प्रसन्न पाठक
शतकांपासून, जागतिक वित्तीय व्यवस्थेत सोन्याचे एक अद्वितीय स्थान राहिले आहे. आधुनिक भांडवली बाजार अस्तित्वात येण्यापूर्वी, सोने हे मूल्याचे भांडार, विनिमयाचे माध्यम आणि आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक म्हणून काम करत होते. आजही युद्ध, करोनासारख्या जागतिक संकट प्रसंगी आर्थिक साधने आणि डिजिटल मालमत्ता उपलब्ध असूनही – पोर्टफोलिओमध्ये सोने महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

गुंतवणूकदारांसाठी, सोन्याचे महत्त्व केवळ त्याच्या किंमत वाढीच्या क्षमतेत नाही. जेव्हा आपण मालमत्ता वाटपात त्याची भूमिका तपासतो तेव्हा त्याचे खरे महत्त्व समोर येते. सोने एक शक्तिशाली वैविध्यात प्रभावी साधन म्हणून काम करते. कारण ते इक्विटी आणि रोखे दोन्हीशी कमी सहसंबंध दर्शवते, ज्यामुळे ते अनिश्चित आर्थिक आणि बाजार परिस्थितीमध्ये सर्वात प्रभावी स्थैर्य देणारे म्हणून ओळखले जाते.

पोर्टफोलिओत वैविध्याची भूमिका

मालमत्ता वाटपाचे मुख्य तत्त्व सोपे आहे: आर्थिक आवर्तनांमध्ये वेगळ्या पद्धतीने वागणाऱ्या मालमत्ता एकत्रित केल्याने एकूण पोर्टफोलिओ जोखीम कमी होते. इक्विटी बाजार सामान्यतः आर्थिक वाढ, कंपन्यांची कमाई आणि गुंतवणूकदारांच्या भावनांशी जोडलेले असतात. स्थिर उत्पन्न साधने व्याजदर आणि पत परिस्थितींद्वारे चालविली जातात.

मात्र, सोने अनेकदा वेगळ्या लयीत जाते. त्याची कामगिरी जागतिक रोकड सुलभता, चलन बाजार, भू-राजकीय अनिश्चितता आणि वाढत्या महागाईच्या अपेक्षांमुळे प्रभावित होते. या विशिष्ट घटकांमुळे, सोन्याने ऐतिहासिकदृष्ट्या पारंपरिक वित्तीय मालमत्तेशी कमी किंवा अगदी नकारात्मक सहसंबंध दर्शविला आहे. बाजारातील ताणतणावाच्या काळात हे वैशिष्ट्य विशेषतः मौल्यवान बनते. जेव्हा समभागांमध्ये अस्थिरता किंवा घसरण येते, तेव्हा सोने अनेकदा संतुलन म्हणून काम करते, ज्यामुळे पोर्टफोलिओ तोटा कमी होण्यास मदत होते. थोडक्यात, सोने परतावा तयार करण्यासाठी नव्हे तर पोर्टफोलिओच्या विम्यासारखे अधिक काम करते.

अस्थिरता आणि संकटाविरुद्ध बचाव

आज जगाला अनिश्चिततेने वेधले आहे. भू-राजकीय तणाव शिगेला पोहोचला आहे. अशा वातावरणात, गुंतवणूकदार स्वाभाविकपणे मूल्य जपणाऱ्या मालमत्तेकडे आकर्षित होतात. सोन्याने ऐतिहासिकदृष्ट्या संकटाच्या काळात आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. जेव्हा वित्तीय बाजारपेठ अस्थिर होतात, तेव्हा गुंतवणूकदार अशा अमूर्त मालमत्तांकडून सोन्यासारख्या मूर्त मालमत्तेकडे वळतात. ज्या सरकार किंवा कंपन्या पतपात्रतेशी जोडलेल्या नाहीत. सोने त्या वर्णनात पूर्णपणे बसते. अलीकडील सोन्याच्या किंमतीतील वाढ या गतिमानतेचे द्योतक आहे. गेल्या वर्षी सोने प्रति औंस ५,१८० डॉलरच्या आसपास होते. जे लक्षणीयरीत्या वाढले आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे, आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असूनही, अमेरिकी डॉलरच्या अलीकडच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किमतीतील वाढ काही प्रमाणात कमी झाली आहे. जागतिक स्तरावर सोन्याची किंमत डॉलरमध्ये असल्याने, मजबूत डॉलर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी धातू अधिक महाग करून नफा मर्यादित करतो.

