GM Breweries Share Price fundamentals and financial performance: वर्ष १९८१ मध्ये स्थापन झालेली ‘जी एम ब्रुअरीज लिमिटेड’ ही कंपनी ‘कंट्री लिकर’ आणि ‘इंडियन-मेड फॉरेन लिकर’ यांसारख्या मद्यनिर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात कार्यरत आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ‘कंट्री लिकर’च्या बाजारपेठेत कंपनीचा मोठा हिस्सा आहे. महाराष्ट्र राज्यात ‘कंट्री लिकर’ची निर्मिती करणारी ही सर्वात मोठी कंपनी असून बाजारपेठेत तिचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘कंट्री लिकर’वरील एकूण उत्पादन शुल्कापैकी सुमारे २५-३० टक्के वाटा जी एम ब्रुअरीजचा आहे. कंपनीच्या नाममुद्रेमध्ये ‘जी.एम. संत्रा’, ‘जी.एम. डॉक्टर’, ‘जी.एम. लिंबू पंच’ इ.चा समावेश आहे.
उत्पादन सुविधा
कंपनीचा विरार (जिल्हा पालघर, महाराष्ट्र) येथे पूर्णपणे स्वयंचलित ‘बॉटलिंग प्लांट’ (बाटल्या भरण्याचा प्रकल्प) आहे. सुरुवातीला दिवसाला २०० केसेस उत्पादन करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाची क्षमता आता दिवसाला सुमारे ५०,००० केसेसपर्यंत वाढली आहे. कंपनीची वार्षिक १३.७६ कोटी बल्क लिटर ‘कंट्री लिकर’वर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे.
काचेच्या बाटल्यांची कमतरता आणि त्या फुटण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी, कंपनीने पेट बाटल्यांचा वापर सुरू केला; आर्थिक वर्ष २०२६ मधील एकूण विक्रीपैकी ~९३ टक्के विक्री पेट बाटल्यांमधील उत्पादनांची होती. या बदलामुळे नाममुद्रेसाठी खर्चात स्थिरता आणि कार्यक्षम कामकाज सुनिश्चित होते. जरी महाराष्ट्राने २०१६ मध्ये मद्यासाठी ‘पेट’ बाटल्यांवर बंदी घातली असली, तरी उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे त्यांचा वापर सुरू ठेवता येत आहे. बाटलीबंद करण्याच्या यंत्रणा (बॉटलिंग लाइन्स) काच आणि ‘पेट’ अशा दोन्ही प्रकारच्या बाटल्यांसाठी उपयुक्त असल्याने, न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी कंपनीचे कामकाज सुरक्षित राहील.
आर्थिक वर्ष २०२६ मधील गुंतवणूक
कंपनीची म्युच्युअल फंड, रोखे इत्यादींमध्ये सुमारे ५७० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तसेच, कंपनीची सुमारे १०८.०४ कोटी रुपयांची मालमत्ता गुंतवणूक म्हणून आहे. या गुंतवणूक मालमत्तेमध्ये निवासी सदनिका, भाडेकरूंनी वापरलेली मालमत्ता आणि कंपनीने भाडेकरू म्हणून वापरलेली मालमत्ता यांचा समावेश आहे.
कंपनीचे यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. जून २०२६ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीने २०० कोटी रुपयांच्या उलाढालीवर (२३ टक्के वाढ) ३७.७ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल ४६ टक्क्याने जास्त आहे. गेल्या सहामाहीत वर्षात उच्च कर दर आणि कायद्यांमधील वारंवार होणारे बदल यामुळे कंपनीला अडचणींचा सामना करावा लागला. कंपनीचा मुख्य कच्चा माल असलेल्या ‘रेक्टिफाइड स्पिरिट’च्या किमतीतही मोठी चढ-उतार झाली आणि त्याचा पुरवठाही अपुरा होता. त्या मूळे गेल्या आर्थिक वर्षाचे निकाल अपेक्षेप्रमाणे आहेत. संपूर्ण आर्थिक वर्षांत कंपनीने ७४८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर (१७ टक्के वाढ) १३८ कोटी रूपयांचा (८ टक्के वाढ) नक्त नफा कमावला आहे. कंपनीची सुमारे ६०० कोटी रुपयांची इतर गुंतवणूक आहे हे विशेष. मद्य निर्मिती क्षेत्रातील स्पर्धात्मक बाजारपेठेच्या परिस्थितीमुळे, आर्थिक वर्ष २०२६ पासून कंपनीने प्रामुख्याने ‘कंट्री लिकर’वरच लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही वर्षांत कंपनी ‘कंट्री लिकर’च्या व्यवसायात सातत्याने प्रगती करत आहे.
कुठलेही कर्ज नसलेले तसेच अनुभवी प्रवर्तक आणि वाढती मागणी असलेले मद्य क्षेत्र यामुळे सध्याच्या अनिश्चित काळात जी एम ब्रुवरीज एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकेल.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
जी एम ब्रुअरीज लिमिटेड (बीएसई कोड ५४४७४४)
वेबसाइट: http://www.gmbreweries.com
प्रवर्तक: जिमी अल्मेडा
बाजारभाव: रु. ८९९/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: देशी मद्य
भरणा झालेले भाग भांडवल: रु. २२.८६ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७४.४३
परदेशी गुंतवणूकदार १.१९
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ०.०१
इतर/ जनता २४.३७
पुस्तकी मूल्य: रु. ४७२
दर्शनी मूल्य: रु. १०/-
लाभांश: ९०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ७३.८४
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १२.२
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४६.६
डेट इक्विटि गुणोत्तर: ०
इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: —-
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (ROCE): १८%
बीटा: १.१
बाजार भांडवल: रु. २०५४ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १३२९/६६
गुंतवणूक कालावधी : ३६ महिने
(हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे. प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)
