भांडवली बाजारात गेल्या काही सत्रात सेन्सेक्स नवीन उच्चांकी शिखर गाठतो आहे, तिथून पुन्हा त्यात किंचित घसरण होते आणि पुन्हा सेन्सेक्स नवीन शिखराला स्पर्श करतो. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही विक्रमी उच्चांकाच्या जवळ आहेत. हा लेख लिहीत असताना मागील वर्षभरात सेन्सेक्सने २५.७२ टक्के, बीएसई मिडकॅपने ५८.३२ आणि बीएसई स्मॉलकॅपने ५४.८७ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी ज्यांनी नफावसुलीच्या निमित्ताने बाजारातून गुंतवणूक काढून घेतली, त्यांना ४ जूनचा अपवाद वगळता बाजाराने गुंतवणुकीची संधी दिलेली नाही. म्हणूनच बाजारात गुंतवणुकीसाठी वेळ साधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, ‘जाणत्या जनांनी’ गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून आज शिफारस केलेल्या उभरत्या लार्ज अँण्ड मिडकॅप फंडात गुंतवणूक करून आपली वित्तीय ध्येये साध्य करावी, हा या लेखाचा उद्देश आहे.

पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी हा फंड भविष्यात १२ ते १५ टक्के संभाव्य परतावा देऊ शकेल अशी शक्यता असल्याने हा फंड एक आशादायक पर्याय आहे. मागील तीन वर्षांच्या चलत सरासरीनुसार एक साधारण कामगिरी असूनही ‘रिस्क रिवॉर्ड परफॉर्मर’ म्हणून या फंडाची निवड केली आहे. या ‘बडोदा बीएनपी पारिबा लार्ज अँण्ड मिडकॅप फंडा’ने मागील शुक्रवारी, म्हणजे ४ सप्टेंबर रोजी कारकीर्दीची पाच वर्षे पूर्ण केली आहेत.

आणखी वाचा-अबब…भयंकर शिक्षा ! (भाग १)

लार्ज आणि मिडकॅप फंडांना त्यांच्या ७० टक्के पोर्टफोलिओ हा आघाडीच्या २५० कंपन्यांत गुंतवावा लागतो. (लार्ज कॅपमध्ये ३५ टक्के आणि मिड-कॅपमध्ये ३५ टक्के). ‘बीएसई २५० लार्ज ॲण्ड मिड कॅप टीआरआय’ हा फंडाचा मानदंड असून, संजय चावला हे या फंडाचे सुरुवातीपासूनचे नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत. ते मानदंड निर्देशांकसापेक्ष जागरूक निधी व्यवस्थापक असून त्यांना ३० वर्षांचा समभाग संशोधन आणि निधी व्यवस्थापनाचा अनुभव आहे. गुंतवणुकीत ते कोणतेही साहसी निर्णय घेत नाहीत. परंतु रिस्क रिवॉर्ड विचार करून नफा देणारे कॉल घेण्यास ते कचरत नाहीत. हा फंड कंपन्यांच्या निवडीसाठी मिडकॅपसाठी बॉटम-अप आणि लार्ज कॅपसाठी टॉप-डाउन रणनीतीचा अवलंब करतात.

बदोडा बीएनपी पारिबा लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाची सुरुवात करोना महासाथ ऐन भरात असताना, म्हणजेच ४ सप्टेंबर २०२० रोजी झाली. सुरुवातीपासून या फंडाने रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार वार्षिक २९.३२ टक्के परतावा दिला आहे. सुरुवातीपासून या फंडात ५,००० रुपयांची एसआयपी केलेल्या गुंतवणूकदाराला त्याच्या २,४०,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य ४,२१,०७० झाले असून परताव्याच्या दर २९.९४ टक्के आहे. फंडाच्या पहिल्या जाहीर झालेल्या म्हणजेच ३० सप्टेंबर २०२० च्या पोर्टफोलिओनुसार, ६० टक्क्यांहून अधिक गुंतवणुका लार्ज कॅप होत्या. मिड कॅपची मात्रा ३७ टक्के होती. जानेवारी २०२१ पासून निधी व्यवस्थापकांनी मिड-कॅपमध्ये वाढ करणे सुरू केले. ताज्या आकडेवारीनुसार लार्जकॅप आणि मिडकॅप यांची समान मात्रा आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत मालमत्तेच्या ४५.३४ टक्के लार्ज कॅप आणि ४५.८५ टक्के मिड कॅप, तर ४.६ टक्के स्मॉलकॅप आणि उर्वरित रोकडसंलग्न गुंतवणुका आहेत. गेल्या एका वर्षात फंडाने मिड आणि स्मॉल-कॅपची मात्रा वाढवून, लार्ज-कॅप गुंतवणुका कमी केल्या होत्या. आता पुन्हा मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे प्रमाण कमी करून निधी व्यवस्थापक लार्जकॅपचे प्रमाण वाढवताना दिसत आहेत.

