लेखाच्या पूर्वार्धात आपण पाहिले की, भारतीय गुंतवणूकदारांच्या इक्विटी पोर्टफोलिओमध्ये जागतिक गुंतवणूक असणे हा आता अपवाद नसून ती गरज बनली आहे. देशांतर्गत गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात (होम बायस) आता फायदा कमी आणि जोखीम जास्त असल्याचे आढळून येत आहे. या लेखमालेच्या दुसऱ्या भागात आपण ही गुंतवणूक कुठे, कशी आणि किती करावी, याच्या तांत्रिक बाजू समजून घेऊ.
फंडाच्या शोधाआधी रणनीती आखाः
जागतिक फंडाच्या परताव्यांचे आकडे तपासायला सुरुवात करण्याआधी खालील तीन प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे तयार असायला हवीत:
- १. उद्देश: तुमच्या भारतीय पोर्टफोलिओमधील नेमकी कोणती उणीव या गुंतवणुकीमुळे भरून काढण्याची गरज आहे?
- २. प्रमाण: तुमची आर्थिक परिस्थिती आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार किती जागतिक गुंतवणूक करणे योग्य ठरेल?
- ३. मार्ग: तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेचा विचार करता कोणता मार्ग अनुरूपता, सोय आणि कर कार्यक्षमता यांचा सर्वोत्तम समतोल साधतो
यांच्या उत्तरासाठी पुढील माहिती उपयुक्त ठरेल.
जागतिक इक्विटी फंडांचे चार प्रमुख प्रकार:
- १. ग्लोबल डायव्हर्सिफाइड फंड (जागतिक वैविध्यता फंड) : हे एकाच वेळी अमेरिका, युरोप, जपान आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करतात. हे आपल्याकडील ‘फ्लेक्सी-कॅप’ फंडासारखे असतात. पहिल्यांदाच जागतिक गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा सर्वात सुरक्षित आणि सुटसुटीत पर्याय आहे.
- २. जिओग्राफी-फोकस्ड फंड्स (भूप्रदेश केंद्रित फंड) : हे एका विशिष्ट प्रदेशात गुंतवणूक करतात. यात अमेरिकन फंड सर्वाधिक प्रसिद्ध आहेत, कारण तिथे तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व आणि रुपयाच्या घसरणीचा फायदा या दोन्ही गोष्टी (पूर्वार्धात वर्णन केलेला ‘डबल इंजिन’ फायदा!) मिळतात. युरोपचे आकर्षण तिथल्या कमी मूल्यांकन आणि चक्रीय पुनर्प्राप्तीच्या संधींमुळे आहे, तर आसियान क्षेत्र वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांसाठी ओळखले जाते.
- ३. ग्लोबल थीमॅटिक फंड : हे देशावर नव्हे, तर एखाद्या ‘थीम’वर (उदा. एआय, सेमीकंडक्टर्स, बायोटेक) पैज लावतात. भारतीय बाजारात उपलब्ध नसलेल्या क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी हे उत्तम आहेत. मात्र, लक्षात ठेवा की हे फंड जरी भविष्याचे प्रतिनिधित्व करीत असले तरी त्यांच्या कामगिरीमध्ये चढ-उतार अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांचा वापर सॅटेलाइटप्रमाणे (पॅावर प्ले) करा – जसे आपण भारतीय थीमॅटिक फंड्सबाबत करतो.
- ४. जिओग्राफी-प्लस-सेक्टर फंड (भौगोलिक-अधिक-क्षेत्रीय संयोजन) : याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘यूएस टेक्नॉलॉजी फंड’. हे फंड १०-२० वर्षांचा दीर्घ दृष्टिकोन असलेल्या आणि ४० टक्क्यांपर्यंतची घसरण पचवू शकणाऱ्या आक्रमक गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत.
गुंतवणुकीचे ‘अडीच’ मार्ग :
मार्ग १: देशांतर्गत म्युच्युअल फंड – एफओएफ
हे असे भारतीय म्युच्युअल फंड आहेत जे पुढे जागतिक फंडांत गुंतवणूक करतात. यात भारतीय रुपयांमध्ये गुंतवणूक स्वीकारली जाते. हे समजायला सोपे, सेबीद्वारे नियंत्रित आणि ‘एसआयपी’साठी सोयीस्कर आहेत. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या ७ अब्ज डॉलरच्या मर्यादेमुळे यातील गुंतवणूक (एसआयपीदेखील) कोणत्याही सूचनेशिवाय थांबवली जाऊ शकते.
मार्ग २ : थेट ‘एलआरएस’ मार्ग
‘लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम’ (एलआरएस) अंतर्गत तुम्ही दरवर्षी २.५ लाख डॉलरपर्यंतची रक्कम थेट परदेशातील ब्रोकरेज खात्यात जमा करून तिथले शेअर्स किंवा ईटीएफ (उदाहरणार्थ, एस अँड पी ५०० किंवा आयशेअर्स एमएससीआय वर्ल्ड वगैरे) खरेदी करू शकता. यात गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.
अडथळे : आर्थिक वर्षात १० लाख रुपयांच्या वर पाठवलेल्या रकमेवर २० टक्के ‘टीसीएस’ लागू होतो. तसेच, परदेशातील मालमत्तेची माहिती प्राप्तिकरात (शेड्यूल एफए) देणे बंधनकारक आहे. तांत्रिक ज्ञान असलेल्यांसाठीच हा मार्ग योग्य आहे.