हा लेख लिहीत असताना डॉलर निर्देशांक १००.३० च्या जवळ आहे, कारण सोन्याच्या किमती ५,६०० डॉलरच्या जवळच्या विक्रमी उच्चांक आणि ४,४०० डॉलरच्या आसपासच्या नीचांकी दरम्यान सतत चढ-उतार होत आहेत. डॉलरमधील निर्णायक ‘ब्रेकआउट’ सोन्याच्या हालचालीच्या पुढील टप्प्यावर परिणाम करू शकतो. तरीही व्यापक मुद्दा कायम आहे.

सोने महागाई रोखण्यासाठी कार्यरत

सोने महागाई रोखण्यासाठी एक उपाय म्हणून आणखी एक महत्त्वाची भूमिका बजावते. चलनवाढ कालांतराने पैशाची खरेदी शक्ती कमी करते. चलनवाढीच्या काळात अनेक वित्तीय मालमत्ता संघर्ष करू शकतात, परंतु सोन्याने ऐतिहासिकदृष्ट्या मूल्य जपले आहे.

तर्क सरळ आहे. मध्यवर्ती बँकांद्वारे सोने छापले जाऊ शकत नाही आणि ते अमर्याद पुरवठ्यात तयार केले जाऊ शकत नाही. जेव्हा महागाई वाढते किंवा गुंतवणूकदारांना जास्त आर्थिक विस्ताराची भीती वाटते तेव्हा सोने मूल्याचा नैसर्गिक साठा बनते. यामुळेच सोने अनेकदा कमकुवत चलन धोरण, वाढत्या महागाईच्या अपेक्षा आणि नकारात्मक वास्तविक व्याजदरांच्या काळात चांगले प्रदर्शन का करते हे स्पष्ट होते

सोने भारतीय गुंतवणूकदारांच्या दृष्टीतून

भारतीय गुंतवणूकदारांसाठी, सोने एक अतिरिक्त फायदा देते. ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, ते म्हणजे चलन संरक्षण. सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमत अमेरिकी डॉलरमध्ये असल्याने, भारतीय रुपयाचे कोणतेही अवमूल्यन रुपयाच्या दृष्टीने सोन्याचे परतावे वाढवते. दुसऱ्या शब्दांत, जरी जागतिक स्तरावर सोन्याचे भाव स्थिर राहिले तरी, कमकुवत रुपयामुळे देशांतर्गत सोन्याच्या किमती वाढतात. ज्या काळात डॉलर जागतिक स्तरावर मजबूत होतो, त्या काळात उदयोन्मुख बाजारातील चलने – रुपयासह अनेकदा डॉलरच्या तुलनेत घसरतात. ही गतिमानता भारतीय पोर्टफोलिओसाठी एक नैसर्गिक ‘हेज’ प्रदान करते, ज्यामुळे सोने स्थिर मालमत्ता म्हणून आणखी मौल्यवान बनते.

ऐतिहासिकदृष्ट्या, या चलन परिणामाचा अर्थ असा आहे की, भारतातील सोन्याचा परतावा बहुतेकदा केवळ जागतिक डॉलरच्या किमतीपेक्षा जास्त मजबूत राहिला आहे.

