कौस्तुभ जोशी
HDFC Bank Share Mutual Fund Holding : खासगी क्षेत्रातील एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्यातील महाविलीनीकरणानंतर गेल्या दोन वर्षांपासून हा शेअर गुंतवणूकदारांची निराशाच करत आला आहे. अलीकडेच बँकेचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक शशिधर जगदीशन यांनी आपल्याला पुन्हा पदभार घेण्यात रस नाही, असे जाहीर केल्याने एचडीएफसी बँकेच्या शेअरच्या भवितव्याबद्दल शंकांना पुन्हा उधाण आलं. या निमित्ताने जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले त्यातील एक म्हणजे ‘अजूनही म्युच्युअल फंड एचडीएफसी बँकेच्या समभागांमध्ये गुंतवणूक कायम का ठेवत आहेत?’
निफ्टीमधील सर्वात भाग एक असलेला एचडीएफसी बँक जवळपास सगळ्या लार्ज आणि फ्लेक्झीकॅप फंडांच्या पोर्टफोलिओमधील महत्त्वाचा शेअर आहे. सगळीकडून नकारात्मक वृत्त येत असतानाही पोर्टफोलिओमधील शेअरचा वाटा का कमी होत नाही? याची यामागे संभाव्य दोन कारणे आहेत; पहिले कारण म्हणजे जरी एक दोन वादग्रस्त निर्णयामुळे एचडीएफसी बँकेच्या कार्यक्षमतेवर, व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले असले तरीही भारतातील आकाराने सगळ्यात मोठी खासगी बँक आहे. जी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. नफ्याचे प्रमाण आणि एकूण नफा यामध्ये खूप घसरण झाली आहे असे नाही. तसेच ‘टू बिग टू फेल’ म्हणजेच अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची बँक असल्याने तिला धोका नाही. म्हणून आपल्या पोर्टफोलिओमध्ये हा शेअर असावा असे निधी व्यवस्थापकांना वाटते. दुसरे कारण म्हणजे एचडीएफसी बँकेत प्रवर्तकांचे प्रमाण (प्रमोटर) नसून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून या गुंतवणूकदारांनी एचडीएफसी बँकेतील हिस्सा विकण्याचे धोरण राबवले आहे, म्हणून तो शेअर पडतो आहे. जेव्हा हे गुंतवणूकदार पुन्हा ‘यू-टर्न’ घेऊन बाजारात परत येतील तेव्हा एचडीएफसी बँकेचा समभाग उसळी घेईल म्हणून तो शेअर पोर्टफोलिओमध्ये कायम ठेवला जात आहे.
गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड घराणे, गुंतवणूक कुठे आणि कसे करतात याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. सेबीच्या निर्देशानुसार फंडाचे प्रकार ठरलेले असले तरीही प्रत्येक फंड कंपनीचा स्वतःचा गुंतवणुकीचा ‘पॅटर्न’ असतो, ठोकताळा असतो. अचानकपणे पोर्टफोलिओमध्ये बदल केले जात नाहीत. पण ज्यावेळी म्युच्युअल फंड कंपन्या आपली धोरणे बदलतात तेव्हा सावध गुंतवणूकदार म्हणून आपण त्याचा अभ्यास करायला हवा.
पोर्टफोलिओतील ‘टॉप टेन’
प्रत्येक फंडाने आपल्या एकूण फंड गंगाजळीपैकी सर्वाधिक रक्कम कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवली आहे आणि त्यातून आघाडीचे दहा शेअर एकूण पोर्टफोलिओच्या किती टक्के आहेत याचा अभ्यास करावा. म्हणजेच एखाद्या फंड योजनेत एकूण ४० कंपन्यांचे शेअर असले तर त्यापैकी आघाडीचे दहा शेअर पोर्टफोलिओचा ७० टक्के भाग असतील तर ते धोकादायक आहे. त्यात जोखीम जास्त आहे. कारण यातील प्रमुख शेअर कोलमडले तर एकूण फंड योजनेवर त्याचा परिणाम होतो.
लार्ज मिड आणि स्मॉलचे प्रमाण
निधी व्यवस्थापकाने लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप यामध्ये किती पैसे गुंतवायचे ठरवले आहे? विशेषतः फ्लेक्झीकॅप फंडात निधी व्यवस्थापकाला याचे अधिक स्वातंत्र्य मिळते. जर बाजाराचा रोख मिडकॅपकडे असेल आणि एखादा निधी व्यवस्थापक लार्जकॅप शेअरमध्ये आपले गुंतवणुकीचे प्रमाण वाढवत असेल तर तो त्याचा ‘कॉन्ट्रा कॉल’ आहे का ‘फसलेला कॉल’ आहे याचा विचार करावा. याचे ताजे उदाहरण म्हणजे गेल्या दहा वर्षातील गुंतवणूकदारांच्या मनात भरलेला पराग पारीख फ्लेक्झीकॅप फंड. मिडकॅपकडून लार्ज कॅपकडे झुकत आहे. पण त्याचे परिणाम परताव्यावर होताना दिसतात.
क्षेत्र अभ्यास
निधी व्यवस्थापक गुंतवणूक करताना कोणत्या क्षेत्रात पोर्टफोलिओतील शेअर्सची गुंतवणूक वाढवत आहे? याचा विचार महत्त्वाचा ठरतो. ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ ही गेल्या दहा वर्षात गाजलेली ‘थीम’ ठरली. व्यापार युद्धाचे ढग गडद झाल्यावर फार्मा कंपन्यांवर त्याचा परिणाम होईल की काय? अशी चर्चा होत असतानाच गेल्या वर्षभरात फार्मा फंडांनी अनपेक्षित रित्या चांगला परतावा दिला आहे. अशावेळी तुमच्या पोर्टफोलिओतील फंड योजनेत कोणत्या क्षेत्रात पैसे गुंतवलेले आहेत व त्याचे प्रमाण किती आहे हे तुम्ही तपासून पाहिले पाहिजे.
‘एन्ट्री-एक्झिट’
काही वेळा काही शेअरमधून निधी व्यवस्थापक पूर्णपणे ‘एक्झिट’ म्हणजे बाहेर पडतो, अर्थात सगळे शेअर विकून पोर्टफोलिओमधून त्या कंपन्यांचे शेअर काढले जातात. असे करण्यामागे काही विशेष उद्देश आहे का? व तो काय असेल याचा विचार व्हायला हवा. कधीकाळी काही कंपन्यांचे शेअर वेगवेगळ्या फंडांमध्ये अचानकपणे नव्याने विकत घेतलेले दिसतात. विशेषतः बाजारात आयपीओ येतात त्यावेळी घेतलेले शेअर किती काळपर्यंत टिकतात हे समजून घ्यायला हवे. प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीकडून दर महिन्याला शेअर बाजार, रोखे बाजार यावर प्रसिद्धीपत्रक काढले जाते. त्याचा अभ्यास व्हायला हवा. म्युच्युअल फंडातील निर्णय कुणीतरी सांगितले म्हणून किंवा ऐकीव बातमीवरून होत नसतात. अशावेळी बाजारातील नव्या आणि जुन्या सर्वच गुंतवणूकदारांनी फंडांच्या गुंतवणूक रणनीतीचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
- लेखक आर्थिक नियोजनकार आणि अर्थ-अभ्यासक आहेत
joshikd28@gmail.com