आणखी वाचा-आधुनिक किराणा बाजाराचा नादस्वर : शॉपिंग… गेट सेट गो!

फंडाची कारकीर्द पाच वर्षाची असल्याने या फंडाची निवड करताना केवळ तीन वर्षांच्या चलत सरासरी परताव्याचा विचार केला आहे. फंडाने ‘बीएसई २५० लार्ज ॲण्ड मिड कॅप टीआरआय’ला १०० टक्के वेळा मागे टाकले आहे, कदाचित फंडाची कारकीर्द केवळ पाच वर्षाची असल्यामुळे हे असू शकेल. परंतु म्हणून या फंड गटात अशी कामगिरी करणारे जे मोजके फंड आहेत, त्यापैकी हा एक फंड आहे. ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे असे म्हणता आले नाही तरी, मागील पाच वर्षात तीन वर्षाच्या चलत सरासरीनुसार किमान २०.२२ टक्के आणि कमाल २५.४८ टक्के वार्षिक परतावा त्याने दिला आहे. मागील पाच वर्षाचा विचार करता तीन वर्षे चलत सरासरीचे ४३५ डेटा पॉइंट्स मिळाले. हे डेटा पॉईंट्स स्पष्टपणे सूचित करतात की, लार्ज ॲण्ड मिड कॅप फंड गटात हा फंड एक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फंड आहे. फंडाचा ‘अपसाइड कॅप्चर रेशो’ १०२.४६ असल्याने तेजीत हा फंड ‘बीएसई २५० लार्ज ॲण्ड मिड कॅप टीआरआय’पेक्षा खूप अधिक जास्त वाढू शकत नाही. विशेष म्हणजे, ‘डाउनसाइड कॅप्चर रेशो केवळ’ ९२.०८ आहे, हे असे सूचित करते की, बाजार घसरणीदरम्यान फंडाची एनएव्ही बेंचमार्कसापेक्षा खूप कमी होत नाही.

फंडाच्या गुंतवणुकीत क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, लार्सन ॲण्ड टुब्रो, एनएचपीसी या आघाडीच्या पाच गुंतवणुका आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत खासगी बँका, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य निगा, वाहन आणि वाहन पूरक उत्पादने, सेवा ही आघाडीची उद्योग क्षेत्रे आहेत. फंडाच्या सुरुवातीपासून निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीत एकूण ५२-५५ कंपन्यांचा समावेश केला आहे. या कंपन्या पोर्टफोलिओला वैविध्य प्रदान करतात. ‘ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस’ हे फंडाच्या गुंतवणुकीचे सूत्र आहे. प्रत्येक फंड गटात फंडामध्ये सामान्यतः दोन किंवा तीन फंड असतात जे दहा वर्षे त्या फंड गटात आपला दबदबा राखून असतात. या फंडाची मालमत्ता जरी १,३३८ कोटी रुपये असली तरी भविष्यात या फंड गटात आपला दबदबा निर्माण करेल किंवा एक सातत्य राखणारा फंड म्हणून उदयास येईल. अनेक गुंतवणूकदार मोठी एनएव्ही असलेल्या फंडात गुंतवणूक करणे टाळतात, अशा गुंतवणूकदारासाठी ही शिफारस आहे. भविष्यात सातत्य राखण्याची शक्यता असलेला हा फंड आहे. गुंतवणूकदार किमान पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी या फंडाचा एकरकमी गुंतवणुकीसाठी विचार करू शकतात किंवा पाच वर्षासाठी ‘एसआयपी’ करू शकतात.