कौस्तुभ जोशी
बचत म्हणजे उत्पन्न वजा खर्च. आजवर रुळलेले हे समीकरण आहे. ते बदलून, आता खर्च होऊन काही उरले तर ती बचत अशी वृत्ती बनली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या अतिरिक्त खर्चाला आवर घालावा लागणे, हे तिशीतील तरुणांपुढील पहिले कठीण आव्हान आहे.
गुंतवणूकविषयक नियोजन करताना वयाची साठी ओलांडल्यानंतरचे, म्हणजेच सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन महत्त्वाचे? की ते मध्यम वयाच्या जोडप्यांसाठी अधिक महत्त्वाचे? हा प्रश्न नेहमीच निर्माण होतो. संसाराच्या जबाबदाऱ्या पेलताना वयाच्या चाळिशीकडे नवरा-बायको दोघेही झुकू लागतात आणि हाताशी असलेले पैसे शिल्लकच राहत नाहीत याची जाणीव अधिक वेदनादायी असते. कधीतरी पन्नाशीच्या आसपास डोक्यावरचे गृह कर्जाचे हप्ते कमी झाले आणि ऑफिसमधील किंवा बिझनेसमधील प्रगतीनुसार उत्पन्न वाढले की सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन करण्यास सुरुवात केली जाते. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांचा हा सर्वसाधारणपणे अनुभवास येणारा पॅटर्न आहे! त्यात चांगले किंवा वाईट असे काही नसून आहे ते वास्तव स्वीकारून पुढे जाणे हा मुद्दा आहे.
आज पन्नाशीच्या आसपास असलेल्या पिढीने ज्याप्रमाणे निवृत्ती नियोजन केले त्याप्रमाणे आताच्या तिशीतील पिढीला करता येणार नाही, म्हणूनच नव्या जमान्याचे गुंतवणूक नियोजन कसे असावे हे समजून घेण्यासाठी आणि थोडे शिस्तीचे बाळकडू पाजण्यासाठी हा लेखप्रपंच…
जेन झी आणि गुंतवणूक नियोजन
भारतामध्ये ढोबळमानाने विचार करायचा झाल्यास १९९० नंतर जन्माला आलेले व त्याआधी जन्माला आलेले यांच्या राहणीमानात खूपच मोठ्या प्रमाणावर तफावत जाणवते. १९९१ या वर्षात घडून आलेल्या उदारीकरणामुळे अर्थव्यवस्थेत नवा प्राण फुंकला गेला. शेती आणि उद्योग याच्या बरोबरीने कधीकाळी कुठेतरी अडगळीत पडलेले सेवा क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, बँकिंग हे एकाएकी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा मुख्य कणा बनले. मध्य आणि उच्च मध्यमवर्गीय याच्या व्याख्या बदलू लागल्या. कारण त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. पूर्वी अधिक श्रम करणाऱ्याला अधिक पैसे ही श्रमप्रधान संस्कृतीची व्याख्या अधिक सैल झाली.
. ऋण काढून सण साजरे
कौशल्य आणि संधी यांच्या एकत्रीकरणातून हातात येणाऱ्या उत्पन्नाचा प्रवाह चांगलाच वाढला. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरातील अक्षरशः लाखोंच्या संख्येने तरुणांना परदेशात बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या. हाती पैसा खेळू लागला. उदारीकरणामुळे जसजशी अर्थव्यवस्था खुली होऊ लागली तसतशी पाश्चात्त्य बाजारपेठेची ओळख आपल्या बाजाराला होऊ लागली. आयातीवरचे निर्बंध कमी झाले आणि चैनीच्या, सुखवस्तू, आयुष्य उपभोगू देणाऱ्या वस्तू विकत घेणे शक्य झाले. ऋण काढून सण साजरे करू नका असा संदेश ज्या पिढीने खड्या आवाजात दिला त्यांच्याच घरात फायनान्स कंपन्या आणि बँका यांच्या मेहरबानीने मिळालेले ईएमआय उपभोगून फोन, वॉशिंग मशीन, टीव्ही इतकेच काय क्वचित प्रसंगी लग्नानंतर मधुचंद्राला जाण्यासाठी पैसे कमी पडतात म्हणून पर्सनल लोन घेण्याची सवय लागली. ज्याच्याकडे आधुनिक गॅजेट्स तोच अधिक पुढारलेला असा समज दृढ होऊ लागला. त्यामुळे जगण्यातील पैशाचा अर्थ आणि महत्त्व दोन्ही बदलू लागले.
