मला भेटणाऱ्या बऱ्याच गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये डझनभर विविध फंड आणि समभाग असतात. वरवर पाहता हे ‘डायव्हर्सिफिकेशन’ (वैविध्यीकरण) वाटते, पण जागतिक घडामोडींचा विचार करता हे आता एकाच घोड्यावर दहा वेळा पैज लावल्यासारखे वाटू लागले आहे. तो घोडा म्हणजे ‘इंडिया बीटा’.

कारण भारतकेंद्रित पोर्टफोलिओमधील प्रत्येक फंड भारतीय व्यावसायिक चक्र, रिझर्व्ह बँकेचे निर्णय, मान्सून आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या (एफपीआय) मानसिकतेनुसार वर-खाली होतो. हे सगळे घटक एकमेकांशी सहसंबंधित आहेत. त्यामुळे जेव्हा भारतासाठी एखादे वर्ष खराब असते, तेव्हा हे सर्व दहा फंड एकत्र अडचणीत येऊ लागतात.

गेल्या दशकापर्यंत हा ‘होम बायस’ (स्वदेशातील गुंतवणुकीचा ओढा) शहाणपणाचा वाटत होता, कारण भारतीय बाजार जगाच्या तुलनेत सरस कामगिरी करत होता. पण गेल्या पाच वर्षांच्या अनुभवाने आपल्याला एक महत्त्वाचा धडा दिला आहे: बाजारचक्रे बदलतात. अलीकडच्या काळात ‘निफ्टी’ने जेमतेम ४.८६ टक्के परतावा दिला असताना, ‘एसअँडपी ५००’ (२९.५५ टक्के) आणि ‘हँग सेंग’ (२५.२७ टक्के) वेगळ्याच खेळपट्टीवर खेळत आहेत असे वाटते. हा फरक केवळ तात्पुरता नाही, तो आजच्या बहुध्रुवीय (मल्टीपोलर) जगात आपल्या पोर्टफोलिओतील एक संरचनात्मक कमकुवतपणा दर्शवतो.

‘एफपीआय’चा आरसा: ‘बडा पैसा’ आपल्याला काय सांगतोय?

ऑक्टोबर २०२४ पासून, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय बाजारपेठेतून ४५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक मूल्याचे समभाग विकले आहेत. हा ओघ जागतिक आर्थिक संकटाच्या (२००८) काळापेक्षाही मोठा आहे. आज भारताच्या बाजारातील ‘एफपीआय’ची मालकी १५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. यामागचे कारण स्पष्ट आहे, भारतीय बाजार उदयोन्मुख देशांच्या सरासरीपेक्षा ५० टक्के महाग आहे. जेव्हा तुम्ही एकमेव आकर्षक पर्याय असता, तेव्हा गुंतवणूकदार कोणतीही किंमत मोजतात. पण आता इतर पर्यायही खुले झाले आहेत. चीन पुन्हा गुंतवणुकीसाठी विचारात घेतला जात आहे, कोरिया ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’ सुधारत आहे आणि तैवानचे अर्धसंवाहक अर्थात सेमीकंडक्टर क्षेत्रातील नेतृत्व दुर्लक्षित करणे अशक्य आहे.

एकेकाळी भारत हीच एकमेव मोठी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ होती; पण आता ती मक्तेदारी संपली आहे. जागतिक संस्थागत पैसा सापेक्ष मूल्य (रिलेटिव्ह व्हॅल्यू) आणि आवर्तनाच्या दिशेनुसार (मार्केट सायकल) फिरत आहे. व्यावसायिक गुंतवणूकदार हे सातत्याने करत असतात. किरकोळ गुंतवणूकदारांनी यातून बोध घेण्याची वेळ आली आहे.

‘बँक-अँड-बोअर’ (म्हणजे ‘बँकिंग आणि ठराविक पारंपरिक क्षेत्रे) ही समस्या

भारत भविष्यातील भौतिक पायाभूत सुविधा उभारण्यात गुंतलेला असताना, जागतिक दिग्गज कंपन्या भविष्यातील डिजिटल आणि जैविक ‘मेंदू’ विकसित करत आहेत. जर तुमचा पोर्टफोलिओ १०० टक्के भारतीय असेल, तर लक्षात घ्या की पुढील दशकातील सर्वात महत्त्वाच्या खालील ‘थीम्स’मधली तुमची गुंतवणूक सध्या शून्य आहे:

  • सेमीकंडक्टर : टीएसएमसी, एएसएमएल, एनव्हीडीया आणि क्वालकॉम – प्रत्येक एआय मॉडेल आणि स्मार्ट उपकरणामागची ताकद. भारतात याला तोडीस तोड सूचिबद्ध कंपनी नाही.
  • एआय पायाभूत सुविधा: मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, अल्फाबेट, मेटा यांसारख्या बलाढ्य कंपन्यांना भारतात कोणतीही समकक्ष कंपनी नाही. केवळ त्यांचा २०२५ मधील एआयवरील भांडवली खर्च भारताच्या संपूर्ण आयटी सेवा निर्यात महसुलापेक्षा जास्त होता.
  • प्रिसिजन बायोटेक: मॉडर्ना आणि रीजनरॉनसारख्या कंपन्या एमआरएनए आणि जीन-एडिटिंग मंच विकसित करत आहेत. भारताचे औषध निर्माण क्षेत्र सामर्थ्यवान असले तरी ते मुख्यत्वे जेनेरिक औषधांच्या व्यवसायात आहे.
  • एरोस्पेस आणि संरक्षण: लॉकहीड मार्टिन, रेथिऑन आणि सफ्रान या कंपन्या जागतिक सुरक्षेची भविष्यकालीन यंत्रणा उभारत आहेत.

या दृष्टीने विचार केल्यास भौगोलिक वैविध्य हे छद्मवेषातील क्षेत्रीय विविधीकरणच आहे. भारतीय बाजारात सूचिबद्धही नसलेल्या उद्योगांत तुम्ही गुंतवणूक करू शकता.

‘डबल इंजिन’चा फायदा जागतिक इक्विटी फंडात गुंतवणूक करणे म्हणजे इक्विटीच्या परताव्याबरोबरच रुपयाच्या अवमूल्यनाचाही फायदा मिळविण्याची संधी साधणे. गेल्या २० वर्षांत भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत दरवर्षी सरासरी ३.४ टक्के ते ४.३ टक्क्यांनी घसरला आहे. यामागे भारतातील उच्च चलनवाढ आणि चालू खात्यातील तूट यांसारखे संरचनात्मक घटक आहेत.

असे पहा की, अमेरिकेत गुंतवणूक केली असेल आणि जर एखाद्या वर्षी ‘एसअँडपी ५००’ स्थिर राहिला पण रुपया ४ टक्के घसरला, तरीही भारतीय गुंतवणूकदाराला ४ टक्के रुपयांचा परतावा मिळतो. जर ‘एसअँडपी ५००’ने १५ टक्के परतावा दिला आणि रुपया ४ टक्क्यांनी घसरला, तर एकूण परतावा अंदाजे १९.६ टक्के असतो. तुमच्या परताव्याची दोन्ही इंजिने एकाच वेळी सुरू असतात (अर्थात दोन्हीही प्रत्येक वर्षी फायदाच देतील असे नाही) आणि, जर तुमचे अपत्य पाच वर्षांनी परदेशात शिकायला जाणार असेल, तर जागतिक वाटप ही तुमच्या दृष्टीने एक तातडीची गरजदेखील आहे. जर तुमचा भविष्यातील खर्च डॉलरमध्ये असेल, तर तुमची १०० टक्के मालमत्ता रुपयांमध्ये ठेवल्याने तुम्ही (अनवधानाने) ‘अनहेज्ड’ चलन तफावत निर्माण करत आहात. तुम्ही तुमच्या पाल्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी तुमचा पोर्टफोलिओ पूर्णतः कार्यक्षम नाही, असा याचा अर्थ होतो.

गुंतवणुकीची संधी:

ताटीचे दार उघडले आहे! भारतीय म्युच्युअल फंडांसाठी परकीय गुंतवणुकीची उद्योगव्यापी मर्यादा ७ अब्ज डॉलर एवढीच आहे. ही मर्यादा ओलांडली गेली, की भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ नवीन गुंतवणुकीचा ओघ थांबवते. त्यामुळे जागतिक गुंतवणुकीची संधी भारतीय गुंतवणूकदारांना नेहमीच उपलब्ध नसते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा हे दार बंद होते, तेव्हा सर्वात आधी तुमच्या शिस्तबद्ध ‘एसआयपी’ थांबवल्या जातात. म्हणूनच, जेव्हा ही संधी उपलब्ध असते तेव्हा पटकन निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. सध्या जागतिक बाजारातील मूल्यांकनामध्ये घट झाल्यामुळे अनेक फंडांमध्ये गुंतवणुकीसाठी जागा निर्माण झाली आहे. चाणाक्ष गुंतवणूकदारांनी याकडे ‘संधीचे उघडलेले दार’ म्हणून पाहणे गरजेचे आहे.

मला आशा आहे की, इथपर्यंत आपल्याला प्रस्तुत विषयाची चांगलीशी तोंडओळख झाली असेल. या लेखाच्या उत्तरार्धात आपण विशिष्ट फंड संरचना, जागतिक इक्विटीमधील ‘अडीच’ मार्ग आणि २०२३ नंतरच्या कर बदलांचा तुमच्या वास्तविक परताव्यावर नेमका काय परिणाम होतो, यावर चर्चा करू.

तोपर्यंत, या मुद्द्यांवर तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी जरूर संवाद साधा. आणि जर तुम्ही अजूनही सल्लागार नेमला नसेल, तर शोध सुरू करण्यासाठी ही कदाचित सर्वोत्तम वेळ आहे !