संदीप वाळुंज : “What the human being is best at doing is interpreting all new information so that their prior conclusions remain intact”
-Warren Buffet
“मनुष्य एका बाबतीत मात्र विलक्षण हुशार असतो — नव्या माहितीचाही अर्थ असा काही लावतो, की जुन्या मतांना धक्काही लागू नये.”
— वॉरेन बफे
जागतिक गुंतवणुकीवरील माझी दोन भागांची लेखमाला वाचल्यानंतर, एका सुज्ञ वाचक मित्राने मला जुन्या लेखाची आठवण करून दिली. “गेल्या वर्षी तर तुम्हीच म्हणाला होता की, भारतासाठी ‘टीना’ (देअर इज नो ॲाल्टरनेटीव्ह ) अशी परिस्थिती आहे, मग आता हा जागतिक गुंतवणुकीचा आग्रह का?”
हा प्रश्न ऐकताना कौतुकाचे हसू आले. कारण हो, त्यावेळी माझा निष्कर्ष तसा होता आणि त्यावेळी तो पूर्णपणे तर्कसंगतही होता. भारताची संरचनात्मक वाढीची कथा, भक्कम आर्थिक स्थिरता, बँकांचे सुदृढ ताळेबंद आणि धोरणात्मक वेग हे सर्व मुद्दे भारताच्या बाजूने होते. शिवाय इतर उदयोन्मुख बाजारपेठा एकतर संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत किंवा धोरणात्मकदृष्ट्या अनाकर्षक वाटत होत्या.
पण बाजार हे काही पुराणवस्तू संग्रहालय नव्हे. परिस्थिती बदलते. सापेक्ष मूल्यांकन बदलते. भांडवली प्रवाह बदलतात. स्पर्धात्मक अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणा होतात. काही नवे क्षेत्र अचानक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची बनतात. हे बदल लक्षात घेऊन रणनिती न बदलणे हे समर्थांच्या शब्दात सांगायचे झाल्यास ‘मूर्खलक्षण’ आहे.
पण त्या मित्राच्या चतुर प्रश्नामुळे गुंतवणूकदारांच्या हमखास चुकांविषयी वॉरन बफे यांचे एक अत्यंत मार्मिक निरीक्षण माझ्या मानसपटलावर तरळले, जे आजच्या लेखासाठी निवडले आहे. (आणि शीर्षकासाठी समर्थांची दासबोधातली ओवी वापरली आहे, जी या चुकीवर उपाय सांगते!)
पूर्वग्रहाची कैद (कन्फर्मेशन बायस)
आपण तर्कशुद्ध निर्णय घेणारे आहोत असे आपल्यापैकी प्रत्येकाचा (गैर) समज असतो. प्रत्यक्षात मात्र एकदा का आपण एखाद्या निष्कर्षावर पोहोचलो की, तर्काशी आपण जणू फारकत घेतो. आपण नव्या माहितीचे निष्पक्ष न्यायाधीश राहण्याऐवजी आपल्या जुन्या विश्वासांचे समर्थन करणारे ‘बचाव पक्ष’ बनतो. आपल्या मताला पुष्टी देणाऱ्या पुराव्यांचे आपण आनंदाने स्वागत करतो, पण आपल्या विचारांना आव्हान देणाऱ्या पुराव्यांकडे मात्र संशयाने पाहतो किंवा सरळसरळ नाकारतो.
मानसशास्त्रज्ञ या प्रवृत्तीला ‘मोटिव्हेटेड रिझनिंग’ म्हणतात. ही काही बौद्धिक आळसामुळे निर्माण होणारी प्रवृत्ती नाही; तर दोन परस्परविरोधी विचार एकाच वेळी मनात निर्माण झाल्यामुळे होणाऱ्या मानसिक संघर्षाचा (कॉग्निटिव्ह डिसोनन्स) तो परिणाम आहे. एकाच वेळी दोन विरुद्ध निष्कर्ष मनात ठेवणे माणसाला स्वाभाविकपणे अस्वस्थ करणारे असते. हे मानसिक द्वंद्व सोडवण्यासाठी आपला मेंदू जुन्या मताचे पुनर्मूल्यांकन करण्याऐवजी, समोर आलेल्या नव्या माहितीचेच असे स्पष्टीकरण शोधतो की जुना निष्कर्ष अबाधित राहील.
गुंतवणुकीच्या जगात ही सर्वात महागडी खोड आहे. मानवी इतिहासातील प्रत्येक मोठ्या आर्थिक बुडबुड्यामागे या चुकीचा मोठा वाटा होता. डॉट कॉमच्या उन्मादाच्या काळात ’इंटरनेटमुळे सर्व काही बदलले आहे’ हा समज पुढे रेटला गेला. २००८ च्या जागतिक आर्थिक संकटापूर्वी अनेक बुद्धिमान गुंतवणूकदारांचा असा ठाम विश्वास होता की, अमेरिकेतील घरांच्या किमती कधीही कमी होऊ शकत नाहीत. प्रत्येक वेळी आपल्या आवडत्या निष्कर्षाला धक्का लागू नये म्हणून नवीन माहितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले गेले नाही.