जेन झीची वैशिष्ट्ये कोणती?
वर उल्लेखलेल्या उदारीकरणाच्या पर्वात म्हणजेच प्रगतिशील भारताच्या काळात ज्यांचा जन्म झाला त्यांना म्हणजेच १९९७ ते २०१२ या वर्षात जन्माला आले त्यांना जेन झी असे म्हणायचा प्रघात आहे.
या पिढीचे वर्तन आणि वैशिष्ट्ये कोणती?
आपल्याला एखाद्या वस्तूची गरज असेल त्यावेळी ती आपल्याला मिळणार नाही म्हणजेच आपल्याकडे पैसे नसतील किंवा सध्या ते दुसऱ्या कोणत्यातरी कामासाठी वापरायचे असतील, म्हणून आपल्याला ‘नको’ ऐकून घ्यावे लागेल असे ज्यांना आवडत नाही ते या पिढीत मोडतात! सरसकट पणे सगळेच अशा प्रकारे वागणारे नसतील. मात्र बहुतांश लोकांमध्ये हे गुण समान दिसतात.
गुंतवणूक साक्षरतेचा फायदा
पूर्वीच्या पिढीला पोस्ट ऑफिस, बँकेच्या फिक्स डिपॉझिट यापलीकडे काही गुंतवणूकविषयक पर्याय असतात याची माहितीच नसायची. आता मात्र शालेय जीवनातच हळूहळू गुंतवणूक साक्षरता हा विषय अभ्यासक्रमात असल्याने त्यांना विविध पर्याय कोणते, याची माहिती असते. नाईलाज आणि काही समजत नाही म्हणून पैसे गुंतवायचे असे होत नाही.
या पिढीपुढील आव्हाने नेमकी कोणती आहेत?
आता वयाच्या तिशीत असलेल्या तरुणांपुढे पहिले आव्हान आहे ते म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या अतिरिक्त खर्चाला आवर घालावा लागणे असे आहे. पूर्वीच्या काळी पैसे कमी मिळत असले तरीही खर्च करण्यासाठी संधीच कमी होत्या. आता मात्र पैसे खर्च होण्यासाठी संधी शोधावी लागत नाही, यामुळे बचत म्हणजे उत्पन्न वजा खर्च हे आजवर रुळलेले समीकरण बदलून, आता खर्च होऊन काही उरले तर ती बचत अशी वृत्ती बनली आहे!
आता जीवनशैलीमध्ये जे बदल घडून येत आहेत त्यामधील महत्त्वाचा बदल म्हणजे लग्न करण्याच्या वयामध्ये होत असलेला बदल आहे. शिक्षणाच्या वाढत्या सोयी उपलब्ध झाल्यामुळे उच्च शिक्षण पूर्ण होऊन करिअर सुरू होईपर्यंतच पंचविशी येते. स्थिर आणि सुरक्षित भविष्याची खात्री होईपर्यंत तरुण आणि तरुणी लग्नाचा विचार करत नाहीत असा ट्रेंड आहे.
यामुळे दोन प्रश्न निर्माण होणार आहेत.
बचतीची सवय नसणे किंवा बचतीचे गांभीर्य नसणे
जोपर्यंत संसारिक जबाबदाऱ्या पडत नाहीत तोपर्यंत हाती आलेला पैसा आपल्याला साठवायचा असतो, त्यामुळे भविष्यात त्याचे फायदे घेता येतात हा विचार येत नाही. अलीकडच्या काळात आपला पैसा ऐन उमेदीच्या वेळेत आपल्यावर खर्च नाही करायचा तर काय म्हातारपणी खर्च करायचा अशा प्रकारचे डोस सोशल मीडियावरून मिळू लागले आहेत! वर्षभरात एक तरी सोलो ट्रिप करायची म्हणून पैसे साठवणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशा वेळी अचानक जबाबदारीचे ओझे आले तर वित्तीय शिस्त पटकन येत नाही.