मार्ग २.५: ‘गिफ्ट सिटी’ – एक सुवर्णमध्य
भारतीय जागतिक गुंतवणुकीच्या क्षेत्रातील हा अतिशय महत्त्वाचा पण चांगलाच दुर्लक्षित असा बदल आहे. गुजरातच्या ‘गिफ्ट सिटी’मध्ये आता भारतीय फंड घराण्यांचे असे फंड उपलब्ध आहेत जे थेट जागतिक बाजारात गुंतवणूक करतात. इथे सेबीची ७ अब्ज डॉलरची मर्यादा लागू होत नाही, त्यामुळे तुम्ही कधीही गुंतवणूक करू शकता. डॉलरमध्ये गुंतवणूक असूनही देशांतर्गत नियामक चौकटीत व्यवस्थापित केल्यामुळे तुम्हाला परदेशी ब्रोकरेज खात्याची किंवा कागदपत्रांची गरज भासत नाही.
हा मार्ग, क्रमांक १ चा साधेपणा आणि क्रमांक २ चे स्वातंत्र्य, यामधील अंतर भरून काढतो. नफ्यावर मानक ‘एलटीसीजी’ आणि ‘एसटीसीजी’ दर लागू होतात; १० लाख रुपयांवरील ‘एलआरएस रेमिटन्स’वर २० टक्के दराने टीसीएस येथेही लागू राहतो. तरीही मी याला ‘अर्धा मार्ग’ म्हटले आहे, कारण सध्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या मोठ्या भारतीय फंडांनी ‘गिफ्ट सिटी’मध्ये आपले फंड लाँच केले आहेत; तसेच तिथली कस्टोडियन्स, ब्रोकरेज आणि प्लॅटफॉर्म्सची परिसंस्था सध्या पूर्णपणे विकसित होत आहे.
गुंतवणूक किती करायची? एक प्रारंभिक चौकट :
- ० जोखीम टाळणारे गुंतवणूकदार (एकूण निधीच्या ५ ते १० टक्के): ‘एसआयपी’द्वारे एखाद्या व्यापक जागतिक वैविध्यपूर्ण फंडाचा विचार करा. परतावा वाढवणे हे तुमचे ध्येय नसून चलन विविधता आणि भारतात न मिळणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक करणे हे असल्यामुळे थीमॅटिक फंड टाळा.
- ० मोजकी जोखीम घेणारे गुंतवणूकदार (एकूण निधीच्या १० ते १५ टक्के): एक मुख्य डायव्हर्सिफाइड फंड आणि सोबतीला एखादा थीमॅटिक फंड, जो एखादी विशिष्ट उणीव भरून काढेल, (उदाहरणार्थ, टेक फंड) ठेवावा. या स्तरावर ‘एलआरएस’ किंवा ‘गिफ्ट सिटी’चा विचार करता येईल.
- ० साहसी गुंतवणूकदार (१५ ते २५ टक्के): एआय, बायोटेक आणि एरोस्पेस यांसारख्या क्षेत्रांत आक्रमक गुंतवणूक करण्यासाठी ‘गिफ्ट सिटी’ किंवा ‘एलआरएस’ मार्ग अधिक कार्यक्षम ठरू शकतो. मोठ्या रकमेच्या हस्तांतरणावर करांचे – ‘टीसीएस’चे नियोजन करण्यासाठी, सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या सल्लागारासोबत विचारविनिमय करा.
करांचा विचार : गाडा घोड्यापुढे नको!
एप्रिल २०२३ पासून, बहुतेक आंतरराष्ट्रीय फंड ऑफ फंड्सवर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांप्रमाणे कर आकारणी केली जाते. म्हणजेच, कोणताही इंडेक्सेशन लाभ न देता, नफा तुमचे त्या वर्षीचे उत्पन्न आहे असे धरून तो तुमच्या उत्पन्नात जोडला जातो. देशांतर्गत इक्विटीच्या १२.५ टक्के दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या (एलटीसीजी) तुलनेत, हे जाचक वाटते. पण निर्णय घेण्यापूर्वी निव्वळ नफातोटा तपासा.
ड्युएल इंजिन करन्सी गेनसह १७ टक्के परतावा देणाऱ्या ग्लोबल फंडावर ३० टक्के कर द्यावा लागला तरी, कर-पश्चात परतावा ११.९ टक्के असेल. तर ९ टक्के परतावा देणाऱ्या देशांतर्गत फंडावर १२.५ टक्के कर आकारल्यास, ७.९ टक्के परतावा मिळेल. ग्लोबल फंडावर तुम्हाला जास्त दराने कर भरावा लागला असला तरीही तुमचा निव्वळ फायदा जास्त असू शकतो. (हे एक उदाहरण आहे, कोणताही फंड नेहमीच सकारात्मक परतावा देईल याची कोणतीही हमी नाही.)
त्यामुळे केवळ कर जास्त आहे म्हणून चांगल्या संधीकडे पाठ फिरवू नका. पण जागतिक गुंतवणुकीत कराचे नियम गुंतागुंतीचे आहेत आणि त्यात वारंवार बदल होत आहेत. त्यामुळे तुमच्या सल्लागाराने सर्वसाधारण उत्तर देण्याऐवजी तुमच्या विशिष्ट परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.
समारोप
विविधीकरण म्हणजे ‘मी बरोबर आहे’ यावर लावलेली पैज नसून, ‘मी चुकू शकतो’ यासाठी घेतलेली खबरदारी आहे. जागतिक गुंतवणुकीमुळे तुमची संपत्ती वेगवेगळ्या देशांमध्ये विभागली जाते. मग कोणत्याही एका देशात अंधार झाला, तरी तुमचे घर उजळलेले राहते.
ही गुंतवणूक विचारपूर्वक करा, टप्प्याटप्प्याने करा, पण संधी उपलब्ध असतानाच ती नक्की करा!
