सचिन सावरीकर

Dhantrayodashi Gold Purchase : अमेरिकन डॉलरमध्ये मोजल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किंमतींनी जानेवारी २०२६ च्या उत्तरार्धात प्रति औंस जवळपास ५,६०० डॉलर इतका उच्चांकी विक्रमी दर गाठला होता. १६ ऑक्टोबरपर्यंत स्पॉट गोल्ड (प्रत्यक्ष सोन्याचा भाव) सुमारे ४,१७९ डॉलरवर आला होता. हा दर उच्चांकापासून जवळपास २५ टक्क्यांनी कमी होता. नऊ महिन्यांपूर्वी सोन्याच्या तेजीचे कौतुक करणाऱ्या मीडियाच्या हेडलाईन्स आता बुल मार्केट संपले का, असा प्रश्न विचारत आहेत.

एसोचॅम संघटनेने एप्रिल २०२६ मध्ये भारतीय कुटुंबांकडे जवळपास पाच ट्रिलियन डॉलर (५ लाख कोटी डॉलर) मूल्याचे सोने आहे आणि ते जगातील शीर्ष १० मध्यवर्ती बँकांच्या एकत्रित सोन्यापेक्षाही जास्त आहे, असा अंदाज वर्तविला होता. सोने हे भारताच्या बचत करण्याच्या पद्धतीत अगदी घट्ट रुजलेले आहे आणि धनत्रयोदशी जवळ आली की, सोने खरेदी करण्याचा निर्णय प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या मनात येतो.

दरातील घसरणीमुळे सोने अधिक आकर्षक बनले आहे. घसरणीमागील दबाव आता कमी होत आहे, अशी अर्थ भारत’ची धारणा आहे. दीर्घकालीन दृष्टिकोन असलेल्या खरेदीदारांनी सोने खरेदी सुरूच ठेवली आहे आणि जागतिक स्तरावरील भारतीयांकडे आता ‘गिफ्ट सिटी’च्या माध्यमातून प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याचा अतिरिक्त पर्यायही उपलब्ध झालेला आहे.

सोन्याचे भाव का घसरले आणि तो दबाव का कमी होत आहे?

अमेरिकेच्या सरकारी रोख्यांवरील वाढणारे परतावे हा सोन्यासाठी एक मोठा अडथळा ठरलेला आहे. जानेवारीच्या उत्तरार्धात सोन्याचा भाव उच्चांकावर असताना, १० वर्षांच्या अमेरिकी ट्रेझरीचा परतावा सुमारे ४.२४ टक्के होता. ५ ऑक्टोबरपर्यंत तो वाढून ५.३१ टक्क्यांवर बंद झाला आणि १० वर्षांचा चलनवाढ-संरक्षित परतावा २.९२ टक्क्यांवर पोहोचला. हा परतावा २००८ मधील त्याच्या विक्रमाच्या जवळ होता. व्याज न देणाऱ्या सोन्यासारख्या मालमत्तेसाठी, गेल्या जवळपास दोन दशकांमधील हा सर्वाधिक धारणा खर्च राहिलेला आहे.

चलनवाढ-संरक्षित परताव्याने नवीन उच्चांक गाठलेला असतानाही, सोन्याने तो धक्का उत्तम प्रकारे पचवला आहे आणि जूनच्या अखेरीस ४,००० डॉलरपेक्षा थोड्या कमी असलेल्या आपल्या नीचांकी पातळीवर भाव टिकवून ठेवला आहे. १६ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्याने काहीसा दिलासा दिला आहे. सप्टेंबर महिन्यासाठी अमेरिकेतील महागाईचा दर अपेक्षापेक्षा जास्त म्हणजे ३.७ टक्के असूनही, १० वर्षांचा परतावा ५.३३ टक्क्यांपर्यंत उसळून पुन्हा ५.०९ टक्क्यांपर्यंत खाली आला; ही वर्षभरातील एका आठवड्यातील सर्वात मोठी घसरण होती. वास्तविक परताव्यातील प्रत्येक घसरण सोने बाळगण्याचा खर्च कमी करते.

दीर्घकालीन दृष्टिकोन असलेल्या खरेदीदारांनी अद्यापही सोने बाजाराकडे पाठ फिरवलेली नाही. दर घसरत असताना २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत मध्यवर्ती बँकांनी एकूण २८९ टन सोन्याची खरेदी केली आणि ती दुसऱ्या तिमाहीतील आतापर्यंतची विक्रमी खरेदी ठरली. ही खरेदी प्रामुख्याने पोलंड आणि चीनने केली. पहिल्या तिमाहीच्या आकडेवारीत मोठ्या घसरणीचा सुधारित अंदाज जागतिक सुवर्ण परिषदेने व्यक्त केला असतानाही आगामी वर्षात मध्यवर्ती बँकांकडून मजबूत मागणी राहील, अशी शक्यता पुन्हा वर्तवली आहे. भारतात सप्टेंबर महिन्यात सोने ईटीएफमध्ये ४४५१ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आणि त्यामुळे या वर्षातील आतापर्यंतची एकूण गुंतवणूक २०२५ मधील एकूण गुंतवणूकीच्याही पुढे निघून गेली आहे.