उशिरा लग्न आणि कुटुंब नियोजन
पूर्वीच्या काळी मुले शिक्षण संपवून नोकरी व्यवसायाला लागली की तोपर्यंत त्यांच्या आई-वडिलांच्या निवृत्तीचा काळ जवळ येत असे. याचे कारण पहिल्या मुलाचा-मुलीचा जन्म पालकांच्या तिशीतच होत असे. आता लग्नच उशिरा होतात. त्यामुळे त्यानंतर मुलाबाळांना जन्म देणे, त्यांच्या शाळेसाठी आणि उच्च शिक्षणासाठी पैसे गोळा करणे आणि स्वतःचे रिटायरमेंट प्लॅनिंग करणे हे सगळे एकाच वयात करावे लागते. दोघे कमावणारे असले तरीही हे शक्य होत नाही. म्हणूनच कात्री लावली जाते ती पैसे गुंतवण्याला.
आयुष्यमान भव..,पण
एखादी व्यक्ती सुखाने ऐंशी वर्षे जगली तर तिच्या गरजा भागवण्यासाठी किमान २० वर्षे पुरेल एवढे पैसे तिला कॉर्पसमध्ये ठेवायला लागतील. हा विचार जेन झी पिढी करते आहे का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. किमान अन्न, औषधे आणि घर चालवण्यासाठी लागतील एवढे पैसे तुम्हाला दरमहा मिळतील असा पेंशन प्लॅन बनवायला लागेल.
गुंतवणूक आणि जेन झी मानसिकता
तंत्रज्ञानाचा प्रभाव : अगदी शालेय आणि महाविद्यालयीन वयापासून मोबाइल फोन, स्मार्टफोन, इंटरनेट यांची तोंडओळख असल्यामुळे गुंतवणूक करताना पारंपरिक पर्यायाचा वापर न करता स्मार्ट गुंतवणुकीमध्ये यांना विश्वास असतो.
बिनधास्तपणा : गुंतवणूकविषयक निर्णय घेताना वय, किती वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे, आपल्यावर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत याचा सारासार विचार करून जोखीम किती घ्यायची हे ठरवायचे असते. या पिढीला मात्र बिनधास्तपणे जोखीम घेणे यात भीती किंवा धोकाही वाटत नाही. कमवायला लागल्यानंतर पहिल्या-दुसऱ्या महिन्यातच क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करावी असाही विचार यांच्या मनात येऊ शकतो.
सोशल मीडियाचा प्रभाव
गेल्या दहा वर्षात फेसबुक, इंस्टाग्राम. यूट्यूब यांचा प्रभाव वाढला आहे. पैसे कसे गुंतवायचे याचे शास्त्रोक्त ज्ञान न घेता सहजपणे मिळणाऱ्या माहितीवर या पिढीचा लवकर विश्वास बसतो. ‘इन्फ्लुएन्सर’ असतात तसे ‘फिन्फ्लूएन्सर’ या पिढीसाठी महत्त्वाचे आहेत.
फोमो प्रभाव : फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आऊट. या मानसिकतेमध्ये आजूबाजूच्या लोकांनी आपल्या समवयस्कांनी जे निर्णय घेतले आहेत विशेषतः त्यांना शेअर बाजार त्यातही फ्युचर्स किंवा ऑप्शन्स यामध्ये त्यांना पैसे मिळाले असतील तर आपण या स्पर्धेत कुठेतरी मागे पडलो आहोत अशी नकारात्मक भावना या पिढीत तयार होते.
हे लक्षात ठेवा…
- क्रेडिट कार्डची सवय टाळा
- कुटुंबाच्या अन्न, शिक्षण आणि आरोग्य याव्यतिरिक्त खर्चांना मर्यादा असू द्या.
- ‘फोमो’ प्रभाव पडणार नाही याची काळजी घ्या.
- निर्णय घेताना जोडीदाराला विश्वासात घ्या.
(लेखक, अर्थअभ्यासक आणि वित्तीय नियोजनतज्ज्ञ, ईमेल: joshikd28@gmail.com)