आजच्या काळात हे अधिकच धोकादायक झाले आहे, कारण सोशल मीडियाचे ‘इको चेंबर्स’ हा पूर्वग्रह घरपोच पोहोचवत आहेत. कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय-आधारित प्रणाली आपल्याला तेच दाखवतात, जे आपल्या आधीच्या विचारांशी जुळणारे असते. जर तुमचा असा विश्वास असेल की, भारत ही गुंतवणुकीसाठी एकमेव सर्वोत्तम जागा आहे, तर त्या मताला पुष्टी देणारी सामग्री इंटरनेटच्या जंजाळात विपुल प्रमाणात मिळेल. तंत्रज्ञानामध्ये अमेरिकेचे वर्चस्व कायमस्वरूपी आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर इंटरनेट आनंदाने त्याला दुजोरा देईल. मानवी पूर्वग्रहांना इतकी शक्तिशाली तांत्रिक मदत इतिहासात कधीही मिळाली नव्हती.
मग याचा अर्थ असा घ्यायचा का? की, आपण यावर मात करू शकत नाही? बफे आपल्याला चार्ल्स डार्विनचे अनुकरण करायला सांगतात. पूर्वग्रहाच्या कैदेवर मात करण्यासाठी डार्विन एक नियम कटाक्षाने पाळायचा: जेव्हा जेव्हा त्याला त्याच्या मूळ निष्कर्षाच्या विरुद्ध एखादा तथ्यात्मक पुरावा किंवा निरीक्षण मिळायचे, तेव्हा तो ती माहिती विनाविलंब आणि त्वरित लिहून ठेवत असे. त्याला मानवी स्वभावाचे एक गुपित उमजले होते: आपण जोवर स्वतःला विरोधाभासी पुराव्यांचा सामना करायला भाग पाडत नाही, तोवर आपले मन उपजतपणे जुन्याच विचारांचे संरक्षण करत राहते.
प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःला वारंवार विचारले पाहिजेत असे प्रश्न:
- मी या माहितीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करत आहे की जुन्या विश्वासाचे समर्थन?
- जर माझ्याकडे ही गुंतवणूक आज नसती, तर आजच्या किमतीला मी ती विकत घेतली असती का?
- गुंतवणुकीचे मूलतत्त्व बदलले आहे की फक्त किंमत?
- नेमका कोणता पुरावा माझे मत बदलायला मला भाग पाडेल?
इतिहासातील सर्वात महान गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून वॉरन बफे यांचे नाव घेतले जाते, त्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्वतःचा दृष्टिकोन बदलण्याची त्यांची तयारी. त्यांनी हे केवळ वैचारिक पातळीवर मान्य केले नाही, तर जाहीरपणे आणि मोठ्या धैर्याने आपले दृष्टिकोन बदलले. एकेकाळी ‘सिगार-बट’ शैलीत म्हणजे अत्यंत स्वस्त पण मर्यादित गुणवत्तेच्या कंपन्यांमध्ये संधी शोधणारे बफे पुढे उत्कृष्ट दर्जाच्या दीर्घकालीन ‘क्वालिटी कंपाउंडर्स’कडे वळले. तंत्रज्ञान क्षेत्रापासून अनेक वर्षे दूर राहिल्यानंतर त्यांनी पुढे ॲपलमध्ये आपली सर्वात मोठी गुंतवणूक केली. स्वतःचा विचार बदलण्यात कमीपणा नाही, उलट ती बौद्धिक प्रामाणिकतेची खूण आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
म्हणूनच त्यांनी केलेले हे निरीक्षण अधिक महत्त्वाचे ठरते. ही इतरांवर केलेली टीका नाही; तर प्रत्येक माणसात आणि स्वतःमध्येही असलेल्या एका मूलभूत मानवी प्रवृत्तीचे अचूक वर्णन आहे. एखाद्या मानसिक दुर्बलतेचे इतके नेमके शब्दचित्र तोच माणूस रेखाटू शकतो, ज्याने त्या अस्वस्थतेचा अनुभव स्वतः आतून घेतला आहे. जो माणूस स्वतःला नेहमीच बरोबर समजतो, तो गुंतवणूकीसाठी धोकादायक व्यक्ती ठरतो. आणि जो पोर्टफोलिओ केवळ मालकाने स्वतःला प्रश्न विचारणे थांबवले आहे या एकाच कारणामुळे बदलला जात नाही, तो सर्वात जास्त जोखमीचा ठर शकतो.
अशा पोर्टफोलिओचा मालक बनण्यापासून स्वतःला वाचवा!