शिस्तबद्ध दृष्टिकोन
कोणत्याही मल्टी-ॲसेट ॲलोकेशन म्हणजेच बहु-मालमत्ता वाटप धोरणामध्ये सोने ही मालमत्ता महत्त्वाची भूमिका बजावते. सोने हा घटक संपूर्ण पोर्टफोलिओमधील चढ-उतार कमी करते आणि जोखीम-समायोजित चांगला परतावा मिळवून देण्यास मदत करते. त्यामुळे, सोन्यामध्ये किती गुंतवणूक केली पाहिजे? हा आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो. कारण व्याज किंवा लाभांश कमावणाऱ्या कर्जरोखे किंवा समभागांप्रमाणे सोने स्वतःहून काहीही परतावा/व्याज देत नाही.

गुंतवणूकदारांची आधीपासून सोन्यात असलेली गुंतवणूक, उद्दिष्टे आणि अस्थिरता पचविण्याची ताकद यावर सोन्यात किती गुंतवणूक केली पाहिजे, हे अवलंबून असते. बहुतांश वैविध्यपूर्ण गुंतवणूकदारांसाठी, आर्थिक मालमत्तेच्या १० ते १५ टक्के हा एक योग्य रणनीतिक गुंतवणूक टप्पा मी मानतो. एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीत सोन्यामधील आपली गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करणे अधिक फायदेशीर ठरते. योग्य कालावधीच्या एसआयपीद्वारे हे उद्दीष्ट सहज साध्य करता येते.

सोने कुठे ठेवले आहे हे महत्त्वाचे असते?

गुंतवणूकदारांसाठी, प्रत्येक पारंपारिक मार्गामध्ये काही ना काही तडजोड करावी लागते. दागिन्यांवर घडणावळ खर्च आणि शुद्धतेचा धोका असतो आणि त्यामुळे ते विकताना त्यात हे घटक विचारात घेतले जाऊन त्यानुसार कपात केली जाते. परिणामी दागिन्यांची विक्री खर्चिक ठरते. भारताच्या देशांतर्गत बाजारात खरेदी केलेले सोने रुपयांमध्ये मोजले जाते आणि त्यावर आंतरराष्ट्रीय दरापेक्षा जास्त आयात शुल्क लागू होते.

गिफ्ट सिटीत आंतरराष्ट्रीय किंमतीनुसार सोन्याची केली जाणारी खरेदी, गुंतवणूक मूल्याइतका प्रत्यक्ष सोन्याचा साठा आणि भारतातच सुरक्षितरित्या सोन्याचा केला जाणारा साठा या साऱ्या घटकांचा मिलाफ गिफ्टसिटीत साधला जातो. २०२२ मध्ये सुरू झालेल्या इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज (आयआयबीएक्स) वर लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (एलबीएमए) च्या मापदंडांनुसार सोन्याचा आंतरराष्ट्रीय डॉलर किंमतींतच व्यवहार केला जातो आणि ते गिफ्टसिटीमध्ये विमाकवच असलेल्या तिजोऱ्यांमध्ये ठेवले जाते.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) च्या २०२६ च्या नव्या नियमांमुळे फंड व्यवस्थापक आता गिफ्ट सिटीमधील सोन्यात अधिकृतपणे गुंतवणूक करू शकतात. यामुळे सामान्य गुंतवणूकदारांच्या पैशांना सरकारी नियमांचे आणि संस्थात्मक देखरेखीचे कडक संरक्षण मिळते. एखादी व्यक्ती स्वतः सोन्याचे बिस्किट किंवा बार विकत घेते, तेव्हा लॉकरचा खर्च, विमा आणि शुद्धतेची काळजी त्याला स्वतः घ्यावी लागते. फंडच्या माध्यमातून ही सर्व काळजी अत्यंत कमी खर्चात आणि व्यावहारिक पद्धतीने घेतली जाते. हे फंड आंतरराष्ट्रीय मजबूत चलनामध्ये (उदा. डॉलर) असल्याने, भविष्यात जर भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाला किंवा घसरला, तर त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान न होता उलट अतिरिक्त फायदा/संरक्षण मिळते.

धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर, १६ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय सोन्याचे भाव त्यांच्या जानेवारीतील उच्चांकावरून सुमारे २५ टक्क्यांनी खाली आलेले आहे. ट्रेझरी यील्ड्स अर्थात सरकारी कर्जरोख्यांचा परतावा त्यांच्या उच्चांकावरून पुन्हा खाली आला आहे आणि जगातील मध्यवर्ती बँकांकडून सोने खरेदी अद्यापही सुरूच आहे. दीर्घकालीन दृष्टिकोन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी, टप्प्याटप्प्याने आपली गुंतवणूक वाढवण्यासाठी सध्याची स्थिती अतिशय योग्य आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे वित्तीय केंद्र उभे केल्याने जागतिक गुंतवणूकदार जागतिक दरात तेथे प्रत्यक्ष सोने खरेदी करू शकतात, हे दाखवून देण्याची भारतासाठी सुवर्णसंधी आहे.

लेखक अर्थ भारत इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स आयएफएससी एलएलपी संस्थापक आणि ग्रुप सीईओ आहेत.