Gold Investment Tips : जेव्हा जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था डगमगायला लागते, तेव्हा सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग म्हणून जगभरातील गुंतवणूकदारांची पावलं सोन्याकडे वळतात. गेल्या काही काळात भारतासह अनेक मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी केलेला सोन्याचा साठा याचेच द्योतक आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात सोन्याने पुन्हा एकदा चर्चेत स्थान मिळवले आहे. महागाई आणि चलनाचे घटते मूल्य यांविरुद्ध ‘ढाल’ म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. मात्र, सोन्याचे भाव ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर असताना, आता गुंतवणूक करावी का? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे.
सोन्यात गुंतवणूक का करावी?
सोन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही सरकार किंवा कॉर्पोरेट संस्थेच्या कामगिरीवर अवलंबून नाही. जेव्हा डॉलर किंवा पाउंडसारख्या चलनांची खरेदी क्षमता घटते, तेव्हा सोने तुमच्या मालमत्तेचे मूल्य टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच, शेअर बाजार आणि कर्ज रोखे यांच्याशी सोन्याचा संबंध व्यस्त असल्याने, ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एक उत्तम संतुलन राखते. सोनं महागाईपासून संरक्षण करते आणि मंदीच्या काळात बचाव करते (उदा. २०२० च्या कोविडच्या काळात ६ महिन्यांत २७% वाढ झाली), तर सेन्सेक्स आर्थिक तेजीच्या काळात तेजीत असतो, पण तो अधिक अस्थिर असतो.
पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा वाटा किती असावा?
सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आणि ‘मेरी माइंड’चे सह-संस्थापक अरिजीत सेन यांच्या मते, सोन्याकडे केवळ संरक्षणात्मक गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे. एका संतुलित पोर्टफोलिओमध्ये सोन्याची हिस्सेदारी ५ ते १० टक्क्यांच्या दरम्यान असावी. गरजेपेक्षा जास्त सोन्यात केलेली गुंतवणूक दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या क्षमतेला मारक ठरू शकते, कारण सोने इतर साधनांच्या (उदा. शेअर्स) तुलनेत नेहमीच जास्त परतावा देत नाही. गेल्या १० वर्षातील सोने आणि शेअर बाजार (सेन्सेक्स/निफ्टी ५०) यांची तुलना पाहिली तर सोन्याने जवळपास १८० टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या दोन वर्षातील अस्थिरता असूनही शेअर बाजाराने २३४ टक्क्यांपर्यंत परतावा देऊन सोन्याला मागे टाकले आहे.
गुंतवणुकीसाठी ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ला पर्याय काय?
काही काळापूर्वी ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ हा सोन्यातील गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग मानला जात होता. सरकारची गॅरंटी, २.५% वार्षिक व्याज आणि करमुक्त नफा यामुळे गुंतवणूकदार तिकडे वळायचे. मात्र, आता नवीन एसजीबी सिरीज येणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांना नवीन पर्याय शोधावे लागत आहेत. सध्या सोन्याचे भाव चढे असल्याने एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणे टाळावे. त्याऐवजी गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून हप्त्या-हप्त्याने गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
खरेदीची हीच ‘योग्य’ वेळ आहे का?
एकीकडे जागतिक मध्यवर्ती बँकांकडून सोन्याचा साठा वाढवला जात आहे, तर दुसरीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या किमती चढे आहेत. जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे प्रमाण ५ टक्क्यांहून कमी असेल, तर सध्याच्या पातळीवर थोडी गुंतवणूक करण्यास हरकत नाही. मात्र, ‘स्ट्रॅगर्ड एन्ट्री’ म्हणजेच टप्प्याटप्प्याने केलेली खरेदी तुम्हाला बाजारातील चढ-उतारांपासून वाचवेल आणि दीर्घकाळात सरासरी खरेदी किंमत कमी ठेवण्यास मदत करेल.
(यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
