थिक निर्णय केवळ तिच्या वैयक्तिक भवितव्यावर परिणाम करणार नाहीत, तर भारताच्या आर्थिक भवितव्यावरही त्यांचा मोठा प्रभाव असेल.

प्रत्येक पिढीसमोर आर्थिक क्षेत्रात एक महत्त्वाचे आव्हान राहिले आहे. मागील पिढ्यांसाठी ते औपचारिक बँकिंग व्यवस्थेपर्यंत पोहोच मिळवण्याचे होते. जेन झीसाठीचे आव्हान मात्र उपलब्धतेच्या या मुबलकतेतून योग्य पर्याय निवडण्याचे असू शकते.

डिजिटल युगाचा विरोधाभास हाच आहे की, आर्थिक सेवा जितक्या सहज उपलब्ध होत जातील, तितकी निर्णयक्षमता अधिक महत्त्वाची होत जाईल. तंत्रज्ञानापर्यंत पोहोच मिळणे हा खरा फायदा नाही; त्या तंत्रज्ञानाचा उद्देशपूर्ण आणि विवेकपूर्ण वापर करण्याची क्षमता हाच खरा फायदा आहे. ही बाब ज्या देशांना, वित्तीय संस्थांना आणि व्यक्तींना लवकर समजेल, तेच डिजिटल संधीचे रूपांतर दीर्घकालीन आर्थिक समृद्धीत अधिक प्रभावीपणे करू शकतील.

(लेखक ॲक्सिस बँकेच्या डिजिटल बिझनेस अँड ट्रान्सफॉर्मेशन आणि स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्सचे ग्रुप हेड आहेत.)