सोन्याचे योग्य वाटप

पोर्टफोलिओ बांधताना, सोन्याला सट्टेबाजीचा व्यापार म्हणून नव्हे तर एक धोरणात्मक वाटप म्हणून पाहणे ही परतावा वाढविण्याची गुरुकिल्ली आहे. पोर्टफोलिओच्या एकूण आकारमानाच्या ५ टक्के ते १५ टक्के सोन्याचे त्यात प्रमाण असावे, असे बहुतेक जागतिक वित्तीय सल्लागार असे सुचवतात. भारतीय गुंतवणूकदारांसाठी, अतिरिक्त चलन ‘हेज’ लाभ आणि धातूकडे दीर्घकालीन सांस्कृतिक ओढ लक्षात घेता, या श्रेणीच्या उच्च टोकाकडे – सुमारे १० टक्के ते २० टक्के वाटप करणे अर्थपूर्ण आहे. असे वाटप पोर्टफोलिओ अस्थिरता कमी करण्यास मदत करते आणि दीर्घकालीन जोखीम-समायोजित परतावा सुधारते.

ज्या गुंतवणूकदारांनी या आधी सोन्याकडे गुंतवणूक या दृष्टिकोनातून पाहिले नाही, त्यांच्यासाठी, पद्धतशीर गुंतवणुकीद्वारे (एसआयपी) पोर्टफोलिओत हळूहळू सोन्याचे प्रमाण वाढविणे हा एक विवेकपूर्ण दृष्टिकोन असू शकतो. विशेषतः अशा वातावरणात जागतिक घडामोडींमुळे अल्पकालीन किमतीत चढ-उतार होऊ शकतात.

सोन्यात गुंतवणूक करण्याचा आधुनिक मार्ग

आज, गुंतवणूकदारांना त्याच्या पोर्टफोलिओत फायदा घेण्यासाठी सोने मूर्त रूपात खरेदी करण्याची आवश्यकता नाही. वित्तीय बाजारपेठा ‘गोल्ड ईटीएफ’सारखे कार्यक्षम आणि पारदर्शक मार्ग देतात, जे सोन्याच्या किमतीचा मागोवा घेतात आणि साठवणूक आणि शुद्धतेशी संबंधित चिंता दूर करतात. आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे ‘मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड्स’, जिथे निधी व्यवस्थापक बाजार आवर्तनांत संतुलित गुंतवणूक राखण्यासाठी ‘इक्विटी’, रोखे आणि सोन्यामध्ये गतिमानपणे वाटप करतात. ही साधने गुंतवणूकदारांना सोईस्कर आणि नियंत्रित गुंतवणूक चौकटीत सोन्याचे विविधीकरण फायदे मिळवण्यास अनुमती देतात.

निष्कर्ष

आर्थिक आवर्तने, भू-राजकीय बदल आणि वित्तीय बाजारातील अस्थिरतेद्वारे परिभाषित जगात, मालमत्ता वाटप ही यशस्वी गुंतवणुकीचा आधारस्तंभ आहे. इक्विटी आणि रोखे त्याचा कमी सहसंबंध, महागाईशी लढण्याची क्षमता, बाजारातील अस्थिरतेदरम्यान लवचीकता आणि चलन अवमूल्यनापासून संरक्षण यामुळे ते चांगल्या पोर्टफोलिओचा एक अपरिहार्य घटक बनते.

सोने नेहमीच दरवर्षी सर्वोत्तम कामगिरी करणारी मालमत्ता नसली तरी ते मौल्यवान आहे. त्याचा उद्देश इतर सर्व गोष्टींपेक्षा चांगली कामगिरी करणे नाही – जेव्हा इतर मालमत्ता संघर्ष करतात तेव्हा पोर्टफोलिओ स्थिर राखणे आवश्यक आहे. ‘गोल्ड ईटीएफ’ असो किंवा ‘मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड’ असो, सुमारे १०-२० टक्क्यांच्या शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

(लेखक द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)